शनिवार, २ नोव्हेंबर, २०१९

विरुबाई : आंदणी ते मातुश्रीसाहेब!

रेखाचित्र : अतुल बेलोकर

प्रवास तरी केवढा? तर औरंगजेबाच्या छावणीतल्या, एका तंबूपासून दुसऱ्या तंबूपर्यंतचा... तोही लपून-छपून नाही, तर सरदार-दरकदारांच्या साक्षीने झालेला आणि संभाजीपत्नी येसूबाई व औरंगजेबाची कन्या झिनतुन्निसा यांच्या संमतीनेच घडवून आणलेला... पण या छोट्याशा प्रवासातच मराठा साम्राज्याचा वारसदार शाहू, विरूबाईचा झाला तो कायमचा!
काय घडलं असेल, या छोट्याशा प्रवासात? शाहू-विरूबाईची नजरानजर झाली असेल? दोघं चुटपुटत एकमेकांशी काहीतरी बोलले असतील? ...की न बोलता, न स्पर्श करता, त्यांना एकमेकांच्या मनाची भाषा उमगली असेल? बहुदा असंच झालं असेल... काहीही न बोलता, ते खूप बोलले असतील... आणि प्रवासाचं तरी काय, तो छोटा असो वा मोठा, कसा आणि कुणासोबत होतो तेच महत्त्वाचं, नाही का?
...पण जे घडलं, ते मराठ्यांच्या इतिहासातलं एकमेव उदाहरण होतं.
तेव्हाही विरूबाई शाहूची लग्नाची बायको नव्हती, अन् नंतरही कधी झाली नाही... आणि तरीही औरंगजेबाच्या छावणीत शाहू कैद असल्यापासून ते सातारच्या गादीवर त्याचा राज्याभिषेक होऊन तो मराठा साम्राज्याचा छत्रपती होईपर्यंत प्रत्येक वेळी विरूबाई त्याच्यासोबत, त्याच्या जोडीने उभी होती. एवढंच कशाला, १९४० साली विरूबाई वारली, तेव्हाही शाहूने कोण शोक व्यक्त केला... भोसल्यांच्या राजघराण्यातील व्यक्तींचं जिथे दहन केलं जातं, त्या संगम माहुली येथेच शाहूने विरूबाईचं दहन केलं आणि तिची सुरेख समाधीही बांधली.
... अशी ही विरूबाई होती तरी कोण? तर विरूबाई होती, एक सामान्य आंदणी. म्हणजे लग्नात आंदण म्हणून आलेली!
***
झुल्फिकारखानाने १६८९मध्ये रायगड ताब्यात घेतला आणि रायगडावर मुक्काम असलेल्या येसूबाई व आठ वर्षांचा शाहू यांना कैद केलं. तेव्हापासून येसूबाई व शाहू, मोगलांच्या छावणीत कैदी म्हणून होते. नगर-सोलापूर-औरंगाबाद... जिथे औरंगजेबाची छावणी हलायची-पडायची, त्या छावणीत खुद्द औरंगजेबाच्या नजरेखाली राहील अशा तंबूत येसूबाई-शाहूची सोय केली जायची. अर्थात मराठ्यांचा राजपुत्र आणि मराठ्यांची महाराणी असल्यामुळे येसूबाई किंवा शाहूच्या खिदमतीत कोणतीच कमी नसे. उलट खुद्द औरंगजेबाची कन्या झिनतुन्निसा ही येसूबाई आणि संभाजीराजांची बडदास्त ठेवायची. शाहूवर तर झिनतुन्निसाचं पुत्रवत प्रेम होतं. त्यामुळेच जेव्हा शाहूचं लग्नाचं वय झालं, तेव्हा येसूबाईपेक्षा झिनतुन्निसानेच अधिकारवाणीने आपल्या पित्याकडे, म्हणजे औरंगजेबाकडे शाहूच्या लग्नाचा विषय काढला. तेव्हा औरंगजेब येसूबाई आणि शाहूच्या सोबतीला असलेल्या मराठा सरदारांना ( उद्धव योगदेव, मोरोपंत सबनीस, जोत्याजी केसरकर) म्हणाला, ‘ आमचे पदरी मातबर मराठा उमराव, सरदार आहेत. यांत राजांचे शरीर-संबंधी पूर्वीपासून होत असतील, त्यांच्या कन्या पाहून, उत्तम अशा योजाव्या आणि लग्न करावे. एवढंच बोलून औरंगजेब थांबला नाही, तर त्याने या लग्नाच्या खर्चासाठी एक लाख रुपयांची तरतूदही केली.
त्यानुसार १७०३ साली शाहू आपल्या कैदेत असतानाच औरंगजेबाने त्याची दोन लग्नं लावून दिली. पैकी एक मुलगी होती- सरदार रुस्तुमराव जाधवांची राजसबाई (सावित्रीबाई) आणि दुसरी होती- कण्हेरखेडच्या शिंद्यांची अंबिकाबाई. ही दोन्ही लग्नं एकाच वेळी आणि धूमधडाक्यात झाली. मात्र लग्नानंतर एके दिवशी औरंगजेबाने शाहूच्या बायकोला मूँहदिखाईसाठी बोलावलं आणि येसूबाईसमोर मोठाच पेच निर्माण झाला. कारण औरंगजेबाच्या कैदेत असले, तरी येसूबाई मराठा साम्राज्याची विद्यमान महाराणी होती आणि नवीन आलेली सून भावी महाराणी. त्यात मराठा स्त्रिया परपुरुषाला चेहरा दाखवत नाहीत. शेवटी येसूबाईने झिनतुन्निसालाच यातून मार्ग काढायला सांगितला आणि दोघींनी संगनमताने एक निर्णय घेतला. या निर्णयानेच मराठ्यांच्या इतिहासातील एक जगावेगळी प्रेमकहाणी जन्माला घातली. शाहू आणि विरूबाईची!
***
झालं असं की, मराठ्यांच्या सुनेला पादशहाकडे घेऊन जाण्याचा दिवस उगवला. तेव्हा येसूबाई आणि झिनतुन्निसा या दोघींनी ठरल्याप्रमाणे, शिंद्याच्या अंबिकाबाईबरोबर आंदण आणि पाठराखीण म्हणून जी मुलगी आली होती, तिलाच एखाद्या नव्या नवरीसारखी सजवली. तिची वेणी-फणी केली, तिला उंची वस्त्रं नेसवली, तिच्या अंगा-खादंयावर जडजवाहीर घातलं... तिचं असं रूपडं तयार केलं की, पाहणाऱ्याला वाटावं, ही मराठा साम्राज्याची भावी राणीच जणू!
... आणि दिली पाठवून शाहूबरोबर, त्याची लग्नाची बायको म्हणून!
येसूबाई आणि झिनतुन्निसाची तरी कमालच म्हणायला हवी कुणाला कानोकान खबर लागली नाही. एवढा हिंदुस्थानचा आलमगीर औरंगजेब... पण त्याला साधा संशयही आला नाही. शाहू आणि त्याची पत्नी आपल्या तंबूत येताच त्याने दोघांचंही खूप प्रेमाने स्वागत केलं. शाहूवर तर औरंगजेबाचा तसाही जीव होताच. याच्या आज्याने, बापाने आणि चुलत्यानेही आपल्याशी वैर धरलं, तरी हा आपल्याविषयी लोभ बाळगून असतो, याची त्याला जाणीव होती. शाहू लहानाचा मोठाच मुघलांच्या छावणीत आणि तुलनेने औरंगजेब व झिनतुन्निसाच्या प्रेमळ छायेत झाल्यामुळे, त्याच्याही मनात त्यांच्याविषयी वैरत्वाची भावना नव्हतीच. असलीच तर ती येसूबाईच्या मनात सुप्तपणे होती, परंतु शाहूच्या मनात यत्किंचितही नव्हती... याची जाणीव असल्यामुळेच शाहूचा आपल्या तंबूत प्रवेश होताच, औरंगजेबाने त्याला आणि नव्या सुनेला जवळ बोलावलं. त्यांचा रीतसर मानपान केला. त्यांचं कौतुक केलं आणि दोघांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना मनापासून आशीर्वादही दिला- तुमचे राज्य, तुम्ही उभयतां बहुत दिवस कराल... इतकंच करुन औरंगजेब थांबला नाही. त्याने साडी-चोळीच्या खर्चासाठी इंदापूर-सुपे-बारामती हे परगणे नव्या सुनेच्या नावे करुन दिले... आणि दोघांना प्रेमाने निरोप दिला.
बस्स... आणि तिथून शाहू आणि त्याच्याबरोबर त्याची पत्नी म्हणून आलेली अंबिकाबाईची पाठराखीण पुन्हा माघारी फिरले... नि आपल्या तंबूत आले. हा तंबू ते तंबू प्रवास त्या उभयतांनी चालत केला, पालखीतून केला की मेण्यातून केला, ठाऊक नाही. कळायला काही मार्गही नाही. पण हा प्रवास उभयतांना सुखकर झाला एवढा नक्की... आणि या प्रवासातच शाहूची मर्जी अंबिकाबाईच्या या पाठराखणीवर बसली, ती कायमची. तेव्हापासून तिचा अंतकाळ होईपर्यंत शाहूने तिला किंवा तिने त्याला कधीच अंतर दिलं नाही... अंबिकाबाईची ही पाठराखीण, किंवा आंदणी म्हणजेच विरूबाई!
***
विरुबाईची आणि शाहूची या प्रवासात गाठ पडली, तेव्हा शाहूचं वय होतं वीसेक वर्षांचं, तर विरूबाई होती चौदा-पंधरा वर्षांची.
या घटनेनंतर शाहू किमान पाच-सहा वर्षं तरी औरंगजेबाच्याच कैदेत होता आणि औरंगजेब जगता तर कदाचित आणखी काही काळ शाहूला औरंगजेबाच्याच कैदेत काढावी लागली असती. परंतु वृद्धापकाळामुळे २० फेब्रुवारी १७०७ला अहमदनगर येथे औरंगजेब मृत्यू पावला. त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याचा दुसरा मुलगा आजमशहा माळव्याच्या सुभेदारीवर होता. औरंगजेबाच्या मृत्यूची वार्ता कळताच तो तातडीने नगरला आला आणि त्याने औरंगजेबावर संस्कार करुन स्वतःला हिदुस्तानचा पादशहा घोषित केलं. परंतु त्याच सुमारास औरंगजेबाचा मोठा मुलगा शहाआलमही नुकताच इराणवरुन हिंदुस्थानात परतला होता. शहाआलम आपल्या मार्गात अडथळा आणू शकतो, हे उमगल्यामुळे आजमशहाने लगेच दिल्लीला परतायची तयारी सुरू केली. औरंगजेबाबरोबर तब्बल सत्तावीस वर्षं दखनी मुलुखात काढलेल्या त्याच्या सैन्यालाही आपल्या मुलुखात परत जायची इच्छा होती आणि सगळ्यांनाच शांतपणे परत माघारी फिरायचं होतं. मात्र यातला मुख्य अडथळा होता, तो शाहू. कारण एवढी वर्षं मुघलांच्या कैदेत असला, तरी शाहू महाराष्ट्रातच होता. त्यामुळे मराठ्यांचे सरदार बाहेरुन का होईना शाहूवर लक्ष ठेवून होते. आता शाहूला पार दिल्लीला नेतायत म्हटल्यावर मराठे पुन्हा एकत्र येऊन मुघलांवर हल्ला करण्याची शक्यता होती. ती शक्यता लक्षात घेऊनच आझमशहाने आपल्या परतीच्या वाटेतूनच शाहूला स्वतंत्र केलं. शाहूपेक्षा त्याला दिल्लीचं तख्त महत्त्वाचं वाटतं होतं. त्याशिवाय शाहूवर पुत्रवत प्रेम करणाऱ्या झिनतुन्निसालाही वाटत होतं की, आता शाहूला सोडलं पाहिजे. म्हणून तिच्या प्रयत्नांमुळेच मुघलांनी शाहूला स्वराज्यात सोडलं, असंही म्हटलं जातं.
८ मे १७०७ रोजी शाहूची मुघलांच्या कैदेतून सुटका झाली. मुघलांच्या छावणीचा निरोप घेताना शाहू झिनतुन्निसा बेगमला भेटायला गेला. यावेळचं वर्णन करताना शाहूचा चरित्रकारमल्हार रामराव चिटणीस म्हणतो की बेगमेने शक्य तितक्या लवकर शाहूला छावणीतून निघायला सांगितलं, तसंच ती पुढे म्हणाली- ‘तुमचे राज्य तुम्ही साधावे. पातशाहीशी वाकडे चालू नये. सनदावगैरे देतील ते घ्यावे. तुम्ही पातशहाचे नातू आहात. एवढं बोलून झिनतुन्निसाने आपल्या पुजेतील पवित्र पंजे शाहूच्या हवाली केले.
त्यानंतर शाहू मुघलांच्या छावणीतून लगेच निघाला. मात्र इथे लक्षात घ्यावयाची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शाहूची सुटका झाली तरी येसूबाईची सुटका झाली नव्हती. तिला आझमशहाने आपल्यासोबतच ठेवली होती. तसंच संभाजीचा दासीपुत्र मदनसिंग आणि शाहूची लग्नाची एक बायकोदेखील आझमशहाबरोबर उत्तरेत गेली. तर शाहूची दुसरी बायको सावित्रीबाई मुघलांच्या छावणीतच मृत्यू पावली होती. अशा वेळी मराठा साम्राज्यात परतताना शाहूने विरूबाईला मात्र आपल्या सोबत ठेवली, ही नक्कीच दखल घेण्याजोगी बाब होती.
स्वराज्यात परतल्यावर शाहूने आणखी दोन लग्नं केली. पैकी सरदार कुंवारजी शिर्के यांच्या मुलीशी लग्न करुन तिचं नाव सकवारबाई ठेवलं, तर दुसरी सरदार मोहित्यांची मुलगी करुन तिचं नाव सगुणाबाई ठेवलं. त्याशिवाय, मुघलांच्या छावणीत लहानाचे मोठे झाल्यामुळे, शाहूने त्यांच्या धर्तीवरच आपला जनानखाना तयार केला. पण तरीही त्याच्या बायकांत पहिला मान मात्र कायम विरूबाईचाच राहिला. कारण तो तिने समंजसपणे मिळवलेला होता. शाहू आपला लग्नाचा दादला नाही, हे तिला ठाऊक होतं. पण त्याची एकदा मर्जी बसल्यावर, तिने एखादी धर्मपत्नी काय साथ देईल अशी साथ शाहूला दिली. शाहूच्या जनानखान्यापासून मुदपाकखान्यापर्यंत आणि राजदरबारापासून शाहूच्या खासगी कामापर्यंत सर्वत्र तिने आपल्या समजूतदारपणाची, शहाणपणाची आणि ज्येष्ठतेची मोहोर उमटवली. विरूबाई जात्याच शहाणी आणि स्वतःचा आब राखून असणारी असावी. लग्नाच्या नसलो, तरी आपण शाहूच्या मर्जीतल्या आहोत, याचं भान तिने कधीच सोडलं नाही. तिची आपल्याप्रतिची ही समर्पणाची वृत्तीच शाहूला पहिल्यापासून भावली असावी आणि त्यामुळेच आपल्या लग्नाच्या बायकांपेक्षाही मोठा मान त्याने कायम विरूबाईला दिला. किंबहुना आपल्या बायकांना आणि प्रेमपात्रांना कायम विरूबाईच्या धाकाखाली ठेवलं.
विरूबाई हे शाहूच्या आयुष्यातलं एक असं प्रेमपात्र होतं, जिच्याशिवाय जणूकाही शाहूच्या आयुष्याला शोभाच नव्हती. त्यामुळेच जेजुरी, तुळजापूर, नाशिक कुठेही कामासाठी किंवा मौजेसाठी भटकंती झाली की शाहूबरोबर असायची ती विरूबाईच. विरुबाईने अल्पावधीत आपल्या कर्तृत्वाने दराराच असा निर्माण केला की मराठ्यांच्या राजदरबारापासून ते पेशव्यांपर्यंत सारेच तिला मातुश्रींचाच मान देऊ लागले. याससंदर्भात पेशवे दप्तरातलं एक पत्र पाहण्यासारखं आहे. थोरला बाजीराव पेशवा मोहिमेदरम्यान बाहेर असताना, त्याचा मुलगा नानासाहेब सातारा दरबारात असे. तो रोजच्या रोज सातारा दरबारातील महत्त्वाच्या घडामोडी पत्राद्वारे बाजीरावाला कळवत असे. त्यातल्या एका पत्रात नानासाहेबाने लिहिलं आहे- आम्ही राजश्री स्वामीस नजर पाच मोहरा केल्या. राजश्री स्वामीनी जरी चादर आम्हास दिली. तेथून वाडियात गेलो. सौभाग्यादिसंपन्न वज्रचुडेमंडित मातुश्री विरुबाईसाहेब यांची भेट घेतली. नजर दोन मोहरा केल्या. त्यांनी विडे देऊन आज्ञा दिल्ही. यावरुन विरूबाई शाहूची लग्नाची बायको नसली, तरी ती त्याच्या पत्नीपदाला पोचली होती, एवढं नक्की. इतकंच नाही, तर पेशव्यांना जेव्हा शाहूकडून काही काम करुन घ्यायचं असे, तेव्हा ते मातुश्री विरूबाईंना पत्र लिहीत असल्याचेही अनेक उल्लेख सापडतात. किंबहुना क्वचित प्रसंगी विरूबाई पेशव्यांनाही धाकात घेत असे. तिचं असंच एक पत्र उपलब्ध आहे. त्यात पेशव्यांना सातारच्या महालातील मुदपाकखान्याच्या दुरुस्तीविषयी जरबेने लिहिताना ती म्हणते- दिवस गतीवर घालणे. अविलंबे तयार करविले पाहिजे. यावरुन विरूबाईचं शाहूच्या आयुष्यातील आणि मराठा राजदरबारातीलही महत्त्वाचं स्थान लक्षात येतं.
विरूबाईचं शाहूच्या आयुष्यातील हे स्थान एवढं महत्त्वाचं होतं की, तिच्याकडे वक्र दृष्टीने पाहण्याचीही अनेकांची हिंमत होत नसे. उलट तिच्याबाबतीत प्रत्येकजण सावध असे. यासंबंधीची एक घटना शेडगावकर बखरीत आलेली आहे. या बखरीनुसार विरूबाईच्या मनात एकदा समुद्रस्नानाची इच्छा निर्माण झाली. तेव्हा शाहूने बसवंतराव नावाच्या एका इसमास आज्ञा केली की – मर्जीबरोबर तुम्हास चाकरीस नेमले आहे. त्यांस समुद्रस्नान करवून आणावे... याप्रसंगी आपल्यावरची जोखीम ओळखून या बसवंतरावाने आपले लिंग स्वतःच्या हाताने छाटले आणि मगच तो विरूबाईबरोबर समुद्रस्नानाच्या मोहिमेवर गेला.
*** 
आयुष्याच्या एका नाजूक वळणावर शाहू आणि विरुबाईची पहिली भेट झाली होती. त्या भेटीच्या वेळी विरूबाई लहान असली, तरी शाहूस जाणता होता. त्याला त्या लहान मुलीच्या मनातली चलबिचल उमजली होती का?... कुणास ठाऊक! आपण औट घटकेच्या शाहूपत्नी आहोत, ते त्या लहानग्या विरूबाईला कळलं असावं आणि त्यातून तिच्या मनात निर्माण झालेली चलबिचल शाहूने हेरली असावी... कदाचित! आणि त्यावेळी विरूबाईला दिलेली साथ शाहूने अखेरपर्यंत निभावली.
शाहूचं बालपण मुघलांच्या छावणीत गेलं. साहजिकच त्याने त्यांचे सगळे ऐषोआरामी तोर तरीके उचलले. अशा छंदांसाठी सातारच्या गादीवर बसल्यावर त्याने खास रंगमहालही बांधून घेतला होता. त्यामुळे तो आपल्या लग्नाच्या बायका किंवा मर्जीतल्या स्त्रियांशी एकनिष्ठ होता, असं नाही. उलट पेशवे दप्तरात आणि इतरही सरदारांच्या दप्तरखान्यांत अशी अनेक पत्रं सापडतात, की ज्यांत शाहूने चांगल्या देखण्या मुलींची मागणी केलेली आहे. इतिहासकाळात या व्यवहारांकडे अनैतिक म्हणून पाह्यलं जात नसे. किंबहुना राजरोस असे संबंध ठेवले जात असत... अन् तरीही शाहू-विरूबाई प्रकरणाचं वैशिष्ट्य किंवा वेगळेपण हे आहे की, कितीही जणींशी संबंध आले, तरी शाहूने विरूबाईला कधी अंतर दिलं नाही. ती त्याची जणू पट्टराणीच राह्यली कायम. एखादी स्त्री लग्नाची नसतना, केवळ अंगवस्त्र किंवा मर्जी असताना, तिला इतका बहुमान मिळण्याचं मराठ्यांच्या इतिहासातलं हे एकमेव उदाहरण असावं. अन्यथा स्त्री वापरली आणि फेकून दिली, हीच तेव्हाची आणि आताचीही रीत आहे. पण शाहूने विरूबाईच्या संबंधात तसं केलं नाही. आणखी एक म्हणजे, सुरुवातीच्या काळात शाहू-विरूबाईचे जे शारीरिक संबंध आले असतील, ते नंतरच्या काळात किती आले असतील शंकाच आहे. कारण शाहूसाठी नव्हाळीतल्या अनेकजणी उपलब्ध होत्या. तरीही विरूबाई आणि शाहूच्या नातेसंबंधांत जराही दुरावा आल्याचं दिसत नाही. याचा अर्थ शरीरापेक्षाही ते मनाने एकमेकांच्या अधिक जवळ असावेत... नव्हे, शाहूचं तिच्यावर खरोखरच प्रेम होतं आणि आपल्या वागणुकीतून ते त्याने कायम व्यक्त केलं. जणू काही नव्हाळीत जुळलेलं प्रेम उत्तरोत्तर अधिक पक्व होत गेलं. मुरत गेलं.
शाहू आणि विरूबाईच्या प्रेमाचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांची मुलं- राजसबाई आणि फत्तेसिं भोसले. त्या दोघांना कधीही अनौरस मानण्यात आलं नाही. उलट सातारच्या राजदरबारात त्यांना एखाद्या राजकन्या-राजपुत्राचीच वागणूक आणि सन्मान मिळे. त्यातही राजसबाई थेट शाहू-विरूबाईच्या संबंधांतूनच जन्माला आलेली. त्यामुळे तिच्यासंदर्भात सगळे शाही रीतीरिवाज पाळले जायचे. राजसबाईच्या संदर्भातील एक पत्र उपलब्ध आहे. त्यात लिहिलंय – राजसबाई प्रसूत जाली. कन्यारत्न झाले. २३ मोहरमी इंदुवारी बारसे जाले. अवघ्या सरकारकुळाच्या बाईकांनी जाऊन सिस्टाचार विध संपादिले.
फत्तेसिं मात्र ना शाहू-विरूबाईच्या रक्ताचा होता, ना नात्याचा... तरीही तो सातारच्या राजवाड्यात शाहू आणि विरूबाईच्या देखरेखीखालीच मोठा झाला आणि त्याचा मराठ्यांच्या दरबारात उचित मान राखला जाई. कारण तो त्या दोघांचा मानसपुत्र होता. हा फत्तेसिं म्हणजे शाहू-विरूबाईच्या एकमेकांवरच्या प्रेमाचं लखलखीत उदाहरणच होता...
... शाहू नुकताच मुघलांच्या छावणीतून स्वराज्यात परतला होता. संभाजीराजांचा मुलगा आणि स्वराज्याचा खरा वारसदार म्हणून अनेक मराठा सरदारांनी त्याचं स्वागत केलं. मात्र ताराबाई त्याच्या विरोधात गेली. कारण शिवाजीपुत्र राजारामाच्या पश्चात तिने मराठ्यांचं राज्य सांभाळलं होतं. औरंगजेबाच्या विरोधात लढणाऱ्या मराठ्यांचं नेतृत्व एकहाती तिने केलं होतं. त्यामुळे स्वराज्यावर आता फक्त आपला आणि आपल्या मुलांचाच हक्क आहे, असं तिला वाटत होतं. परिणामी ती शाहूच्या विरोधात गेली, प्रसंगी तिने त्याच्याशी युद्धही केलं.
असंच शाहू मुघलांच्या छावणीतून निघून गोदावरी उतरुन अहमदनगरवरुन पारद, परगणे, शिवणे प्रांतात आला. या प्रांतात एक गढी होती. या गढीचा मालक असलेला सरदार सयाजी लोखंडे पाटील ताराबाईच्या पक्षाचा होता. त्याने शाहूसोबत असलेल्या सैन्यावर अचानक हल्ला चढवला. यामुळे बिथरलेल्या शाहूच्या सैन्याने जोरदार चढाई करुन सयाजी पाटलासह त्याचं सैन्य तर मारलंच, सारं गाव उध्वस्त केलं. एवढा गहजब झाला की सयाजी पाटलाच्या बायकोला आपल्या छोट्या लेकरासह घरातून पळ काढावा लागला. आपल्या जिवाला घाबरलेल्या त्या माऊलीने आपलं मूल कसबसं वाचवलं आणि शाहूला शरण येऊन ते मूल त्याच्या पदरात घातलं आणि म्हणाली- यास वाचवावे. अन्यायी होते ते मारले गेले.’ तेव्हापासून ते मूल शाहूच्याच ताब्यात होतं. पारदच्या या लढाईत आपली फत्ते झाली म्हणून शाहूने या मुलाचं नाव ठेवलं- फत्तेसिं.
पण फत्तेसिंची हकिकत इथेच संपत नाही. शाहूने आपल्या ताब्यात आलेलं हे मूल आपल्या लाडक्या राणीच्या, विरूबाईच्या पदरात घातलं. विरूबाईने त्याला जिवाच्या कराराने सांभाळलं-वाढवलं. एवढंच नाही, तर आपल्या विरूबाईला हा मुलगा एवढा आवडतो, म्हणून शाहूने आपलं भोसले आडवनाही त्याला दिलं. तोच हा शाहु-विरूबाई पुत्र- फत्तेसिं भोसले. मराठा दरबारच्या अनेक पत्रांत त्याचा उल्लेख केवळ राजपुत्र असाच केला गेला आहे.
फत्तेसिंदेखील शाहू आणि विरूबाईला माता-पित्याचाच मान देई. तो कधीही त्या दोघांच्या शब्दाबाहेर गेला नाही. शाहूनेही पुढच्या काळात त्याच्यावर अनेक मोहिमा सोपवल्या आणि त्या त्याने जबाबदारीने आणि शौर्याने पार पाडल्या.
विरूबाई तर फत्तेसिंची आईच होती. तिने त्याला जन्म दिला नसेल एवढंच. अन्यथा अपत्यासाठी ज्या खस्ता खाव्या लागतात, त्या साऱ्या तिने फत्तेसिंसाठी खाल्ल्या. त्यामुळेच फत्तेसिंगाचंही तिच्यावर विलक्षण प्रेम होतं... इतकं की तिचा दुरावा त्याला जराही सहन होत नसे. तो लगेच व्याकूळ होत असे. त्यामुळेच तो कर्नाटकाच्या स्वारीवर असताना २४ डिसेंबर १७४०मध्ये विरूबाई मृत्यू पावली, तेव्हा तो या गोष्टीवर विश्वास ठेवण्यास तयारच नव्हता. त्यावेळी त्याच्यासोबत असलेला रघुजी भोसले शाहूला लिहिलेल्या पत्रात म्हणतो- मातोश्रींच्या मृत्यूची बातमी कळताच फतेसिंगबावांनी अतिशय खेद करुन परम शोक केला. समाधान करता चित्ताचा खेद न टाकीत, तेव्हा स्वामींचे (शाहूमहाराज) हस्ताक्षर दाखविलें. स्वामींच्या चरणारविंदाचा निजध्यास बहुतच करतात. स्वामींवाचून आणिकच्याने शोक दूर होणे नाही.
हे साहजिकच होतं, विरूबाईच्या मृत्यूनंतर फत्तेसिंला भावनिक आधार आणि धीर देणारं शाहूशिवाय दुसरं कुणी नव्हतं. त्यामुळे कर्नाटकाच्या मोहिमेतून फत्तेसिं माघारी आला. तो आल्यावरच विरूबाईचे मृत्यूनंतरचे सगळे विधी केले गेले आणि पुत्र म्हणून ते सारे फत्तेसिंगाने केले.
इथे आणखी एक हकिकत सांगायलाच हवी... कारण मातृवारशाने मुलाला मिळालेल्या जहागिरीची मराठ्यांच्या इतिहासातील तीदेखील एकमेव घटना असावी.
विरूबाईच्या मृत्यूनंतर तिला औरंगजेबाने साडी-चोळीच्या खर्चासाठी दिलेला अक्कलकोट परगणा फत्तेसिंगाला मिळाला. त्यातूनच पुढच्या काळात फत्तेसिंगाने अक्कलकोट संस्थानाची निर्मिती केली. मात्र हे संस्थान म्हणजे, आपल्या आईची विरूबाईची देणगी आहे, ते फत्तेसिंग कधीच विसरला नाही. त्यामुळेच या संस्थानाच्या निर्मितीच्या वेळी राजवाडा बांधला गेला, तेव्हा फत्तेसिंगाने विरूबाईची सोन्याची मूर्ती घडवून घेतली आणि ती आपल्या देवघरात ठेवली.
... एखाद्या राजाची मर्जी असलेली स्त्री थेट देवघरात जाऊन बसण्याची ही भारतीय इतिहासातील नव्हे, जागतिक इतिहासातील एकमेव घटना असावी...!
***
विरूबाईच्या मृत्यूनंतर जे दुःख फत्तेसिंगाला झालं, तेवढंच किंबहुना त्याहून अधिक दुःख शाहूला झालं. कारण विरूबाईच्या मृत्यूमुळे, शाहूला समजून-उमजून घेणारं माणूसच त्याच्या आयुष्यातून नाहीसं झालं होतं. त्या अर्थाने विरूबाईच्या पश्चातलं त्याचं जगणं हे एकाकीपणाचं होतं. सकवारबाई आणि सगुणाबाई या त्याच्या दोन बायका हयात होत्या, परंतु त्यांनी त्याला उद्वेगच आणलेला दिसतो. उलट ऐतिहासिक पत्रांनुसार जोवर विरूबाई होती, तोवर या दोघी तिच्या धाकात होत्या. तिच्यासमोर ब्र ही काढण्याची त्यांची प्राज्ञा नव्हती. मात्र ती मृत्यू पावताच, या दोघी स्वैर सुटल्या आणि त्यांनी शाहूच्या मागे लागून स्वतःसाठी वेगळा सरंजाम व नेमणुका करुन घेतल्या. त्यांना आपल्या नवऱ्यापेक्षा त्याच्या संपत्तीचाच अधिक लोभ होता.
परिणामी नंतरच्या काळात शाहू जिवंत होता एवढंच, अन्यथा त्याचा जगण्यातला रस संपलेला होता. त्यात विरूबाईच्या मृत्यूच्या आगेमागेच, बाजीराव पेशवा आणि त्याचा भाऊ चिमाजी आप्पा यांचंही निधन झालं. ज्यांच्या समवेत आपण स्वराज्य वाढलेलं पाहिलं, ती माणसंच नाहीशी झाल्यामुळे शाहू उदास झाला...
... या उदासकाळात शाहू कधी साताऱ्यापासून जवळच असलेल्या लिंब-शेरी गावातील बारवेला भेट द्यायला गेला असेल का? दगडात बांधून काढलेली ही कलात्मक बारव शाहूने विरूबाईच्या सांगण्यावरुन बांधली होती... या विहिरीत आतील बाजूस एक छोटेखानी सज्जा आहे. कधी विरंगुळ्याच्या क्षणी शाहू आणि विरूबाई येऊन या सज्ज्यात बसून गप्पा मारायचे म्हणे...
खरं-खोटं काळालाच ठाऊक...
रुढार्थाने शाहू, विरूबाईच्या मृत्यूनंतर नऊ वर्षँ जगला. १५ डिसेंबर १७४९ ला त्याचा मृत्यू झाला... पण त्याचं प्राणपाखरु तर केव्हाच उडून गेलं होतं, विरूबाईबरोबर!
***
शाहू मराठा साम्राज्याचा स्वामी आणि त्याची खास ‘मर्जी’ असलेल्या विरूबाईची ही जगावेगळी कहाणी. ‘एक सर्वसामान्य आंदणी ते मातुश्री विरूबाई’ हा विरूबाईचा प्रवास थक्क करणाराच आहे… अर्थात तो शाहूशिवाय शक्य नव्हता. किंबहुना दोघांनीही एकमेकांच्या सोबतीनेच केला. … मात्र मराठ्यांच्या इतिहासातलं एवढं महत्त्वाचं आणि मानाचं पान असतानाही, आज विरूबाई कुणालाच ठाऊक नाही. शाहूने संगम माहुलीला तिची समाधी उभारली, परंतु तिचा आज मागमूसही तिथे नाही…
पण इतिहास झाकला गेला, तरी पुसला कधीच जात नाही. कालौघात कधी तरी कालपटावरची अक्षरं उघडी पडतातच… कुणी सांगावं, पुन्हा एकदा धूळ झटकली जाईल आणि इतिहास बाजीराव-मस्तानीप्रमाणे शाहू-विरूबाईची कहाणीही उच्च रवाने गाईल!
मुकुंद कुळे

शनिवार, १३ एप्रिल, २०१९

गंधर्व-गोहरची शापित प्रेमकहाणी


गोहरला लावलेला काळा रंग खरवडत गेलो आणि गोहर एखाद्या दीपकळीसारखी पुन्हा नव्याने भेटत गेली. तरीही माहीमच्या कब्रस्तानातून बाहेर पडताना पावलं पुन्हा जड होतातच. मन उदास होतं... गोहर पुन्हा कधी भेटणारअशी खंत मन दाटून येते... पण तेवढ्यात पदर सळसळावातशी कब्रस्तानातील झाडं-वेलींची पानं थरथऱतात. जणू गोहरच सांगत असते- इथे कशाला परत यायला हवंय तुला. तुझ्या मनात जिवंत ठेव म्हणजे झालं!एक टळटळीत दुपार. हातातल्या मोबाइलमधलं एक छायाचित्र पाहत मी माहीमच्या कब्रस्तानात फिरत असतो. अचानक माझ्याजवळच्या छायाचित्रात दिसत असलेलं झाड समोर दिसतं आणि त्याच्या पार्श्वभूमीला असलेली भिंतही. मी त्या झाडाच्या दिशेने धावत सुटतो. मला हवं असलेलं गवसल्याच्या आनंदात... पण झाडाजवळ गेल्यावर गोंधळतो. साहजिकच असतं ते. कारण माझ्याजवळच्या जुन्या छायाचित्रात झाडाच्या सावलीत तीनेकच कबरी दिसत असतात. प्रत्यक्षात आता मात्र त्याजागी अनेक कबरी असतात. मी पुन्हा पुन्हा मोबाइलमधलं छायाचित्र न्याहाळतो आणि मला हवी असलेली कबर धुंडाळण्याचा प्रयत्न करतो. पण नाहीच ठरवता येत मला, ती कुठल्या कबरीत शांतपणे निजलीय ते. मी अगदी, म्हणजे अगदीच अंदाजाने एका कबरी समोर उभा राहतो, म्हणतो - बाई ग, नाही ओळखता येतेय मला तुझी कबर... तुझी कबर हीच असेल किंवा कदाचित हिच्या बाजूची. पण मनापासून सांगतो, तू मला भारी आवडतेस. मला ठाऊक आहे, तुला दफन केल्यालाही आता तब्बल ५४ वर्षं झालीत. एवढ्या वर्षांत तुझ्या नात्या-गोत्यातलंही क्वचितच कुणी आलं असेल तुझी हालहवाल घ्यायला... आणि यायला तू बांधून तरी कुणाला ठेवलं होतंस स्वतःशी, त्या एकट्या बालगंधर्वांशिवाय? तू घरदार सोडलंस, सिनेमासारख्या मायानगरीशी असलेलं नातं संपवलंस आणि पदरात काय बांधलंस, एक बुडणारं जहाज? खरोखरच किती वेडी ग तू... असो, पण निभावलंस तू. मरेस्तोवर निभावलंस. लोकांचे शिव्याशाप खाऊन आणि लोकांना शिव्याशाप देऊन. ज्याच्यावर जिवापाड प्रेम केलं, तो माणूस आपल्याकडे अखेरपर्यंत राखलास तू... तूच विजयी झालीस बरं, तूच विजयी झालीस. लोकांनी तुला कितीही खलनायिका ठरवलं, तरी बालगंधर्वांच्या आयुष्यातली खरी नायिका तूच होतीस... बालगंधर्वांवरची तुझी अविचल निष्ठा कधीही ढळली नाही... गोहरबाई म्हणूनच मला तू आवडतेस!
एवढं म्हणून मी निरोप घेतो गोहरबाईचा. कब्रस्तानाबाहेर चालू लागतो. पण पाय तिथेघुटमळत राहतात. कारण परत कधी इथे येईन ठाऊक नाही. किंबहुना पुन्हा कधी येण्याची शक्यता कमीच. कारण गोहरबाई का माझ्या नात्यागोत्याची की जातधर्माची? पण मग तिची कबर शोधत मी का आलो या कब्रस्तानात?... तर, जातिधर्माच्या पलीकडे मला ती माणूस म्हणून आवडली म्हणून. सगळे विरोधात असतानाही खमकेपणाने बालगंधर्वांना सांभाळून राहिली म्हणून आणि... तिच्या काही चुका झाल्याच नसतील, असं नाही म्हणत मी, पण एकजात तिला सगळ्यांनी काळ्या रंगातच रंगवली म्हणूनदेखील!
मी माझ्याच नकळत तिचा काळा रंग खरवडू लागतो. तर बघता बघता माझ्यासमोर रुद्रव्वा उभी राहते. कित्तुरची राणी चेन्नम्माच्या भूमिकेतली रौद्रव्वा. १९२५-३०च्या काळात ज्यावेळी महाराष्ट्र आणि कर्नाटक एकाच मुंबई प्रांताचे भाग होते, तेव्हा महाराष्ट्रात संगीत रंगभूमीचा उदय झाला होता, तसाच तो कर्नाटकातही झाला होता. विशेषतः उत्तर कर्नाटकात,  म्हणजे विजापूर-बेळगाव-धारवाड-गदग या भागात कन्नड संगीत रंगभूमीचा जोर होता आणि ज्यावेळी मराठी रंगभूमीवर किर्लोस्कर, ‘गंधर्व अशा अनेक नाटकमंडळींची स्वयंवर’, ’सौभद्र’, ’मानापमानही नाटकं गाजत होती;  तेव्हाच कन्नड संगीत रंगभूमीवर दत्तात्रेय संगीत नाटक मंडळी, ‘ हालसिद्धेश्वर संगीत नाटक मंडळी, ‘लक्ष्मी-वेंकटेश संगीत नाटक मंडळी अशा अनेक कंपन्यांचं कित्तुर चेन्नम्मा’,  कित्तुर रुद्रव्वा, ‘कित्तुर रुद्रम्माही ब्रिटिशांच्या विरोधात लढणाऱ्या कित्तुरती राणी चेन्नम्मा हिच्या आयुष्यावर बेतलेली संगीत नाटकंही गाजत होती. मात्र या सगळ्यांत अधिक नावाजलं गेलं ते गदगच्या एरसी भरमाप्पा यांनी स्थापन केलेल्या वाणीविलास संगीत नाटक मंडळीचं कित्तुर रुद्रव्वा’. कारण या नाटकात इंग्रजांशी तावातावाने लढणारी राणी चेन्नम्मा, म्हणजेच रुद्रव्वा झाली होती- गोहर कर्नाटकी. सतरा-अठरा वर्षांची गोहर अशा काही तडफेने चेन्नम्मा रंगवायची आणि गायची की, सगळं पब्लिक वेडं व्हायचं. या नाटकात गोहरचे सहकलाकार होते बसवराज आणि मल्लिकार्जुन हे मन्सूरबंधू. बसवराज या नाटकात राणी चेन्नम्माच्या नवऱ्याचं म्हणजे कित्तुरचा राजा मल्लसर्जाचं काम करायचे. तर मल्लिकार्जुन दिलावरखान या मुसलमान सरदाराचं! या नाटकाने तेव्हा कहर केला होता. दिवसाला दीड हजार रुपयांचा गल्ला जमा व्हायचा आणि त्यात सगळ्यात मोठं कर्तृत्व होतं गोहरचं.
वाणीविलासच्या या पहिल्याच नाटकाला अभूतपूर्व यश मिळाल्यामुळे काही महिन्यांतच एरसी भरमाप्पा यांनी वरप्रदानया दुसऱ्या नाटकाची घोषणा केली. कादंगल हणमंतराव या नाटककाराने लिहिलेल्या या नाटकाचा विषय इतिहासप्रसिद्ध विजयनगर साम्राज्याशी संबंधित होता. या नाटकातील ललिता ही भूमिकादेखील गोहरने गायनासह चांगलीच रंगवली आणि ती पुन्हा एकदा रसिकांच्या पसंतीस उतरली. या नाटकाला खुद्द मल्लिकार्जुन मन्सूर यांनीच संगीत दिलं होतं. विशेष म्हणजे त्यांनी यातील गाण्यांसाठी वापरलेले छायानट, भैरव, बहार, गौरव हे राग यानिमित्ताने कन्नड संगीत रंगभूमीवर प्रथमच वापरले गेले.
वरप्रदानही यशस्वी होताच, एरसी भरमाप्पा यांनी तिसऱ्या संगीत नाटकाचीही सुरुवात केली आणि हे नाटक होतं, मराठी संगीत रंगभूमीवरुन जसंच्या तसं कन्नडमध्ये आणलेलं– ’संगीत मानापमान’. या नाटकात धैर्यधर साकारले होते बसवराज मन्सूर यांनी, तर भामिनी रंगवली होती खुद्द गोहरने. यातल्या गाण्यांच्या चालीही मराठी मानापमानच्याच जशाच्या तशा उचललेल्या होत्या. त्यामुळे बालगंधर्वांचं मानापमान पाहिलेल्या उत्तर कर्नाटकातल्या मराठी-कन्नड भाषिक रसिकांना गोहरचं गाणं ऐकून बालगंधर्वांचीच आठवण आली. गोहर अगदी बालगंधर्वांच्याच शैलीत गाते नि काम करते, असंच जो-तो म्हणू लागला.
गोहरची भामिनीशी झालेली ही भेट म्हणजे, थेट बालगंधर्वांशीच झालेली भेट होती. तसंही ती पहिल्यापासून बालगंधर्वांच्या गाण्याच्या प्रेमात होतीच. आजचा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक म्हणजे, तेव्हाचा सांस्कृतिक दृष्ट्या एकसंध असलेला भागच होता. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत असो किंवा संगीत नाटक त्यांची आधुनिक काळातली उपज याच प्रांतातून झालेली. साहजिकच संगीत आणि नाटक दोन्हीची खुल्या दिलाने देवाणघेवाण चालायची. कन्नड संगीत नाटकं मुंबई-पुण्यात व्हायची नाहीत, पण मराठी संगीत रंगभूमीवरची नाटकं मात्र उत्तर कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर व्हायची. तिथला रसिकवर्ग मराठी-कन्नड दोन्ही भाषांचा जाणकार तर होताच, शिवाय सांस्कृतिक एकता होती. याच कारणांमुळे बालगंधर्वांची नाटकं आणि गाणी दोन्हीही उत्तर कर्नाटकात लोकप्रिय होती. घराघरात बालगंधर्वांच्या गाण्याचे चाहते होते, त्यातली एक होती स्वतः गोहर. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्या आठवणीप्रमाणे गोहरच्या तर पुजेतच बांलगंधर्वांचा फोटो होता... त्यामुळे भामिनी रंगवल्यावर तर गोहर,  गोहर राहिलीच नाही, ती प्रतिबालगंधर्व झाली. बालगंधर्वांची गाणी ऐकावी आणि त्यांची जशीच्या तशी नकल करावी, हाच तिचा पूर्णवेळचा उद्योग होता. तिने बालगंधर्वांची नाटकं थेट पाहिली होती की नाही, कळायला मार्ग नाही. परंतु त्यांचं गाणं मात्र मनःपूत ऐकलं होतं, ऐकत होती आणि आपल्या गळ्यावर चढवत होती.
अर्थात मुळात स्वतःला गाणं येत असल्याशिवाय दुसऱ्या कुणाचीही गायकी सहजासहजी गळ्यावर चढत नाही. पण गोहर गाणं शिकली होती. तेही शास्त्रीय गाणं. तिच्या गाण्याची सुरुवात लहानपणीच बेऊरच्या बादशाह नावाच्या तिच्या मामांकडेच झाल्याचं म्हटलं जातं. ते संगीत नाटक मंडळीत गाणं शिकवायचे. त्यांच्यानंतर पंचाक्षरीबुवा आणि नीलकंठबुवा यांच्याकडे गोहर गाणं शिकल्याचा उल्लेख सापडतो. ती आणि तिची दोन वर्षांनी मोठी असलेली बहीण अमीरबाई, दोघीही लहानपणापासून गाणं शिकायच्या आणि नाटकांत कामंही करायच्या. विजापूर जवळच्या बिळगी या आपल्या ग्रामनामावरुन बिळगी स्टिस्टर्सम्हणूनच त्या दोघी प्रसिद्ध होत्या. खरंतर ही सहा भावंडं. पाच बहिणी आणि एकुलता एक भाऊ. त्यांचे आई-वडील (अमिनाबी आणि हुसैनसाब) दोघेही कर्नाटक रंगभूमीवर काम करणारे होते. हुसेनसाब स्वतः तबला आणि पेटीवादक होते. त्यांचीही तालीम अमीरबाई आणि गोहरला लहानपणी मिळाली असली पाहिजे. विशेषतः गोहरला, कारण गाण्याबरोबरच तिचं वादनावरही प्रभुत्व होतं. उतरलेला तबला-डग्गा ती अगदी सहज सुरात लावत असे म्हणे, आणि पेटीवर तर तिची बोटं अगदी झरझर फिरत असत.
अमीर आणि गोहर, दोघी ज्या कलावंत परंपरेतून आल्या होत्या, तिथे मुला-मुलींचं गायन-वादन म्हणजे वास्तविक आम बात होती. संगीत शौकिन असलेल्या आणि किताब-ए-नौरसहा ग्रंथ लिहिणाऱ्या विजापूरच्या इब्राहिम आदिलशहाच्या (१५७१-१६२७) राजवटीत संगीत आणि इतर कलांना चांगलं उत्तेजन मिळालेलं होतं. विजापूरचा परिसर म्हणजे तर दखनी उर्दू आणि भारतीय सुफी संगीताचं माहेरघरच. त्याअर्थाने आदिलशाही राजवटीखालचा हा आजचा कर्नाटकचा भाग म्हणजे कलावंतांची खाणच होता. केवळ सुफी नाही, तर हिंदुस्तानी संगीतही इथे आकाराला आलं आणि वाढलं. दिवंगत संगीत अभ्यासक अशोक दा. रानडे तर म्हणतात - इब्राहिम आदिलशहा हाच इथल्या हिंदुस्थानी संगीताचा प्रवर्तक असण्याचा संभव आहे. अर्थात विजयनगरच्या पराभूत साम्राज्यातील कलावंतानी आदिलशहाच्या दरबारात आश्रय घेतला असणेही शक्य आहे. त्यामुळेच इथे दाक्षिणात्य संगीत शैलीचा अभाव दिसून येतो.
ते काहीही असलं, तरी अभिनय आणि गाण्याची मोठी परंपरा विजापूर परिसरात होती. विशेषतः कर्नाटकचं लोकनाट्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या कृष्ण पारिजातया नृत्यनाट्याला तत्कालीन समाजात मोठी मान्यता होती आणि आजही आहे. कृष्ण पारिजातला सुमारे चारशे ते पाचशे वर्षांची परंपरा आहे. यामध्ये कृष्णासंबंधीच्या शृंगारिक कथा गुंफलेल्या आढळतात. विशेष म्हणजे मुख्यतः उत्तर कर्नाटकात नावारुपाला आलेल्या या कलाप्रकाराच्या सादरीकरणात मुस्लिम कलाकारांची संख्या लक्षणीय होती. किंबहुना दीडेकशे वर्षांपूर्वी कृष्ण पारिजातमध्ये काम करणाऱ्या मुस्लिम कलावंतांची घराणीच होती. अशाच एका घराण्यातून गोहर आणि अमीरबाई आलेल्या होत्या. पैकी पुढे हिंदी चित्रपटक्षेत्रात गाजलेल्या अमीरबाईचं कन्नड रंगभूमीवर फार नाव झालं नाही. परंतु वाणीविलास संगीत नाटक मंडळीच्या केवळ तीन नाटकांत काम करुनच गोहर उत्तर कर्नाटकात नावारूपाला आली होती. म्हणूनच जेव्हा नाटकं जोरात चालू असताना आणि विशीच्या उंबरठ्यावर असतानाच गोहरने मुंबईला जायचं नाव काढलं, तेव्हा सगळ्यांचं धाबं दणाणलं. किंबहुना १९३१च्या दरम्यान वाणीविलास कंपनीचा मुक्काम गुलबर्गा येथे असतानाच कंपनीचा आधारस्तंभ असलेली गोहर चित्रपटात काम करण्यासाठी मुंबईला निघून आलीसुद्धा... त्यावेळचं वर्णन करताना बसवराज मन्सूर चिगुरु नेनेपुया आपल्या आत्मकथनात म्हणतात- गोहरजान (बसवराज मन्सूर यांनी आपल्या आत्मकथनात गोहरबाईंचा उल्लेख गोहरजान असाच केला आहे.) ह्या मुंबईला चित्रपटात काम करायला निघून गेल्या. त्यावेळी आम्हा सगळ्यांना गळून गेल्यासारखंच झालं.
बसवराज मन्सूर यांच्या म्हणण्यात तथ्य होतं. कारण वाणीविलासही संगीत नाटक मंडळी भरमाप्पा यांनी गंधर्व नाटकमंडळीच्या धर्तीवरच उभी केली होती. तेव्हा गंधर्वमंडळीसारखाच बडेजाव-तामझाम वाणीविलासचा कन्नड संगीत रंगभूमीवर होता. गायकांपासून वादक-वाद्यांपर्यंत सगळं उत्तमोत्तम जमा करण्यात आलं होतं. इथे मराठी संगीत रंगभूमीवर बालगंधर्वांचे समकालीन असलेले गायकनट नटवर्य शंकर नीळकंठ ऊर्फ नानासाहेब चापेकर यांच्या स्मृतिधनया आत्मचरित्रातील एक मजकूर उद्धृत करायला हवा. नानासाहेब लिहितात- वाणीविलास कंपनीत गाण्याच्या साथीला र्गन आणि सारंग्या ठेवायच्या होत्या. तेवढ्या करता कंपनीचे मालक भरमाप्पा यांच्याजवळ माझ्या नावाने पत्र देऊन गोहरबाईने त्यांना मुंबईला पाठवलं. पाश्चिमात्य वाद्य विकणाऱ्या एस. रोज कंपनीतून मी त्यांना साडेआठशे किंमतीचा एक मोठा र्गन विकत घेऊन दिला. तसंच उत्तम सारंग्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या दिल्ली नजिकच्या मीरत शहरातील एका सारंग्यांच्या कारखानदाराला तब्बल बारा सारंग्यांच र्डर दिली आणि त्या येताच वाणीविलासकंपनीकडे पाठवून दिल्या.यावरुन वाणीविलास कंपनीच्या गंधर्वथाटाचा अंदाज येतोच, पण हे सारं गोहर करत होती, हेही अधोरेखित होतं. याचा अर्थ एवढाच की कळायला लागल्यापासून गोहरने बालगंधर्वांचा, किंबहुना त्यांच्या गाण्याचा ध्यास घेतलेला असावा आणि जे गंधर्व करतील, ते तिला भविष्यात करायचं असावं. अन् कदाचित तेवढ्यासाठीच वाणीविलासव विजापूर-बिळगी सोडून ती मुंबईला आली असावी.
+++
मुंबईत अमीरबाई आधी आली की गोहर, ते नक्की सांगता येत नाही. मात्र दोघीही स्वतंत्रपणे मुंबईत आल्या एवढं नक्की! कारण गोहर मुंबईत आली ती नानासाहेब चापेकरांच्या भरवशावरच. नानासाहेब आणि गोहरची ओळख विजापूरची. १९३०-३१ च्या दरम्यान नानासाहेब अनंतराव गद्रे यांच्या बोलमोहन नाटक कंपनीत नट म्हणून कामाला होते. या कंपनीच्या नाटकांच्या विजापूर दौऱ्यातच नानासाहेब आणि गोहरची कधीतरी भेट झाली. या भेटीचं मैत्रीतही रूपांतर झाली असण्याची शक्यता आहे. कारण त्या ओळखीच्या बळावरच गोहरने आपल्या नावाचं पत्र नानासाहेबांकडे पाठवून वाद्यं मागवून घेतली होती. साहजिकच मुंबईला येतानाही तिने त्यांच्याशीच संपर्क साधला, कारण तेव्हा तरी तिच्या ओळखीचं मुंबईत दुसरं कुणी नव्हतं.
गोहर मुंबईत आली नि थेट चापेकरांच्याच घरी उतरली. एवढंच नव्हे, तर मुंबईत तिचं नीट बस्तान बसेपर्यंत ती त्यांच्याकडेच राहिली. नानासाहेबांनी आपल्या ओळखीने तिला रेडिओवरती गाणी मिळवून दिली. रेडिओवरचं गाणं म्हणजे त्याकाळी गायक कलावंतांच्या प्रसिद्धीचं उत्तम माध्यम होतं. रेडिओवर कुणाही गायिकेचा चांगला आवाज ऐकला की बोलपटांचे निर्माते लगेच त्यांचा शोध घेत यायचे. कारण तेव्हा नायक-नायिकेसाठी पार्श्वगायनाचं युग अवतरायचं होतं. त्यामुळे सिनेमानिर्माते नेहमीच गायक नट-नट्यांच्या शोधात असायचे. गोहरबाबतही तसंच झालं. तिचा आवाज ऐकला आणि निर्मात्यांनी तिला लगेच आपल्या बोलपटात घेतलंही. तिचं पहिलं काँट्रॅक्ट झालं मायाशंकर ठक्कर यांच्या शारदा फिल्म्स कंपनीबरोबर. मेहनताना ठरला रुपये तीनशे. त्याबरोबर लगेचच गोहरने आपलं बिऱ्हाड ग्रँटरोड स्टेशनजवळच्या बावला बिल्डिंगमध्ये हलवलं आणि ती स्वतंत्रपणे राहू लागली. सिनेमात यश मिळू लागल्यावर तिला रेकॉर्ड कंपन्यांतूनही ध्वनिमुद्रिकांसाठी बोलावणी येऊ लागली. पहिलं बोलावणं आलं ते कोलंबिया रेकार्ड कंपनीचं. या कंपनीसाठी तिने दोन कानडी गाणी दिली. पैकी ना पेलुवे हे गोहरचं गाणं खूपच लोकप्रिय झालं. गोहरची ही यशस्वी वाटचाल पाहूनच नंतरच्या काळात अमीरबाई आणि सगळ्यात मोठी अहिल्या ऊर्फ अल्लाजान या तिच्या दोघी बहिणीही मुंबईत आल्याचं म्हटलं जातं. त्यातली अमीरबाई कर्नाटकी आधी गायिका अभिनेत्री आणि नंतर पार्श्वगायिका म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत ख्यातकीर्त झाली. अगदी जद्दनबाई, जोहराबाई अंबालेवाली, शमशाद बेगम, लता मंगेशकर यांच्या बरोबरीने अमीरबाई कर्नाटकीचं नाव घेतलं जातं.  
... मात्र आधी येऊनही आणि करियरची चांगली सुरुवात होऊनही गोहरबाईला अमीरबाईसारखा नावलौकिक मिळाला नाही. कारण तिनं कधीच आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं नाही. सिनेमासारख्या मायासृष्टीत वावरुनही तिच्या मनात मात्र संगीत रंगभूमीवरची फुलपाखरंच रुंजी घालत होती आणि ती पुन्हा पुन्हा बालगंधर्व नावाच्या फुलाभोवती घुटमळत होती.
गोहरने साधारण बारा-पंधरा सिनेमांत काम केलं. रंभारानी, सोहनी-महिवाल, गुल नी शान, सिंहल द्वीप की सुंदरी, गोल निशान, बुरखावाली, बासुरीवाला... ही तिच्या काही सिनेमांची नावं. हे सगळेच सिनेमे त्या-त्या वेळी चालले, तरी त्यांना म्हणावं तसं यश मात्र मिळालं नाही. अर्थात यामुळे गोहरच्या आयुष्यात फार काही मोठा फरक पडला नव्हता. दिवसभर सिनेमाचं शूटिंग करायचं, रात्री मुंबईत जिथे कुठे बालगंधर्वांच्या नाटकाचा प्रयोग असेल, त्या प्रयोगाला हजेरी लावायची आणि अगदी पहिल्या रांगेत बसून बालगंधर्वांच्या गाण्यातल्या-अभिनयातल्या लकबी हेरायच्या, हाच तिचा नित्य ध्यास होता. ती नेमकी कशावर फिदा होती... बालगंधर्वांच्या गाण्यावर, त्यांच्या स्त्रीसुलभ अभिनयावर की त्यांच्या पौरुषावर? नेमकं काहीच कळत नाही. मात्र कळायला लागलं तेव्हापासून तिने काही घोकलं असेल तर, ते बालगंधर्वांचं गाणंच. त्यामुळे ती त्यांच्या गाण्यावरच भाळली म्हणायला हवं आणि त्यासाठी तिने गंधर्वांशी संपर्क साधण्याचाही सतत प्रयत्न केला... परंतु एक सिनेनटी सातत्याने आपल्या कार्यक्रमाला येऊन बसते आणि आपल्याला भेटायचा प्रयत्न करते, हे कळूनदेखील बालगंधर्वांनी तिला कधीच प्रतिसाद दिला नाही. उलट जेव्हा गोहरने त्यांच्या कान्होपात्रा नाटकातील कान्होपात्रेचे अभंग, त्यांच्याच गंधर्व नाटक कंपनीतील साथीदारांना घेऊन कोलंबिया रेकॉर्ड कंपनीसाठी गायले, तेव्हा बालगंधर्व प्रचंड संतापले होते. सगळ्यात आधी त्यांनी आपल्या साथीदारांना झापलं आणि मग त्यांनी गोहरच्या विरोधात कोर्टात केसच दाखल केली. कारण त्या रेकॉर्डमध्ये गोहर सहसही बालगंधर्वांसारखीच गायली होती आणि तिच्या या रेकार्डला रसिकांचा चांगला प्रतिसादही मिळत होता. मात्र मूळ अभंग संत कान्होपात्रेचे असल्यामुळे कोर्टात बालगंधर्वांची केस उभीच राहू शकली नसती आणि ते हरण्याचीच शक्यता होती. म्हणून काही सुज्ञ जनांच्या सांगण्यावरुन गंधर्वांनी ती केस अखेर मागे घेतली.
या काळातच भवनानी प्रॉडक्शन कंपनीत गोहरला महिना आठशेच्या कराराने सिनेमासाठी बद्धही करण्यात आलं. परंतु एकीकडे सिनेमा सुरू असतानाही, तिचं  बालगंधर्वांच्या गाण्याचं वेड कमी होत नव्हतं. येन केन प्रकारे तिचे त्यांना गाठण्याचे प्रयत्न सुरुच होते. मुंबईत आल्यापासून म्हणजे १९३१-३२ सालापासून १९३८ पर्यंत ती एकीकडे सिनेमात काम करत राहिली आणि दुसरीकडे बालगंधर्वांचं गाणं आणि बालगंधर्वांसाठी झुरत राहिली. खरंतर या संपूर्ण काळात ती कायम संधीच्या शोधात होती, अन् ती काही केल्या गवसत नव्हती. मात्र एक दिवस ती संधी स्वत:हून चालून आली...    
... वास्तविक त्या काळात बालगंधर्व कर्जात बुडालेले होते, त्यांचं वय उताराला लागलेलं होतं आणि मुख्य म्हणजे बोलपटांचा जमाना सुरू होऊन संगीत रंगभूमीला उतरती कळा लागली होती. गंधर्व संगीत मंडळीच नाही, तर त्या काळातील एकूणच सगळ्या संगीत मंडळींपुढे अस्तित्वाचा मोठाच प्रश्न निर्माण झाला होता... त्यामुळे संगीत रंगभूमीवरील अनेकांनी काळाची पावलं ओळखून मार्ग बदलला. पण काळाशी जुळवून घेणं जमलं नाही, ते बालगंधर्वानाच. ते आपल्या ऐन उमेदीतल्या संगीत रंगभूमीच्या आभासी काळात रमत राहिले. त्यांच्या सुभद्रेने, त्यांच्या भामिनीने, त्यांच्या कान्होपात्रेने आणि त्यांच्या सिंधुने मराठी जनांना कायमच भुरळ घातली. पुरुषच काय, पण स्त्रियाही बालगंधर्वांवर फिदा होत्या... पण आता तो काळ सरला होता. बालगंधर्वांचं गाणं तेवढंच सुंदर, तेजोमयी आणि तपःपूत असलं, तरी शरीर सुटून त्यांचं वजन वाढायला लागलं होतं. दुसऱ्या नाटककंपन्यांत सुशिक्षित घरातल्या स्त्रियाही रंगभूमीवर आपल्या गाण्याची-अभिनयाची कमाल दाखवत असताना बालगंधर्वांच्या थोराड नायिका कोण सहन करणार…? अखेर उशिरा का होईना, पण बालगंधर्वांना आपल्या वास्तवाची चाहूल लागली. आपण आता नायिकेच्या नव्हे, तर नायकाच्या भूमिका साकारायला हव्यात, हे त्यांना उमगलं... आणि त्यांनी नायिकांचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्या काळी म्हणजे १९३५-४०च्या दरम्यान काही कमी गायिका-कलावंत नव्हत्या महाराष्ट्रात. हिराबाई बडोदेकरांपांसून ज्योत्स्नाबाई भोळे यांच्यापर्यंत अनेकजणी होत्या. पण गंधर्व मंडळीसारखी नावाजलेली नाटक कंपनी असतानाही, बालगंधर्वांच्या कंपनीत कुणीही आलं नाही. त्यासाठी बालगंधर्वांनी किती व कसे प्रयत्न केले किंवा केलेच नाहीत, हे ठाऊक नाही. त्याची कुठे माहितीही मिळत नाही. पण कुणी आलं नाही एवढं खरं... कदाचित ही काळाचीच खेळी असावी. त्याच्याच मनात असावं की, गोहरने बालगंधर्वांच्या कंपनीत जावंअन् त्याने तशी संधी गोहरसाठी निर्माण केली.
गंधर्वकंपनी गायिका अभिनेत्रीच्या शोधात असल्याची खबर मिळताच, दोन-तीन सिनेमांत आपले नायक असलेले गायकनट कृष्णराव चोणकर यांच्याकरवी गोहरने बालगंधर्वांकडे, ती गंधर्व कंपनीत येण्यास उत्सुक असल्याचा निरोप पाठवला आणि एक गायिका अभिनेत्री मिळणार, गंधर्वमंडळी तगणार, म्हणून बालगंधर्वांनी होकारही देऊन टाकला. पण या होकाराच्या आगे-मागे गोहरच्या विरोधकांनी एवढ्या सुरस आणि चमत्कारिक कथा रंगवल्या की, गोहर ही त्यांच्यासारखी हाडामांसाची माणूस नव्हती, तर काळी जादू करणारी चेटकिण होती जणू...  आणि याला कारणीभूत ठरला तो गोहरने आपल्या घरी बालगंधर्वांसाठी ठेवलेला खाना. बालगंधर्वांनाही गोहरचे आभार मानायचे होते म्हणून त्यांनी तिचं जेवणाचं निमंत्रण स्वीकारलं. बालगंधर्व एकटेच नव्हते गेले. त्यांच्याबरोबर दुर्गाराम खेडेकर, कृष्णराव चोणकर ही मंडळीही होती. बालगंधर्वांनी आपले परममित्र आणि हितचिंतक असलेल्या वसंत देसाई यांनाही सोबत यायला सांगितलं होतं. परंतु देसाई यांनी नकार दिला. शेवटी ठरल्याप्रमाणे गंधर्व गोहरच्या घरी गेले. गोहरने त्यांच्यासाठी नाना परीची पक्वान्नं तयारच ठेवली होती. बालगंधर्वांना मांसाहार आवडायचा म्हणून तिने त्यांच्यासाठी खास पाककृती करवून घेतल्या होत्या. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बालगंधर्वांचं घरात आगमन होताच तिने सगळ्यात आधी काय केलं असेल, तर त्यांच्या चरणांवर गुलाबाच्या पाकळ्या वाहून त्यांवर आपलं मस्तक ठेवलं. खात्री आहे त्यावेळी गोहरच्या मनात पूर्णपणे समर्पणाचीच भावना असणार. ज्या माणसाचं गाणं आपण आजवर ऐकलं आणि आत्मसात केलं, त्याला हृदयाच्या कुठल्या कप्प्यात ठेवू अशीच तिची भावना झाली असणार... आणि बालगंधर्व... त्यांच्या मनात तरी वेगळी कुठली भावना असणार देवा... पन्नाशी उलटलेल्या एका कलावंताचा पंचविशी-तिशीतली एक तरुण कलावंत एवढा सत्कार करते, हे पाहून त्यांनाही कृतकृत्यच झालं असणार. या क्षणी निश्चितच दोन कलावंत मनं शुद्ध कलेच्या हेतुने एकत्र आली असणार...
... पण म्हणे, जेवण झाल्यावर सगळे खाली उतरले अन् क्षणभरासाठी गोहरने काही कारणाने गंधर्वांना पुन्हा वर बोलावून घेतलं. अगदी काही क्षणच गोहर आणि बालगंधर्व वर एकत्र होते... पण ते काही क्षणच काळाच्या गुलदस्त्यात असे काही बंद झाले की, काही केल्या ते आपली गुंथी सोडायला तयार नाहीत. कुणी म्हणतं तिने त्यांना पान खिलवलं आणि पानात काही चारलं, कुणी म्हणतं तिने खिलवलेल्या जेवणातच काहीतरी होतं, कुणी म्हणतं तिने वर बोलावून त्यांच्या हातात रुमाल दिला, त्या रुमालाचा त्यांनी वास घेतला आणि ते तिच्याकडे मोहीत झाले, तर आणखी कुणी म्हणतं की तिने वर बोलावून त्यांना घट्ट मिठी मारली आणि बालगंधर्व गोहरचे झाले ते कायमचेच...!
+++
गोहर बाई ग... केलंस तरी काय नेमकं त्या दिवशी, की आमच्या उभ्या महाराष्ट्राचा गाणारा गळा कायमचा तुला बांधिल झाला? कसला जादूटोणा केलास की भानामती केलीस? आजतागायत तुमच्या त्या एकांतातील भेटीचं रहस्य उगडलेलं नाहीआणि ठाऊक आहे, ते उलगडणारही नाही. कारण ते छुपं गुपित नव्हतंच, असलंच तर ते एक खुलं गुपितच होतं. अंतर्बाह्य निखळ आणि नितळ. कारण तू तुझं गंधर्वप्रेम कधीच लपवलं नव्हतंस. तशी तू पहिल्यापासूनच होतीस म्हणा, बेडर-नीडर. तुझ्या व्यक्तिमत्त्वातूनच वाहायचा तुझा मोकळेपणा. तुझी कित्तुर रुद्रव्वा आणि भामिनी उगाच नाही गाजल्या. त्या तुझ्यातच होत्या दडलेल्या. फक्त नाटकाच्या निमित्ताने बाहेर आल्या. एवढंच कशाला, कन्नड रंगभूमीवर काम करत असताना बसवराज मन्सूर आणि नंतर मुंबईत आल्यावर नानासाहेब चापेकरांशीही तुझं नाव जोडलं गेलंच की…! त्यातला खरे-खोटेपणा ठेवू बाजूला, पण कळायला लागल्यापासून तू बालगंधर्वांच्या गाण्याला कधीच अंतर दिलं नाहीस, हे मात्र तुला ओळखणाऱ्या कुणीही छातीठोकपणे सांगितलं असतं
तरीही माझ्या मनात एक प्रश्न मात्र नक्की आहे. तू ढीग अर्पण केलं असशील स्वत:ला, बालगंधर्वांनी तुला सहजासहजी कसं स्वीकारलं? हिची भेट आपण कितीदा तरी नाकारली, हे त्यांना मुळीच स्मरलं नसेल?... कदाचित स्मरलं असेलच ग, पण काळ बदलला होता. आता तुला त्यांची नाही, पण त्यांना तुझी गरज होतीपण असं तरी कशाला म्हणू? तुम्हाला दोघांना एकमेकांची गरज होतीआणि सगळ्यात भारी काय वाटतं, सांगू?... त्या छोट्याशा क्षणात तुमच्यात काय घडलं नि काय नाही, हे जाणून घेण्याची दुनियेला इच्छा असली, तरी मला बिलकूल नाही. त्या क्षणाने तुम्ही एकमेकांना आयुष्यभरासाठी भेटलात आणि तुम्ही तुमचं नातं कायम जपलंत, हे मला महत्त्वाचं वाटतं!
+++
१९३८ साली गोहर आणि बालगंधर्व एकत्र आले, ते भल्याभल्याना रुचलं नाही. खरंतर गंधर्व नाटक मंडळीचं बुडतं तारू बघून आधीच सगळ्यांनी आपापली सोय बघायला सुरुवात केली होती. गोहर फक्त निमित्त होती, कंपनीतून बाहेर पडण्याचं. अगदी धाकटा भाऊ असलेले बापुराव राजहंसही कंपनी सोडून गेले आणि धर्माची पत्नी असलेल्या लक्ष्मीबाईनीदेखील गोहर येताच आपला मुक्काम कंपनीतून पुण्यात हलवला.  
कंपनीतून बाहेर पडल्याव सगळ्यांनाच सोपं गेलं, गोहरला नाव ठेवणं. पण आश्चर्य याचं वाटतं की, ही गंधर्वकंपनीच्या भल्यासाठीच आलीय, असा विचार कुणीच का केला नाही? ती बालगंधर्वांना लुबाडण्यासाठी तर नक्कीच आली नव्हती. मुळात तेव्हा गाता गळा सोडला, तर गंधर्वांकडे लुबाडण्यासारखं होतंच काय? उलट सांपत्तिक स्थितीचा विचार केला, तर गोहरच वरचढ होती. कारण सिनेमात काम करुन मिळवलेला पैसा तिच्या गाठीशी होता. तिला काहीच नको होतं, तिला हवे होते फक्त आणि फक्त गंधर्व नि त्यांचं गाणं. एवढ्याचसाठी तर तिने स्वत:च्या आयुष्याचा होम केलाहे कुणालाच कधीच का उमगलं नसेल? की गोहर आल्यामुळे त्यांच्या हितसंबंधाना बाधा आल्यामुळे त्यांनी गोहरची बदनामी सुरू केली...?
गोहरने बालगंधर्वांना लुटलं-लुबाडलं आणि सगळा पैसा कर्नाटकात आपल्या गावी पाठवून दिला किंवा आपल्या यारदोस्तांबरोबर मजा करण्यात घालवला, असंच त्यांनी सर्वत्र पसरवलं. साहजिक गोहरबाईंच्या टीकाकारंनी जे ढोल बडवून सांगितलं तेवढंच आजवर जगासमोर आलं. त्यामुळे बालगंधर्व उतारवयात गात राहिले, काम करत राहिले आणि गोहर फक्त ठेकेदारणीसारखी पैसे कमवत राहिली, असाच साऱ्यांचा समज झाला. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती फार वेगळी होती. गोहरनेही आपल्याकडचा पैसा बालगंधर्वांच्या कंपनीसाठी पणाला लावला होता. प्रसिद्ध चित्रकार रावबहादूर एम. व्ही. धुरंधर यांच्या कन्या दिवंगत अंबिका धुरंधर यांची यासंदर्भातील आठवणी पाहण्यासारखी आहे. त्या म्हणतात- बालगंधर्व एके रात्री गोहरबाईना घेऊन ठाण्याला मोरेश्वर कीर्तिकर यांच्याकडे गेले. बालगंधर्वांची नाटकं जेव्हा जोरात चालली होती, तेव्हा मुंबईतल्या प्रयोगांची छायचित्रं काढण्याची परवानगी गिरगावात राहणाऱ्या मोरेश्वर किर्तिकर यांनाच देण्यात आली होती. मात्र रंगभूमीवरील गंधर्वकाळ ओसरल्यावर कीर्तिकर ठाण्यात आपल्या घेऊन ठेवलेल्या इस्टेटीच्या जागेत येऊन राहिले होते. त्यांचा ज्योतिषशास्त्राचा थोडाफार अभ्यासही होता. त्यामुळेच बालगंधर्व त्या रात्री करार-मदाराची काही कागदपत्रं घेऊन गोहरसह गाडीतून ठाण्याला गेले आणि कीर्तिकरांना म्हणाले- आता मी कर्जमुक्त होणार. गोहरबाई अडीच लाख रुपये मला देणार आहेत. आता इथूनच आम्ही पुण्याला जाणार आहोत. मात्र ही आनंदाची बातमी बाबांना म्हणजे चित्रकार धुरंधरांना सांगण्यासाठी कीर्तिकर, बालगंधर्व आणि गोहर दोघांना घेऊन थेट त्यांच्याच गाडीने खारला आमच्या अंबिकानिवासला आले. कारण बाबांचा आणि गंधर्वांचा चांगला परिचयहोता. इथे रात्रभर गंधर्वांचं गाणं झालं आणि मग भल्या पहाटे कीर्तिकरांना ठाण्याला सोडल्यावरच गंधर्व आणि गोहरबाई पुढे पुण्याला निघून गेले.
त्यावेळी बालगंधर्व आणि गोहरमध्ये नेमका कोणता करार झाला आणि त्या कराराच्या बदल्यात गोहरने कुणाच्या कर्जदारीतून बालगंधर्वांना सोडवलं, त्याचा काहीच थांग लागत नाही. कारण त्याचे तपशील गोहरच्या टीकाकारांकडे नाहीत. पण केवळ हा एकच प्रसंग नव्हे, जेव्हा जेव्हा गरज लागली, तेव्हा तेव्हा गोहरने आपल्या पैशांचा बालगंधर्वांना आधार दिला होता. अगदी सॉलिसिटर लाडांनी जेव्हा गंधर्व कंपनी बालगंधर्वांच्या हातातून काढून श्रीपाद नेवरेकर यांच्या हातात सोपवली आणि नंतर त्याच दरम्यान कराचीचे गंधर्वप्रेमी लक्ष्मीचंद यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने जेव्हा गंधर्व कंपनीचं सामान आपल्या ताब्यात घेतलं, तेव्हाही गोहरच बालगंधर्वांना धीर द्यायला त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. त्यासाठी १९४९च्या दरम्यान तिने सिनेमाच्या पैशातून गावाकडे घेतलेली जमीन विकली. या जमीन विकून आलेल्या पैशांतून गोहरने नाटकासाठी लागणारं सगळं सामान पुन्हा उभं केलं आणि एक नवीच नाट्यसंस्था उभी केली (ही हकीकत खुद्द बालगंधर्व आणि गोहर जिला मानसकन्या मानायचे त्या आशम्माने, गंधर्व जन्मताब्दीच्या निमित्ताने १९८७ला रामनाथ पंडित रीसर्च इन्स्टिट्यूट या संशोधन संस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितली आहे.). एवढंच नव्हे, तर वेळप्रसंगी स्वतःचा ठेवणीतला वजनदार दागिना विकायचा आणि घर चालवायचं असंही गोहरने केलं असल्याचं आशम्मानी या मुलाखतीत सांगितलं आहे.
खरंतर ही वेळ बालगंधर्व आणि गोहरवर यायला नको होती. पण इथे काळाचे फासे नेमके विरोधात पडले. नाटककंपनी चालावी, म्हणून बालगंधर्वांनी गोहरला घेतली. तिच्याकडून सुभद्रा, भामिनी, सिंधु, कान्होपात्रा, अशा आपण रंगवलेल्या सगळ्या नायिकांची भरपूर तयारी करुन घेतली. आपण स्वतः त्या नाटकात पुरुष नायकाच्या भूमिकेत उभे राहिले. परंतु गंधर्वांच्या स्त्री-रूपावर जिवापाड प्रेम करणाऱ्या रसिकांनी त्यांना नायक म्हणून स्वीकारलं नाहीच, पण त्यांच्या नायिका साकारणाऱ्या गोहरबाईंनाही स्वीकारलं नाही. निव्वळ गायकीचा विचार करायचा, तर गोहरबाईंच्या गाण्यात बिलकूलच खोट नव्हती. संगीत समीक्षक गोविंदराव टेंबे यांनी तर एके ठिकाणी म्हटलंय की- गोहरबाई संगीत रंगभूमीचे प्रलोभन झाल्या असत्या इतका त्यांच्या कंठात आणि गायकीत रंग होता.परंतु त्यांच्या संवादातला कानडी हेल काढून टाकणं कुणालाच जमलं नाही. त्यामुळे गाणं चांगलं होऊनही मराठी संगीत रंगभूमीवरील त्यांच्या भूमिका रसिकांच्या पसंतीस उतरल्या नाहीत… तर आपल्या पुरुषभूमिकांबद्दल स्वतः बालगंधर्वच म्हणायचे- देवा, नायकाची भूमिका केली खरी, फक्त पदराला हात मागे गेला नाही एवढंच...म्हणजे गंधर्वांनी कितीही तडफदारपणे नायकाच्या भूमिका साकारायचा प्रयत्न केला, तरी आयुष्यभर त्यांनी साकारलेल्या नायिका अधेमधे डोकं वर काढायच्याच... एकूण स्त्रीनेच नायिकेच्या भूमिका करण्याचा गंधर्वांचा हा प्रयत्न सपशेल फसला. काळाने गंधर्वांना साथ दिली नाही. तरीही तब्बल सहा वर्षं गंधर्व महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात हा प्रयोग करत राहिले. मात्र या प्रयोगातून उत्पन्न येण्याऐवजी उलट कंपनीचा पाय दिवसेंदिवस तोट्याच्या गाळातच रुतत गेला.
+++
गोहर, बाई ग कमाल वाटते... कसं सावरलं असशील तेव्हा तू स्वतःला आणि बालगंधर्वांनादेखील. ज्याचा ध्यास घेतला होतास, तो तुझ्या वाट्याला आला खरा... पण त्याचा विश्वास आपण खरा ठरवू शकलो नाही, याची बोच तुला लागून राहिली का? पण मराठी रंगभूमीवरील तुझ्या भूमिका स्वीकारल्या गेल्या नाहीत, हा मला फक्त तुझाच दोष वाटत नाही. हा मला आमच्या संस्कृतीचाही दोष वाटतो. कलावंत कुठल्याही स्तरातून आलेला असो, त्याने रंगभूमीवर कसं शूचिर्भूत-शुद्धच दिसलं, असलं आणि बोललं पाहिजे, हा आमचा अट्टाहास. आता कुठे कलेच्या साचेबद्ध चौकटी कोसळतायत. पण तू ज्या काळात मराठी रंगभूमीवर उभी राहिलीस, ती रंगभूमी सोवळीच होती की ग... असो तू फार वाईट वाटून घेऊ नकोस. उलट मला तर आश्चर्य वाटतं की, या सव्यापसव्यानंतर तू पळून कशी गेली नाहीस याचं... तुझ्या जागी दुसरी कुणी असती तर केव्हाच परागंदा झाली असती की. पण तू तर भारीच एकनिष्ठ आणि खमकी निघालीस. बालगंधर्वाँच्या पाठीला पाठ लावून ठाम उभी राहिलीस. बघायला गेलं तर तुमचं लग्न तरी कुठे झालं होतं, तेव्हा. तू आणि बालगंधर्व तुम्ही १९३८ ला भेटलात. त्यानंतर दीड-दोन वर्षांत लक्ष्मीबाई गेल्या. तरीही प्रत्यक्ष लग्न करायला तुम्हाला अजून आठ-नऊ वर्षं जावी लागली. कधी कधी प्रश्न पडतो की, गंधर्वांनी तुझ्यात फक्त त्यांना हवी असलेली नायिका पाहिली? छट् माझा नाही विश्वास बसत. त्यांनी तुझ्यात सहचारिणीही पाहिली असणार. तुमच्या वयात २३ वर्षांचं अंतर होतं खरं... पण खात्री आहे, तुमचं प्रेम शारीरिक खचितच नसणार. ते प्लेटॉनिकच अधिक असणार. तुला हवं होतं, त्यांचं गाणं आणि त्यांना हवी होती आपल्या गाण्याच्या उसळत्या उर्मी समजून घेणारी सहचरी... जी लक्ष्मीबाई कधीच नव्हत्या. शेवटी आयुष्यात कुणी तरी समानधर्मा लागतोच आणि याच धाग्याने तुम्हाला कायम एकमेकांशी जोडून ठेवलं. पुढच्या काळातल्या आर्थिक विपन्नावस्थेतही...!
+++
बालगंधर्व आणि गोहर एकत्र आल्यावर वेगळंच काही भव्यदिव्य निर्माण होईल असं वाटलं होतं. प्रत्यक्षात दिवसेंदिवस परिस्थिती बिघडतच गेली. संगीत रंगभूमीवर त्यांनी एकत्र केलेली नाटकं चालली नाहीत. म्हणून गोहरने मग स्वतः नाटकात काम करणं बंदच केलं. जिथे कुठे संधी मिळेल तिथे बालगंधर्वच आपल्या जुन्या साथीदारांना घेऊन जमेल तसे नाटकाचे प्रयोग करू लागले. या प्रयोगात गंधर्वकंपनीची जुनी शानोशौकत नसायची. पण गंधर्वांचं गाणं तसंच लखलखीत होतं. त्यामुळे त्यांच्या शरीर सुटलेल्या नायिकाही गानरसिकांनी स्वीकारल्या. या अशा प्रयोगांतून मिळालेले पैसे साठवूनच गोहरने माहीम कापडबाजारात पंचवीस हजारात एक घर विकत घेतलं. परंतु ज्याच्याकडून ते विकत घेतलं, तोच पैसे घेऊन फाळणीच्या धामधुमीत पाकिस्तानात पळून गेला आणि त्याची मालमत्ता सरकारजमा झाली. शेवटी दिल्लीपर्यंत, म्हणजे थेट पंडित नेहरुंपर्यंत खटपटी करुन तीच जागा गोहर आणि बालगंधर्वांनी कशीबशी भाड्याने मिळवली. ही भाड्याची जागा हेच गोहर-बालगंधर्वांचं शेवटपर्यंत निवासस्थान होतं.
माहीमच्या या घराने बालगंधर्व आणि गोहर दोघांना डोक्यावर छप्पर दिलं, परंतु सगळ्यात कष्टाचे दिवसही याच घराने दाखवले. कारण जगण्यासाठीच्या साऱ्या खटपटी गोहर आणि गंधर्व दोघांनाही याच घरात कराव्या लागल्या. एव्हाना गंधर्वांचं वय पासष्टीच्या आसपास पोचलं होतं आणि गोहरही पंचेचाळिशीला आली होती. दोघांचंही गाणं शाबूत होतं, परंतु दोघांच्याही शरीराने दगा दिला होता. गोहरला दमा आणि पित्ताशयाचा विकार जडला होता, तर गंधर्व पायाने अधू झाले होते. सुरुवातीला एकच पाय अधू असताना त्याही अवस्थेत गंधर्व कसंबसं नाटक करायचे. परंतु १९५५ सालानंतर त्यांचं नाटक पूर्ण बंद झालं. कारण त्यांचे दोन्ही पाय आजाराने जायबंदी झाले. मग गोहर-गंधर्व दोघेही मिळून कुठे खाजगी मैफली मिळतात ते पाहू लागले. त्या काळात गोहरने विविध संस्थानिक-व्यावसायिकांना पाठवलेली अनेक पत्रं पाहायला मिळतात, ज्यात तिने गंधर्वांच्या गायनाचा कार्यक्रम ठेवण्याची विनंती केलेली दिसते. अगदी आर्जवंही केलेली दिसतात. परिस्थितीच अशी होती की जगायचं, तर लोकांसमोर कार्यक्रमांसाठी हात पसरण्याशिवाय दुसरा इलाज नव्हता. अनेकदा गोहर आपल्या ओळखीतल्या जवळच्या माणसांकडे जाऊन कार्यक्रम देण्यासाठी विनंतीही करायची. जयपूर-अत्रोली घराण्याचे दिवंगत गायक पं. वामनराव सडोलीकर यांच्या दादरयेथील हिंदू कॉलनीतल्या घरीही गोहर अनेकदा जायची. म्हणायची- दादा काही कार्यक्रम मिळतात का ते पाहा हो, घरात राशन भरायचीही मुश्कील येऊन पडलीय.त्या काळात वामनरावांकडे आलेल्या गोहरला पाहिलेल्या त्यांच्या कन्या गानविदुषी श्रुती सडोलीकर म्हणतात- गोहरबाई अनेकदा दादांकडे यायच्या, त्यावेळचं त्यांच्या व्यक्तिमत्त्वातलं कारुण्य मला आजही आठवतं. पण त्याचबरोबर सावळेपणातलं त्यांचं सौंदर्यही. त्यांचे डोळे तर इतके सुंदर होते की कुणीही त्यांच्या प्रेमात पडावं.
पण तेव्हा गोहर कुणाच्याही प्रेमात पडण्याच्या आणि पाडण्याच्या पलीकडे गेली होती. आपण हौसेने पदराला बांधून घेतलेल्या गंधर्वांना सांभाळायचं कसं हाच तिच्यापुढचा यक्षप्रश्न होता... आणि तो तिला सोडवणं भाग होतं. कारण एव्हाना तिच्या विरोधकांनी बाहेर आवई उठवायला सुरुवातच केली होती- गोहरबाई नारायणरावांना जेवायला देत नाही, दिलं तर अल्युमिनीयमच्या थाळीत कुत्र्याला टाकावे तसे मटणाचे दोन-चार तुकडे टाकते, कपडालत्ता देत नाही, महिना महिना आंघोळ घालत नाही, त्यांच्या गाण्याचा कार्यक्रम ठरवते आणि त्यांना बोचक्यासारखं तिथे नेऊन बसवते...वगैरे वगैरे.
हे सारेच आरोप नाठाळपणाचे आहेत. कारण माहीमच्या घरात गोहर आणि बालगंधर्व यांच्याबरोबर राहत असलेली त्यांची मानसकन्या आशम्मा आपल्या मुलाखतीत म्हणते-मी बालगंधर्वांना नाना म्हणायचे. नानांना गोहरआपा खायला घालायची नाही, म्हणणाऱ्यांना माझ्यासमोर आणून उभं करा. गोहरआपा खुद नानासाहब के लिये खाना पकाती थी. उनको मच्छी, बिर्यानी बहोत पसंत थी, वो सब गोहरआपा पकाती थी. मैने खुदने नानासाहब के लिये बिर्यानी, मुर्गी का कोरमा बनाया है.याच मुलाखतीत पुढे आशम्मा सांगते की- जोपर्यंत नाना व्यवस्थित खाऊ-पिऊ शत होते, तोपर्यंत त्यांच्यासाठी सगळं काही केलं जायचं. पुढे पुढे त्यांना प्रकृतीमुळे फार जेवण जायचं नाही. तरी दिवसाला ते दीड लिटर दूध प्यायचे, सकाळी अर्धा लिटर, दुपारी अर्धा लिटर आणि संध्याकाळी अर्धा लिटर.
एवढंच नाही, या मुलाखतीत आशम्मा म्हणते की, नानासाहेब जेव्हा पूर्णपणे जागेवरच बसले, तेव्हा त्यांना आम्ही घरातच राहणारा रमेश आणि समोरच्या चाळीत राहणारा यशवंत या मुलांच्या मदतीने दर एक दिवसाआड आंघोळ घालायचो. शिवाय त्यांचं हगणं-मुतणं अनेकदा गोहर स्वतः करायची. रमेशही तिला मदत करायचा. याउपर बालगंधर्वांना कार्यक्रमाच्या ठिकाणी जायला-यायला त्रास होऊ नये म्हणून गोहरने त्यांच्यासाठी ओपेल गाडीही आधीच घेतली होती आणि ही गाडी बरीच वर्षं होती, असंही आशम्मा सांगतात.
आता बाहेरुनच कंड्या पिकवणाऱ्यांवर विश्वास ठेवायचा की गोहर-बालगंधर्वांबरोबर राहणाऱ्या आशम्मावर, हे ज्याचं त्यानेच ठरवायला हवं... आणि जर आशम्मावर विश्वास ठेवायचा नसेल, तर तो न ठेवणाऱ्यांसाठी माझा एक सवाल निश्चितच आहे, की एवढी जर बालगंधर्वांची काळजी होती, तर १९६४मध्ये गोहरचं निधन झाल्यावरही तीन-साडेतीन वर्षँ बालगंधर्व त्याच माहीमच्या घरात राहत होते आणि आशम्मा त्यांना कशीबशी सांभाळत होती. बालगंधर्वांना सरकारकडनं मिळणाऱ्या साडेसातशे रुपयांवर कसबसं गुजराण होत असे. त्या काळात कुणीच का पुढे आलं नाही? मी तर म्हणतो की जेव्हा गोहर हयात होती आणि परिस्थितीशी झुंज देत होती, तेव्हाच कुणी त्यांच्या मदतीला पुढे का आलं नाही? एवढे रसिकजन, डॉक्टर, वकील, व्यापारी बालगंधर्वांवर प्रेम करत होते, तर ते का पुढे आले नाही, गोहर आणि गंधर्वांच्या या विपन्नावस्थेत? याचं उत्तर एकच आहे, त्यांना बालगंधर्व हवे होते, पण गोहर नको होती. गोहर नसती तर त्यांनी बालगंधर्वांसाठी त्यांच्या अखेरपर्यंत पैशाच्या राशी ओतल्या असत्या... पण त्यांना गोहर नको होती. या लोकांना गोहर कधीच नको होती. ती बालगंधर्वांच्या आयुष्यात आलेली या लोकांना कधीच खपलं नाही. त्यांचं अखेरपर्यंत एकच म्हणणं राहिलं- गोहर नको, गोहर नको...!
+++
गोहर बाई ग, तुला तरी उमगलं होतं का कधी की या लोकांना तू का नको होतीस ते...? अग तू मुसलमान होतीस, जातीने मुसलमान. तुला कळलंच कसं नाही, बालगंधर्व धर्माने हिंदू आणि जातीने ब्राह्मण आहेत ते. तुझी हिंमतच कशी झाली, त्यांच्यावर प्रेम करण्याची? वेडी कुठली... गोहर तू हिंदू असायला हवी होतीस ग... हिंदू असतीस ना, तर तुला आमच्या लोकांनी सहज स्वीकारलं असतं. एवढंच काय तुझ्यापुढे पायघड्याही अंथरल्या असत्या. पण तू पडलीस पक्की मुसलमानीण... आणि तू तरी… तुझ्यापुढे त्या बाजीराव-मस्तानीचं उदाहरण नव्हतं काय. अग या समाजाने जी गत त्यांची केली, तीच तुमची केली. तो बाजीराव तर मराठेशाहीचा पेशवा-पंतप्रधान. तो हतबल झाला या सामाजिक मानसिकतेसमोर, तर तुमचा काय पाड...! तू केवळ मुसलमान होतीस म्हणूनच ग, तू गंधर्वांची लग्नाची बायको अतानाही, तुला सगळे बायकोपणाचे अधिकार नाकारले गेले. बालगंधर्वांचा शिवाजीपार्कला मोठा अमृतमहोत्सव झाला. त्यावेळी तेव्हाचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित, पृथ्वीराज कपूर, शिवाजी गणेशन असे कोणकोण होते त्या भल्या मोठ्या व्यासपीठावर. पण तुझ्यासाठी एक हक्काची खुर्ची ठेवायला आयोजकमंडळी विसरलीच ग... पण त्यांचं तरी चुकलं कुठे, त्यांना तुला गंधर्वांच्या बायकोचा अधिकार द्यायचाच कुठे होता? तुमचं तर लग्न झाल्याचंही नाकारलं गेलं होतं. कारण तू मुसलमान होतीस!
मला माहीत आहे, तुला साधं बोलावणंही नव्हतं, त्यामुळे तू तिकडे फिरकलीस सुद्धा नाही... पण आपल्यावर हा सारा अन्याय आपण मुससलमान असल्यामुळेच होतोय, हे तुलाही तेव्हा उमगलं असेलच. त्याशिवाय का बडोद्याच्या डॉ. कीर्तन्यांच्या घरी बालगंधर्वांवर उपचार सुरू होते,  तेव्हा तिथे त्यांच्या घरी येणाऱ्या आणि एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला असलेल्या दामोदरला (डॉ. दामोदर नेने ऊर्फ दादुमिया, आता वय वर्ष ८८) म्हणाली होतीस- ‘ मुसलमान असणं हा काही गुन्हा नाहीय. हिंदू समाजाने मुसलमानाना जवळ केलं पाहिजे. आज हिंदू समाज मुसलमानाना दूर ठेवतो, अस्पृश्य मानतो, त्यामुळे मुसलमानांच्या मनावर वाईट परिणाम होतो, ते उगाच बिथरतात. जर प्रत्येक हिंदू पुरुषाने एक मुसलमान स्त्री घरी आणली तर हा हिंदू-मुस्लिम प्रश्न राहतोच कशाला?’
गोहर, तो दामोदर, ज्याला तू जवळ बसवून लेकाच्या ओढीने त्याच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवायचीस, तो अजून हयात आहे. तो तर अजूनही ठामपणे सांगतो की, गोहर मुसलमान होती,  म्हणूनच तिला आमच्या माणसांनी स्वीकारलं नाही म्हणून!
अग तू मुसलमान असल्याची आमच्या लोकांनी एवढी धास्ती घेतली होती की, तू गंधर्वांनाही मुसलमान केलंस आणि त्यांचं नाव शेख सय्यद इब्राहिम अल् ठेवलं असल्याची अफवाही त्यांनी पसरवली होती. प्रत्यक्षात तुम्ही दोघं आपापल्या धर्मात सुखी होतात. तुमच्या प्रेमाच्या आड कधीच धर्म आला नाही. पण इतरांनी मात्र तुमच्या धर्माचंच भांडवल केलं. ते तरी किती करावं...?
... तुला आठवतं का?  तुला कसं आठवणार म्हणा... तुझा देह या... या कब्रस्तानातच दफन केला जात होता आणि याच बाजूच्या झाडाखाली बसून बालगंधर्व अक्षरशः धाय मोकलून माझा गोहरबाबा गेला, माझा गोहरबाबा गेला म्हणत रडत होते. रडताना भावनावेगात ते फक्त एवढेच म्हणाले की- मी मेल्यावर मला इथेच बाबाच्या शेजारी दफन करा…
तर काय सांगू, तुझ्या मृत्यूनंतर तीन-साडेतीन वर्षांनी बालगंधर्व पुण्यात वारले, तर त्यांच्या मृत्यूची कानोकान खबर या लोकांनी कुणाला लागू दिली नाही. ते आजारी पडले तुमच्याच माहीमच्या घरी. नाईलाज म्हणून आशम्माने पुण्याला त्यांच्या नाताईकांना कळवलं. त्यासरशी ते आले आणि पुण्याला घेऊनही गेले. त्यानंतर बालगंधर्व महिनाभर तसे बेशुद्धावस्थेतच होते. मधे आशम्मा पुण्याला जाऊन त्यांना बघूनही आली. नानासाहेबांचं काय होतंय ते मला कळवा, असंही तिने कळवळून सांगितलं होतं. प्रत्यक्षात रेडिओवरची बातमी ऐकूनच कुणीतरी धावत आशम्माला सांगत आलं- ‘आशाबी नानासाहेब गेले…’ बालगंधर्व गेले ते सुटलेच बिचारे. पण त्यांची अंत्ययात्रा इतक्या घाईगडबडीत काढण्यात आली की एकेकाळच्या महाराष्ट्राच्या या संगीतसम्राटाच्या अंत्ययात्रेला पन्नास-शंभर माणसंही नव्हती... कुणी तरी मागे लागल्यासारखं बालगंधर्वांचं कलेवर ओंकारेश्वरला नेण्यात आलं आणि एखाद्या चोरावर करावे, तसे अंत्यसंस्कार त्यांच्यावर केले गेले... गोहर, यामगचं कारण तुला ऐकायचंय? त्यांना भीती वाटत होती की बालगंधर्वांच्या मृत्यूची बातमी कळताच माहीमचे मुसलमान येतील आणि त्यांचं कलेवर मुंबईला नेऊन माहीमच्या कब्रस्तानात तुझ्या शेजारी दफन करतील!
मला खरोखरच हसू येतं गोहरत्या वेड्यांना कळलंच नाही की जो बालगंधर्व जिवंतपणी आपल्या हाती लागला नाही, तो त्याच्या मृत्यूनंतर हाती लागून काय एवढं मोठं होणार होतं...? माझा आत्मा-पितरवगैरे गोष्टींवर मुळीच विश्वास नाही, पण असलाच आत्मावगैरे, तर तिकडे पुण्यात जीव जाताच बालगंधर्वांचा आत्मा खात्रीने तुझ्या कबरीत येऊन तुझ्या शेजारी निजला असणार- माझा गोहरबाबा, माझा गोहरबाबा म्हणत!
... आणि गोहर तुला एवढं तर आयुष्यात नक्कीच कळलं असेल की- बाकी कुणी तुला कितीही शिव्या घातल्या असतील, तुझा दुस्वास केला असेल, पण गंधर्वांनी तुझ्यावर फक्त प्रेमच केलं. ना तू कधी त्यांना अंतर दिलंस, ना त्यांनी तुला...
गोहर तुमची प्रेमकहाणी सफल झाली असती, तर मला आवडलं असतं. पण ती विफल झाली, असं तरी मी कसं म्हणू?  बघ अजून कसे एकमेकांना बिलगून आहात...!
+++
गोहरला लावलेला काळा रंग खरवडत गेलो आणि गोहर एखाद्या दीपकळीसारखी पुन्हा नव्याने भेटत गेली. तरीही माहीमच्या कब्रस्तानातून बाहेर पडताना पावलं पुन्हा जड होतातच. मन उदास होतं... गोहर पुन्हा कधी भेटणार, अशी खंत मन दाटून येते... पण तेवढ्यात पदर सळसळावा, तशी कब्रस्तानातील झाडं-वेलींची पानं थरथऱतात. जणू गोहरच सांगत असते- इथे कशाला परत यायला हवंय तुला. तुझ्या मनात जिवंत ठेव म्हणजे झालं!
…………
(या लेखासाठी बालगंधर्वप्रेमी गायक विक्रांत आजगावकर, कन्नड लेखक रहमत तरिकेरी, बडोद्याचे डॉ. नेने ऊर्फ दादुमिया आणि तळेगावच्या ‘रामनाथ रीसर्च इन्स्टिट्यूट’च्या एस. के. पंडित यांच्याशी झालेल्या चर्चेची मदत झाली.)
लेखक - मुकुंद कुळे


(‘हंस’च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेख)