माझ्या गावची इळणे नदी |
प्रत्यक्ष बघण्याआधीच आमच्या इळणे गावची नदी मला भेटली होती, आईच्या गप्पा-गोष्टींतून. पावसाळ्यातलं तिचं बेभान होऊन वाहणं, हिवाळ्यातलं तिचं आत्ममग्न होणं आणि उन्हाळ्यातली तिची विरक्ती... असं काही बाही सांगायची ती नदीचे उमाळे नि उसासे. ते तिचे होते की नदीचे ते लहानपणी कळलंच नाही... तसंही तिला स्वत:ला एकूणच निसर्ग तत्त्वाशी जोडून घ्यायची सवय... 'बब्या एकदा नं काय झाला, मी गेला व्हता नह्यवर...', अशी तिने सांगायला सुरुवात केली की मी समजून जायचो, की आता काही तरी चमत्कारिक ऐकायला मिळणार आणि तसंच व्हायचं. नदीच्या वेड्या वाकड्या वाक-वळणांविषयी सांगताना ती हमखास नदीतल्या भोवर्यांविषयी, डोहांविषयी सांगत बसायची. हे भोवरे-डोह नदीतले होतेच, पण तिच्या मनातलेही होते.
माझ्या जन्मानंतर, दम्याच्या उपचारासाठी गाव सोडून मुंबईला यावं लागलं, हे तिला मानवलं नव्हतंच बहुदा. वयाची चाळीस-बेचाळीस वर्षं गावात काढल्यावर ती भिन्न राहिलीच नव्हती गावापासून आणि तिथल्या निसर्गापासून. झाडापेडापासून नदी-तळ्यांपर्यंत तिची एक स्वत:ची दुनिया होती... आणि त्यात नदी म्हणजे तर ती स्वत:च होती. वाटेत आलेलं स्वीकारणारी, स्वत:त सामावून घेणारी, डोहासारखे काही खोल खाचखळगे तसेच ठेवून पुढे वाहत जाणारी... जणू काही सगळंच वश तिला, सगळेच नतमस्तक तिच्यासमोर.... वातावरण असं ताब्यात आल्या नंतर तिची नदीची गोष्ट हमखास सुरू व्हायची ती गिर्ह्याच्या डोहापासून. आमच्या गावच्या नदीतील हा खोल डोह म्हणजे भयाची जातिवंत जाणीव. अर्थात पाणवठ्याच्या एखाद्या जागी वस्ती करुन असणारा पिशाच योनीतील गिर्हा हा तसा त्रासदायक नाही. भर दुपारी मध्याह्नी किंवा मावळतीला किंवा चांदण्या रात्री एखादा आलाच याच्या प्रभावक्षेत्रात तर तो त्याला छळतो, पण मारत नाही. उगाच नदीत बुचकळवून काढ, उगाच लहान-मोठं रूप धारण करुन घाबरवून सोड, हे याचे उद्योग. पण ज्याच्या वाटेला ते यायचे तो भीतीनेच अर्धमेला झालेला असायचा... अशा या गिर्ह्याच्या कचाट्यात सापडलेल्यांची गोष्ट आई हसत रंगवून सांगायची. पण ऐकणार्याच्या मनात भीतीचं सावट निर्माण होईल, याची पुरेशी काळजी घ्यायची.
... जसा गिर्ह्याचा डोह, तसाच म्हैसधाड. हाही डोहच. कभिन्न काळा आणि भयाचं तांडवच! तिथलं लाल-काळं-निळं पाणी म्हणजे सर्जन-विसर्जनाचं मूर्तिमंत रूप. जणू आदिम काळोखच त्या डोहात दडून राहिलेला... या डोहात कधी काळी प्रत्येक वर्षी म्हशीचा बळी दिला जायचा, म्हणून हा म्हैसधाड... अशा या म्हैसधाडात दिवसाउजेडी गायब झालेल्यांच्या हकिकती आई सांगायची, तेव्हा अंगावर काटा यायचा... आजूबाजूला सगळ्यांचा वावर असताना नदीत पोहायला उतरलेला चुकून डोहाच्या जवळ जायचा आणि काही कळायच्या आतच त्याचा स्वाहा व्हायचा... वर यायचा केवळ एक बुडबुडा... शेवटचा श्वास घेतल्याचा. आई म्हणायची- म्हैसधाडाचा चकवा भारी वाईट. इच्छा असली-नसली, तरी माणूस तिकडं वढला जातं!
घाबरवून टाकणार्या नदीतल्या या डोहांच्या बरोबरीने आई नदीतल्या आसरांची गोष्टही सांगायची. या आसरा म्हणजे जलअप्सरा, आईसारख्याच प्रेमळ असायच्या… नदीत पोहायला उतरलेला एखादा बाळजीव नाकातोंडात पाणी जाऊन गुदमरला की या आसरा येतात पाण्याच्या तळ्यातनं, अन् त्या जीवाला अलगद झेलून वर आणून सोडतात पाण्यावरती… या आसरांची गोष्ट ऐकताना वाटायचं आपणही पाण्यात बुडावं, म्हणजे आसरा आपल्याला पण अलगद वर आणतील… पण नदीच्याच काय कुठल्याच पाण्यात उतरण्याचं धाडस मला कधीही झालं नाही. कारण आईनं एकदा तिच्या भावसृष्टीत घेऊन सांगितलं होतं- बब्या, पाण्याशी कधी खेळू नकोस. तू पोटात व्हतास तवा मला पाण्याची लय सपना पडायची!... तिच्या त्या स्वप्नांचा अर्थ मला कधीच उलगडला नाही, परंतु मला स्वत:ला लहानपणापासून आतापर्यंत मी नदीत, विहिरीत बुडत असल्याची स्वप्नं मात्र अनेकदा पडतात.
लहानपणी आईच्या तोंडून ऐकलेल्या नदीच्या गोष्टी थोडा जाणता झाल्यावर तिच्याचबरोबर फिरुन पाहिल्या. तिचा हात घट्ट धरुन. तिनेही त्या दाखवल्या, अगदी गिऱ्ह्याच्या डोहापासून ते म्हैसधाडापर्यंत. मात्र आईबरोबर असताना त्या पाण्यात उतरण्याची जराही भीती वाटली नाही. कारण वेळ आलीच तर ती पाण्यालाही पालथी पाडील याची खात्री मला होती… किंबहुना तसा अनुभवच माझ्या गाठीशी होता. मी चार-पाच वर्षांचा असेन. एकदा पावसाळ्यात मामाच्या गावाला पूजा होती म्हणून मी आणि आई-बाबा, असे आम्ही तिघेजण निघालो. अचानक धो-धो पावसाला सुरुवात झाली. बघता बघता नदीला पूर आला. मामाच्या गावाला जायचं, तर नदी ओलांडून जाण्याशिवाय पर्याय नव्हता आणि पूजेला जायचं हा आईचा हट्ट. बाबांनी एका कातकरीदादाला सोबत घेतलं. त्याने बाबांचा हात धरला, आईने बाबांचा आणि मी आईच्या कडेवर… कातकरीदादानी तिरकं चालत पाणी छेदायला सांगितलं. त्याप्रमाणेच आम्ही चाललो होतो. मात्र हळूहळू पाण्याची पातळी वाढू लागली. आता मागे फिरणंही शक्य नव्हतं. पाणी छातीपर्यंत आलं, तसं बाबा आईला म्हणाले- बब्याला दे माझ्या खांद्यावर. तशी आई म्हणाली- काय नको, वेळ आली तर द्याल त्याला सोडून. पण मी त्याला माझ्या पदराला बांधून घातलाय, पाणी पण नाय सोडवणार आमची गाठ!
… अशी लहानपणापासून नदी, पाणी, आई आणि मी, आमची एकमेकांशी अगम्य गाठ बांधली गेलीय. मोठेपणी कृष्णा, कोयना, गोदावरी, नर्मदा, अगदी नाईलही पाहिली… तरी प्रत्येक नदी मला आमच्या गावच्या नदीसारखीच भासते… आणि प्रत्येक नदीच्या लोकसंस्कृतीतील गोष्टी ऐकताना, त्या आईच माझ्या कानात सांगतेय, असं वाटत राहतं!
- मुकुंद कुळे