सोमवार, २२ जून, २०१५

आर्यगंधर्व कौसल्याबाई


विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात लावणीच्या क्षेत्रात प्रतिगंधर्व म्हणून ओळखल्या जाणा‍ऱ्या कौसल्याबाई कोपरगावकर यांची जणू नावनिशाणीच कालपटलावरुन पुसली गेली आहे. मृत्यूनंतर तब्बल ४०  वर्षांनी पहिल्यांदाच त्यांच्या आठवणींना दिलेला उजळा

लावणीसम्राज्ञी कौसल्याबाई कोपरगावकर
छायाचित्र सौजन्य : अनंत पटवर्धन

१९२०-३० चा सुमार... संपूर्ण महाराष्ट्र बालगंधर्वांच्या गाण्याने आणि त्यांच्या स्त्री-रुपातल्या छबीने वेडावलेला होता. पुरुषवर्गाला बालगंधर्वांच्या गाण्याचा मोह पडला होता. तर महिलावर्ग बालगंधर्वांच्या केवळ वेशभूषेचंच नाही; केशभूषा, त्यांच्या बोलण्या-चालण्याची ढब सा‍ऱ्याचंच अनुकरण करत होता. अन् तरीही उभ्या महाराष्ट्रात प्रतिगंधर्व असं संबोधलं गेलं, ते फक्त कौसल्याबाई कोपरगावकर यांनाच! कौसल्याबाई खरंतर लावणीकलावंत. गंधर्वांचा बहराचा काळ, तो त्यांचा उमेदीचा काळ. पण बालगंधर्वांची वेशभूषा आणि रुपाचा त्यांना असा काही चस्का लागला की, आपल्याही नकळत कौसल्याबाईंनी बालगंधर्वांची नकल केली. अर्थात ही नकल फक्त बाह्यरुपाची म्हणजे वेशभूषेची होती. आपल्या मैफलीत त्यांनी कायम परंपरेनं चालत आलेली आपली घरंदाज लावणीच म्हटली आणि जपली. वेशभूषा मात्र अशी केली की, पाहताक्षणीच बघणा‍ऱ्याच्या तोंडून उद्गार निघावेत- अरे हे तर बालगंधर्व! कपाळावर दोन्ही बाजूना काढलेल्या वळणदार बटा, अंगात नक्षीदार चोळी, चापूनचोपून नेसलेलं पायघोळ लुगडं आणि खांद्यावरून पार कमरेखाली गेलेला पदर. अशाच सोज्ज्वळ वेशात कौसल्याबाई लावणी सादर करायच्या. मग ती लावणी खडी असो वा बैठकीची. आपल्या बालगंधर्वीय वेशभूषेचा आब त्या अशा काही सांभाळायच्या की पाहणाऱ्याला बालगंधर्वांचाच भास व्हायचा. त्यामुळे रसिकांनीच त्यांना उत्स्फूर्तपणे पदवी बहाल केली होती - प्रतिगंधर्व!
... आणि स्वतः बालगंधर्व त्यांना संबोधायचे आर्यगंधर्व! कारण पुण्यातील तत्कालीन आर्यभूषण तमाशा थिएटरवर कोसल्याबाईंचं अनभिषिक्त साम्राज्य होतं. बाईंची पार्टी उभी राहिली की, आर्यभूषणचं आवार रसिकांनी फुलून जायचं. बाई येण्याआधी रंगमंच्यावर तबलजी, ढोलकीवाला आणि पेटीवाल्याने बैठक जमवलेली असायची. त्यांनी जमवलेल्या वाद्यांच्या मेळ्यात आपल्या टाळ्यांच्या नादाची वैशिष्ट्यपूर्ण भर घालत कोसल्याबाई अवतरायच्या आणि बघता बघता लावण्यांचा फड जमून जायचा. दोन हात एकमेकांत गुंफून वाजवलेली टाळी हे बाईंचं खास अस्त्र होतं. बाईंचा हा टाळीनाद ऐकण्यासाठी रसिक हजेरी लावायचे, अशी आठवण पुण्याच्या आर्यभूषण तमाशा थिएटरचे मालक माजिदशेठ तांबे आजही सांगतात. या रसिकांमध्ये कोण नसायचं? मिळालेल्या माहितीनुसार प्रसिद्ध शहनाईवादक बिस्मिल्लाखाँसाहेब, नामवंत तवलावादक अल्लारखाँ आणि थिरकवाखाँसाहेब, मास्टर भगवान, आचार्य अत्रे, पु. . देशपांडे, बाबासाहेब पुरंदरे यांसारख्या अनेकांनी कौसल्याबाईंच्या लावण्यांचा आस्वाद अनेकवेळा घेतला.
बाईंनी एकदा लावणी म्हणायला सुरुवात केली की, त्या थांबत नाहीत तोपर्यंत रसिक खिळून असायचे. कधी उभ्याने नाचून म्हटलेली द्रुत लयीतली फक्कडशी छक्कड, तर कधी बसून घोळवत म्हटलेली ठाय लयीतली बैठकीची लावणी आणि सोबत अदेचा नखरा... कौसल्याबाईंचे नृत्य आणि गाननिपुणत्व पाहण्यासाठी रसिक पुनपुन्हा हजेरी लावत. बालगंधर्व तर अनेकदा 'देवा देवा' म्हणत बाईंचं कौतुक करत. आर्यभूषणच नाही, तर बाईंच्या रास्तापेठेतील घरीही गंधर्व जात. बाईंची गायकी त्यांच्या विशेष आवडीची होती. कौसल्याबाईंच्या तरुण, पण दमदार आवाजातल्या लावण्या गंधर्वांना मोहात पाडायच्या. विशेष म्हणजे अनेकदा बाई स्वतः पेटी वाजवून त्यावर बैठकीच्या लावण्या म्हणत. त्यामुळे पुणे मुक्कामी असल्यावर गंधर्व आणि कौसल्याबाईंची भेट झाली नाही असं सहसा होत नसे. या भेटीत कोसल्याबाईंनी बैठकीच्या लावण्या म्हणाव्यात आणि बालगंधर्वांनी व्वा देवा, व्वा देवाम्हणत तारीफ करावी, ही रीत जणू ठरुनच गेलेली. बालगंधर्व नाट्यव्यवसायाच्या निमित्ताने मुंबईला जाईपर्यंत या भेटीगाठी कायम होत्या. एवढंच नाही, तर कौसल्याबाईंवर जीव असल्यामुळेच बालगंधर्वांनी बाईंचा घरोबा आपल्या गंधर्व नाटकमंडळीतील गायकनट प्रभाकरपंत पटवर्धन यांच्याशी जुळवून दिला.
बालगंधर्वांनाही लोभावणारी कौसल्याबाईंची ही गायकी खास म्हणावी अशीच होती. त्यांना गोड आवाजाची देणगी निसर्गदत्तच लाभलेली होती. खरंतर त्यांचं घराणं तमाशा किंवा लावणीकलावंतांचं नव्हे. त्या गोंधळी समाजातल्या (आडनाव थिटे) होत्या. त्यांचे वडील माधवराव गोंधळकलावंत म्हणून प्रसिद्ध होते, तर आई म्हाळसाबाईकडेही जुन्या लोकगीतांचा मोठा संग्रह होता. या दोघांच्या प्रभावातून गाण्याची आवड फार लहानपणीच कोसल्याबाईंना लागली. परंपरेनं आलेलं गाणं-बजावणं रक्तातच असल्यामुळे पूर्वापार अनेक गोंधळीकलावंत तमाशा-लावणीच्या क्षेत्रातही नाव कमावून होते. कौसल्याबाईंचा लावणीच्या क्षेत्रातला शिरकावही असाच झाला. मात्र एकदा या क्षेत्रात आल्यावर त्यांनी एकलव्यनिष्ठेने पारंपरिक लावणी शिकून घेतली. त्या काळात बाई सुंदराबाई जाधव, चंदा कारवारकरीण, हिराबाई सासवडकर, शेवंता जेजुरीकर, सरस्वती कोल्हापूरकर अशा अनेक नामवंत लावणीगायिका आपला जम बसवून होत्या. बहुतेकींचे पुण्यात दिवाणखाने होते. संध्याकाळ झाली की, या दिवाणखान्यांतून बैठकीच्या लावण्यांचे दीप उजळायचे. यातल्या बहुतेकींच्या आवाजातील लावण्यांच्या त्या काळी म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात रेकॉर्ड निघाल्या होत्या. कौसल्याबाईंचं गाणं या बुजुर्ग लावणीकलावंतांच्या गाण्याशी नातं सांगणारं होतं. त्यामुळेच आजही त्यांची अबोला का रे धरसी, सखया बोला मजसीसारखी तबकडीवरची लावणी कानावर पडली की अवाक् व्हायला होतं. त्यांचं लावणीगायन ऐकताना त्यांना किमान उपशास्त्रीय प्रकारातील गाण्याचं अंग होतं, असं म्हणावं लागतं. कारण ही लावणी ऐकताना तिच्यात ठुमरी-कजरीसारख्या उपशास्त्रीय गानप्रकारातली वै‌शिष्ट्य जाणवत राहतात. ही ठाय लयीतली लावणी ऐकताना आपल्या कानावर बाईंचं नुस्तं गाणं पडत नाही, तर त्यातली बाईंची शब्दांची फेक अशी आहे, गाण्याबरोबरच नजरेसमोर बाईंचं भावकामही सुरू होतं. महत्त्वाचं म्हणजे कोसल्याबाईंचं लावणीगायन एकदम खानदानी होतं. बालगंधर्व संगीत रंगभूमीवर जी घरंदाज करामत करत होते, तीच करामत कौसल्याबाई लावणीच्या रंगमंचावर करत होत्या. योगायोग म्हणजे बालगंधर्वांचा मृत्यूनंतर पुण्यात त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ बालगंधर्व रंगमंदिर सुरू करण्यात आलं, तेव्हा तिथे कार्यक्रम सादर करण्याचा पहिला मान कौसल्याबाईंनाच देण्यात आला होता.
बालगंधर्वांच्या प्रभावातून कौसल्याबाईंना गाण्याचीदेखील विशेष मर्म आकळली असली पाहिजेत. कारण तीन मुलांच्या पाठीवर झालेली मुलगी कमल हिला गाणं शिकवण्यासाठी कौसल्याबाईंनी खास किराना घराण्याचे संस्थापक अब्दुल करीम खाँसाहेब यांचे ज्येष्ठ चिरंजीव सुरेशबाबू माने यांची नेमणूक केली होती. सुरेशबाबू मानेंकडे कमल वर्षभर शास्त्रीय पद्धतीचं गाणं शिकली. त्यावेळी आपल्याबरोबर सुरेशबाबूंकडे आजच्या नामवंत गायिका प्रभा अत्रेदेखील गाणं शिकत असल्याची याद आज ऐंशीच्या घरात असलेल्या कमलबाई हटकून जागवतात. वर्षभरानंतर आपलं गाणं खंडित झाल्याची रुखरुख कमलबाईंना आजही आहे. पण शास्त्रीय गाणं सुटलं, तरी परंपरेतलं गाणं मात्र कमलबाई गात राहिल्या. परंतु हे गाणं लावण्यांपेक्षा वगनाट्यासाठीचं होतं. उदाहरणार्थ लीला गांधी यांचंसोळावं वरीस धोक्याचं’, निळू फुले यांचंकथा अकलेच्या कांद्याचीयांसारख्या अनेक वगनाट्यांसाठी कमलबाई यांनी गाणी गायली. त्याशिवाय अगदी तरुणपणी भाऊबीज, शिवलीला’, ‘सुदाम्याचे पोहे’, ‘चिमण्यांची शाळाया चित्रपटांत त्यांनी सुलोचना, वसंत शिंदे, आशा काळे यांच्याबरोबर कामही केलं. परंतु या झगमगाटी दुनियेपासून कौसल्याबाईंनी आपल्या लेकीला तसं दूरच ठेवलं होतं. आपल्याबरोबरही त्या क्वचितच तिला घेऊन जात.
कौसल्याबाईंनी मात्र अखेरपर्यंत लावणीशी असलेलं आपलं नातं जपलं आणि वाढवलंही. लावणीगायनाच्या क्षेत्रात येऊ इच्छिणा‍ऱ्या अनेकींना त्यांनी शिकवलं. कौसल्याबाई, राधाबाई बुधगावकर आणि यशोदाबाई वाईकर या तिघींची तर खास दोस्ती होती. तिघींनी महाराष्ट्र गाजवला होता. पैकी आपल्या मुलीच्या मुलाचं लग्न राधाबाईंच्या नातीशी करुन त्यांनी राधाबाई बुधगावकर यांच्याशी तर नातंही जोडलं. महाराष्ट्र शासन आयोजित तमाशा प्रशिक्षण शिबिरात कौसल्याबाईंनी प्रशिक्षकाची भूमिकाही पार पाडली. तसंच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे दिल्लीत १९६६ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमोरही आपली कला पेश केली. इतकं कौसल्याबाई हे लावणीपरंपरेतलं मानाचं लखलखीत पान आहे.
अन् तरीही कौसल्याबाई कोपरगावकर यांचं नाव आज जणू इतिहासात गडप झालंय. जणू कौसल्याबाई झाल्याच नाहीत.
पण त्यांच्या मुलीचा म्हणजे कमलबाई पटवर्धन यांचा नातू अनंत पटवर्धन याने आपल्या पणजीला पुन्हा वर्तमानाच्या झळाळीत आणण्याचा निर्णय घेतला आहे. या लेखाच्या निमित्ताने कौसल्याबाईंच्या आयुष्यातले काही मोजके कप्पे पहिल्यांदाच उघड होत आहेत. प्रतिगंधर्व म्हणून नावारुपाला आलेल्या कौसल्याबाईंची आजच्या रसिकांसाठी ही पहिलीच झलक!

'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये पूर्वप्रकाशित (२१ जून २०१५)

बुधवार, ३ जून, २०१५

राधेच्या घरी होतो सोहळा...


राधेच्या घरी होतो सोहळा...


राधा-कृष्णाचं अप्रतिम शिल्प
अनयाची राधा सुखी होती. सासू थोडा जाच करायची. पण जिवापाड प्रेम करणारा नवरा असल्यावर आणखी काय हवं होतं तिला. सासूचा सारा जाच ती प्रेमाने सहन करायची. पोटी मूलबाळ नव्हतं, म्हणून उदास असायची बिचारी. मात्र अनयानं तिचा कधी राग केला नाही. तसा तो तिच्या शेल्याच्या गाठीला बांधलेलाच होता. कारण सा-या गोकुळात राधेइतकं आरसपानी सुंदर कुणी नव्हतंच ...


... पण कृष्णजन्म झाला नि घात झाला. अनयाच्या आणि राधेच्या प्रेमात वाटेकरी आला. खरंतर सुरुवातीला राधा इतर गवळणींप्रमाणेच जायची यशोदेच्या घरी, कृष्णाला जोजवायला. आपल्याला मूल नाही म्हणून तीही आपल्या प्रेमाचा पान्हा त्याच्यावर रीता करायची. यशोदा आणि गोकुळीच्या सा-या गवळणींनाही राधा-कृष्णाच्या या प्रेमलीलांचं कौतुक वाटायचं. त्यांच्या लेखी त्या मायलेकांच्या लीला होत्या. त्यात त्यांना कधीच विषयबाधा दिसली नाही.


कृष्णाच्या लहानपणी खरोखरच तसं काही नसेलही. पण कृष्ण मोठा होत गेला तरीही राधा-कृष्णाच्या लीला तशाच सुरू राहिल्या. कदंबाच्या तरुतळी दोघेही म्हणे गुपचूप भेटायचे, तासन् तास बोलत बसायचे. काय बोलायचे ते कुणाला कधीच कळलं नाही आणि कळायला त्यांच्यात शब्दांचं बोलणं होतं तरी कुठे? एक अवाक्षरही न बोलता दोघेही एकमेकांच्या मनीचं गुज नेमकं जाणायचे. तो तिच्यासाठी मंजुळ पावा वाजवायचा. तेव्हा राधेला यमुनेकाठचं सारं वेळूचं बनच पावा झाल्यासारखं वाटायचं. मग ती आपल्या रंध्रारंध्रात ते अलौकिक सूर साठवून ठेवायची. जणू पुन्हा कधीच हे सूर ऐकायला मिळणार नाहीत, अशी तिला भीती वाटाची की काय न कळे! पण ती संपूर्ण तनाचाच कान करायची नि बासरीतून निघणारे सूर पिऊन घ्यायची. तिचा हा उद्योग सुरू असताना कृष्ण मात्र शांतच असायचा. त्याला कळायचंच नाही, की हे सूर जीवनाच्या अंतापर्यंत फक्त हिचेच असताना ही का एवढी बावरी होतेय?

कदाचित राधेच्या जागी असता, तर तो हे समजू शकला असता. राधा कितीही त्याची असली, तरी ती अनयाची बायको होती. तिला पत्नीधर्म निभवावा लागणारच होता. इच्छा असो वा नसो... आणि कृष्णाबरोबरच्या नात्याला तरी ती काय नाव देणार होती!

खरोखरच तिला कृष्णाबद्दल किंवा कृष्णाला तिच्याबद्दल नेमकं काय वाटत होतं? पुराणांनी त्यांच्यातल्या प्रेमाला अध्यात्माचंच अवगुंठन चढवलं. मग एकजात सा-याच कवी-लेखकांनीही त्यांचा प्रणय अध्यात्माच्याच चौकटीत बंद केला. त्यांच्या प्रेमाला अलौकिक ठरवून खरंतर सा-यांनीच त्यांच्या प्रेमाची क्रूर चेष्टाच केली. ते अलौकिक प्रेम नव्हतं. ते ख-या अर्थाने लौकिक प्रेमच होतं. एका जीवाला दुस-या जीवाबद्दल वाटणारं. असेल कदाचित त्यांच्यात वयाचं मोठं अंतर. पण त्यांना एकमेकांबद्दल जी भावना वाटत होती, त्या भावनेला कोणतंच वय नव्हतं. म्हणून तर लोकगीतं म्हणतात-

यमुनेच्या तिरी कोन वाजवितो बासरी

राधा म्हणे मनी, आला असेल माझा हरी

राधा कृष्णाचं हे नातं, गावात होतोया बोभाटा

अनयाची राधा मोठी, कृष्णसखा गं धाकुटा

मात्र राधा-कृष्णाने हे वयाचं बंधन नाहीच मानलं. कारण त्यांनी एकमेकांना केवळ शरीरानेच नाही, मनाने स्वीकारलेलं होतं. त्यांच्या या नात्याचा उलगडा आजवर कुणाला झालेला नाही. पण ती निव्वळ सात्त्विक प्रेमभावना नक्कीच नव्हती. तिथे प्रियकर-प्रेयसीचाच तृप्त विलास होता आणि तो हळूहळूच पुष्ट होत गेला होता. कृष्ण लहान असताना राधेने त्याच्याकडे वात्सल्यानेच पाहिलं असेल कदाचित! पण कृष्ण मोठा होत गेला, तसं त्यांच्यातलं नातंही फुलत गेलं. त्याच्या अडनिड्या वयात त्याला तिचं आकर्षण वाटलं असणं स्वाभाविक आहे आणि राधेलाही त्याच्या रूपात आपलं नव्हाळीचं प्रेम सापडलं असणं शक्य आहे. म्हणूनच त्यांचं हे नवथर प्रेम लोकमानस नेमक्या शब्दात व्यक्त करतं-

रुतला बाई काटा, या आडवाटा

नंदाचा गं कारटा हुता जोडीला

हुता जोडीला म्हणून मी आले गोडीला

गोड बोलूनी कसा गं काटा काढीला... गं बाई बाई रुतला बाई काटा

हा कृष्णरूपी काटा राधेच्या पायात नाही, तनामनात रुतलेला आहे. एकाच वेळी तो काढावासाही वाटतो आणि त्याच वेळी तसाच राहू द्यावा, असंही वाटतं. कारण त्याच्या असण्याने त्या वेदनेची जी हुळहुळी असते, ती नेहमीच हवीहवीशी वाटते. राधा-कृष्णाच्या या अनोख्या, पण सच्च्या नात्याचं थेट चित्रण करणं सा-यांनीच टाळलं. प्रत्येकानेच ते केवळ उदात्त करण्याचाच प्रयत्न केला. पण ‘जांभूळआख्यान’ लिहिणाऱ्या लोकसंस्कृतीतील अनाम कर्त्याने मात्र त्याला योग्य शब्दरूप दिलंय. तो म्हणतो-

राधा म्हणे रडू नको घन:श्यामा, यशोदेशी करू द्या घरी कामा

कडेवर घेऊन कृष्णाशी, आली मग आपल्या सदनाशी

शिवकरी मृगनयना बोले, थोर केव्हा होताल या वेळा

पाहताना ‘थोर’ झाला सावळा, राधेच्या घरी होतो सोहळा

बोलता बोले गुजगोष्टी, प्रेमाने घाली मिठी हो कंठी

तो आला भ्रतार पूर्वीचा, लज्जा माझी राखावी हो आता

पाहताना कृष्ण झाला सावळा राधेच्या घरी होतो सोहळा

अनयाचा संसार करतानाच राधा तना-मनाने कृष्णमय झाली. पण तिने दोघांची गल्लत कधीच केली नाही. म्हणून तर गोकुळातून कृष्ण मथुरेला निघून गेल्यावर ना तिने त्याच्याकडे वळून पाहिलं, ना त्याने. शेवटी दोघांनाही आपल्या नात्याच्या सीमारेषा होत्याच ठाऊक!

(प्रहारमध्ये असताना राधा-कृष्णाच्या नात्यावर लिहिलेला एक तुकडा)