मंगळवार, २८ जून, २०१६

खंडेरायाची झाले मी मुरळी ग बाई मुरळी

मुंबईत शिवडीला राहणा‍ऱ्या कमलबाई शिंदे म्हणजे खंडेरायाच्या नामांकित मुरळी. लहानपणी परिस्थितीवश खंडोबाचं मुरळीपण त्यांच्या पदरात पडलं. पण त्यांनी ते एखाद्या सत्त्वासारखं निभावलं. खंडोबाच्या गाण्यांचा-विराण्यांचा प्रचंड खजिना असलेल्या कमलबाईंशी काही वर्षांपूर्वी मारलेल्या या गप्पा...

छायाचित्रे : संदेश घोसाळकर

मी ग आनंदले मनाला ... माझा ग बाई मल्हार कुणीकडनं आला
काचेची न्हाणी बाई, गुलाबाचं पाणी
पाणी विसणते म्हाळसाराणी
न्हाऊ घालिते देवाला... माझा ग बाई मल्हार कुणीकडनं आला
... कुणाच्या तरी घरी-दारी कुलाचाराचं खंडोबाचं जागरण सुरू असतं अन् त्यात खंडेरायाची मुरळी असलेल्या कमलबाई शिंदे हातात देवाची घाटी घेऊन, गाणं म्हणत नाचत असतात. त्यावेळची त्यांच्या चेहऱ्यावरची भावसमाधी पाहायला हवी. कुलविधी पार पडून जागरणातलं गण-गवळण गाऊन झालं की, कमलबाई खंडोबाची पदं गायला सुरूवात करतात. त्यांच्या तोंडची ही पदं ऐकणं म्हणजे निव्वळ आनंद असतो. गाण्यातला भाव त्यांच्या चेहऱ्यावर जसाच्या तसा पाहायला मिळतो. मग तो कधी खंडोबा अचानक कुठून तरी घरी आल्यामुळे आनंदून गेलेल्या म्हाळसेचा असतो, तर कधी तोच भाव आपण लग्नाची बायको असताना मल्हारी बानुबाईला आणायला गेल्यामुळे म्हाळसेला झालेल्या दु:खाचा असतो. गाणं कुठलंही असो आणि त्यातला भावही, प्रत्येक वेळी कमलबाई गाण्यातला भाव नव्याने जगतात. किंबहुना देवाची पदं म्हणायला लागल्यावर त्या कमलबाई उरतच नाहीत, त्या जणू म्हाळसाच होऊन जातात. खंडोबाची प्रीतीची बायको म्हाळसा, शत्रूच्या निर्दालनासाठी मल्हारी मार्तण्डाबरोबर लढणारी शूर नारी म्हाळसा, तर कधी मल्हारीरायाने केलेल्या विश्वासघातामुळे दुखावलेली म्हाळसा...
हो जागरण करताना मी म्हाळसाच असते. म्हाळसा जशी देवाची बायको, तशी मीदेखील. देवाची मुरळी आहे मी. माझं रीतसर लग्न लागलंय बाराव्या वर्षी देवाशी. अन् म्हाळसाच का कधी कधी बानुबाईपण असते. तीदेखील देवाची बायकोच दुसरेपणाची. आम्हा तिघींचं सुख-दु:ख सारखंच. खंडोबापाशी सुरू होणारं आणि त्याच्यापाशीच संपणारं..’, कमलबाई हे सांगत असतात, तेव्हाही तनामनाने खंडोबापाशीच पोचलेल्या असतात.
पण कमलबाईंचं खंडोबाशी लग्न झालंच नसतं, तर... तर कदाचित कमलबाईंचं आयुष्य वेगळंच घडलं असतं. अर्थात या जरतरला काही अर्थ नाही. जे घडणार असतं, ते घडतंच. कमलबाईंच्याबाबतीत असंच झालं. त्याची कथा सांगताना कमलबाई म्हणतात, ‘मी तेव्हा आठ-नऊ वर्षाची असेन. आम्ही पूर्वीपासून मुंबईत शिवडीलाच राहायचो. एकदा घराबाहेर मी आणि माझ्या दोन बहिणी आम्ही खेळत होतो. आम्ही खेळत असतानाच, तिथं एक वाघ्या-मुरळीची जोडी देवाच्या नावानं शिधा मागायला आली. रविवारचा दिवस होता तो. खंडोबाचा दिवस. खंडोबा आमचंही कुलदैवत. म्हणून आईने घरातून थोडे तांदूळ-डाळ आणली आणि मुरळी असलेल्या म्हाळसाबाईच्या टोपलीत टाकली. तेवढ्या थोडक्या वेळात म्हाळसाबाई मुरळीने मला आणि घरातच पलंगावर झोपून असलेल्या माझ्या वडिलांना नेमकं हेरलं. तिने पटकन आईला विचारलं- घरात कुणी आजारीबिजारी हाय काय ग?’ तिने तसं विचारताच लगेच आईचा बांध सुटला आणि बोलण्याच्या ओघात वडील सात-आठ वर्षं जागेला खिळून असल्याचं तिने सांगितलं. त्यासरशी म्हाळसाबाईने नेमकं टुमणं काढलं की, तुझी पोरगी खंडोबाला वाहा, म्हणजे बघ तुझा घरधनी कसा ठणठणीत बरा होतो ते! आईने पहिल्यांदा पटकन ते झटकून टाकलं. म्हणाली, नको ग बाई माझी मुलगी देवाची मुरळीबिरळी. पण तेवढ्याने ती म्हाळसाबाई हार मानणारी थोडीच होती. तिने लगेच सावरून घेतलं अन् म्हणाली- आता लगेच नको तसा पणकरूस. पण नवऱ्याला बरं वाटलं, तर देईन असं म्हण. मी तुझ्या दाराला हळद-भंडाऱ्याची पुरचुंडी बांधून जाते. पुढच्या खेपंला येईन तेव्हा सांग काय ते!कळतनकळत आईनेही तिच्या हो ला हो म्हटलं आणि पुन्हा आपल्या कामाला लागली. पण संध्याकाळी गंमतच झाली. गेल्या सात-आठ वर्षात कधी भाकरीचा तुकडा न मागणाऱ्या माझ्या वडिलांनी आईकडे अर्धी भाकर खायला मागितली आणि खाल्लीही. आईसाठी हे जरा इपरितच होतं. पण तिला वाटलं हा म्हाळसाबाईने सांगितलेल्या उताऱ्याचाच गुण आहे आणि तिने मनाशी काही एक निर्णय घेतला.
खरोखरच दुसऱ्या दिवसापासून कमलबाईंच्या वडिलांच्या तब्येतीला उतार पडला आणि खंडोबामुळेच नवरा बरा झाला, असं कमलबाईंच्या आईला वाटू लागलं. खरंतर बोला-फुलाची गाठ पडावी, तसं घडलं होतं. पण तसं होण्याने कमलबाईंच्या आयुष्याला मात्र वेगळीच दिशा मिळाली. पुढच्या रविवारी म्हाळसामुरळी न विसरता कमलबाईंच्या घरी आली. तिने कमलबाईंच्या वडिलांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांना बरं वाटू लागलंय म्हटल्यावर, त्यांच्या आईवडिलांच्या मागे आता खंडोबाला मुरळी सोडा असं टुमणं लावलं. खरंतर आपली मुलगी देवाला वाहाणं त्यांना पटत नव्हतं. कारण देवाला सोडलेल्या मुलींची काय वाताहत होते, ते त्यांना ठाऊक होतं. पण यावर लगेच म्हाळसाबाईंनीच उपाय सुचवला. त्या त्यांना म्हणाल्या-अहो भाऊ, मुलगी कायमची मुरळी म्हणून सोडू नका. तिला आपण घरमुरळी करू. म्हणजे मुरळी झाली, तरी ती घरीच राहील. तिचं लग्नही करता येईल. फक्त कधी कधी तिला देवाच्या जागरणाला पाठवत जा, म्हणजे झालं!कमलबाईंच्या आई-वडिलांना हा उपाय पसंत पडला. कारण त्यामुळे देवाला बोललेला नवसही फेडून होणार होता आणि मुलगीही नजरेसमोर राहणार होती. त्यांनी लगेच हो म्हटलं. पण कुठली मुलगी मुरळी म्हणून देवाला वाहायची, असा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा म्हाळसाबाईंची नजर छोट्या कमलबाईंकडे गेली. त्या लगेच म्हणाल्या- ही पांढरी पोरच द्या देवाला. देवाला बरं वाटंल!
नेमकं मलाच निवडलं की हो त्यांनी. निवडलं कसलं, खरंतर आधीच त्यांनी मला हेरून ठेवलं होतं. आदल्या रविवारी आल्या होत्या, तेव्हा माझ्याकडे टकामका बघत होत्या. आम्हा तिघी बहिणींमध्ये मी दिसायला बरी आणि गोरीगोमटी होते ना, म्हणून त्यांनी मलाच हेरलं देवासाठी. आता मला याचं वाईट वाटत नाही. पण तेव्हाही अजाणत्या वयात वाटलं नव्हतं. कारण एक तर ते कळण्याचं वय नव्हतं आणि माझे वडील नंतरच्या काळात खरोखरच हिंडा-फिरायला लागले. मी देवाची मुरळी झाल्यावर माझे वडील तब्बल तेरा वर्ष जगले. त्यामुळेही मुरळी होण्याचं दु:ख तेव्हा झालं नाही’, कमलबाई जुन्या दिवसांच्या आठवणी जागवत असतात.
कमलबाईंच्या आई-वडिलांनी होकार भरल्यावर एक दिवस मग त्यांचे आई-वडील आणि म्हाळसाबाई मुरळी, तिच्याबरोबरचा मार्तण्ड वाघ्या सारेजण छोट्या कमलबाईंना घेऊन जेजुरी गडावर गेले. तिथे छोट्या कमलचं ब्राह्मणाच्या साक्षीने खंडोबाशी लग्न लागलं. देवाच्या नावाने कमलबाईंच्या गळ्यात चांदीचं डोरलं बांधण्यात आलं आणि तेव्हापासून आजतागायत कमलबाई प्रेमाने म्हणत आल्यात- खंडेरायाची झाले मी, मुरळी ग बाई मुरळी. 

पण हे मुरळीपण निभावणं तसं सोपं नव्हतं. कमलबाईंना मुरळी म्हणून वाऱ्यावर सोडून दिलं असतं, तर कदाचित त्यांच्याही आयुष्याची रया गेली असती. पण कमलबाईंनी आपलं मुरळीपण मानानं मिरवलं आणि राबवलंही. मुरळी झाल्यानं त्यांच्या आयुष्यात फार फरक पडला नाही. पण एक मात्र नक्की झालं - त्यांना खूप नाचायला-गायला मिळालं. त्याची हकीगत सांगताना कमलबाई म्हणतात, ‘मला नाचण्या-गाण्याची हौस अगदी लहानपणापासून होती. आम्ही राहायचो, तिथे मी वेगवेगळ्या कार्यक्रमात कधी गाणी म्हणायचे, कधी नाचायचेदेखील. पण आधी मी हौस म्हणून नाचायचे. मुरळी झाल्यावर जागरणासाठी म्हणून नाचायला-गायला लागले. खरंतर मी तेव्हा जागरणासाठी कुठे जात नसे. पण आम्ही राहायचो, तिथेच पारूबाई नावाची मुरळी राहायची. तिचं जागरणाचं पथक होतं. ही पारूबाई म्हाळसाबाईच्याही परिचयाची होती. कारण म्हाळसाबाईदेखील घोडपदेवलाच राहायची. त्या साऱ्यांचंच एक पथक होतं. एक दिवस पारूबाईने मला गुपचूप विचारलं की, जागरणात नाचायला येते का म्हणून. मी घरच्यांना विचारलं असतं, तर ते नाहीच म्हणाले असते. माझ्या एका चुलतभावालाही माझं नाचणं-गाणं आवडायचं नाही. म्हणून मी एका रात्री गुपचूपच पारूबाईबरोबर गेले. घरातले सगळे झोपल्यावर गेले आणि ते उठायच्या आत परत आले. त्यानंतर काही दिवस हे लपूनछपून सुरूच होतं. मात्र एक दिवस माझ्या चुलतभावाला मी जागरणात नाचत असल्याचं त्याच्या एका मित्राकडून कळलं. त्यावर घरी येऊन त्याने खूप आरडाओरडा केला. तो माझ्या भल्याचंच सांगत होता. पण ते समजण्याचं माझं वय नव्हतं आणि बाबांना वाटत होतं की, ते खंडोबाच्या कृपेमुळेच बरे झालेत. आईचंही तसंच मत होतं. त्यामुळे त्यांनी माझ्या नाच-गाण्याला फार आडकाठी केली नाही. उलट त्यांनी माझ्या चुलतभावालाच बोल लावला आणि त्या भांडाभांडीत तो भाऊ आपल्या बायकोसह आमचं घर सोडून निघून गेला. माझं नाचगाणं मात्र सुरूच राहिलं आणि खरंच सांगते मला नाचायला-गायला आवडायचं म्हणूनच मी तेव्हा जायचे. देवाच्या मुरळीचं मुरळीपण तोवर माझ्यात भिनलं नव्हतं आणि त्याचे फायदे-तोटेपण तोपर्यंत कळले नव्हते.
र्ष सरत गेली, सोमवती-चंपाषष्ठी या सणांना जेजुरीगडाला देवाच्या दर्शनाला जाणं व्हायला लागलं, तसतसं मात्र मग कमलबाईंना मुरळी म्हणजे काय ते उमगू लागलं. कळू लागलं. आपण मुरळी असल्याचं वेगळेपण आकळू लागलं. मात्र यामुळे त्या अधिकच सांभाळून राहू लागल्या. कारण तोपर्यंत त्यांचं वय पंधरा-वीसच्या आसपास गेलं होतं. देवाची मुरळी म्हणून जो-तो हक्काने बघायला लागला होता. त्या काळात पारूबाई-म्हाळसाबाई लग्नसराईच्या दिवसांत कमलबाईंना घेऊन जुन्नरकडे जागरणाच्या कार्यक्रमाला जात. कमलबाई तेव्हा दोन-दोन महिने त्यांच्याबरोबर असत. त्या काळात कमलबाईंना सांभाळायचं म्हणजे म्हाळसाबाई आणि पारूबाई दोघींना मोठी जोखीमच वाटायची. पारूबाई तर एकसारख्या म्हणायच्या की,  कमलबाईच्या रूपानं आपण इखाची कुपी जवळ बाळगतोय म्हणून!
याच कलापथकात शाहीर धामणीकर नावाचे गृहस्थ होते. त्यांच्याकडे खंडोबाच्या पारंपरिक पदांचा मोठा साठा होता. कमलबाईंकडे आज जे बरंच काही आहे, ते त्यांच्याकडूनच आलं आहे. ते कमलबाईंना मुलगी मानायचे. तेच मग एक दिवस कमलबाईंना म्हणाले- जागरणाच्या कलापथकाबरोबर एवढी हिंडतेस, देवाची सेवा करतेस, चांगलं आहे. पण आता तू घरगृहस्थी कर. गृहस्थी सांभाळून देवाचं कर. म्हणजे आमचंही नाव राहील नि तुझंही.मग शाहीर धामणीकर यांनीच सुचवलेल्या, सचिवालयात कामाला असलेल्या आणि जयमल्हार सेवा पार्टीत शाहीर असलेल्या शिंदे यांच्याशी कमलबाईंचं साधारणपणे वीस-बाविसाव्या वर्षी लग्न झालं. त्यानंतर त्यांचा सुखाचा संसार सुरू झाला. पण शाहीर शिंदेही खंडोबाचे भक्त होते. त्यामुळे त्यांनी कमलबाईंना कधी जागरणाच्या कार्यक्रमाला जायला आडकाठी केली नाही. उलट त्यांच्याबरोबर ते स्वत:ही जायचे.
कमलबाईंना आवाजाची नैसर्गिक देणगी असल्यामुळे कमलबाईंचं नाव खूप लोकांपर्यंत पोचलं. त्याच काळात शिवडीला असलेल्या तमाशा थिएटरमध्ये अनेक नामवंत तमाशा कलावंतांच्या पार्ट्या असायच्या. अशीच एकदा विठाबाई नारायणगावकर यांची पार्टी आलेली होती. अन् एकदा अचानक त्यांची गाणारी बाई आजारी पडली. आता काय करायचं म्हणता म्हणता कुणी तरी त्यांना कमलबाईंचं नाव सुचवलं. त्याबरोबर कमलबाईंना बोलावणं गेलं, त्या आल्या आणि विठाबाईंसाठी गायल्यादेखील. पहिल्याच वेळी कमलबाईंनी विठाबाईंसाठी म्हटलेली गाणी होती - पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची, तुम्हे और क्या दू दिलके सिवा... आणि कही दीप जले कही दिल... ही गाणी कमलबाईंनी तेव्हा एवढी जबरदस्त म्हटली की, तेव्हा आणि नंतरच्या काळात विठाबाई जेव्हा जेव्हा मुंबईला आल्या, तेव्हा तेव्हा त्यांनी कमलबाईंनाच त्यांच्या घरून उचलून नेलं गाण्यासाठी. यामुळे जागरण करता करता कमलबाईंचं नाव तमाशा क्षेत्रातही व्हायला लागलं. कमलबाईंचा आवाज गोड होताच, पण त्या रुपानंही देखण्या होत्या. त्यामुळे अनेकांनी त्यांना आमच्या तमाशा पार्टीत नाचता का असंही विचारलं. पण कमलबाईंनी तो मोह आवरला. तमाशात काही काळ त्या गात राहिल्या. अगदी अनेकींच्या संगीतबारीत त्यांनी एकसे एक लावण्याही म्हटल्या. पण पायात घुंगरू बांधून त्या तमाशाच्या फडावर नाचल्या नाहीत.
सच्च्या दिलाने त्या म्हणतात,‘नाचायचा मोह झाला होता, नाही असं नाही. पण वेळीच सावरले. एरव्ही आपण नाचतो, ते देवाला सेवा म्हणून नाचतो. पण तमाशा थिएटरातला देव वेगळाच असतो, हे उमगलं आणि मी नाचायच्या फंदात पडले नाही. गाणं मात्र गात राहिले.
कमलबाईंनी आपलं मुरळीपण एखाद्या सत्त्वासारखंच निभावलं. लग्न केलं, तरी खंडोबाच्या सेवेच्या चाकरीत त्यांनी कधी हयगय केली नाही. त्याचे उपासतापास, त्याचं जागरण एखाद्या पतिव्रतेच्या बळानेच निभावलं. केवळ यामुळेच अनेक संकटं कोसळंली, पण त्यातून आपण निभावून गेलो, अशी त्यांची श्रद्धा आहे. या संदर्भातले दोन अनुभव तर अफलातून आहेत. त्या सांगतात - आमच्या कलापथकाचा एकदा फलटणजवळच्या कुंभारीकोसारी गावात जागरणाचा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम आटपून संध्याकाळीच आम्हाला तिथून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या ढालगावाला जायचं होतं. कारण तिथली जागरणाची सुपारी घेतली होती. कुंभारीकोसारीचे कार्यक्रम आटपून आम्ही निघालो. रात्री आठची गाडी होती. गाडी आल्यावर एकच गलका झाला. आम्ही कसेबसे आत चढलो. मात्र गाडी अर्ध्या रस्त्यात आली नि माझ्या लक्षात आलं की, आपली कपड्यांची नि दागिन्यांची पेटी खालीच राहिलेली आहे. मी लगेच पुढच्या गावी उतरले आणि परतीच्या गाडीने पुन्हा जिथून गाडी सुटली होती, त्या एसटी स्टॅण्डवर आले. सुदैवाने माझी पेटी बाजूच्या टपरीवाल्याने उचलून ठेवली होती. त्याने मला ती दिली. मी म्हटलं, ‘देवासारखा पावलास बाबा. आतमध्ये माझे दागिने होते.  मी ती पेटी घेतली नि गाडीची वाट बघत उभी राहिले. त्यावर त्या टपरीवाल्याने आता सकाळशिवाय गाडी येणार नाही, असं सांगितलं आणि माझी पाचावर धारण बसली. कारण काहीही करून मला रात्रीच ढालगावला पोचणं गरजेचं होतं. तिथली सुपारी घेतलेली होती. एवढ्यात माझी अडचण ओळखून टपरीवर उभे असलेले दोघे-तिघे पुढे आणि म्हणाले आम्ही तुम्हाला बैलगाडीने सोडतो. मनात आलं, कोण कुठले हे, पण देवासारखे धाऊन आले. आम्ही बैलगाडीने निघालो. माझ्यासोबत माझा एक छोटा भाचा तेवढा होता. ढालगावला जाणारा रस्ता घाटीतून जाणारा होता. किर्रर्र अंधार पडला होता आणि मी दोन परक्या माणसांबरोबर प्रवास करत होते. अर्ध्या रस्त्यात आलो असतानाच मधल्या जंगलातल्या रस्त्याने दोघे-तिघे आले आणि आम्हालापण ढालगावला जायचंय म्हणत माझ्या बाजूला येऊन बसले. थोड्या वेळाने त्यांचा हात माझ्या पेटीकडे जाऊ लागला. तेव्हा त्यांच्याकडे रागाने नीट निरखून बघितलं, तर ते मघाशी टपरीवर उभे असल्याचं आठवलं आणि तेव्हाच माझ्या लक्षात आलं की, आपण पेटीत दागिने असल्याचं नकळत बोलून गेलो होतो आणि त्यासाठीच हे आले होते. पहिल्यांदा त्यांना हिंमतीने हटकलं. तरीही दुसऱ्यांदा जेव्हा त्यांचा हात पेटीकडे जाऊ लागला. तेव्हा मी संतापाने त्यांना म्हटलं - पाव्हणं नीट गुमान बसा की, का उगं खंडोबाच्या सेवेकऱ्यांना छळताय?’ मी एवढं म्हणायचा अवकाश, त्यांनी ताडकन् गाडीतून खाली उडी मारली. अन् म्हणाले - तुम्ही खंडोबाच्या मुरळी हाय व्हय, मंग आदी नाय का सांगायचं. आम्ही रामोशी हाव. खंडोबा आमचं कुलदैवत हाय, जा तुम्ही तुम्हाला कोण काय करणार नाय.आणि मग खरोखरच कसलंही विघ्न न येता, मी वेळेत ढालगावला पोचले. आमचा सुपारीचा कार्यक्रमही वेळेत पार पडला. मला ही सगळी त्या मल्लुरायाची म्हणजे खंडोबाचीच कृपा वाटते.
दुसरा प्रसंग खुद्द मुंबईतच घडलेला. दक्षिण मुंबईतच कुठल्या तरी गल्लीत कमलबाईंचा जागरणाचा कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रम संपला आणि अचानक कुठूनशी टोळधाड यावी, तसे दहा-बाराजण आले. त्यातल्या एकाने कमलबाईंना आपल्याबरोबर चलायला सांगितलं. त्याच्या हातात चाकू असल्यामुळे त्याच्याबरोबर जाण्याशिवाय कमलबाईंकडे दुसरा पर्याय नव्हता. कमलबाई सांगतात,‘मी खंडोबारायाचा धावा करतच त्याच्या पाठोपाठ चालले होते. एका क्षणी मनात म्हटलं देवा आता तूच वाचव तुझ्या या मुरळीला. आणि अचानक समोरून एक माणूस आला. मी ज्याच्याबरोबर गुमान चालत होते, त्याला तो माणूस म्हणाला, ’या सभ्य बाईला तू कशाला उचललंस. मी तुला उचलून आणायला सांगितली ती बाई वेगळी होती.आणि नंतर मग त्या दोघांनी पुन्हा पुन्हा माझी माफी मागितली. नंतर मला कळलं की, केवळ सारख्या दिसण्यामुळे मला भलतीच समजून उचललं गेलं होतं. पण काहीही असो खंडोबाच्या मेहेरबानीनेच आजवर मी प्रत्येक संकटातून, अवघड परिस्थितीतून बाहेर पडलेय.
आपण खंडोबाचं व्यवस्थित केलं की तोही आपलं व्यवस्थित करतो अशी बाईंची श्रद्धा आहे. त्यातूनच आज साठी उलटली तरी त्या देवाची सेवा करतात. कुठे जागरणाची सुपारी आली, तर नाही म्हणत नाहीत. कारण त्यांच्यासाठी तो केवळ उपजीविकेचा मार्ग नसतो. ते त्यांच्यासाठी देवाच्या सन्निध राहण्याचा एक उपाय असतो. मग देवासाठी कुठल्याही मार्गाने सेवा करण्याची त्यांची तयारी असते. मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीच्या विद्यार्थ्यांना त्या जागरणनृत्यही याच भावनेतून शिकवतात. ही मुलं काही दारोदार जाऊन जागरणनृत्य करणार नाहीत, हे त्यांना ठाऊक असतं. पण त्यांना शिकवणं म्हणजेही देवाची सेवाच आहे, असं त्या मानतात. तसंच मागे वीसेक वर्षापूर्वी इंडियन नॅशनल थिएटरच्या ‘खंडोबाचं लगीन’ नाटकात काम केलं होतं, तेही याच भावनेतून. एवढंच कशाला बसल्या जागी त्यांना खंडोबाचं एखादं पद म्हणायला सांगितलं तरी त्या कसलेही आढेवढे न घेता पटकन म्हणतात. मुख्य म्हणजे त्यांनी मुरळीच्या भूमिकेत जायला जराही वेळ लागत नाही. कारण तो त्यांचासाठी एक विरंगुळाही आहे. परत देवाचं गाणं ऐकवायला नाही कसं म्हणायचं, हा प्रश्नही असतोच. पण खरा प्रश्न आपल्याला पडतो, जेव्हा त्या आपल्यालाच विचारतात की, कुठलं गाणं गाऊ? कारण त्यांच्या पोतडीत एवढी असतात की आपल्यालाच संभ्रम पडावा. मग आपल्यावरचं धर्मसंकट पाहून त्याच म्हणतात- मघाशी म्हाळसेचं सुखाचं-आनंदाचं पद ऐकवलं होतं, आता तिच्या दु:खाचं ऐका. खंडोबा बानूबाईच्या नादाने घर सोडून गेल्यावर म्हाळसाबाई काय म्हणते ऐका -
देव मल्हारी रुसून आला घोड्यावर बसून
गेला बानूला आनाया मी ग लग्नाची असून
देव चंदनपुरात राखतो मेंढरं
खाई बानूच्या हातची ताक कन्या न् भाकर
बोले बानूशी गोड गोड देव गालात हसून
... गेला बानूला आनाया मी गं लग्नाची असून
... कमलबाई आपल्या गाण्यातून म्हाळसेचं, किंबहुना स्त्रीजातीचं सनातन दु:ख उभं करतात. मघाचं आनंदाचं गाणं गातानाची आणि आताचं दु:खाचं गाणं गातानाची त्यांची भावसमाधी मात्र सारखीच असते.
बरीच वर्षं कमलबाई दुसऱ्याच्या कलापथकातून काम करायच्या. आता त्यांचं घरचंच जागरणाचं कलापथक आहे आणि त्यांचा मुलगा राजू शिंदे त्याची जबाबदारी सांभाळतो. पण कमलबाईंना वाटतं, हे खंडोबाच पार पाडतोय. कारण खंडोबा हाच त्यांचा ध्यास आणि श्वास आहे. म्हणून तर लौकिक जीवनातला साथीदार गमावल्यावरही त्यांनी कपाळावरचं कुंकू तसंच ठेवलं. आणि जेव्हा कुणी विचारलंच, तेव्हा त्या म्हणाल्यात- अहो माझं लगीन झालंय खंडोबाशी. जोवर खंडोबा नावाचं दैवत या पृथ्वीखंडावर आहे, तोवर मी सवाष्णच आहे.
... आता बोला या भक्तीचं मोजमाप कशात करायचं?
                                      
खंडेरायाची झाले मी मुरळी ग बाई मुरळी

मुंबईत शिवडीला राहणा‍ऱ्या कमलबाई शिंदे म्हणजे खंडेरायाच्या नामांकित मुरळी. लहानपणी परिस्थितीवश खंडोबाचं मुरळीपण त्यांच्या पदरात पडलं. पण त्यांनी ते एखाद्या सत्त्वासारखं निभावलं. खंडोबाच्या गाण्यांचा-विराण्यांचा प्रचंड खजिना असलेल्या कमलबाईंशी काही वर्षांपूर्वी मारलेल्या या गप्पा...

छायाचित्रे : संदेश घोसाळकर

मी ग आनंदले मनाला ... माझा ग बाई मल्हार कुणीकडनं आला
काचेची न्हाणी बाई, गुलाबाचं पाणी
पाणी विसणते म्हाळसाराणी
न्हाऊ घालिते देवाला... माझा ग बाई मल्हार कुणीकडनं आला
... कुणाच्या तरी घरी-दारी कुलाचाराचं खंडोबाचं जागरण सुरू असतं अन् त्यात खंडेरायाची मुरळी असलेल्या कमलबाई शिंदे हातात देवाची घाटी घेऊन, गाणं म्हणत नाचत असतात. त्यावेळची त्यांच्या चेहऱ्यावरची भावसमाधी पाहायला हवी. कुलविधी पार पडून जागरणातलं गण-गवळण गाऊन झालं की, कमलबाई खंडोबाची पदं गायला सुरूवात करतात. त्यांच्या तोंडची ही पदं ऐकणं म्हणजे निव्वळ आनंद असतो. गाण्यातला भाव त्यांच्या चेहऱ्यावर जसाच्या तसा पाहायला मिळतो. मग तो कधी खंडोबा अचानक कुठून तरी घरी आल्यामुळे आनंदून गेलेल्या म्हाळसेचा असतो, तर कधी तोच भाव आपण लग्नाची बायको असताना मल्हारी बानुबाईला आणायला गेल्यामुळे म्हाळसेला झालेल्या दु:खाचा असतो. गाणं कुठलंही असो आणि त्यातला भावही, प्रत्येक वेळी कमलबाई गाण्यातला भाव नव्याने जगतात. किंबहुना देवाची पदं म्हणायला लागल्यावर त्या कमलबाई उरतच नाहीत, त्या जणू म्हाळसाच होऊन जातात. खंडोबाची प्रीतीची बायको म्हाळसा, शत्रूच्या निर्दालनासाठी मल्हारी मार्तण्डाबरोबर लढणारी शूर नारी म्हाळसा, तर कधी मल्हारीरायाने केलेल्या विश्वासघातामुळे दुखावलेली म्हाळसा...
हो जागरण करताना मी म्हाळसाच असते. म्हाळसा जशी देवाची बायको, तशी मीदेखील. देवाची मुरळी आहे मी. माझं रीतसर लग्न लागलंय बाराव्या वर्षी देवाशी. अन् म्हाळसाच का कधी कधी बानुबाईपण असते. तीदेखील देवाची बायकोच दुसरेपणाची. आम्हा तिघींचं सुख-दु:ख सारखंच. खंडोबापाशी सुरू होणारं आणि त्याच्यापाशीच संपणारं..’, कमलबाई हे सांगत असतात, तेव्हाही तनामनाने खंडोबापाशीच पोचलेल्या असतात.
पण कमलबाईंचं खंडोबाशी लग्न झालंच नसतं, तर... तर कदाचित कमलबाईंचं आयुष्य वेगळंच घडलं असतं. अर्थात या जरतरला काही अर्थ नाही. जे घडणार असतं, ते घडतंच. कमलबाईंच्याबाबतीत असंच झालं. त्याची कथा सांगताना कमलबाई म्हणतात, ‘मी तेव्हा आठ-नऊ वर्षाची असेन. आम्ही पूर्वीपासून मुंबईत शिवडीलाच राहायचो. एकदा घराबाहेर मी आणि माझ्या दोन बहिणी आम्ही खेळत होतो. आम्ही खेळत असतानाच, तिथं एक वाघ्या-मुरळीची जोडी देवाच्या नावानं शिधा मागायला आली. रविवारचा दिवस होता तो. खंडोबाचा दिवस. खंडोबा आमचंही कुलदैवत. म्हणून आईने घरातून थोडे तांदूळ-डाळ आणली आणि मुरळी असलेल्या म्हाळसाबाईच्या टोपलीत टाकली. तेवढ्या थोडक्या वेळात म्हाळसाबाई मुरळीने मला आणि घरातच पलंगावर झोपून असलेल्या माझ्या वडिलांना नेमकं हेरलं. तिने पटकन आईला विचारलं- घरात कुणी आजारीबिजारी हाय काय ग?’ तिने तसं विचारताच लगेच आईचा बांध सुटला आणि बोलण्याच्या ओघात वडील सात-आठ वर्षं जागेला खिळून असल्याचं तिने सांगितलं. त्यासरशी म्हाळसाबाईने नेमकं टुमणं काढलं की, तुझी पोरगी खंडोबाला वाहा, म्हणजे बघ तुझा घरधनी कसा ठणठणीत बरा होतो ते! आईने पहिल्यांदा पटकन ते झटकून टाकलं. म्हणाली, नको ग बाई माझी मुलगी देवाची मुरळीबिरळी. पण तेवढ्याने ती म्हाळसाबाई हार मानणारी थोडीच होती. तिने लगेच सावरून घेतलं अन् म्हणाली- आता लगेच नको तसा पणकरूस. पण नवऱ्याला बरं वाटलं, तर देईन असं म्हण. मी तुझ्या दाराला हळद-भंडाऱ्याची पुरचुंडी बांधून जाते. पुढच्या खेपंला येईन तेव्हा सांग काय ते!कळतनकळत आईनेही तिच्या हो ला हो म्हटलं आणि पुन्हा आपल्या कामाला लागली. पण संध्याकाळी गंमतच झाली. गेल्या सात-आठ वर्षात कधी भाकरीचा तुकडा न मागणाऱ्या माझ्या वडिलांनी आईकडे अर्धी भाकर खायला मागितली आणि खाल्लीही. आईसाठी हे जरा इपरितच होतं. पण तिला वाटलं हा म्हाळसाबाईने सांगितलेल्या उताऱ्याचाच गुण आहे आणि तिने मनाशी काही एक निर्णय घेतला.
खरोखरच दुस-या दिवसापासून कमलबाईंच्या वडिलांच्या तब्येतीला उतार पडला आणि खंडोबामुळेच नवरा बरा झाला, असं कमलबाईंच्या आईला वाटू लागलं. खरंतर बोला-फुलाची गाठ पडावी, तसं घडलं होतं. पण तसं होण्याने कमलबाईंच्या आयुष्याला मात्र वेगळीच दिशा मिळाली. पुढच्या रविवारी म्हाळसामुरळी न विसरता कमलबाईंच्या घरी आली. तिने कमलबाईंच्या वडिलांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांना बरं वाटू लागलंय म्हटल्यावर, त्यांच्या आईवडिलांच्या मागे आता खंडोबाला मुरळी सोडा असं टुमणं लावलं. खरंतर आपली मुलगी देवाला वाहाणं त्यांना पटत नव्हतं. कारण देवाला सोडलेल्या मुलींची काय वाताहत होते, ते त्यांना ठाऊक होतं. पण यावर लगेच म्हाळसाबाईंनीच उपाय सुचवला. त्या त्यांना म्हणाल्या-अहो भाऊ, मुलगी कायमची मुरळी म्हणून सोडू नका. तिला आपण घरमुरळी करू. म्हणजे मुरळी झाली, तरी ती घरीच राहील. तिचं लग्नही करता येईल. फक्त कधी कधी तिला देवाच्या जागरणाला पाठवत जा, म्हणजे झालं!कमलबाईंच्या आई-वडिलांना हा उपाय पसंत पडला. कारण त्यामुळे देवाला बोललेला नवसही फेडून होणार होता आणि मुलगीही नजरेसमोर राहणार होती. त्यांनी लगेच हो म्हटलं. पण कुठली मुलगी मुरळी म्हणून देवाला वाहायची, असा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा म्हाळसाबाईंची नजर छोट्या कमलबाईंकडे गेली. त्या लगेच म्हणाल्या- ही पांढरी पोरच द्या देवाला. देवाला बरं वाटंल!
नेमकं मलाच निवडलं की हो त्यांनी. निवडलं कसलं, खरंतर आधीच त्यांनी मला हेरून ठेवलं होतं. आदल्या रविवारी आल्या होत्या, तेव्हा माझ्याकडे टकामका बघत होत्या. आम्हा तिघी बहिणींमध्ये मी दिसायला बरी आणि गोरीगोमटी होते ना, म्हणून त्यांनी मलाच हेरलं देवासाठी. आता मला याचं वाईट वाटत नाही. पण तेव्हाही अजाणत्या वयात वाटलं नव्हतं. कारण एक तर ते कळण्याचं वय नव्हतं आणि माझे वडील नंतरच्या काळात खरोखरच हिंडा-फिरायला लागले. मी देवाची मुरळी झाल्यावर माझे वडील तब्बल तेरा वर्ष जगले. त्यामुळेही मुरळी होण्याचं दु:ख तेव्हा झालं नाही’, कमलबाई जुन्या दिवसांच्या आठवणी जागवत असतात.
कमलबाईंच्या आई-वडिलांनी होकार भरल्यावर एक दिवस मग त्यांचे आई-वडील आणि म्हाळसाबाई मुरळी, तिच्याबरोबरचा मार्तण्ड वाघ्या सारेजण छोट्या कमलबाईंना घेऊन जेजुरी गडावर गेले. तिथे छोट्या कमलचं ब्राह्मणाच्या साक्षीने खंडोबाशी लग्न लागलं. देवाच्या नावाने कमलबाईंच्या गळ्यात चांदीचं डोरलं बांधण्यात आलं आणि तेव्हापासून आजतागायत कमलबाई प्रेमाने म्हणत आल्यात- खंडेरायाची झाले मी, मुरळी ग बाई मुरळी. 

पण हे मुरळीपण निभावणं तसं सोपं नव्हतं. कमलबाईंना मुरळी म्हणून वाऱ्यावर सोडून दिलं असतं, तर कदाचित त्यांच्याही आयुष्याची रया गेली असती. पण कमलबाईंनी आपलं मुरळीपण मानानं मिरवलं आणि राबवलंही. मुरळी झाल्यानं त्यांच्या आयुष्यात फार फरक पडला नाही. पण एक मात्र नक्की झालं- त्यांना खूप नाचायला-गायला मिळालं. त्याची हकीगत सांगताना कमलबाई म्हणतात, ‘मला नाचण्या-गाण्याची हौस अगदी लहानपणापासून होती. आम्ही राहायचो, तिथे मी वेगवेगळ्या कार्यक्रमात कधी गाणी म्हणायचे, कधी नाचायचेदेखील. पण आधी मी हौस म्हणून नाचायचे. मुरळी झाल्यावर जागरणासाठी म्हणून नाचायला-गायला लागले. खरंतर मी तेव्हा जागरणासाठी कुठे जात नसे. पण आम्ही राहायचो, तिथेच पारूबाई नावाची मुरळी राहायची. तिचं जागरणाचं पथक होतं. ही पारूबाई म्हाळसाबाईच्याही परिचयाची होती. कारण म्हाळसाबाईदेखील घोडपदेवलाच राहायची. त्या साऱ्यांचंच एक पथक होतं. एक दिवस पारूबाईने मला गुपचूप विचारलं की, जागरणात नाचायला येते का म्हणून. मी घरच्यांना विचारलं असतं, तर ते नाहीच म्हणाले असते. माझ्या एका चुलतभावालाही माझं नाचणं-गाणं आवडायचं नाही. म्हणून मी एका रात्री गुपचूपच पारूबाईबरोबर गेले. घरातले सगळे झोपल्यावर गेले आणि ते उठायच्या आत परत आले. त्यानंतर काही दिवस हे लपूनछपून सुरूच होतं. मात्र एक दिवस माझ्या चुलतभावाला मी जागरणात नाचत असल्याचं त्याच्या एका मित्राकडून कळलं. त्यावर घरी येऊन त्याने खूप आरडाओरडा केला. तो माझ्या भल्याचंच सांगत होता. पण ते समजण्याचं माझं वय नव्हतं आणि बाबांना वाटत होतं की, ते खंडोबाच्या कृपेमुळेच बरे झालेत. आईचंही तसंच मत होतं. त्यामुळे त्यांनी माझ्या नाच-गाण्याला फार आडकाठी केली नाही. उलट त्यांनी माझ्या चुलतभावालाच बोल लावला आणि त्या भांडाभांडीत तो भाऊ आपल्या बायकोसह आमचं घर सोडून निघून गेला. माझं नाचगाणं मात्र सुरूच राहिलं आणि खरंच सांगते मला नाचायला-गायला आवडायचं म्हणूनच मी तेव्हा जायचे. देवाच्या मुरळीचं मुरळीपण तोवर माझ्यात भिनलं नव्हतं आणि त्याचे फायदे-तोटेपण तोपर्यंत कळले नव्हते.
र्ष सरत गेली, सोमवती-चंपाषष्ठी या सणांना जेजुरीगडाला देवाच्या दर्शनाला जाणं व्हायला लागलं, तसतसं मात्र मग कमलबाईंना मुरळी म्हणजे काय ते उमगू लागलं. कळू लागलं. आपण मुरळी असल्याचं वेगळेपण आकळू लागलं. मात्र यामुळे त्या अधिकच सांभाळून राहू लागल्या. कारण तोपर्यंत त्यांचं वय पंधरा-वीसच्या आसपास गेलं होतं. देवाची मुरळी म्हणून जो-तो हक्काने बघायला लागला होता. त्या काळात पारूबाई-म्हाळसाबाई लग्नसराईच्या दिवसांत कमलबाईंना घेऊन जुन्नरकडे जागरणाच्या कार्यक्रमाला जात. कमलबाई तेव्हा दोन-दोन महिने त्यांच्याबरोबर असत. त्या काळात कमलबाईंना सांभाळायचं म्हणजे म्हाळसाबाई आणि पारूबाई दोघींना मोठी जोखीमच वाटायची. पारूबाई तर एकसारख्या म्हणायच्या की,  कमलबाईच्या रूपानं आपण इखाची कुपी जवळ बाळगतोय म्हणून!
याच कलापथकात शाहीर धामणीकर नावाचे गृहस्थ होते. त्यांच्याकडे खंडोबाच्या पारंपरिक पदांचा मोठा साठा होता. कमलबाईंकडे आज जे बरंच काही आहे, ते त्यांच्याकडूनच आलं आहे. ते कमलबाईंना मुलगी मानायचे. तेच मग एक दिवस कमलबाईंना म्हणाले- जागरणाच्या कलापथकाबरोबर एवढी हिंडतेस, देवाची सेवा करतेस, चांगलं आहे. पण आता तू घरगृहस्थी कर. गृहस्थी सांभाळून देवाचं कर. म्हणजे आमचंही नाव राहील नि तुझंही.मग शाहीर धामणीकर यांनीच सुचवलेल्या, सचिवालयात कामाला असलेल्या आणि जयमल्हार सेवा पार्टीत शाहीर असलेल्या शिंदे यांच्याशी कमलबाईंचं साधारणपणे वीस-बाविसाव्या वर्षी लग्न झालं. त्यानंतर त्यांचा सुखाचा संसार सुरू झाला. पण शाहीर शिंदेही खंडोबाचे भक्त होते. त्यामुळे त्यांनी कमलबाईंना कधी जागरणाच्या कार्यक्रमाला जायला आडकाठी केली नाही. उलट त्यांच्याबरोबर ते स्वत:ही जायचे.
कमलबाईंना आवाजाची नैसर्गिक देणगी असल्यामुळे कमलबाईंचं नाव खूप लोकांपर्यंत पोचलं. त्याच काळात शिवडीला असलेल्या तमाशा थिएटरमध्ये अनेक नामवंत तमाशा कलावंतांच्या पार्ट्या असायच्या. अशीच एकदा विठाबाई नारायणगावकर यांची पार्टी आलेली होती. अन् एकदा अचानक त्यांची गाणारी बाई आजारी पडली. आता काय करायचं म्हणता म्हणता कुणी तरी त्यांना कमलबाईंचं नाव सुचवलं. त्याबरोबर कमलबाईंना बोलावणं गेलं, त्या आल्या आणि विठाबाईंसाठी गायल्यादेखील. पहिल्याच वेळी कमलबाईंनी विठाबाईंसाठी म्हटलेली गाणी होती- पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची, तुम्हे और क्या दू दिलके सिवा... आणि कही दीप जले कही दिल... ही गाणी कमलबाईंनी तेव्हा एवढी जबरदस्त म्हटली की, तेव्हा आणि नंतरच्या काळात विठाबाई जेव्हा जेव्हा मुंबईला आल्या, तेव्हा तेव्हा त्यांनी कमलबाईंनाच त्यांच्या घरून उचलून नेलं गाण्यासाठी. यामुळे जागरण करता करता कमलबाईंचं नाव तमाशा क्षेत्रातही व्हायला लागलं. कमलबाईंचा आवाज गोड होताच, पण त्या रुपानंही देखण्या होत्या. त्यामुळे अनेकांनी त्यांना आमच्या तमाशा पार्टीत नाचता का असंही विचारलं. पण कमलबाईंनी तो मोह आवरला. तमाशात काही काळ त्या गात राहिल्या. अगदी अनेकींच्या संगीतबारीत त्यांनी एकसे एक लावण्याही म्हटल्या. पण पायात घुंगरू बांधून त्या तमाशाच्या फडावर नाचल्या नाहीत.
सच्च्या दिलाने त्या म्हणतात,‘नाचायचा मोह झाला होता, नाही असं नाही. पण वेळीच सावरले. एरव्ही आपण नाचतो, ते देवाला सेवा म्हणून नाचतो. पण तमाशा थिएटरातला देव वेगळाच असतो, हे उमगलं आणि मी नाचायच्या फंदात पडले नाही. गाणं मात्र गात राहिले.
कमलबाईंनी आपलं मुरळीपण एखाद्या सत्त्वासारखंच निभावलं. लग्न केलं, तरी खंडोबाच्या सेवेच्या चाकरीत त्यांनी कधी हयगय केली नाही. त्याचे उपासतापास, त्याचं जागरण एखाद्या पतिव्रतेच्या बळानेच निभावलं. केवळ यामुळेच अनेक संकटं कोसळंली, पण त्यातून आपण निभावून गेलो, अशी त्यांची श्रद्धा आहे. या संदर्भातले दोन अनुभव तर अफलातून आहेत. त्या सांगतात- आमच्या कलापथकाचा एकदा फलटणजवळच्या कुंभारीकोसारी गावात जागरणाचा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम आटपून संध्याकाळीच आम्हाला तिथून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या ढालगावाला जायचं होतं. कारण तिथली जागरणाची सुपारी घेतली होती. कुंभारीकोसारीचे कार्यक्रम आटपून आम्ही निघालो. रात्री आठची गाडी होती. गाडी आल्यावर एकच गलका झाला. आम्ही कसेबसे आत चढलो. मात्र गाडी अर्ध्या रस्त्यात आली नि माझ्या लक्षात आलं की, आपली कपड्यांची नि दागिन्यांची पेटी खालीच राहिलेली आहे. मी लगेच पुढच्या गावी उतरले आणि परतीच्या गाडीने पुन्हा जिथून गाडी सुटली होती, त्या एसटी स्टॅण्डवर आले. सुदैवाने माझी पेटी बाजूच्या टपरीवाल्याने उचलून ठेवली होती. त्याने मला ती दिली. मी म्हटलं, ‘देवासारखा पावलास बाबा. आतमध्ये माझे दागिने होते.  मी ती पेटी घेतली नि गाडीची वाट बघत उभी राहिले. त्यावर त्या टपरीवाल्याने आता सकाळशिवाय गाडी येणार नाही, असं सांगितलं आणि माझी पाचावर धारण बसली. कारण काहीही करून मला रात्रीच ढालगावला पोचणं गरजेचं होतं. तिथली सुपारी घेतलेली होती. एवढ्यात माझी अडचण ओळखून टपरीवर उभे असलेले दोघे-तिघे पुढे आणि म्हणाले आम्ही तुम्हाला बैलगाडीने सोडतो. मनात आलं, कोण कुठले हे, पण देवासारखे धाऊन आले. आम्ही बैलगाडीने निघालो. माझ्यासोबत माझा एक छोटा भाचा तेवढा होता. ढालगावला जाणारा रस्ता घाटीतून जाणारा होता. किर्रर्र अंधार पडला होता आणि मी दोन परक्या माणसांबरोबर प्रवास करत होते. अर्ध्या रस्त्यात आलो असतानाच मधल्या जंगलातल्या रस्त्याने दोघे-तिघे आले आणि आम्हालापण ढालगावला जायचंय म्हणत माझ्या बाजूला येऊन बसले. थोड्या वेळाने त्यांचा हात माझ्या पेटीकडे जाऊ लागला. तेव्हा त्यांच्याकडे रागाने नीट निरखून बघितलं, तर ते मघाशी टपरीवर उभे असल्याचं आठवलं आणि तेव्हाच माझ्या लक्षात आलं की, आपण पेटीत दागिने असल्याचं नकळत बोलून गेलो होतो आणि त्यासाठीच हे आले होते. पहिल्यांदा त्यांना हिंमतीने हटकलं. तरीही दुस-यांदा जेव्हा त्यांचा हात पेटीकडे जाऊ लागला. तेव्हा मी संतापाने त्यांना म्हटलं- पाव्हणं नीट गुमान बसा की, का उगं खंडोबाच्या सेवेकऱ्यांना छळताय?’ मी एवढं म्हणायचा अवकाश, त्यांनी ताडकन् गाडीतून खाली उडी मारली. अन् म्हणाले- तुम्ही खंडोबाच्या मुरळी हाय व्हय, मंग आदी नाय का सांगायचं. आम्ही रामोशी हाव. खंडोबा आमचं कुलदैवत हाय, जा तुम्ही तुम्हाला कोण काय करणार नाय.आणि मग खरोखरच कसलंही विघ्न न येता, मी वेळेत ढालगावला पोचले. आमचा सुपारीचा कार्यक्रमही वेळेत पार पडला. मला ही सगळी त्या मल्लुरायाची म्हणजे खंडोबाचीच कृपा वाटते.
दुसरा प्रसंग खुद्द मुंबईतच घडलेला. दक्षिण मुंबईतच कुठल्या तरी गल्लीत कमलबाईंचा जागरणाचा कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रम संपला आणि अचानक कुठूनशी टोळधाड यावी, तसे दहा-बाराजण आले. त्यातल्या एकाने कमलबाईंना आपल्या बरोबर चलायला सांगितलं. त्याच्या हातात चाकू असल्यामुळे त्याच्याबरोबर जाण्याशिवाय कमलबाईंकडे दुसरा पर्याय नव्हता. कमलबाई सांगतात,‘मी खंडोबारायाचा धावा करतच त्याच्या पाठोपाठ चालले होते. एका क्षणी मनात म्हटलं देवा आता तूच वाचव तुझ्या या मुरळीला. आणि अचानक समोरून एक माणूस आला. मी ज्याच्याबरोबर गुमान चालत होते, त्याला तो माणूस म्हणाला, ’या सभ्य बाईला तू कशाला उचललंस. मी तुला उचलून आणायला सांगितली ती बाई वेगळी होती.आणि नंतर मग त्या दोघांनी पुन्हा पुन्हा माझी माफी मागितली. नंतर मला कळलं की, केवळ सारख्या दिसण्यामुळे मला भलतीच समजून उचललं गेलं होतं. पण काहीही असो खंडोबाच्या मेहेरबानीनेच आजवर मी प्रत्येक संकटातून, अवघड परिस्थितीतून बाहेर पडलेय.
आपण खंडोबाचं व्यवस्थित केलं की तोही आपलं व्यवस्थित करतो अशी बाईंची श्रद्धा आहे. त्यातूनच आज साठी उलटली तरी त्या देवाची सेवा करतात. कुठे जागरणाची सुपारी आली, तर नाही म्हणत नाहीत. कारण त्यांच्यासाठी तो केवळ उपजीविकेचा मार्ग नसतो. ते त्यांच्यासाठी देवाच्या सन्निध राहण्याचा एक उपाय असतो. मग देवासाठी कुठल्याही मार्गाने सेवा करण्याची त्यांची तयारी असते. मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीच्या विद्यार्थ्यांना त्या जागरणनृत्यही याच भावनेतून शिकवतात. ही मुलं काही दारोदार जाऊन जागरणनृत्य करणार नाहीत, हे त्यांना ठाऊक असतं. पण त्यांना शिकवणं म्हणजेही देवाची सेवाच आहे, असं त्या मानतात. तसंच मागे वीसेक वर्षापूर्वी इंडियन नॅशनल थिएटरच्या ‘खंडोबाचं लगीन’ नाटकात काम केलं होतं, तेही याच भावनेतून. एवढंच कशाला बसल्या जागी त्यांना खंडोबाचं एखादं पद म्हणायला सांगितलं तरी त्या कसलेही आढेवढे न घेता पटकन म्हणतात. मुख्य म्हणजे त्यांनी मुरळीच्या भूमिकेत जायला जराही वेळ लागत नाही. कारण तो त्यांचासाठी एक विरंगुळाही आहे. परत देवाचं गाणं ऐकवायला नाही कसं म्हणायचं, हा प्रश्नही असतोच. पण खरा प्रश्न आपल्याला पडतो, जेव्हा त्या आपल्यालाच विचारतात की, कुठलं गाणं गाऊ? कारण त्यांच्या पोतडीत एवढी असतात की आपल्यालाच संभ्रम पडावा. मग आपल्यावरचं धर्मसंकट पाहून त्याच म्हणतात- मघाशी म्हाळसेचं सुखाचं-आनंदाचं पद ऐकवलं होतं, आता तिच्या दु:खाचं ऐका. खंडोबा बानूबाईच्या नादाने घर सोडून गेल्यावर म्हाळसाबाई काय म्हणते ऐका-
देव मल्हारी रुसून आला घोड्यावर बसून
गेला बानूला आनाया मी ग लग्नाची असून
देव चंदनपुरात राखतो मेंढरं
खाई बानूच्या हातची ताक कन्या न् भाकर
बोले बानूशी गोड गोड देव गालात हसून
... गेला बानूला आनाया मी गं लग्नाची असून
... कमलबाई आपल्या गाण्यातून म्हाळसेचं, किंबहुना स्त्रीजातीचं सनातन दु:ख उभं करतात. मघाचं आनंदाचं गाणं गातानाची आणि आताचं दु:खाचं गाणं गातानाची त्यांची भावसमाधी मात्र सारखीच असते.
बरीच वर्षं कमलबाई दुस-याच्या कलापथकातून काम करायच्या. आता त्यांचं घरचंच जागरणाचं कलापथक आहे आणि त्यांचा मुलगा राजू शिंदे त्याची जबाबदारी सांभाळतो. पण कमलबाईंना वाटतं, हे खंडोबाच पार पाडतोय. कारण खंडोबा हाच त्यांचा ध्यास आणि श्वास आहे. म्हणून तर लौकिक जीवनातला साथीदार गमावल्यावरही त्यांनी कपाळावरचं कुंकू तसंच ठेवलं. आणि जेव्हा कुणी विचारलंच, तेव्हा त्या म्हणाल्यात- अहो माझं लगीन झालंय खंडोबाशी. जोवर खंडोबा नावाचं दैवत या पृथ्वीखंडावर आहे, तोवर मी सवाष्णच आहे.
... आता बोला या भक्तीचं मोजमाप कशात करायचं?