शनिवार, १९ सप्टेंबर, २०१५

गौराई माझी लाडाची लाडाची गं...


आईने आणि लोकपरंपरेने सांगितलेल्या गाण्यांच्या आधारे दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र टाइम्समध्ये गौरीवर लिहिलेला हा लेख... आज गौरीच्या आगमनामुळे त्याची आठवण झाली इतकंच!
आमच्या गावच्या घरी येणारी गौर


गणरायाचं थाटामाटात आगमन झालं, त्याची प्रतिष्ठापना झाली; तरी घरोघरच्या मायबाईला खरी ओढ असते, ती गौराईच्या येण्याची. वर्षभर ही पोर कुठे नजरेला पडत नाही. तिची ख्याली-खुशाली कळत नाही. त्यामुळे माहेरवासाला हक्काने येण्याचा तिचा दिवस जवळ आला की, मायबाईचा जीव थाऱ्यावर राहत नाही. लेकीसाठी कायकाय करता येईल, याचे मनसुबे रचण्यातच तिचा सारा वेळ निघून जातो.
...
आणि लेकाच्या आगमनाच्या पाठोपाठ धीर धरवल्यासारखी गौरबाय येतेच अचानक!
येताना येते ती लक्ष्मीच्या पावलांनी. माहेरचं घर-दार उजळून टाकण्यासाठी. पण माहेरी येण्यासाठी तिला किती अन् काय सोसावं लागतं, ते तिचं तिलाच ठाऊक! कुठलाही सणवार आला की, आजूबाजूच्या सया लगेच निघून जातात माहेरी. गौरबाय- पार्वती मात्र कायम सासरीच कामाला जुंपलेली. सासू-नवरा तिला सहजासहजी सोडत नाहीत. म्हणूनच मग हक्काच्या माहेरवासाची वाट बघत बसते. श्रावण-भाद्रपदात तरी तीन दिवस जाता यावं, म्हणून पार ज्येष्ठातच नवऱ्याच्या खनपटीला बसते आणि माहेरी जायला रजा द्या म्हणते. पण नवरा कसला तर्कट. तो गौराईला थोडंच असं पटकन सोडणार असतो. तो तिला कामालाच लावतो. गौराई म्हणजे पार्वती आणि तिचा नवरा म्हणजेच महादेवात, ज्येष्ठापासून सुरू झालेला हा झगडा लोकरहाटीतल्या आयाबायांनी संवादगीताच्या माध्यमातून चांगलाच रंगवला आहे -
देवा इश्वरा द्या मला रजा, जायाला माझ्या माहेरा हो
एवढा डोंगर साफ कर पार्वती, मग जा तू तुझ्या माहेरा गं
एवढा डोंगर साफ केला देवा, जाते मी माझ्या माहेरा हो
एवढी पेरणी कर गं पार्वती, मग जा तुझ्या माहेरा गं
एवढी पेरणी केली मी देवा, जाते मी माझ्या माहेरा हो
एवढी लावणी कर गं पार्वती, मग जा तू तुझ्या माहेरा गं
एवढी लावणी केली मी देवा, जाते मी माझ्या माहेरा हो...
...
पण महादेव कसला खट्याळ. एवढी विनवणी करूनसुध्दा तो गौराईला सोडत नाही. तिच्याकडून निंदणी-खुरपणी अशी सगळी कामं करून घेतो. ही सगळी कामं गौराई गपगुमान करते. तिने पेरलेलं बी रुजतं, वाढतं. शिवार डोलायला लागतं. संपली एकदाची शेतीची कामं म्हणत परत गौराई माहेरी जायची परवानगी मागते. पण गौराईला सोडायला महादेव राजी होत नाही तो नाहीच. आता मात्र गौराईचा धीर सुटतो. ती फणकारते, रागावते. मग थोडं नमतं घेऊन महादेव तिला राजी करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तिला लालूचही दाखवतो -
सोन्याचं सुपलं घेईन पार्वती, नको जाऊ तू तुझ्या माहेरा गं...
पण पार्वतीला कसलं आलंय सोन्याच्या सुपाचं कवतिक? सोन्यासारखं माहेर सोडून ती या स्मशानजोग्याच्या मागे आलेली. तिला नाहीच पडत भूल सोन्याच्या सुपाची नि कसलीही. ती तडक म्हणते-
सोन्याचं सुपलं घेईल माझा बंधु, जाते मी माझ्या माहेरा हो ... आणि जातेच थेट निघून माहेरी. कुणी माघारपणाला यायचीही वाट बघत नाही. कारण आपल्या माहेरी आपलं कौतुक होणार याची तिला खात्रीच असते आणि तसंच होतं. तिच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या मायबायला तिच्या आगमनाची खूण मिळते. ती तिला दारातच उभी करते. लगबगीने घरात जाते. घरातला भाकर-तुकडा आणते नि तिच्यावरून ओवाळून टाकते. तांब्यातल्या पाण्याने तिचे पाय धुते, अलाबला घेते आणि मग अल्लद कुशीत घेतल्यासारखी घरात आणते.
मग कितीतरी वेळ निःशब्दताच असते. मायलेकींचा शब्दाविनाच संवाद सुरू असतो. पण सारं सारं एकमेकींना कळत असतं. गौराईची मूकवेदना सांगताच मायबाईला कळते. तिचं हुर्द आभाळाएवढं होतं. आपल्या आभाळाएवढया पंखाखाली ती लेकीला मिटून घेते. कळतं मायबाईला नवऱ्याबरोबरच सासुनेही केलेला लेकीचा जाच. नवरा माहेरी जायची परवानगी देत नाही म्हणून सासुबाईंना विचारायला जावं, तर त्यांनीच उलट आणखी कामाला लावलेलं. म्हणतात कशा -
कारल्याचं आळं लाव गं पार्वती, मग जा तू तुपल्या माहेरा
कारल्याचं आळं लावलं फुईजी, मी जाते मपल्या माहेरा... आणि कारल्याचा वेळ लावल्यावर तो वाढून त्याची भाजीही खाऊन झाली, तरी लेकीला माहेरी यायची मिळालेली परवानगी. एवढंच कशाला एक दिवस गौराईला उठायला उशीर झाला, तर सासुबाईंनी केवढा त्याचा गहजब केला. खरंतर रात्री कामामुळेच झोपायला झाला होता उशीर. तेव्हा गौराईला पहाटेच्या गार वाऱ्यात लागली निद्रा. पण सासूने नेलं तिच्या नवऱ्याजवळ गाऱ्हाणं. मग चिडलेल्या त्याने काय करावं?
तोडला जी चिंचेचा फोक
त्या फोकाने मार त्याने दिला वो
पार्वतीने झाडला की गुरांचा गोठा
भरल्या वो शेणाच्या पाट्या
...
असं काय काय समजून-उमजून आल्यावर मायबाईच्या जीवाचं पाणीपाणी होतं. लेकीसाठी काय करू नि काय नको, असं तिला होऊन जातं. ती तिला न्हाऊ-माखू घालते. आपल्या नव्या लुगड्याची घडी मोडायला देते. आपले दागिने तर तिच्या अंगावर घालतेच, पण खास तिच्यासाठी केलेला नवा साजही चढवते तिच्या अंगावर.
गौराई बावरूनच जाते या कोडकौतुकाने. तिला ठाऊक असतं, आपल्या मायबाईचं हळवं मन. म्हणूनच अनेक गोष्टी ती उघडही करत नाही. आपल्याला यायला उशीर का झाला ते सांगतच नाही. काहीतरी इकडचं तिकडचं सांगत बसते -
आली आली गवराय येतच हुती
आंब्याच्या वनी गुतली हुती
आंब्याचे आंबे तोडीत हुती
सईच्या वाट्या भरीत हुती
...
तरीही कळायचं ते कळतंच मायबाईला. शेवटी तिच्याच जीवाचा तर गोळा. त्याच्या संवेदना कळल्याशिवाय राहणार आहेत? मग रात्री कुशीत घेऊन झोपते लेकीला. मनात मात्र दुसऱ्या दिवशी लेकीला काय काय खाऊ घालायचं याचेच बेत. त्यातच रात्र सरते. पहाट होते आणि मायबाई कामाला जुंपून घेते. गौराई झोपून उठेपर्यंत मायबाईचा पुरणा-वरणाचा, एकवीस भाज्यांचा स्वयंपाक पूर्णही होतो. एवढंच नाही, गौराईला सामिष भोजन करायचं असेल, तर त्याचीही तयारी केली जाते. अगदी करंदी भरलेल्या सरंग्यांपासून खिम्याच्या करंज्यांपर्यंत. फक्त लेकीने पोटभर जेवावं, एवढीच मायबाईची अपेक्षा असते.
एवढी पक्वान्नं केल्यावर गौराईची दुपार जेवणातच सरते. हे खाऊ की ते खाऊ असं तिला होतं. खरंतर जेवणापेक्षा ते मायबाईने खास आपल्यासाठी रांधलंय, याचंच तिला कौतुक असतं. ती अगदी मनापासून जेवते. एवढं जेवण झाल्यावर ते अंगावरच येतं. मन-शरीर जड होतं. गप्पा मारायला बसल्या बसल्या गौराई पेंगायला लागते. पण मायबाई तिला उठवत नाही. झोपू दे म्हणते. कारण आजची रात्र जागवायची असते.
एव्हाना गौराई आल्याची खबर कानोकानी तिच्या सयापर्यंत गेलेली असते. प्रत्येकीला जेवण उरकून गौराईकडे जाण्याची घाई होते. बघता बघता गौराईकडे माहेरवाशीणींची दाटी होते. झिम्मा-फुगड्या, दिंडे मोडण्यापासून चवळ्या खुटण्यापर्यंतचे सारे नाच होतात. गाण्यांची आवर्तनं तर सुरूच असतात. गौराई देहभान विसरून नाचत असते, गात असते. जणू वर्षभराची ऊर्जाच उरात भरून घेत असते. जाणो सासरी गेल्यावर पुन्हा खेळायला-नाचायला मिळेल मिळेल!
घराच्या एका कोपऱ्यातच उभं राहून मायबाई शांतपणे लेकीचं हे घरभर वावरणं बघत असते. तिच्या समाधानानंच आपलं घर भरलंय याची तिला जाणीव असते. एका डोळ्यात हसू नि एका डोळ्यात आसू ठेवून ती लेकीचं सुख मनात साठवत असते. आता नाचतेय उद्या एव्हाना गेलीपण असेल, असं मनात येतं नि मायबाईचा जीव थरारतो.
तसंच होतं ... गौराईला जागवता जागवता पहाट कधी होते तेही कळत नाही. तिसरा दिवस उजाडतो आणि गौराईच्या पाठवणीची तयारी सुरू होते. घरातल्या कुणाचंच लक्ष थाऱ्यावर नसतं. गौराई आली काय नि चालली काय, असंच साऱ्यांना वाटत असतं. तिने अजून थोडे दिवस राहावं, कोडकौतुक करून घ्यावं, असंच साऱ्यांना वाटत असतं. पण शेवटी ती गौराईच असते. तिलाही आपल्या मान-मर्यादेचं भान असतंच. कितीही राहावंसं वाटलं, तरी ती एक दिवस अधिकचा राहत नाही. कारण तिला माहेर नि सासर दोन्हीकडची गोडी टिकवायची असते. सांधणं हा तिने आपला मनोधर्म मानलेला असतो. म्हणूनच कितीही आग्रह झाला तरी, ती आपल्या मनाचा निग्रह सोडत नाही. मायबाईचा प्रेमाने निरोप घेते. मायबाईलाही कळत असतं, शेवटी आपलीच लेक आहे. म्हणूनच तीही मग आग्रह करत नाही. हात हातात घेऊन स्पर्शातून फक्त एवढाच दिलासा देते - मी आहे तुझ्यासाठी. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते ... असंच जणू तिला सुचवायचं असतं.
...
आणि गौराई आल्यासारखी चालू पडते.
गणेशोत्सवात ती येऊन गेल्यावर प्रश्न पडतो - कोण आलं होतं नेमकं, खड्याची, तेरड्याची, मुखवट्याची किंवा मातीची गौराई की लग्न होऊन सासरी गेलेली आपली लेक?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा