अनागर संस्कृती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अनागर संस्कृती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ५ जुलै, २०१६

आषाढ बिलोरी ऐना…


एकदा का आषाढधारा झडझडून बरसून गेल्या की मग सृष्टीचं, मनामनाचं रुप पालटतं. एक नवी उमेद, नवा उत्साह त्यांना व्यापून उरतो. जणू आषाढाचं सर्जनशीलत्व त्यांच्यात उतरतं. त्यांच्या कल्पनेला-प्रतिभेला नवे धुमारे, नवे पंख फुटतात...
 

केवळ आषाढाच्या भरवशावर संपूर्ण सजीव सृष्टी सारा वैशाखवणवा सहन करते. आषाढ उंबरठ्यावर आहे, हे तिला दिसत असतं. बघता-बघता आषाढउभ्या धारेने कोसळेल आणि आपल्याला न्हाऊ-माखु घालेल याची तिला खात्री असते. खरंतर आषाढाच्या आधी ज्येष्ठच असतो, वैशाखाला बिलगून. पण तो वैशाखाच्या एवढा कह्यात असतो की, त्याचं स्वतंत्र अस्तित्वच जाणवत नाही. वास्तविक रोहिणीसारखी सुरुवातीची पावसाळी नक्षत्र ज्येष्ठातच लागतात. त्यामुळे गावोगावच्या कृषिकर्मांना सुरुवातही ज्येष्ठातच होते. पण जोवर आषाढधारांनी संपूर्ण सृष्टी धुऊन निघत नाही, तोवर सृष्टी आणि भारतीय जनमानसातही चैतन्य संचारत नाही, वैशाखाने आणलेली मरगळ दूर होत नाही. मात्र एकदा का आषाढधारा झडझडून बरसून गेल्या की मग सृष्टीचं, मनामनाचं रुप पालटतं. एक नवी उमेद, नवा उत्साह त्यांना व्यापून उरतो. जणू आषाढाचं सर्जनशीलत्व त्यांच्यात उतरतं. त्यांच्या कल्पनेला-प्रतिभेला नवे धुमारे, नवे पंख फुटतात...
... जसे आषाढाच्या पहिल्या दिवशी कालिदासाच्या प्रतिभेला फुटले होते. कालिदासाच्या मेघदूतातल्या यक्षाला का माहीत नव्हतं, हत्ती जसा मस्तीत डोंगरांना टकरा देतो, तसा आपल्यासमोर डोंगराच्या शिखराला येऊन भिडलेला हा मेघ निर्जीव आहे...! परंतु प्रियाविरहाने व्याकूळ झालेल्या यक्षाला त्या आषाढघनाने भारावून टाकलं. आषढघनांबरोबर आलेल्या आषाढधारांनी त्याला सजर्नत्व बहाल केलं आणि मग... यक्षाने त्या श्यामलसुंदर घननीळालाच बनवला आपल्या निरोप्या. आपला दूत. प्रियेला संदेश घेऊन जाणारा... पाण्याने संपृक्त झालेल्या त्या मेघाला यक्ष म्हणतो-
संतप्तानां त्वमसि शरणं तत्पयोद, प्रियायाः
संदेशं मे हर घनपतिक्रोधविश्लेषितस्य... म्हणजे पाण्याने ओतप्रोत भरलेल्या हे मेघा, मी तुला शरण आलेलो आहे. माझ्यासारख्या विरहाग्नीने पोळणा‍ऱ्यांना तुझाच आसरा आहे. मग नेशील का माझा निरोप? आणि मेघाच्या उत्तराची वाटही न पाहता यक्ष त्या मेघाला आपल्या प्रियेचं वास्तव्य असलेल्या अलकानगरीचा मार्ग सांगायला सुरुवातही करतो. हा मार्ग कसा कुठून-कसा जातो आणि मार्गात मेघाला कोणकोण भेटेल, याचं यक्षाने म्हणजेच कालिदासाने जे अप्रतिम वर्णन केलंय, त्याच्या अनुभूतीसाठी मेघदूत प्रत्यक्षच वाचायला हवं. कारण ते वाचताना केवळ मेघच तो सारा प्रवास करत नाही, त्याच्या सोबती-संगतीने वाचकही प्रवास करतो. मेघदूत वाचताना क्षणभर भारतीय मनालाच विसर पडतो की, मेघ निर्जीव आहे. पण यक्ष आणि पर्यायाने कालिदासाला सुचलेली ही कविकल्पनाच इतकी बहारदार आहे की, ही कविकल्पना भारतीय साहित्यातील चिरंतन-सुंदर कल्पना बनून गेलीय. म्हणूनच तर कालिदासाच्या या कल्पनाविलासाचा मोह कुणाकुणाला पडला नाही? सा‍ऱ्यांनाच पडला. कविकुळातील महोदयांना पडलाच. पण काहीशा रुक्ष क्षेत्रांत काम करणार्यांनाही पडला. मराठीतच मेघदूताचे कितीतरी अनुवाद उपलब्ध आहेत. कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, वसंत बापट, शांता शेळके यांसारख्या महारथींनी हे अनुवाद केलेले आहेतच, पण अर्थशास्त्रज्ञ असलेल्या सी. डी. देशमुखांनाही मेघदूताचा मोह सुटला नाही. त्यांनीही मेघदूताचा नितांतसुंदर अनुवाद केला आहे. पैकी बा.भ. बोरकर यांना तर संस्कृतही येत नव्हतं. पण मेघदूत त्यांच्या मनाला असं भिडलं की, ते त्यात गुरफटतच गेले. त्यांना मेघदूतातील काव्याचा रात्री चैतन्यमय भास व्हायचा आणि सकाळी ते तो कागदावर उतरवून काढायचे. इतके ते मेघदूताशी तादात्म्य पावले होते. कुसुमाग्रजांनी तर मेघदूताविषयी असे उद्गार काढलेत की-
‘एखाद्या निर्जन बेटावर जाताना एकच काव्य बरोबर नेण्याचे जर माझ्यावर बंधन घालण्यात आले तर मी ‘मेघदूत’ या काव्याचीच निवड करेन. कारण रसिकाच्या मनाला अथपासून इतिपर्यंत मंत्रमुग्ध करण्याचे, एक वेगळे भावविश्व त्याच्या सभोवार विणून त्याला उन्मनावस्थेत पोहोचविण्याचे सामर्थ्य मेघदूतात जितके आहे, तितके अन्यत्र आढळणे फार कठीण आहे...’
कालिदासाच्या मेघदूताने भारतीय जनमन असं व्यापून टाकलं आहे. ही किमया त्याच्या प्रतिभेची आहेच. पण त्याची प्रातिभशक्ती जागविणा‍‍‍ऱ्या आषाढाचीही आहे. मेघदूताचा लेखनकाल कुणालाच ठाऊक नाही. जिथे कालिदासाच्या काळाविषयी अजून एकमत झालेलं नाही, तिथे मेघदूत नेमकं कोणत्या काळात (मासात) लिहिलं गेलं, याविषयी सांगणं कठीणच. पण खचितच तो आषाढमास आणि आषाढाचा पहिला दिवस असेल. आषाढाच्या त्या पहिल्याच दिवशी आषाढघनांनी केलेल्या दाटीने कालिदास वेडावून गेला असेल. आषाढ बिलोरी ऐना होऊन कालिदासाच्या तना-मनात उतरला असेल आणि मग सा‍ऱ्या सृष्टीचं प्रतिबिंब त्यात पडून कालिदासाच्या लेखणीतून अलगद शब्द झरले असतील-
आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श... म्हणजे आषाढाच्या पहिल्या दिवशी त्या यक्षाला तो मेघ दिसला, जो एखाद्या हत्तीप्रमाणे पर्वताच्या शिखराला ढुशा देत होता...
आषाढ म्हटला की भारतीय मनाला कालिदासाचं मेघदूत हे असं हटकून आठवतं. त्या मेघदूताचं गारुड अजून कमी झालेलं नाही, होणारही नाही. कारण चेतनगुणोक्ती अलंकाराचं (अचेतनावर सचेतनाचा आरोप करण्याचं) एवढं सुंदर उदाहरण भारतीय साहित्यात दुसरं नाही. म्हणूनच आषाढ म्हटला की, मेघदूत आठवतं आणि मेघदूताचा उल्लेख निघाला की आषाढसरी बरसायला सुरुवात होते.
अन् तरीही आषाढ लागला की थोडंसं भानावरही यावं लागतं. कारण कालिदासाला आषाढाच्या पहिल्याच दिवशी पाऊस भेटला, तसा इथल्या शेतकरी राजाला भेटेलच असं नाही. अन् कधीकधी तर पहिल्याच दिवशी नाही, आषाढ सरत आला तरी भेटत नाही. शेतकरी राजाच नव्हे, तर शहरांतील लोकही आकाशाकडे पाहत बसतात. वरून जाणारे कोरडे ढग दिसले की चुकचुकतात. शेतक‍ऱ्याला शेतीच्या पाण्याची चिंता, तर शहरी माणसाला रोजच्या वापरासाठीच्या पाण्याची.
तरीही आषाढ लागूनही पावसाने ओढ दिली की, धास्तावतो तो भारतीय शेतकरीच... कारण त्याचा गावगाडाच पावसावर आणि त्यातून पिकणा‍ऱ्या शेतीवर अवलंबून असतो. आज शहरातला माणूस नेट-इंटरनेटसारख्या सोयीसुविधांत गुरफटून गेला असेल कदाचित... पण भूक लागली की त्याला अन्नच खावं लागतं. अन्नाविना जगण्याचं तंत्र अजून तरी विकसीत व्हायचंय. निदान तोपर्यत तरी भारतातल्या शेतक‍ऱ्याने आपल्या खळ्यात पिकवलेल्या धनधान्यावरच त्याला अवलंबून राहावं लागणार आहे. आणि भारतातली ऐंशी टक्के जनता अजूनही ग्रामीण भागातच आहे. साहजिकच पावसाची ओढ त्याला दुखावते, चिंताग्रस्त करते. जणू भूमिपुत्राच्या गळ्यालाच फास लागतो. म्हणूनच आषाढाला सुरुवात झाल्यापासूनच तो पाऊसदेवाला आळवायला सुरुवात करतो. जमीन सारवतो, जमिनीवर सुरेखशी रांगोळी रेखतो आणि एका भांड्यात पाणी घेऊन ते सारवलेल्या-सजवलेल्या भूमीवर ठेऊन त्या पाण्याची पूजा करतो. भांड्यातलं हे पाणी त्याच्यासाठी आकाशातलं सर्जनशील पाणीच असतं. ते पावसाच्या रुपाने धरतीवर महामूर बरसावं म्हणूनच त्याची ही पूजा चाललेली असते. कधीतरी वरुणदेव त्याची ही पूजा मान्य करतो आणि एखाद्या साळसूद मुलासारखा धरतीवर बरसतो. पण कधी कधी तो लहरी, हट्टी मुलासारखाही वागतो. अडून बसतो आणि बरसतच नाही. मग मात्र त्याची वेगवेगळ्या पद्धतीने आळवणी करण्याशिवाय शेतकरी राजाकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो.
     पावसाला थोडा जरी विलंब झाला की, शहरी भागांत मंदिरांतून यज्ञयाग करण्याचे प्रकार सर्रास होताना दिसतात. त्यासाठी यज्ञातील समिधांवर किलोकिलोने तूप ओतलं जातं. उच्चरवात मंत्रघोष केले जातात. यात पैशाची किती नासाडी होते, ते कुणीच सांगत नाही. म्हणूनच मग शहरांतून होणा‍ऱ्या या वैदिक विधी-विधानांपेक्षा गावाकडे होणारे पाऊसविधी बरे वाटतात. त्यात खर्च काहीच नसतो. फक्त निसर्गाला केलेलं आवाहन असतं. लोकपरंपरेने चालत आलेले पाऊसदेवाच्या आळवणीचे असे अनेक प्रकार आजही ग्रामीण भागत तग धरून आहेत. केवळ महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण भारतात पूर्वापार असे विधी चालत आलेले आहेत. या विधींमुळेच पाऊस पडतो, हा भ्रम आहे. पण मनुष्याने आदिम अवस्थेत असताना निसर्गाशी ऐक्य, साम्य शोधण्याच्या प्रयत्नांतून सुरू केलेले हे विधी आहेत. एकप्रकारे ते प्रतीकात्मक विधी आहेत. या विधीमागील विज्ञानाचा शोध घ्यायला कुणीही जात नाही. तिथे फक्त लोकभावनाच श्रेष्ठ ठरते. ही लोकभावना आदिम असते.


     रोहिणी गेल्या, मृग नक्षत्रही कारेडंच आलं नि गेलं की, महाराष्ट्रातल्या खेड्याखेड्यात धोंडी-भुंडी या अज्ञात लोकदेवतांच्या नावाने गा‍ऱ्हाणं गायला सुरुवात होते. गावागावातली मुलं एकत्र येतात आणि ‘धोंडी धोंडी पाणी दे’ म्हणत गावभर हुंदडतात. याला धोंडी काढणं असंही म्हणतात. मुलांची एक मिरवणूकच निघते. मिरवणुकीतील दोन मुलं निर्वस्त्र असतात. त्यांनी आपल्या अंगाभोवती फक्त कडुलिंबाच्या पाल्याच्या डहाळ्या गुंडाळलेल्या असतात. या दोघांच्या खांद्यावर एक आडवी काठी देऊन त्या काठीला मध्यभागी एक बेडूक उलटा लटकावलेला असतो. या उलट्या लटकावलेल्या बेडकाला गावभर फिरवलं जातं. मिरवणुकीची सुरुवात गावच्या मंदिरातून होते. त्यावेळी केवळ छोटी मुलंच नाही, जाणती माणसंही उपस्थित असतात. मंदिरातून निघाल्यावर
धोंडी धोंडी पाणी दे
धोंडीच्या दिवसात
पाणी भारी येऊ दे
पीक मोठं होऊ दे ... असं म्हणत ही बालसेना गावातील प्रत्येकाच्या घरी जाते आणि ही धोंडी दारात आल्यावर घरातघरातील महिला रिवाजानुसार प्रथम धोंडीच्या काठीवर आणि बेडकावर लोटाभर पाणी ओततात. नंतर हळद-कुंकू वाहून बेडकाची पूजा करतात. यावेळी प्रत्येक घरातून आपापल्या ऐपतीनुसार गहू, ज्वारी किंवा इतर धान्याचा शिधा मुलांना दिला जातो. असं गावातील प्रत्येक घर घेऊन झालं, की ही मिरवणूक पुन्हा देवळात येते. तिथे मिरवणूक काढलेल्या बेडकाला मुक्त केलं जातं. नंतर मिरवणुकीत मिळालेला शिधा एकत्र केला जातो आणि कुणाच्या तरी घरुन जाडसर दळून आणून तिखट-मीठाची फोडणी देऊन तो गावच्या मंदिरातच शिजवला जातो. या शिजवलेल्या प्रसादाला गावकरी कण्या म्हणतात. या कण्यांचाच नैवेद्य गावदेवाला दाखवून नंतर तो प्रसाद म्हणून सा‍ऱ्या गावाला वाटला जातो. हा प्रसाद खाताना आता मोठा पाऊस येईल असंच प्रत्येकाला मनोमनी वाटत असतं. कारण उलट्या टांगलेल्या बेडकाचं तरी डराव डराव वरुणदेवापर्यंत पोचलं असेल, असा लोकमानसाचा समज असतो.
     विदर्भात धोंडीच्या नावाने पावसासाठी गा‍ऱ्हाणं घालायची पद्धत आहे, तर कोकणात हेच गा‍ऱ्हाणं भुंडीच्या नावाने घातलं जातं-
भुंडे भुंडे पाऊस दे
भुंडी गेली डोंगरात
पाऊस पडला आगरात... भुंडे भुंडे पाऊस दे
भुंडी गेली आगरात
पाऊस पडला डोंगरात... भुंडे भुंडे पाऊस दे
भुंडी गेली शेतावर
पाऊस पडला माळावर...भुंडे भुंडे पाऊस दे
भुंडी गेली माळावर
पाऊस पडला शेतावर...भुंडे भुंडे पाऊस दे
अशा पद्धतीने भुंडीच्या नावाने हाका मारत मुलं संपूर्ण गावाचं रान-शिवार, घर-दार ङ्गिरतात आणि तिच्याकडे पाण्यासाठी गा‍‍ऱ्हाणं घालतात.
धोंडी आणि भुंडीच्या नावाने निघणा‍ऱ्या या मिरवणुका महाराष्ट्रात कदाचित आणखीही वेगवेगळ्या नावाने निघत असतील. कारण धोंडी काय किंवा भुंडी काय यांचं लोकरहाटीत तसं अस्तित्वच नसतं. त्यांच्या नावाचा दगड किंवा मूर्तीही नसते. लोकरहाटीतलाच एखादा रुढ पण वैचित्र्यपूर्ण स्त्रीवाचक शब्द घ्यायचा आणि तिलाच पाऊसदेवता कल्पून तिच्या नावाने पावसाचं गा‍ऱ्हाणं गायचं. असंच पूर्वापार चालत आलंय.
पाऊस पडावा म्हणून महाराष्ट्रभर केल्या जाणा‍ऱ्या या विधींत खूपच वैविध्यही आहे. कारण प्रत्येक समाजाने आपापल्या समजूतींप्रमाणे निवडलेले हे मार्ग आहेत. म्हणूनच पश्चिम महाराष्ट्रात गाढवाचं लग्न लावलं जातं, विदर्भात बेडकाची मिरवणूक काढली जाते, तर खानदेशात अनेक ठिकाणी पाऊसविधी म्हणून जिवंत माणसाची अंत्ययात्रा काढली जाते. तसंच अहमदनगर जिल्ह्यातल्या गावपरिसरात बेडकांची मिरवणूक किंवा गाढवाच्या लग्नाबरोबरच अंधा‍ऱ्या रात्री काही महिला पावसाचं गा‍ऱ्हाणं गात गावभर फिरतात. त्यांचं हे गा‍ऱ्हाणं म्हणजे पावसाची खरोखर केलेली तक्रारच असते. कारण त्या आपल्या गाण्यातून पावसावर राग काढत म्हणतात-
पाऊसराजानं कुणीकडे केलं काळं
वैतागली नार टाकून गेली तान्हं बाळ...
अशी तक्रार करतच लहानथोर सा‍ऱ्या महिला गावातलं घरन् घर घेतात. ही तक्रारीची गाणी म्हणायचीही त्यांची अशी खास पद्धत आहे. या महिलांचं म्होरकेपण करणारी महिला सगळ्यांच्या पुढे असते. तिच्या हातात घुंगरू बांधलेलं मुसळ असतं. हे मुसळ ती प्रत्येक घराच्या दारात वाजवते आणि त्याच्या ताला-सुरावरच पावसाची गा‍ऱ्हाण्याची गाणी गायली जातात. हे गा‍ऱ्हाणं गाताना मुसळच वापरलं जातं कारण मुसळासारखा पाऊस पडावा, अशी त्यांची इच्छा असते.
महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशातील ग्रामीण भागात सर्वत्रच असे पाऊसविधी केले जातात आणि त्यात विविधताही आढळते. मात्र या सा‍ऱ्या विधींमध्ये एक समान आदिम तत्त्व दिसतं- ते म्हणजे सारख्यातून सारखं (होमोजिनियस मॅजिक) निघतं, ही आदिम भावना. या भावनेतूनच आपल्या जी गोष्ट हवी आहे किंवा साध्य करायची आहे, त्यासारखाच एक विधी कल्पनेने करायचा. हे विधी म्हणजे सरळसरळ प्रतीकात्मक विधीच असतात.
आषाढ लागला की असं काय काय आठवायला लागतं. आधी मेघदूत काव्य आठवतं. आषाढसरी चांगल्या कोसळल्या तर मेघदूताची रंगत वाढत जाते. कारण तोवर निसर्गाने कात टाकलेली असते. संपूर्ण आषढच सृष्टीत उतरलेला असतो. हिरवं रान, हिरवं मन आणि सुरेख हिरवी हुरहुर... पण आषढसरी कोसळल्या नाहीत, तर मन भयभीत होतं. त्याला अरिष्टाची चाहुल लागते. एकवेळ आषाढ चांगला गेला तरी तो काहीसा निश्चिंत होतो. कारण पेरण्या झालेल्या असतात. पीकपाणी मार्गी लागलेलं असतं. पण जिथे रुजणंच आषाढाच्या भरवशावर असतं, तिथे आषाढसरी कोसळल्या नाही, तर सारं गणितच चुकून जातं. मग नांगरट, पेरण्या, लावण्या... असं परंपरेनं चालत आलेलं शेतीचं सगळंच वेळापत्रक बिघडून जातं.
... याही परिस्थितीत आषाढाची चाहूल लागली की सर्वप्रथम पंढरपूरच्या वाटेवर वारक‍ऱ्यांची पावलं उमटू लागतात. भक्तांचे जत्थेच्या जत्थे विठोबाच्या दर्शनासाठी धावू लागतात. जणू विठोबा त्यांना पहिल्यांदाच भेटणार असतो. पण विठोबा पहिल्यांदा भेटो किंवा वर्षानुवर्षं, त्याची गोडी, त्याची ओढ थोडीच कमी होते... ती कायमच असते.
आषढाचंही तसंच तर आहे. तो दरवर्षीच येतो, बिलोरी ऐन्याचं स्वप्न दाखवत पावसाचं आवतन घेऊन...
(पुनर्प्रकाशित)

शुक्रवार, १ जुलै, २०१६

श्रीआनंदनायक



२००९ मध्ये रामचंद्र चिंतामण ढेरे ऊर्फ अण्णा ८० वर्षांचे झाले, तेव्हा त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी मला मिळाली होती. त्या मुलाखतीतला हा काही भाग… आता अण्णा नाहीत, पण त्यांनी एकाच आयुष्यात करुन ठेवलेलं काम एवढं आहे की, त्याचा मागोवा घ्यायला आपल्याला कैक जन्मं लागतील…   

जाणत्या वयात त्यांनी सुरू केलेलं उत्खननाचं काम आज ८० व्या वर्षात पदार्पण करतानाही अखंडित सुरू आहे. एक उत्खनन संपलं की लगेच दुसरं… दुसरं झाल की लगेच तिसरं... ही उत्खनन मालिका अव्याहत सुरूच आहे. न थकता न दमता. लवलेशही विश्रांती न घेता. उत्खननात जे जे अमूल्य हाती लागलं ते-ते सारं समाजासाठी उधळून द्यायचं. आपल्याकडे काही राखून झाकून ठेवणं त्यांना पसंतच नाही आणि तरीही त्यांची झोळी कायम भरलेली. अक्षय-अक्षुण्ण… कारण उत्खननासाठी त्यांनी ज्या सर्जन-वेदना साहिलेल्या असतात त्या वेदना मातेच्या प्रसववेदनांइतक्याच तनामनाच्या रंध्रांचा वेध घेणा‍ऱ्या असतात, साहजिकच बाळ जन्माला आल्यावर मातेला त्याचं मातृत्व कायमचं चिकटतं. तसंच उत्खननात जे जे गवसतं ते उधळून दिल्यावरही त्याचं मातृत्व त्यांच्याकडेच उरतं. महत्त्वाचं म्हणजे या उत्खननात जे -जे गवसतं ते, त्यांचंच नाही उभ्या महाराष्ट्राचं जीवन उजळून टाकणारं असतं..
... ते संस्कृतीचं उत्खनन असतं. एका परंपरेचं उत्खनन असतं, पिढ्यान् पिढ्या प्रवास करत आलेल्या लोकमानसाचं उत्खननं असतं आणि या अखंड उत्खननाचा वसा घेणारे असतात ज्ञानमहर्षि रामचंद्र चिंतामण ढेरे ऊर्फ रा. चिं. ढेरे... तपश्चर्येचं तेज आणि ओज काय असतं ते रा. चिं. ढेरे यांच्याकडे पाहिल्यावरच कळतं. रामतीर्थाच्या गुहारूपी मंदिरात ढेरे यांना अंतःस्फूर्तीने शिवप्रिया असलेल्या ‘श्रीआनंदनायकी’चं दर्शन घडलं. ढेरेंना भेटल्यावर-पाहिल्यावर आपल्यालाही ‘श्रीआनंदनायक’ भेटल्याचा आनंद होतो. महाराष्ट्राच्या संस्कृतीचं सार आणि तत्त्व शोधण्यातच आनंद मानणारा श्रीआनंदनायक!
आयुष्यालाही व्यापून उरलेली ही लोकसंस्कृती रा. चिं. ढेरे यांना त्यांच्या बालपणी आजोळच्या गावी गवसली. मावळातलं एक खेडं असलेलं त्यांचं आजोळगाव निगडे, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या लोसकसंस्कृतीचं  लघुरूप होतं. पहाटे दारात येणा‍ऱ्या पिंगळ्यापासून उत्तररात्री रंगणा‍ऱ्या गोंधळ-जागरणापर्यंत आणि कीर्तनापासून तमाशापर्यंत त्यांनी सारं काही त्या छोट्या गावातच एकलं-पाहिलं. लहानपणी ऐकलेल्या-पाहिलेल्या आणि मनाच्या सांदीकोप‍ऱ्यात साठवून ठेवलेल्या या लोकसंस्कृतीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न ते गेली साठ-सत्तर वर्षं करत आहेत.
लोकसंस्कृतीचं उत्खननं एवढं आवश्यक आहे?
‘निश्चितच. आदिमतेपासून आताच्या आधुनिकतेपर्यंत वाटचाल करणा‍ऱ्या  मानवी संस्कृतीचा वेध घ्यायचा असेल तर, आपल्याला  लोकसंस्कृतीलाच शरण जायला पाहिजे. कारण लोकसंस्कृतीच्या गाभ्यातच मानवी संस्कृतीच्या बदलाचे अंतःस्तर तपासता येतात. महाराष्ट्र किंवा पर्यायाने भारत तर मानवी संस्कृतीचं मूळ शोधण्यासाठीचं उत्तम केंद्र आहे, कारण केवळ भारतातच आदिम युगापासून  आत्ताच्या आधुनिक युगापर्यंत झालेल्या मानवी विकासाचे अवशेष पाहायला मिळतात. आजच्या नागर संस्कृतीत ते अवशेष पटकन नजरेस पडणार नाहीत. पण अनागर संस्कृतीकडे तुम्ही डोळसपणे पाहायला लागलात की विविध सामाजिक स्तर रूढी परंपरांच्या रूपाने जिवंत असल्याचं दिसतं. उदाहरण द्यायचं झालं तर दांडेकर पुलाच्या पलीकडे रामकृष्ण मठात मामा दांडेकर यांचा पौर्वात्य-पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास चालायचा, तेव्हा त्याच पुलाच्या अलीकडच्या वेश्यावस्तीत अगदी आदिम काळातील म्हणता येईल असा अहेवपुनव आणि रांडपुनवचा उत्सव साजरा व्हायचा. म्हणजे दोन संस्कृती आजूबाजूला नांदायच्या. पण त्याची महती आणि माहिती तथाकथित आधुनिकांना कधीच कळली नाही. आजही माझ्या लोकसंस्कृतीच्या संशोधनाकडे अनेकजण तुच्छतेने पाहतात. पण आयुष्याचा होम करून मी जे गेली अनेक दशकं संस्कृतीच्या मुळाचा शोध घेतोय, तोच घ्यायला आता परदेशी अभ्यासक  मोठ्या प्रमाणावर भारतात येत आहेत.’ ढेरे अतिशय शांतपणे, सात्त्विकतेने, पण ठामपणे  लोकसंस्कृतीच्या अभ्यासाचं महत्त्व उलगडून दाखवत असतात.
लोकसंस्कृतीची अशी मुळं तपासतच आजवर रा. चिं. ढेरे यांनी महाराष्ट्राच्या  बहुविध संस्कृतीचा, विधिविधानांचा आणि देवदेवतांचा अनन्यलक्ष्यी शोध घेतला आहे. विशेषतः भावभक्तिचा मळा असलेल्या पंढरपूरचा विठोबा, आत्मक्लेशातून भक्तांना भेटणारा जेजुरीचा खंडोबा, महाराष्ट्राच्या शौर्याची तेजशलाका असलेली तुळजापूरची श्रीतुळजाभवानी आणि भोसल्यांचं कुलदैवत असलेल्या शिखर-शिंगणापूरच्या महादेवाचा अनेकलक्ष्यी धांडोळा घेऊन त्यांनी मूळ लोकदेवता असलेल्या आणि आज संपूर्ण महाराष्ट्राच्या झालेल्या या देवतांच्या सांस्कृतिक उन्नयनाची प्रक्रिया प्रथमच समाजाच्या निदर्शनास आणली.
लोकदेवतांचं हे उन्नयन कोण,  का आणि कसं करतं? याचं उत्तर देताना रा. चिं. ढेरे म्हणतात, ‘लोकदेवतांच्या सांस्कृतिक उन्नयनाची प्रक्रिया दीर्घ स्वरूपाची असते आणि हा उद्योग त्या त्या काळातला उच्च संस्कृतीचा अभिमान बाळगणारा वर्ग करत असतो. यामुळे छोट्या समूहातील लोकदेवतेचं उदात्तीकरण होऊन उच्चसंस्कृती असलेल्या देवतांमध्ये ती नांदायला लागते. या उदात्तीकरणासाठी  उच्च संस्कृतीचे पुरोहित स्थळमहात्म्य वगैरे रचून मूळ लोकदेवतेची प्रतिष्ठा  वाढवण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्रातील विठोबा, खंडोबा, तुळजाभवानी, रेणुका या देवतांचं असंच उन्नयन झालेलं  आहे. विठोबा हा मूळचा दक्षिणेकडील गोपजनांचा देव आहे. जेजुरीचा खंडोबादेखील दक्षिणेकडून आलेला धनगर समाजाचा देव आहे. तसंच तुळजाभवानी किंवा रेणुका या मूळ मातृदेवता आहेत. आज त्यांचं जे स्वरूप पाहायला मिळतं, ते त्यांचं मूळ स्वरूप नाही. त्यांचं मूळ रूप पाहायचं तर त्या जिथून आल्या तिथेच आपल्याला सश्रद्ध भावनेनं जायला हवं. देवतांच्या उन्नयनाचा अथवा स्थितीगतीचा वेध हा एका अर्थानं त्या समाजाच्याही स्थितीगतीचा वेध असतो. साहजिकच या देवतांच्या विकसनप्रक्रियेची उकल ही समाजेतिहासाला अत्यंत साहाय्यभूत ठरते. मी देवतांच्या उन्नयन प्रक्रियेचा अभ्यास कायम याच भावनेतून केला. त्यात कुणाच्या श्रद्धा दुखावण्याचा बिलकूल हेतू नव्हता’.
मात्र सांस्कृतिक उन्नयनाचा हेतू सर्व देवतांच्या बाबतीत नेहमीच सफल होतो, असं नाही. विठोबाच्या बाबतीत तो सफल झाला मात्र खंडोबाच्या बाबतीत तो अर्धसफल झाला. त्यामागचं कारण सांगताना  ढेरे म्हणतात, ‘ही उन्नयन प्रक्रिया त्या-त्या ठिकाणी असलेल्या त्या-त्या विशिष्ट समाजाच्या बळावर निर्भर असते. एखाद्या लोकदेवतेचं कोणत्या देवतेच्या रूपात उन्नयन होणार, हे त्या त्या समाजातील ताकदच एकप्रकारे ठरवत असते. उदाहरणार्थ विठोबाचं वैष्णवीकरण झालं, कारण त्या परिसरात वैष्णवजनांचा प्रभाव अधिक होता. तसंच खंडोबाचं शैवीकरण झालं. मात्र खंडोबाचा गाजावाजा अधिक झाला नाही, कारण देवतेच्या प्रचार प्रसारात भक्तांचा मोठा वाटा असतो. वैष्णवीकरण झालेल्या विठोबाला नामदेव-ज्ञानदेव-तुकारामांसारखे भक्त भेटले, परिणामी विठोबाचं स्थान सांस्कृतिकदृष्ट्या अधिक उन्नत झालं. याउलट खंडोबाला तसे भक्त न भेटल्यामुळे आजही खंडोबाच्या उपासनेत त्याच्या मूळ उपासनेतले बगाड किंवा मांडीला आकडा टोचून  घेण्यासारखे आत्मक्लेशात्मक विधी कायम  राहिले. उन्नयनाची प्रक्रिया नेमकी कशी होते त्याचं आणखी एक उदाहरण म्हणजे नेवाशाचं मोहिनीराज मंदिर. वस्तुतः हे मंदिर खंडोबापत्नी म्हाळसेचं आहे. म्हाळसा ही शिवपत्नी. पण खंडोबावर रागावल्यामुळे ती आपल्या माहेरी म्हणजे नेवाश्याला आली, पण तिथे असलेल्या वैष्णवांच्या प्राबल्यामुळे म्हाळसेचं मूळ अस्तित्व पुसलं गेलं. त्यांनी तिला मोहिनी करून विष्णूचं एक रूप करून टाकलं. त्यामुळे आज या मूर्तीकडे मोहिनीरूपातील विष्णू म्हणून पाहिल जातं.’
लोकसंस्कृती किंवा लोकदेवतांच्या या विकसनाचा अभ्यास रा. चिं. ढेरे एखाद्या साधकाच्या वृत्तीने करतात. तिथे शास्त्रज्ञाची सत्यान्वेषी मर्मदृष्टी असते. पण ते आपल्या अभ्यासाची उकल केवळ याच दृष्टीने  करत नाहीत. उलट तर्काधिष्ठित  वास्तवापेक्षा भावसत्ये अधिक महत्त्वाची असल्याचं ते मानतात. कारण संस्कृतीची-प्रकृतीची अनेक गुह्य केवळ  या भावसत्यांनीच उलगडतात, असं त्यांना वाटत. आणि त्यांनी याच  पध्दतीने आत्तापर्यंत लोकसंस्कृतीची व लोकदेवतांच्या उन्नयनीकरणाची गुह्य उकलली आहेत.
हे भावसत्य म्हणजे नेमकं काय?

‘शोधात आणि संशोधनात नेहमीच शास्त्रीयदृष्ट्या योग्य असलेल्या तर्काला महत्त्व दिलं जातं. पण हा निर्णय सगळ्याच गोष्टींना लागू होत नाही. सगळीकडेच शास्त्रीय तर्क उपयोगी पडत नाही. काही वेळा भावविश्वाचाही आधार घ्यावा लागतो. विशेषतः आपला संशोधनविषय जेव्हा मानवी श्रद्धेशी निगडित असतो, तेव्हा भावसत्याचा आधार घ्यावा लागतो. कारण श्रद्धाविषयाच्या गाभ्यात आस्थेने प्रवेश केल्यावरच त्या विषयाचं आकलन होऊ शकतं. माणूस केवळ बुद्धिजीवी प्राणी नाही. बुद्धी आणि  विवेकाने त्याचं आयुष्य बंदिस्त असलं, तरी मूलतः ते भावनांवरच आधारलेलं असतं. साहजिकच त्यामुळे लोकसंस्कृती किंवा देवतांच्या विकसनाचा विचार करताना केवळ तर्काधिष्ठित बुद्धी वापरुन चालत नाही. भावनेचीही मदत घ्यावी लागते. कारण श्रद्धेच्या मुळाशी बुद्धीपेक्षा भावनाच अधिक असते आणि हा जगातल्या सर्व धमेतिहासतज्ज्ञांचा अनुभव आहे.’ रा. चिं. ढेरे संशोधनात तर्काधिष्ठित सत्याबरोबरच भावनेचं बळ कसं महत्त्वाचं असतं, ते समजावत असतात.
परंतु त्यांनी स्वतः केवळ भावनेचं हे बळ कधीच पुरेसं मानलं नाही. जिथे जिथे शास्त्रकाट्याची कसोटी आवश्यक होती, तिथे तिथे त्यांनी ती स्वीकारली. किंबहुना लहानपणी आपल्या आजोळगावी जे जे संवेदनशीलतेनं त्यांनी टिपलं, तेच ते आजतागायत शास्त्रीय मांडणी करुन पुन्हा सांगत आहेत. म्हणून तर  दैवतशास्त्राच्या आधारे महाराष्ट्रातील देवतांची पुनर्मांडणी करण्याचं श्रेय त्यांना जातं. दैवतशास्त्र ही इतिहासाला पूरक अशी उपयुक्त शाखा असल्याचं महाराष्ट्रात त्यांनीच प्रथम आपल्या संशोधनातून सिद्ध केलं. अर्थात दैवतांच्या पुनर्मांडणीचं त्यांनी आरंभलेलं हे ज्ञानसत्र नेहमीच सगळ्यांना रुचलं असं झालं नाही. उलट अनेकांनी त्यांच्यावर मर्मभेदी टीकाही केली. विशेषतः त्यांनी ‘लज्जागौरी’च्या निमित्ताने सर्जनसोहळ्याचा आणि मातृतत्त्वाचा गौरव केला, तेव्हा सनातन्यांच्या प्रचंड रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं. लज्जागौरीत त्यांनी आदिम काळापासून मूर्तिरूपात चालत आलेल्या सर्जनावस्थेचा शोध घेतला होता. पण विषयाची महती न कळलेल्यांनी त्यांच्यावर ‘ढेरे यांनी अक्षरांचा नाइटक्लब चालवला आहे,’ अशी टीका केली होती. अर्थात या किंवा अशा प्रकारच्या कोणत्याच टीकेला ढेरे कधी भ्याले नाहीत. त्यांना आपल्या अक्षरांचा श्रम ठाऊक होता. ढेरे म्हणतात - ‘वेदपूर्व काळापासून भारतात सर्जनावस्थेतील स्त्री-प्रतिमेची पूजा सुरू आहे. आजही आदिम अवस्थेतील अनेक परंपरांमध्ये तिला भजलं-पुजलं जातं. मी या मातृतत्त्ववाची नीट मांडणी करुन तिला शोभनावस्था आणली. जगाच्या निर्मितीचं केंद्र असलेल्या सर्जनस्थळांचा गौरव करण्याचाच माझा प्रयत्न होता. पण आपल्याकडचे सनातनी सर्जनस्थळाला का लाजतात  ठाऊक नाही?’
विषयातून विषय निघत जातो. ढेरे न थकता, लोकसंस्कृतीत रुजलेल्या परंपरांचा वेध घेत राहतात. त्यांच्या समवेत लोकसंस्कृतीच्या वाक-वळणांवरुन चालणं म्हणजे आपल्यासाठी आनंदनिधानच असतं. मात्र कुठल्या तरी टप्प्यावर त्यांचा हात सोडून आपण निघून जातो. पण त्यांचं संस्कृतीचं उत्खनन सुरूच असतं. कारण तोच त्यांचा ध्यास आणि श्वासही आहे!
(मूळ प्रहार दैनिकात प्रकाशित झालेली मुलाखत)

बुधवार, १८ मे, २०१६

पिंगळ्याचा शकुन ऐका वं माय


तांबडं फुटायला अंमळ अवकाश असतो. कोंबड्याच्या आरवण्याचाही मागमूस नसतो. रातकिड्यांची किर्रर्र किरकिर अजून सुरूच असते. अन् एवढ्यातच पिंगळ्यांच्या पालाला जाग येते. गावाकुसाबाहेर पडलेल्या पालातलं एवढुसं खोपटं. कंबरभर उंचीचं. त्यात कोण कुठे झोपलाय त्याचा ठावठिकाणा नसतो. पण चंद्र डावीकडे कलला की पिंगळ्यांच्या वस्तीवरल्या पुरुषाला आपोआप जाग येते. वर्षानुवर्षाची सवय. रात्रीच्या काळोखातच तो आपली धोपटी काढतो. धोपटीतला जामानिमा तपासतो. पिंजरीची डबी, भस्माची वडी, क पाळाच्या फेट्यावर बांधायचा चांद सगळं बाहेर काढतो. मग आधी कसून धोतर नेसतो. त्यावर बंडी घालतो. बंडीवर काळं जाकीट. डोक्याला ८ मीटर लांबीचा फेटा करकचून बांधतो. फेटा बांधून झाला की, त्याच्यावर देवदेवतांचे चांदीचे-पितळेचे मुखवटे, नाणी असलेली साखळी किंवा पट्टी (यालाच चांद म्हणतात) बांधतो. मग भस्माच्या वडीने कपाळावर आडवे फराटे ओढतो. भस्माने कपाळ पांढरशुभ्र झालं की त्यावर कुंकवाचं उभं बोट लावतो. मग खांद्याला भिक्षेची धोपटी लटकवतो. रात्रीच्या अंधारात दिसावं म्हणून एका हातात कंदील घेतो. तर दुसर्या हातात आपण आल्याची वर्दी लोकांना मिळावी म्हणून छोटा डमरू म्हणजे कुडमुडं घेतो आणि निघतो गावमागणीला...

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातल्या वेळापूरच्या चव्हाणवस्तीतील अर्जुन श्यामराव जाधव, सर्जेराव श्यामराव जाधव आणि सोनबा सोपान जाधव या पिंगळ्यांबरोबर पहाटे चार वाजता निघालो, तेव्हा बाहेर मिट्ट काळोख होता. पिंगळ्यांच्या हातात कंदील असले, तरी वाटेतल्या दगड-धोंड्यांनी मला ठेचकाळायला होत होतं. अर्जुन, सर्जेराव, सोनबा मात्र पायाखालचीच वाट असल्यासारखे निश्चिंत, पण तरातरा चालले होते. दिवस उगवण्याआधी दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वेळापूरमध्ये दान मागून त्यांना पुन्हा वस्तीवर यायचं होतं. त्यामुळे धडपडत चाललेल्या माझी खरंतर त्यांना अडचणच झाली होती. पण वेळापूर परिसरात  भटक्या-विमुक्तांसाठी गेली पंचवीसहून अधिक वर्षं काम करणाऱ्या सूर्यकांत भिसे यांनी, त्यांना सांगून ठेवलं होतं- ‘हा माझा पाव्हणा आहे, नीट सांभाळून आणा.’ म्हणून त्यांचा नाईलाज झाला होता. अन्यथा बाहेरच्या माणसाला भटक्यांच्या वस्तीवर राहायला मिळणं, म्हणजे दुर्मीळ गोष्ट. पण ओळखीने का होईना, मला ती साध्य झाली होती आणि गैरसोईने का होईना पण, त्या तिघांनी ती मान्य केली होती.
साधारणपणे पाऊणेक तासाच्या तंगडतोडीनंतर वेळापूरची वेस जवळ आली. गावातल्या अर्ध नारीनटेश्वराच्या मंदिराचा कळस मिट्ट काळोखातही त्यांच्या नजरेला पडला. तसे तिघे तीन वाटांनी निघाले. मला कुणाबरोबर जावं, ते कळेना. तरीही मी अर्जुन पिंगळ्याची पाठ पकडली आणि त्यांच्या मागोमाग जाऊ लागलो. गावात शिरताच तिघांनी एव्हाना कुडमुडं वाजवायला सुरुवात केली होती. त्या कुडमुड्याच्या आवाजाने गावाला जणू अवेळीच जाग आली. कुठेकुठे घरात दिवे-लाइटी पेटू लागल्या. ज्यांना जाग आली त्या माय-माऊल्या पिंगळा दारात येण्याआधीच दाराच्या उंबरठ्यात पसाभर डाळ-तांदूळ घेऊन उभ्या राहिल्या. सोबत एक-दोन रुपयाचं एखादं नाणं. आता क्वचित पाच रुपयाचं. हे दान मिळताच अर्जुनराव जागेवरच उडी घ्यायचे आणि दान मिळाल्याची पावती द्यायचे. तोंडानं देवादिकांची नावं घेत आणि तोंडानं शकुन ऐक ग माय म्हणत तासाभरात सगळं गाव घेऊन झालं. शंभर-दीडशे उंबर्याच्या गावात सगळ्यांनीच काही दान दिलं नाही. जेमतेम दहा-पंधरा घरांतून कोरडा शिधा मिळाला. एकाही घरातून शकुन सांगण्याचं निमंत्रण मिळालं नाही, म्हणून अर्जुनराव थोडे हिरमुसले. कारण कुणी शकुन विचारलं, तर थोडी वरकमाई अधिक होते. पण आजच्या विज्ञानाच्या काळात भविष्यावर नि शकुनावर कुणाचा विश्वास उरलेला नाही, याची त्यांनाही आता अनुभवाने माहिती झाली आहे. त्यामुळे तांबडं फुटण्याची चिन्ह दिसताच, त्यांनी गुमान परतीची वाट धरली. इतर दोन दिशांनी गेलेले सर्जेराव आणि सोनबाही गावाच्या वेशीवर येऊन थांबणार होते. ‘पुन्हा वस्तीवर येताय का?’ अर्जुनरावांनी विचारलं. खरंतर मला पुन्हा जायचंच होतं वस्तीवर (त्यांच्या प्रथा-परंपरा जाणून घेण्यासाठी, समाजाची आजची स्थिती माहीत करुन घेण्यासाठी), पण लगेच नाही. थोडावेळ गावातच रेंगाळायचं होतं, परंपरेचा मागोवा घेत आणि गावगाड्यात असलेलं पिंगळ्यासारख्या मागत्यांचं स्थान हुडकत. मी लगेच अर्जुनरावांना म्हटलं - तुम्ही व्हा पुढं, दिवस उगवला की मी येतोच चहा प्यायला.’
अर्जुनराव, सर्जेराव आणि सोनबा चव्हाणवस्तीच्या दिशेने जायला लागले आणि माझी पावलं गावातील अर्धनारीनटेश्वराच्या मंदिराच्या दिशेने वळली. अजून तसं फटफटायचं होतं. तरीही बाहेरगावी जाणार्यांची वर्दळ सुरू झाली होती. मंदिराजवळ उभ्या असलेल्या माझ्याकडे अनोळखी, संशयी नजर टाकून जो-तो फटफटीवर बसून भुर्रकन निघून जात होता. दुसरीकडे साखरकारखान्यात घालण्यासाठी ऊस नेणाऱ्या ट्रॅक्टर्सचीही धडधड सुरू होती. या सगळ्या काळ बदलल्याच्या खुणा होत्या. गावगाडा बदलला होता. या बदललेल्या गावगाड्यात आता पहाटेच्या पारी दारी येणाऱ्या पिंगळ्याला काही स्थान नव्हतं. गावगाड्याची थोडीफार धुगधुगी अजून शाबुत आहे, तोपर्यंत पिंगळ्याला कुणीकुणी दान घालत राहील. पण पिंगळ्यांची नवी पिढीही आता दान मागायला तयार नाही. आम्ही का कुणापुढे लाचारीने हात पसरावेत, असा त्यांचा सवाल असतो. त्यामुळे तेही पारंपरिक शकुन-भविष्य सांगण्याचा धंदा सोडून आता वेगवेगळ्या उद्योग-व्यवसायाच्या शोधात आहेत. अर्जुन-सोनबा-सर्जेरावांसारखी महाराष्ट्रात आता काही थोडीफारच जुनी खोडं आहेत, जी कधीमधी परंपरेची चाल म्हणून ‘मागतं’ मागायला जातात.



पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत ग्रामीण समाजव्यवस्था ही बलुते-अलुते आणि फिरस्ते अशा गावगाड्यावर आधारलेली होती. बलुतेदारीत वस्तुच्या मोबदल्यात वस्तू असा व्यवहार होता. उदाहरणार्थ कुंभाराने मडकी घडवून द्यावीत, सुताराने शेतीची लाकडी अवजारं बनवून द्यावीत, चर्मकारानं चामडी वस्तू बनवून द्याव्यात आणि त्याबदल्यात, शेतकर्याने त्यांना धान्य द्यावं. पण यापलीकडे अनेक अलुते आणि फिरस्ते असे होते, ज्यांचा शेतकर्याला प्रत्यक्ष उपयोग काही नव्हता. पण परंपरेने ते मागणारे म्हणजे ‘मागते’ होते आणि ते देव-धर्माच्या नावाने दान-भिक्षा मागायचे. आता-आतापर्यंतचा नीतीव्यवहार हा देवधर्मावर आधारित असल्यामुळे, आपल्या गाठीशी पुण्य जमा करण्यासाठी शेतकर्याला अशा मागत्यांची गरज लागायची. आपण या मागत्यांना दानधर्म केला, तर आपल्याला पुण्य लागेल, या भावनेतून शेतकरीवर्ग दान देत राहिला आणि त्यातूनच मागत्यांची परंपरा निर्माण झाली. ती जपली-जोपासलीही गेली. या मागत्यांच्याच नानाविध भेदांपैकी एक म्हणजे पिंगळा ऊर्फ कुडमुडे जोशी उर्फ पांगुळ. खरंतर भटक्या-विमुक्तामंध्ये ‘जोशी’ नावाचा एक समाज आहे. वासुदेव-गोंधळी-नंदीबैलवाला आणि पांगुळ ऊर्फ कुडमुडे हे सारे वेगवेगळे व्यवसाय करणारे भटके कलावंतसमाज याच जोशी समाजाच्या अंतर्गत येतात. हे सगळे देवादिकांची गाणी म्हणून भिक्षा किंवा दान मागतात आणि त्यावरच आपला उदरनिर्वाह करतात. मात्र भिक्षा हेच उपजीविकेचं मुख्य साधन असल्यामुळे हे भटके समाज आजवर कधीच कुठेच स्थिर झाले नाहीत. ते महाराष्ट्राच्या गावोगावी भटकंती करत राहिले आणि आपल्या दात्यासाठी, त्याच्या भल्यासाठी देवाकडे प्रार्थना करत राहिले. त्याचाच परिणाम म्हणून की काय दाते श्रीमंत झाले आणि भटका समाज मात्र कायम गरीबच राहिला. परंतु या मागत्या-भटक्या समाजांचा विशेष म्हणजे त्यांनी कधीच निव्वळ भिक्षा स्वीकारली नाही. भिक्षेच्या-दानाच्या बदल्यात त्यांनी, दान देणाऱ्या दात्याची करमणूक केली किंवा मानसिकदृष्ट्या त्याला स्थिर, शांतचित्त करण्याचं काम केलं. अशा या मागत्यांमध्ये वासुदेव, नंदीबैलवाले, गोंधळी प्रसिद्ध आहेत. कारण ते दिवसाउजेडी येतात. पण पहाटेच्या काळोखात येऊन घरोघरच्या चिंताग्रस्तांना आश्वस्त करणारा पिंगळा मात्र तसा अजूनही उपेक्षितच. कारण तो येऊन कधी जातो, हेच कधी कुणाला कळत नाही. अगदी पहाटे उठणारी घरातली ज्येष्ठ मंडळी सोडली, तर त्याचा कुणालाच थांग लागत नाही. पण सर्वसामान्यांना त्याचा थांग लागला नाही, तरी सर्व भटक्या कलावंतांमध्ये पिंगळा ऊर्फ कुडमुडे जोशी पहिल्या स्थानावर आहे. कारण परंपरेत एकप्रकारे तो मानसोपचारतज्ज्ञाची भूमिका बजावत असतो. त्याच्याइतकी सूक्ष्मनिरीक्षण शक्ती क्वचितच कुणाकडे असेल. त्यामुळेच आज एकूणच मागत्यांचं प्रमाण कमी झालेलं असलं, तरी गावगाड्यात कधीतरी-कुठेतरी पहाटेच्या पारी कानावर पिंगळ्याचं गाणं पडतं -            
               
पांगुळ आला वं माय
दान दे वं माय
शकुन जाणून घे वं माय
तुझं भलं व्हईल वं माय...

सोबत त्याच्या कुडमुड्याची, म्हणजे डमरुचीही लुडबुड ऐकू येते आणि एखाद्या घरातली सासुरवाशीण पसाभर तांदुळ किंवा डाळ घेऊन घराच्या उंबरठ्यात येते. कधी कधी दान देताना, शिधा देताना एखाद्या सासुरवाशीणीचा चेहरा चिंताक्रांत दिसतो. की मग पिंगळ्याचा होरा लगेच सुरू होतो -

त्रासलेली दिसतेस ग माय
काल रातच्याला भांडण झालं ग माय
मनाला लावून घेऊ नकोस ग माय
सुखाचा संसार करशील ग माय...

त्याने अंदाजाची चंची अशी सोडली की, आधीच सैरभैर झालेला महिलावर्ग लगेच विरघळतो आणि घळाघळा त्याला संसारकथा सांगायला सुरुवात करतो. मग तोही तोडपाण्याचे उपाय सांगतो आणि वर हक्काचे थोडे पैसे मिळवतो.


पिंगळा जात्याच हुशार. एखाद्या घरातली मायबाय शिधा आणायला गेली की, लगेच तो घरादारावर नजर टाकतो. घरादारातले सूक्ष्म बदल नजरेने टिपतो आणि घरातली महिला किंवा पुरुष काहीबाही द्यायला आला की सुरू करतो -

‘पिंगळ्याला दान कराया घेऊ नका हरकत
सोनपावलांनी तुमच्या घराला आलीया बरकत’

किंवा

‘नाव काय पाटीलबुवांचे, पुढील भविष्य सांगेन साचे
एका बायकोची संगत घडली, तेणे तुझी महिमा बुडाली...’

असे अंदाजपंचे काही ठोकताळे मांडले की त्यातलं काही ना काही लागू होतं. मग आपोआपच त्या घरातली महिला किंवा पुरुष पिंगळ्याच्या जाळ्यात अडकतो आणि पिंगळा आपला कार्यभाग साधतो. ही एकप्रकारे चलाखीच असते. कारण ‘त’ वरुन ताकभात ओळखण्याची कला पिंगळ्यांना अनुभवाने सिद्ध झालेली असते. पण अडचणीत असणारा माणूस पिंगळ्यावर भरवसा ठेवतो आणि त्याचं भविष्य खरो ठरो अथवा खोटं, त्या व्यक्तीच्या मनाला उभारी मिळते, हे मात्र मान्य करावंच लागतं.
ग्रामीण लोकपरंपरेत ‘मागता’ असलेल्या या समाजाच्या अस्तित्त्वाचे पुरावे थेट दहा-बाराव्या शतकापासून सापडतात. महानुभावांच्या लीळाचरित्रात, ज्ञानदेव-एकनाथांच्या ओव्या-अभंगांत या समाजाचे उल्लेख आहेत. त्याअर्थी हा समाज प्राचिनच आहे. तसंच तेव्हापासूनच हा समाज भटकाही आहे. महत्त्वाचं म्हणजे हा समाज पिंगळा, पांगुळ, कुडमुड्या अशा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. त्यांच्या हातातल्या छोट्या डमरूचा ‘कुडमुड’ असा आवाज येतो, म्हणून ते कुडमुडे जोशी. ते भल्या पहाटे ज्या प्रहरी बाहेर पडतात, तो काळ पिंगळा (म्हणजेच घुबड) पक्षाच्या किजबिजण्याचा असतो. ते किजबिजणं म्हणजे बोलणं या समाजाला समजतं आणि त्यावरून ते शुभ-अशुभ शकुन सांगतात, म्हणून ते पिंगळा जोशी. यांनाच पांगुळ असंही म्हणतात. कारण ते ज्या प्रहरी दान मागायला बाहेर पडतात, तो काळ सूर्योदयापूर्वीचा असला, तरी त्या काळात सूर्याचा सारथी असलेल्या अरूणाचं आगमन झालेलं असतं. हा अरुण पायाने अधू असल्यामुळे त्याला पांगुळ असं लोकभाषेत म्हटलं जातं. साहजिकच त्यावरुन एवढ्या पहाटे बाहेर पडणार्या या समाजालाही ‘पांगुळ’ म्हणजे पांगळा हे नामाभिधान चिकटलं. एकप्रकारे पांगुळ हा अरुणाचा प्रतिनिधीच मानला जातो. लीळाचरित्र आणि नामदेव-ज्ञानदेव-एकनाथ-तुकारामांच्या काव्यात याच पांगुळाचे दाखले सापडतात. 

मृत्युलोका माझारी गा एक सद्गुरू साचार,
त्याचेनी दर्शने तुटला हा संसार
पांगुळा हस्तपाद देतो कृपाळु उदार,
यालागी नाव त्याचे वेदा न कळे पार...

असं पांगुळावर रूपक ज्ञानेश्वरांनी केलं आहे. तर एकनाथांनी ‘मी माझ्या कल्पनेने जाहलोसे पांगूळ, हिंडलो दिशा दाही श्रम जाहला केवळ’ असं भारुड लिहिलं आहे. एकूण लोकपरंपरेत महत्त्वाचा मानला गेलेला लोकप्रतिनिधी पिंगळा किंवा पांगुळ याचं पहाटेपूर्वीच्या अंधःकारमय कालखंडाशी अतूट नातं आहे आणि जणूकाही नव्या दिवसाचं शुभवर्तमान सांगण्यासाठी तो गावात येतो.

. . .

अर्जुनराव, सोनबा, सर्जेराव भल्या पहाटे गावात येऊन असंच शुभवर्तमान सांगून आपल्या वस्तीवर परत गेले होते. मागे थांबून त्यांच्या परंपरेचा माग घेईपर्यंत सूर्व्यादेव उगवला होता. मग मी सूर्यकांत भिसे यांना सोबत घेऊन पुन्हा त्यांच्या वस्तीवर जायला निघालो. त्यांच्या वस्तीवर पोचलो, तोपर्यंत सार्यांना जाग आली होती, बाया-बाप्ये आपापल्या कामाला लागले होते. रात्री उशिरा त्यांच्या वस्तीवर पोचलो, तेव्हा सारं छानछान वाटत होतं. एखाद्या फार्महाऊसवर आल्यासारखंच वाटलं होतं. पण आता दिवसाउजेडी वस्ती पाहताना आमच्या परंपरेने मागत्यांच्या या समाजाला पाडलेली ठिगळं जागोजागी दिसू लागली. परंपरेने यांना कधी एका जागी स्थिर केलंच नाही. पोटा-पाण्याच्या उद्योगासाठी हा समाज महाराष्ट्रभर गाव-दरगाव भटकत राहिला. त्याच्या हक्काचा ना गावात तुकडा होता, ना रानात. नावाला कुठलं तरी एखादं मूळ गाव. पावसाचे चार महिने बुड टेकण्यासाठी. बाकीचे आठ महिने घोडा किंवा गाढवाच्या पाठीवर किडुकमिडुक संसार लादून फिरत राहायचं. गावाच्या वेशीबाहेरची उघड्यावरची पडीक जमीन, किंवा अगदी स्मशान, हीच त्यांची उतरायची हक्काची जागा. ती तरी हक्काची कुठली? अर्जुनराव आणि सूर्यकांत भिसे सांगतात-‘पोलिस पाटलाने उतरायची परवानगी दिली, तरच आजही गावाच्या बाहेर पिंगळ्यांना तळ ठोकता येतो. आपल्याजवळ असलेल्या प्रत्येक वस्तूची नोंद त्यांना आधी पोलीस पाटलाकडे करावी लागते. कारण गावात चोरी-मारी झाली, तर गाववाले सगळ्यात आधी बाहेरुन आलेल्या फिरस्तांवरच संशय घेतात.’
यामुळेच आजवर कधी या समाजाने संसारात फार काही जोडलेलं-सांभाळलेलं नाही. गावात शकुन सांगून जे कमवायचं, ते त्या गावातच खाऊन पुढे निघायचं. म्हणजे कुणाचे आरोपही नकोत आणि कुणाचे शिव्याशापही नकोत. पण त्यामुळेच आजवर हा समाज सामाजिक-शैक्षणिकदृष्टया मागासलेलाच राहिला. एका जागी स्थिर नसल्यामुळे मुलांना शिक्षण नाही आणि शिक्षण नाही म्हणून प्रगती नाही. प्राचीन काळापासून चालत आलेलं त्यांच्यामागचं हे दुष्टचक्र आता भारतीय स्वातंत्र्याला साठ वर्षं होऊन गेल्यावरही संपलेलं नाही. किंबहुना आधीची परिस्थिती बरी होती, असं सोनबा-सर्जेराव सांगतात. कारण तेव्हा देवा-धर्माच्या नावानं समाजात किमान काही मान होता. पिंगळा दारात किंवा गावात आलाय म्हटल्यावर, गावकरी आदराने स्वतःहून काही आणून झोळीत टाकत होते. पण नव्या विज्ञानयुगात, परंपरेने चालत आलेल्या समाजव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडालेला आहे. ते साईबाबा-सिद्धिविनायक अशा मंदिरातील दानपेट्यांत लाखो रुपये टाकतील. पण दारावर आलेल्या मागत्याला पाच रुपयेही देणार नाहीत. मग तो स्वतःची काही कला दाखवत असला, तरीही... 

. . .

... एव्हाना अर्जुनरावांनी चहाचा कप पुढ्यात आणून ठेवला होता. मोकळ्या माळरानावरच्या त्यांच्या खोपट्यातल्या चहाला वेगळीच चव होती. दूध दारातच बांधलेल्या म्हशीचं होतं. तर मुंबईवरून आलेला पाव्हणा म्हणून चहात सढळ हाताने साखर घातलेली होती. सकाळचं दान मागून झालेलं असल्यामुळे स्वारी मोकळी होती. दुपारच्या जेवणाला थांबणार का असं विचारुन, वर बोकड कापायचा का? असंही विचारत होती. पै-पाहुण्याच्या आणि सण-वाराच्या निमित्ताने उत्सव करायचा ही या समाजाची वृत्ती. ते साहजिकच होतं. कारण एरव्ही त्यांच्या आयुष्यात आनंदाचे-सुखाचे क्षण कमीच असतात. मग ते आनंद साजरा करण्याची संधीच शोधतात. ती संधी त्यांना कुणा पाव्हण्याचं आगमन, देवीची यात्रा-जत्रा, कुणाचा जन्म, कुणाचं लग्न अशावेळी मिळते आणि अशावेळी मटणाचं जेवण ठरलेलं.
मांसाहार या समाजाला अतिशय प्रिय. त्यामुळे मूल जन्माला आला की त्याच्या पाचवीला या समाजात बोकड कापला जातो. मात्र मुलगा झाला, तर बोकड आणि मुलगी झाली तर बकरी कापण्याची पद्धत आहे. यांच्या लग्न समारंभात भात, वांग्याची भाजी आणि गव्हल्याची लापशी ठेवावीच लागते. पण लग्नातलं एक जेवण बोकडाचं दिल्याशिवाय वधू-वरांच्या घरच्यांची सूटका नसते. या समाजात लग्नानंतर देवीचा गोंधळ किंवा खंडोबाचं जागरण करण्याची पद्धत आहे, तेव्हाही तिखटाचंच जेवण लागतं. मराठ्यांप्रमाणंच खंडोबा-जोतिबा-तुळजापूरची भवानी, ही या समाजाची कुलदैवतं. त्यांची आडनावंही तशीच जाधव, भोसले, मोरे, निकम, शिंदे, सूर्यवंशी. पण या समाजात कुलदेवतांप्रमाणेच जिथे राहतो, पाल ठोकतो, तिथल्या मरीआई-लक्ष्मीआईला मानाचं स्थान असतं. आषाढी एकादशीनंतर या समाजाची या ग्रामदेवतांची जत्रा भरते. त्या जत्रेला सगळा समाज एकवटतो. त्या जत्रेत दावणाचे म्हणजे नवसाचे बोकड कापले जातात.
या गावदेवतांच्या जत्रेला या समाजात मानाचं स्थान आहे. कारण या निमित्ताने सगळा विखुरलेला समाज एकत्र येतो आणि यात्रेच्या दुसऱ्या दिवशी त्यांची जातपंचायत भरते. समाजातले न्यायनिवाडे, भांडणतंटे या जातपंचायतीतच मिटवले जातात. लग्न ठरणं आणि मोडण्यासारखे प्रकारही या जत्रेतल्या पंचायतीत होतात. महाराष्ट्रभर विखुरलेल्या पिंगळ्यांच्या अशा भरणाऱ्या जत्रा आणि त्यातल्या जातपंचायतीतून अनेक सामाजिक-आर्थिक उलाढाली होत असतात. गेल्या काही वर्षातील एकूणच सामाजिक प्रबोधनामुळे समाजातील जातपंचायती आता पूर्वीसारख्या ताठर भूमिका घेत नाहीत. मानवतेला काळिमा फासणाऱ्या शिक्षाही आता सुनावल्या जात नाहीत. तरीही या समाजाला अद्याप जातपंचायत मात्र हवीशी वाटते. कारण समाजातले काही प्रश्न फक्त समाजाची जातपंचायतच सोडवू शकते, असं या समाजाचं म्हणणं आहे. तसंच एकाच जागी वस्ती नसल्यामुळे न्यायासाठी पोलिसांच्या पाठी कुठे धावायचं, असंही त्यांचं म्हणणं असतं. पिंगळा किंवा त्यांच्यासारख्या मागत्यांच्या या जातपंचायतींचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्या माध्यमातून चालवण्यात येणारी भिशी. जातपंचायतीच्या दिवशी फुटणाऱ्या या भिशीत अक्षरशः लाखोंचे व्यवहार होतात. ही एकप्रकारे या समाजाची पूर्वापार चालत आलेली बचतगट योजना आहे. समाजातील पाटलाच्या हाती या भिशीचे व्यवहार असतात. ज्याला गरज असते, तो उचल घेतो. त्या रकमेवर एक ते दोन टक्के व्याज आकारलं जातं. महत्त्वाचं म्हणजे वर्षानुवर्षं होणाऱ्या या भिशीच्या व्यवहारात आजवर कधीही घोटाळा झालेला नाही किंवा कधी कुणी पैसे बुडवलेले नाहीत. ज्याने उचल घेतलेली असते, तो एकवेळ जिवाचं रान करील, पण ठरल्यावेळी पैशांची परतफेड करणार म्हणजे करणारच. कारण जातपंचायतीत नावाला लागलेला बट्टा, हा या समाजात कलंक मानला जातो. आजही या समाजाला आपल्या जातपंचायतीची भीती वाटते आणि तिच्यात आपली अब्रू जाऊ नये म्हणून हा समाज स्वतःला जपत असतो. आता एकूणच सुधारणेच्या काळातील सामाजिक रेट्यामुळे फिरस्त्या समाजातील जातपंचायती बरखास्त होत आहेत. पण या समाजांचं म्हणणं आहे - ‘आम्हाला आधी एका जागी स्थिर तर करा. तुमच्या समाजव्यवस्थेत आम्हाला सामावून तरी घ्या आणि मग आम्हाला तुमचे कायदेकानून लागू करा.’    

...चहा पीत गप्पा मारता-मारता अर्जुनराव, सोनबा, सूर्यकांत भिसे सामाजिक-सांस्कृतिक माहिती पुरवत होते. या गप्पा चालू असताना मध्येच वस्तीवरचे कोण कोण अर्जुनरावांना काहीबाही विचारायला येत होते. मात्र त्यावेळी त्यांच्यात होणारी चर्चा मला बिलकूल कळत नव्हती. माझ्याशी बोलताना अर्जुनराव किंवा सोनबा नेहमीच्या, मला समजेल अशा मराठीतच बोलत होते. परंतु समाजातलं कुणी आलं की ते त्यांच्या सांकेतिक बोलीत बोलत होते. पिंगळ्यांची किंवा एकूणच भटक्या-फिरस्त्या समाजाची आपापली सांकेतिक भाषा असते. पिंगळा समाज त्यांच्या या सांकेतिक भाषेला ‘पारोशी’ भाषा म्हणतो. ती फक्त त्यांच्या समाजातल्या लोकांनाच कळते. उदाहरणार्थ माणसं आली पळा, असं म्हणायचं असतं, तेव्हा ते म्हणतात- मानवं आली खपला. किंवा वेळ आली याऐवजी ते ‘बानी आली’ असं म्हणतात. अशावेळी ते आपल्यासमोर आपलीच निंदा करत असतील, तर तेही आपल्याला कळायचं नाही. म्हणूनच तुम्ही माझ्याबद्दल तर काहीबाही बोलत नाही ना, असं विचारल्यावर अर्जुनराव खळखळून हसले आणि म्हणाले- पाव्हण्यांबद्दल आम्ही कधी वाकडा शब्द काढत नाही. समोरच्याला एकदा आपलं म्हटलं की तो आपला. 
ते खरंही होतं. आदल्या दिवशी रात्रीपासून त्यांच्या वस्तीवर ठोकलेल्या मुक्कामातल्या अनुभवातून ते सिद्धच होत होतं. खरंतर परक्या समाजातल्या, किंबहुना अनोळखी शहरी माणसाला फिरस्ते समाज कधीच आपल्या पालावर थारा देत नाहीत आणि त्यांच्याशी फार बोलतही नाहीत. कारण ही पोलिसांची माणसं तर नाहीत, अशीच त्यांना सतत धास्ती असते. आणि आजवर सुशिक्षित समाजानेही त्यांना कधी आपलं मानलं नाही. त्यांच्याकडे कायम संशयानेच पाहिलं. त्यामुळे नागर वस्तीतला कुणी त्यांच्याकडे गेला, की ते सुद्धा त्याच्याकडे संशयानेच पाहतात. पण अर्जुनरावांच्या चव्हाण वस्तीवर मला आलेला अनुभव चांगला होता. आपला माणूस मानून त्यांनी संपूर्ण वस्ती फिरवली. वस्तीतल्या माणसांची गाठभेट घालून दिली.
वेळापूरहून दोन-तीन किलोमीटरवर असलेली ही चव्हाणवस्ती, म्हणजे काही आखीवरेखीव कॉलनी किंवा गावही नाही. किंवा सगळ्यांची अगदी पक्की घरंही नाहीत. पण त्यांना बूड टेकायला हक्काची जागा मात्र आहे. सूर्यकांत भिसे यांनी आपल्या ‘भटके-विमुक्त विकासमंच’ या संस्थेच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांमुळेच गृहमंत्री असताना अकलूजच्या विजयसिंह मोहिते पाटलांनी वेळापूर गावाच्या बाहेर असलेला माळरानाचा एक तुकडा फिरस्त्या जोशी समाजाला दिला. त्यात वासुदेव, नंदीबैलवाले असे सगळेच जोशीसमाज एकत्र आहेत. या सगळ्या पन्नास-शंभर उंबर्याच्या वस्तीत पंधरा-वीस घरं पिंगळ्यांची आहेत. या पिंगळ्यांना याच अकलूज-माळशिरस परिसरातील गावं पंरपरेने मागत्यांची वतनं म्हणून मिळालेली. हक्काचं असं कुठलं गावं नव्हतंच. मग संधी मिळताच इतर जोशीसमाजांबरोबर पिंगळेही वेळापूरजवळच्या चव्हाणवस्तीत मुक्कामी आले. आता गेली पंधराएक वर्षं त्यांची मुक्काम एकाच जागी आहे. महत्त्वाचं म्हणजे सूर्यकांत भिसे आणि मोहिते-पाटलांमुळे त्यांच्या नावावर आता रेशनकार्ड आहे. त्यातल्या अनेकांची नावं मतदारयादीतही गेलीत. आजवर बूड एका जागी स्थिर नसल्यामुळे त्यांना मत नव्हतं आणि त्यामुळेच त्यांना पतही नव्हती. मात्र एकाच जागी स्थिर झाल्यावर त्यांच्याकडे मत आणि पत दोन्ही गोष्टी चालून आल्यात.
सगळ्यात दखल घेण्याजोगी बाब म्हणजे एका जागी स्थिर झाल्यामुळे सूर्यकांत भिसे यांच्या प्रयत्नांमुळेच त्यांच्या वस्तीवर शाळा सुरू झाली आणि नवी पिढी शिकू लागली. यातून चव्हाणवस्तीवरच्या पिंगळ्यांच्या कुटुंबातील अनेकजण आता वेगवेगळ्या उद्योग व्यवसायात कामाला लागले आहेत. काहीजण सैन्यातही गेलेत. तर जे वस्तीवरच राहिले, त्यांनी घोडे नाचवण्याचं कसब शिकून घेतलं आणि आता ते वरातीत-मिरवणुकीत घोडे नाचवण्याचा व्यवसाय करतात. त्यासाठी थेट मध्यप्रदेशापासून बेळगाव-बेंगळुरूपर्यंतची काही हजारांची सुपारी घेतात. सूर्यकांत भिसे सांगतात- ‘घोड्याच्या पाठीवर बिऱ्हाड टाकून हिंडत असल्यामुळे पूर्वापारपासून यांच्याकडे घोडा हाताळायची हातोटी होतीच. पण गेल्या काही वर्षांपासून अकलूजला घोड्यांची जत्रा भरायला लागल्यावर, त्यांच्या या हातोटीचा उपयोग झाला. त्यातून या जत्रेतून त्यांना उधारीवर घोडे विकत मिळू लागले. या घोड्यांना नाचायला शिकवूनच आता या समाजातील तरुण त्याचा व्यवसाय करत आहेत.’
सूर्यकांत भिसे ही माहिती सांगत असतानाच अर्जुनरावांच्या मुलाने त्यांच्या दारातला घोडा आणला आणि त्याला नाचवायला सुरुवात केली. त्या घोड्याची दुडकी चाल पाहताना खरोखर मजा वाटत होती. फक्त त्याची दुडकी चाल पाहतानाच नाही, तर वर्षानुवर्ष भटकंती करणाऱ्या समाजाने एका जागी स्थिर झाल्यावर, स्वतःचा जो उत्कर्ष साधला, तो पाहतानाही आनंद वाटत होता. मग भले त्यांची घरं अजून खूप छान नसतील, अजूनही काहीसं ठिगळं लावलेलं आयुष्यच  त्यांच्या वाट्याला आलेलं असेल, पण त्यांच्या खर्या अर्थाने जगण्याला सुरुवात तर झालेली आहे. त्याचाच आनंद वाटत होता.
अन् तरीही एकीकडे आनंद वाटत असताना, दुसरीकडे दुःखाचेही कढ येतच होते. कारण चव्हाणवस्तीवरच्या पिंगळ्यांसारखं भाग्य महाराष्ट्रातील प्रत्येक पिंगळ्यांच्या वाटेला अजून आलेलं नाही. त्यांचं पाल-दर पाल भटकणं अजून सुरूच आहे. मात्र गेल्या दहा-पंधरा वर्षात या भटक्या कलावंत समाजांच्या विकासासाठी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक संघटना उभ्या राहिल्या आहेत. पुण्यात ‘महाराष्ट्र जोशी समाज संघटना’ आहे. मराठवाड्यात लातूरला ‘भारतीय भटक्या-विमुक्त जमाती विकास संघटना’ आहे. या संघटनांचे नेते अनुक्रमे दिलीप परदेशी आणि प्रा. सुधीर अनवले भटक्या समाजांसाठी काम करत आहेत. त्यांना एकत्र आणत आहेत. सोलापूरच्या बाळासाहेब रेणके यांच्या ‘लोकधारा’ संघटनेनेही गेल्या काही वर्षांत भटक्यासांठी मोठं काम उभं केलं आहे. त्याचा परिणाम गेल्या काही वर्षांपासून दिसू लागला आहे. ‘महाराष्ट्र जोशी समाज संघटने’चे अध्यक्ष दिलीप परदेशी सांगतात- महाराष्ट्रात फिरस्त्या जोशी समाजाची लोकसंख्या ३ ते ४ कोटी असेल. त्यातून पिंगळासमाजाची लोकसंख्या ५ ते ७ लाख असेल. आजवर हा समाज कधीच एकत्र न आल्यामुळे त्याची ताकद राजकीय पक्षांना अजून कळलेली नाही. म्हणून अाम्ही आधी या समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण दर तीन दिवसांनी बदलावं लागणारं गाव, परिणामी शिक्षण नाही, शासकीय सवलती नाहीत. अशी या समाजाची कुचंबणा सुरू होती. पण माझ्या प्रयत्नांमुळे अनेकांना जातीचे दाखले मिळालेत. उर्वरित समाजालाही ते मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुख्य म्हणजे आम्ही आर्थिक विकासाबरोबरच समाजाच्या सामाजिक विकासावरही भर देतोय. कारण सामाजिक विकास झाला नाही, तर समाज इतर समाजांच्या तुलनेत मागासलेलाच राहील. म्हणूनच गेल्या काही वर्षांत समाजात शिक्षणाचा प्रसार करतानाच, समाजातील काही जुन्या चालीरिती मागे टाकण्याचाही आम्ही प्रयत्न करतोय. उदाहरणार्थ या समाजात आतापर्यंत विधवाविवाहाची किंवा परित्यक्तेला पुनर्विवाहाची परवानगी नव्हती. त्यामुळे समाजातील अनेक महिलांना जगणं म्हणजे ओझं वाटू लागलं होतं. परंतु आता अशा महिलांसाठी म्होतुर लावण्याचा, म्हणजे पुनर्विवाहाचा पर्याय संघटनेने केलेल्या प्रबोधनामुळे समाजाने स्वीकारलेला आहे.’ 
विविध संघटनांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांमुळे महाराष्ट्रभर विखुरलेला जोशी समाज आणि त्याच्या अंतर्गत पिंगळाही आता एक होऊ लागला आहे. नव्या सामाजिक-आर्थिक-राजकीय बदलाला सामोरं जाण्याची आस त्याच्यातही निर्माण झालेली आहे. त्यासाठी फक्त आपल्या पोटजातीत वस्ती करण्याऐवजी, तो संपूर्ण जोशी समाजात स्वतःला सामावून घेत आहे. अशा जोशी समाजाच्या आता वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये  मोठ्या कॉलन्याही आता उभ्या राहत आहेत. विशेषतः नगर, बीड आणि जळगाव जिल्ह्यांत तर भटक्या जोशीसमाजाच्या मोठमोठ्या कॉलनीज आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जळगावमधील जोशी कॉलनीच्या जीवावर तिथला आमदार निवडून येतो. म्हणजे या समाजाला आता आपली समाजातली पत आणि ताकद कळलेली आहे.
आजवर नसलेली ही पत-प्रतिष्ठा हा समाज एकत्र आल्यावर आणि त्याने एकाच जागी वस्तान ठोकल्यावरच त्याला प्राप्त झालेली आहे. वेळापूरजवळच्या चव्हाणवस्तीवरील अर्जुनरावांच्या घरासमोर बसल्याबसल्या महाराष्ट्रातल्या एकूणच जोशी समाजाची आणि त्यातही पिंगळा ऊर्फ कुडमुडे जोशी ऊर्फ पांगुळ समाजाची नाडीच जणू माझ्या हाती लागली होती. खरंतर एवढी वर्षं इतरांना भविष्य आणि शकुन सांगणार्या या समाजाला स्वतःचंच भविष्य उमगलं नव्हतं.
... पण आता पालापालांवर तांबडं फुटलंय. आपलं भविष्य आपल्याच हातात असल्याचं या भटक्यांनाही उमगलंय...
…..
('अनुभव' मासिकासाठी केलेल्या 'भटक्यांच्या पालावर' या पाच भागांच्या मालिकेतील पिंगळा समाजावरचा लेख)






बुधवार, ३ जून, २०१५

राधेच्या घरी होतो सोहळा...


राधेच्या घरी होतो सोहळा...


राधा-कृष्णाचं अप्रतिम शिल्प
अनयाची राधा सुखी होती. सासू थोडा जाच करायची. पण जिवापाड प्रेम करणारा नवरा असल्यावर आणखी काय हवं होतं तिला. सासूचा सारा जाच ती प्रेमाने सहन करायची. पोटी मूलबाळ नव्हतं, म्हणून उदास असायची बिचारी. मात्र अनयानं तिचा कधी राग केला नाही. तसा तो तिच्या शेल्याच्या गाठीला बांधलेलाच होता. कारण सा-या गोकुळात राधेइतकं आरसपानी सुंदर कुणी नव्हतंच ...


... पण कृष्णजन्म झाला नि घात झाला. अनयाच्या आणि राधेच्या प्रेमात वाटेकरी आला. खरंतर सुरुवातीला राधा इतर गवळणींप्रमाणेच जायची यशोदेच्या घरी, कृष्णाला जोजवायला. आपल्याला मूल नाही म्हणून तीही आपल्या प्रेमाचा पान्हा त्याच्यावर रीता करायची. यशोदा आणि गोकुळीच्या सा-या गवळणींनाही राधा-कृष्णाच्या या प्रेमलीलांचं कौतुक वाटायचं. त्यांच्या लेखी त्या मायलेकांच्या लीला होत्या. त्यात त्यांना कधीच विषयबाधा दिसली नाही.


कृष्णाच्या लहानपणी खरोखरच तसं काही नसेलही. पण कृष्ण मोठा होत गेला तरीही राधा-कृष्णाच्या लीला तशाच सुरू राहिल्या. कदंबाच्या तरुतळी दोघेही म्हणे गुपचूप भेटायचे, तासन् तास बोलत बसायचे. काय बोलायचे ते कुणाला कधीच कळलं नाही आणि कळायला त्यांच्यात शब्दांचं बोलणं होतं तरी कुठे? एक अवाक्षरही न बोलता दोघेही एकमेकांच्या मनीचं गुज नेमकं जाणायचे. तो तिच्यासाठी मंजुळ पावा वाजवायचा. तेव्हा राधेला यमुनेकाठचं सारं वेळूचं बनच पावा झाल्यासारखं वाटायचं. मग ती आपल्या रंध्रारंध्रात ते अलौकिक सूर साठवून ठेवायची. जणू पुन्हा कधीच हे सूर ऐकायला मिळणार नाहीत, अशी तिला भीती वाटाची की काय न कळे! पण ती संपूर्ण तनाचाच कान करायची नि बासरीतून निघणारे सूर पिऊन घ्यायची. तिचा हा उद्योग सुरू असताना कृष्ण मात्र शांतच असायचा. त्याला कळायचंच नाही, की हे सूर जीवनाच्या अंतापर्यंत फक्त हिचेच असताना ही का एवढी बावरी होतेय?

कदाचित राधेच्या जागी असता, तर तो हे समजू शकला असता. राधा कितीही त्याची असली, तरी ती अनयाची बायको होती. तिला पत्नीधर्म निभवावा लागणारच होता. इच्छा असो वा नसो... आणि कृष्णाबरोबरच्या नात्याला तरी ती काय नाव देणार होती!

खरोखरच तिला कृष्णाबद्दल किंवा कृष्णाला तिच्याबद्दल नेमकं काय वाटत होतं? पुराणांनी त्यांच्यातल्या प्रेमाला अध्यात्माचंच अवगुंठन चढवलं. मग एकजात सा-याच कवी-लेखकांनीही त्यांचा प्रणय अध्यात्माच्याच चौकटीत बंद केला. त्यांच्या प्रेमाला अलौकिक ठरवून खरंतर सा-यांनीच त्यांच्या प्रेमाची क्रूर चेष्टाच केली. ते अलौकिक प्रेम नव्हतं. ते ख-या अर्थाने लौकिक प्रेमच होतं. एका जीवाला दुस-या जीवाबद्दल वाटणारं. असेल कदाचित त्यांच्यात वयाचं मोठं अंतर. पण त्यांना एकमेकांबद्दल जी भावना वाटत होती, त्या भावनेला कोणतंच वय नव्हतं. म्हणून तर लोकगीतं म्हणतात-

यमुनेच्या तिरी कोन वाजवितो बासरी

राधा म्हणे मनी, आला असेल माझा हरी

राधा कृष्णाचं हे नातं, गावात होतोया बोभाटा

अनयाची राधा मोठी, कृष्णसखा गं धाकुटा

… मात्र राधा-कृष्णाने हे वयाचं बंधन नाहीच मानलं. कारण त्यांनी एकमेकांना केवळ शरीरानेच नाही, मनाने स्वीकारलेलं होतं. त्यांच्या या नात्याचा उलगडा आजवर कुणाला झालेला नाही. पण ती निव्वळ सात्त्विक प्रेमभावना नक्कीच नव्हती. तिथे प्रियकर-प्रेयसीचाच तृप्त विलास होता आणि तो हळूहळूच पुष्ट होत गेला होता. कृष्ण लहान असताना राधेने त्याच्याकडे वात्सल्यानेच पाहिलं असेल कदाचित! पण कृष्ण मोठा होत गेला, तसं त्यांच्यातलं नातंही फुलत गेलं. त्याच्या अडनिड्या वयात त्याला तिचं आकर्षण वाटलं असणं स्वाभाविक आहे आणि राधेलाही त्याच्या रूपात आपलं नव्हाळीचं प्रेम सापडलं असणं शक्य आहे. म्हणूनच त्यांचं हे नवथर प्रेम लोकमानस नेमक्या शब्दात व्यक्त करतं-

रुतला बाई काटा, या आडवाटा

नंदाचा गं कारटा हुता जोडीला

हुता जोडीला म्हणून मी आले गोडीला

गोड बोलूनी कसा गं काटा काढीला... गं बाई बाई रुतला बाई काटा…

हा कृष्णरूपी काटा राधेच्या पायात नाही, तनामनात रुतलेला आहे. एकाच वेळी तो काढावासाही वाटतो आणि त्याच वेळी तसाच राहू द्यावा, असंही वाटतं. कारण त्याच्या असण्याने त्या वेदनेची जी हुळहुळी असते, ती नेहमीच हवीहवीशी वाटते. राधा-कृष्णाच्या या अनोख्या, पण सच्च्या नात्याचं थेट चित्रण करणं सा-यांनीच टाळलं. प्रत्येकानेच ते केवळ उदात्त करण्याचाच प्रयत्न केला. पण ‘जांभूळआख्यान’ लिहिणाऱ्या लोकसंस्कृतीतील अनाम कर्त्याने मात्र त्याला योग्य शब्दरूप दिलंय. तो म्हणतो-

राधा म्हणे रडू नको घन:श्यामा, यशोदेशी करू द्या घरी कामा

कडेवर घेऊन कृष्णाशी, आली मग आपल्या सदनाशी

शिवकरी मृगनयना बोले, थोर केव्हा होताल या वेळा

पाहताना ‘थोर’ झाला सावळा, राधेच्या घरी होतो सोहळा

बोलता बोले गुजगोष्टी, प्रेमाने घाली मिठी हो कंठी

तो आला भ्रतार पूर्वीचा, लज्जा माझी राखावी हो आता

पाहताना कृष्ण झाला सावळा राधेच्या घरी होतो सोहळा…

अनयाचा संसार करतानाच राधा तना-मनाने कृष्णमय झाली. पण तिने दोघांची गल्लत कधीच केली नाही. म्हणून तर गोकुळातून कृष्ण मथुरेला निघून गेल्यावर ना तिने त्याच्याकडे वळून पाहिलं, ना त्याने. शेवटी दोघांनाही आपल्या नात्याच्या सीमारेषा होत्याच ठाऊक!

(प्रहारमध्ये असताना राधा-कृष्णाच्या नात्यावर लिहिलेला एक तुकडा)