संगीत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संगीत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २८ जून, २०१६

खंडेरायाची झाले मी मुरळी ग बाई मुरळी


मुंबईत शिवडीला राहणा‍ऱ्या कमलबाई शिंदे म्हणजे खंडेरायाच्या नामांकित मुरळी. लहानपणी परिस्थितीवश खंडोबाचं मुरळीपण त्यांच्या पदरात पडलं. पण त्यांनी ते एखाद्या सत्त्वासारखं निभावलं. खंडोबाच्या गाण्यांचा-विराण्यांचा प्रचंड खजिना असलेल्या कमलबाईंशी काही वर्षांपूर्वी मारलेल्या या गप्पा...

छायाचित्रे : संदेश घोसाळकर


मी ग आनंदले मनाला ... माझा ग बाई मल्हार कुणीकडनं आला
काचेची न्हाणी बाई, गुलाबाचं पाणी
पाणी विसणते म्हाळसाराणी
न्हाऊ घालिते देवाला... माझा ग बाई मल्हार कुणीकडनं आला
... कुणाच्या तरी घरी-दारी कुलाचाराचं खंडोबाचं जागरण सुरू असतं अन् त्यात खंडेरायाची मुरळी असलेल्या कमलबाई शिंदे हातात देवाची घाटी घेऊन, गाणं म्हणत नाचत असतात. त्यावेळची त्यांच्या चेहऱ्यावरची भावसमाधी पाहायला हवी. कुलविधी पार पडून जागरणातलं गण-गवळण गाऊन झालं की, कमलबाई खंडोबाची पदं गायला सुरूवात करतात. त्यांच्या तोंडची ही पदं ऐकणं म्हणजे निव्वळ आनंद असतो. गाण्यातला भाव त्यांच्या चेहऱ्यावर जसाच्या तसा पाहायला मिळतो. मग तो कधी खंडोबा अचानक कुठून तरी घरी आल्यामुळे आनंदून गेलेल्या म्हाळसेचा असतो, तर कधी तोच भाव आपण लग्नाची बायको असताना मल्हारी बानुबाईला आणायला गेल्यामुळे म्हाळसेला झालेल्या दु:खाचा असतो. गाणं कुठलंही असो आणि त्यातला भावही, प्रत्येक वेळी कमलबाई गाण्यातला भाव नव्याने जगतात. किंबहुना देवाची पदं म्हणायला लागल्यावर त्या कमलबाई उरतच नाहीत, त्या जणू म्हाळसाच होऊन जातात. खंडोबाची प्रीतीची बायको म्हाळसा, शत्रूच्या निर्दालनासाठी मल्हारी मार्तण्डाबरोबर लढणारी शूर नारी म्हाळसा, तर कधी मल्हारीरायाने केलेल्या विश्वासघातामुळे दुखावलेली म्हाळसा...
‘हो जागरण करताना मी म्हाळसाच असते. म्हाळसा जशी देवाची बायको, तशी मीदेखील. देवाची मुरळी आहे मी. माझं रीतसर लग्न लागलंय बाराव्या वर्षी देवाशी. अन् म्हाळसाच का कधी कधी बानुबाईपण असते. तीदेखील देवाची बायकोच दुसरेपणाची. आम्हा तिघींचं सुख-दु:ख सारखंच. खंडोबापाशी सुरू होणारं आणि त्याच्यापाशीच संपणारं..’, कमलबाई हे सांगत असतात, तेव्हाही तनामनाने खंडोबापाशीच पोचलेल्या असतात.
पण कमलबाईंचं खंडोबाशी लग्न झालंच नसतं, तर... तर कदाचित कमलबाईंचं आयुष्य वेगळंच घडलं असतं. अर्थात या जरतरला काही अर्थ नाही. जे घडणार असतं, ते घडतंच. कमलबाईंच्याबाबतीत असंच झालं. त्याची कथा सांगताना कमलबाई म्हणतात, ‘मी तेव्हा आठ-नऊ वर्षाची असेन. आम्ही पूर्वीपासून मुंबईत शिवडीलाच राहायचो. एकदा घराबाहेर मी आणि माझ्या दोन बहिणी आम्ही खेळत होतो. आम्ही खेळत असतानाच, तिथं एक वाघ्या-मुरळीची जोडी देवाच्या नावानं शिधा मागायला आली. रविवारचा दिवस होता तो. खंडोबाचा दिवस. खंडोबा आमचंही कुलदैवत. म्हणून आईने घरातून थोडे तांदूळ-डाळ आणली आणि मुरळी असलेल्या म्हाळसाबाईच्या टोपलीत टाकली. तेवढ्या थोडक्या वेळात म्हाळसाबाई मुरळीने मला आणि घरातच पलंगावर झोपून असलेल्या माझ्या वडिलांना नेमकं हेरलं. तिने पटकन आईला विचारलं- ‘घरात कुणी आजारीबिजारी हाय काय ग?’ तिने तसं विचारताच लगेच आईचा बांध सुटला आणि बोलण्याच्या ओघात वडील सात-आठ वर्षं जागेला खिळून असल्याचं तिने सांगितलं. त्यासरशी म्हाळसाबाईने नेमकं टुमणं काढलं की, तुझी पोरगी खंडोबाला वाहा, म्हणजे बघ तुझा घरधनी कसा ठणठणीत बरा होतो ते! आईने पहिल्यांदा पटकन ते झटकून टाकलं. म्हणाली, नको ग बाई माझी मुलगी देवाची मुरळीबिरळी. पण तेवढ्याने ती म्हाळसाबाई हार मानणारी थोडीच होती. तिने लगेच सावरून घेतलं अन् म्हणाली- ‘आता लगेच नको तसा ‘पण’ करूस. पण नवऱ्याला बरं वाटलं, तर देईन असं म्हण. मी तुझ्या दाराला हळद-भंडाऱ्याची पुरचुंडी बांधून जाते. पुढच्या खेपंला येईन तेव्हा सांग काय ते!’ कळतनकळत आईनेही तिच्या हो ला हो म्हटलं आणि पुन्हा आपल्या कामाला लागली. पण संध्याकाळी गंमतच झाली. गेल्या सात-आठ वर्षात कधी भाकरीचा तुकडा न मागणाऱ्या माझ्या वडिलांनी आईकडे अर्धी भाकर खायला मागितली आणि खाल्लीही. आईसाठी हे जरा इपरितच होतं. पण तिला वाटलं हा म्हाळसाबाईने सांगितलेल्या उताऱ्याचाच गुण आहे आणि तिने मनाशी काही एक निर्णय घेतला.’
खरोखरच दुसऱ्या दिवसापासून कमलबाईंच्या वडिलांच्या तब्येतीला उतार पडला आणि खंडोबामुळेच नवरा बरा झाला, असं कमलबाईंच्या आईला वाटू लागलं. खरंतर बोला-फुलाची गाठ पडावी, तसं घडलं होतं. पण तसं होण्याने कमलबाईंच्या आयुष्याला मात्र वेगळीच दिशा मिळाली. पुढच्या रविवारी म्हाळसामुरळी न विसरता कमलबाईंच्या घरी आली. तिने कमलबाईंच्या वडिलांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांना बरं वाटू लागलंय म्हटल्यावर, त्यांच्या आईवडिलांच्या मागे ‘आता खंडोबाला मुरळी सोडा’ असं टुमणं लावलं. खरंतर आपली मुलगी देवाला वाहाणं त्यांना पटत नव्हतं. कारण देवाला सोडलेल्या मुलींची काय वाताहत होते, ते त्यांना ठाऊक होतं. पण यावर लगेच म्हाळसाबाईंनीच उपाय सुचवला. त्या त्यांना म्हणाल्या-‘अहो भाऊ, मुलगी कायमची मुरळी म्हणून सोडू नका. तिला आपण घरमुरळी करू. म्हणजे मुरळी झाली, तरी ती घरीच राहील. तिचं लग्नही करता येईल. फक्त कधी कधी तिला देवाच्या जागरणाला पाठवत जा, म्हणजे झालं!’ कमलबाईंच्या आई-वडिलांना हा उपाय पसंत पडला. कारण त्यामुळे देवाला बोललेला नवसही फेडून होणार होता आणि मुलगीही नजरेसमोर राहणार होती. त्यांनी लगेच हो म्हटलं. पण कुठली मुलगी मुरळी म्हणून देवाला वाहायची, असा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा म्हाळसाबाईंची नजर छोट्या कमलबाईंकडे गेली. त्या लगेच म्हणाल्या- ही पांढरी पोरच द्या देवाला. देवाला बरं वाटंल!
‘नेमकं मलाच निवडलं की हो त्यांनी. निवडलं कसलं, खरंतर आधीच त्यांनी मला हेरून ठेवलं होतं. आदल्या रविवारी आल्या होत्या, तेव्हा माझ्याकडे टकामका बघत होत्या. आम्हा तिघी बहिणींमध्ये मी दिसायला बरी आणि गोरीगोमटी होते ना, म्हणून त्यांनी मलाच हेरलं देवासाठी. आता मला याचं वाईट वाटत नाही. पण तेव्हाही अजाणत्या वयात वाटलं नव्हतं. कारण एक तर ते कळण्याचं वय नव्हतं आणि माझे वडील नंतरच्या काळात खरोखरच हिंडा-फिरायला लागले. मी देवाची मुरळी झाल्यावर माझे वडील तब्बल तेरा वर्ष जगले. त्यामुळेही मुरळी होण्याचं दु:ख तेव्हा झालं नाही’, कमलबाई जुन्या दिवसांच्या आठवणी जागवत असतात.
कमलबाईंच्या आई-वडिलांनी होकार भरल्यावर एक दिवस मग त्यांचे आई-वडील आणि म्हाळसाबाई मुरळी, तिच्याबरोबरचा मार्तण्ड वाघ्या सारेजण छोट्या कमलबाईंना घेऊन जेजुरी गडावर गेले. तिथे छोट्या कमलचं ब्राह्मणाच्या साक्षीने खंडोबाशी लग्न लागलं. देवाच्या नावाने कमलबाईंच्या गळ्यात चांदीचं डोरलं बांधण्यात आलं आणि तेव्हापासून आजतागायत कमलबाई प्रेमाने म्हणत आल्यात- खंडेरायाची झाले मी, मुरळी ग बाई मुरळी. 

पण हे मुरळीपण निभावणं तसं सोपं नव्हतं. कमलबाईंना मुरळी म्हणून वाऱ्यावर सोडून दिलं असतं, तर कदाचित त्यांच्याही आयुष्याची रया गेली असती. पण कमलबाईंनी आपलं मुरळीपण मानानं मिरवलं आणि राबवलंही. मुरळी झाल्यानं त्यांच्या आयुष्यात फार फरक पडला नाही. पण एक मात्र नक्की झालं - त्यांना खूप नाचायला-गायला मिळालं. त्याची हकीगत सांगताना कमलबाई म्हणतात, ‘मला नाचण्या-गाण्याची हौस अगदी लहानपणापासून होती. आम्ही राहायचो, तिथे मी वेगवेगळ्या कार्यक्रमात कधी गाणी म्हणायचे, कधी नाचायचेदेखील. पण आधी मी हौस म्हणून नाचायचे. मुरळी झाल्यावर जागरणासाठी म्हणून नाचायला-गायला लागले. खरंतर मी तेव्हा जागरणासाठी कुठे जात नसे. पण आम्ही राहायचो, तिथेच पारूबाई नावाची मुरळी राहायची. तिचं जागरणाचं पथक होतं. ही पारूबाई म्हाळसाबाईच्याही परिचयाची होती. कारण म्हाळसाबाईदेखील घोडपदेवलाच राहायची. त्या साऱ्यांचंच एक पथक होतं. एक दिवस पारूबाईने मला गुपचूप विचारलं की, जागरणात नाचायला येते का म्हणून. मी घरच्यांना विचारलं असतं, तर ते नाहीच म्हणाले असते. माझ्या एका चुलतभावालाही माझं नाचणं-गाणं आवडायचं नाही. म्हणून मी एका रात्री गुपचूपच पारूबाईबरोबर गेले. घरातले सगळे झोपल्यावर गेले आणि ते उठायच्या आत परत आले. त्यानंतर काही दिवस हे लपूनछपून सुरूच होतं. मात्र एक दिवस माझ्या चुलतभावाला मी जागरणात नाचत असल्याचं त्याच्या एका मित्राकडून कळलं. त्यावर घरी येऊन त्याने खूप आरडाओरडा केला. तो माझ्या भल्याचंच सांगत होता. पण ते समजण्याचं माझं वय नव्हतं आणि बाबांना वाटत होतं की, ते खंडोबाच्या कृपेमुळेच बरे झालेत. आईचंही तसंच मत होतं. त्यामुळे त्यांनी माझ्या नाच-गाण्याला फार आडकाठी केली नाही. उलट त्यांनी माझ्या चुलतभावालाच बोल लावला आणि त्या भांडाभांडीत तो भाऊ आपल्या बायकोसह आमचं घर सोडून निघून गेला. माझं नाचगाणं मात्र सुरूच राहिलं आणि खरंच सांगते मला नाचायला-गायला आवडायचं म्हणूनच मी तेव्हा जायचे. देवाच्या मुरळीचं मुरळीपण तोवर माझ्यात भिनलं नव्हतं आणि त्याचे फायदे-तोटेपण तोपर्यंत कळले नव्हते.’
वर्ष सरत गेली, सोमवती-चंपाषष्ठी या सणांना जेजुरीगडाला देवाच्या दर्शनाला जाणं व्हायला लागलं, तसतसं मात्र मग कमलबाईंना मुरळी म्हणजे काय ते उमगू लागलं. कळू लागलं. आपण मुरळी असल्याचं वेगळेपण आकळू लागलं. मात्र यामुळे त्या अधिकच सांभाळून राहू लागल्या. कारण तोपर्यंत त्यांचं वय पंधरा-वीसच्या आसपास गेलं होतं. देवाची मुरळी म्हणून जो-तो हक्काने बघायला लागला होता. त्या काळात पारूबाई-म्हाळसाबाई लग्नसराईच्या दिवसांत कमलबाईंना घेऊन जुन्नरकडे जागरणाच्या कार्यक्रमाला जात. कमलबाई तेव्हा दोन-दोन महिने त्यांच्याबरोबर असत. त्या काळात कमलबाईंना सांभाळायचं म्हणजे म्हाळसाबाई आणि पारूबाई दोघींना मोठी जोखीमच वाटायची. पारूबाई तर एकसारख्या म्हणायच्या की,  कमलबाईच्या रूपानं आपण इखाची कुपी जवळ बाळगतोय म्हणून!
याच कलापथकात शाहीर धामणीकर नावाचे गृहस्थ होते. त्यांच्याकडे खंडोबाच्या पारंपरिक पदांचा मोठा साठा होता. कमलबाईंकडे आज जे बरंच काही आहे, ते त्यांच्याकडूनच आलं आहे. ते कमलबाईंना मुलगी मानायचे. तेच मग एक दिवस कमलबाईंना म्हणाले- ‘जागरणाच्या कलापथकाबरोबर एवढी हिंडतेस, देवाची सेवा करतेस, चांगलं आहे. पण आता तू घरगृहस्थी कर. गृहस्थी सांभाळून देवाचं कर. म्हणजे आमचंही नाव राहील नि तुझंही.’ मग शाहीर धामणीकर यांनीच सुचवलेल्या, सचिवालयात कामाला असलेल्या आणि ‘जयमल्हार सेवा पार्टी’त शाहीर असलेल्या शिंदे यांच्याशी कमलबाईंचं साधारणपणे वीस-बाविसाव्या वर्षी लग्न झालं. त्यानंतर त्यांचा सुखाचा संसार सुरू झाला. पण शाहीर शिंदेही खंडोबाचे भक्त होते. त्यामुळे त्यांनी कमलबाईंना कधी जागरणाच्या कार्यक्रमाला जायला आडकाठी केली नाही. उलट त्यांच्याबरोबर ते स्वत:ही जायचे.
कमलबाईंना आवाजाची नैसर्गिक देणगी असल्यामुळे कमलबाईंचं नाव खूप लोकांपर्यंत पोचलं. त्याच काळात शिवडीला असलेल्या तमाशा थिएटरमध्ये अनेक नामवंत तमाशा कलावंतांच्या पार्ट्या असायच्या. अशीच एकदा विठाबाई नारायणगावकर यांची पार्टी आलेली होती. अन् एकदा अचानक त्यांची गाणारी बाई आजारी पडली. आता काय करायचं म्हणता म्हणता कुणी तरी त्यांना कमलबाईंचं नाव सुचवलं. त्याबरोबर कमलबाईंना बोलावणं गेलं, त्या आल्या आणि विठाबाईंसाठी गायल्यादेखील. पहिल्याच वेळी कमलबाईंनी विठाबाईंसाठी म्हटलेली गाणी होती - पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची, तुम्हे और क्या दू दिलके सिवा... आणि कही दीप जले कही दिल... ही गाणी कमलबाईंनी तेव्हा एवढी जबरदस्त म्हटली की, तेव्हा आणि नंतरच्या काळात विठाबाई जेव्हा जेव्हा मुंबईला आल्या, तेव्हा तेव्हा त्यांनी कमलबाईंनाच त्यांच्या घरून उचलून नेलं गाण्यासाठी. यामुळे जागरण करता करता कमलबाईंचं नाव तमाशा क्षेत्रातही व्हायला लागलं. कमलबाईंचा आवाज गोड होताच, पण त्या रुपानंही देखण्या होत्या. त्यामुळे अनेकांनी त्यांना आमच्या तमाशा पार्टीत नाचता का असंही विचारलं. पण कमलबाईंनी तो मोह आवरला. तमाशात काही काळ त्या गात राहिल्या. अगदी अनेकींच्या संगीतबारीत त्यांनी एकसे एक लावण्याही म्हटल्या. पण पायात घुंगरू बांधून त्या तमाशाच्या फडावर नाचल्या नाहीत.
सच्च्या दिलाने त्या म्हणतात,‘नाचायचा मोह झाला होता, नाही असं नाही. पण वेळीच सावरले. एरव्ही आपण नाचतो, ते देवाला सेवा म्हणून नाचतो. पण तमाशा थिएटरातला देव वेगळाच असतो, हे उमगलं आणि मी नाचायच्या फंदात पडले नाही. गाणं मात्र गात राहिले.’
कमलबाईंनी आपलं मुरळीपण एखाद्या सत्त्वासारखंच निभावलं. लग्न केलं, तरी खंडोबाच्या सेवेच्या चाकरीत त्यांनी कधी हयगय केली नाही. त्याचे उपासतापास, त्याचं जागरण एखाद्या पतिव्रतेच्या बळानेच निभावलं. केवळ यामुळेच अनेक संकटं कोसळंली, पण त्यातून आपण निभावून गेलो, अशी त्यांची श्रद्धा आहे. या संदर्भातले दोन अनुभव तर अफलातून आहेत. त्या सांगतात - ‘आमच्या कलापथकाचा एकदा फलटणजवळच्या कुंभारीकोसारी गावात जागरणाचा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम आटपून संध्याकाळीच आम्हाला तिथून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या ढालगावाला जायचं होतं. कारण तिथली जागरणाची सुपारी घेतली होती. कुंभारीकोसारीचे कार्यक्रम आटपून आम्ही निघालो. रात्री आठची गाडी होती. गाडी आल्यावर एकच गलका झाला. आम्ही कसेबसे आत चढलो. मात्र गाडी अर्ध्या रस्त्यात आली नि माझ्या लक्षात आलं की, आपली कपड्यांची नि दागिन्यांची पेटी खालीच राहिलेली आहे. मी लगेच पुढच्या गावी उतरले आणि परतीच्या गाडीने पुन्हा जिथून गाडी सुटली होती, त्या एसटी स्टॅण्डवर आले. सुदैवाने माझी पेटी बाजूच्या टपरीवाल्याने उचलून ठेवली होती. त्याने मला ती दिली. मी म्हटलं, ‘देवासारखा पावलास बाबा. आतमध्ये माझे दागिने होते.’  मी ती पेटी घेतली नि गाडीची वाट बघत उभी राहिले. त्यावर त्या टपरीवाल्याने आता सकाळशिवाय गाडी येणार नाही, असं सांगितलं आणि माझी पाचावर धारण बसली. कारण काहीही करून मला रात्रीच ढालगावला पोचणं गरजेचं होतं. तिथली सुपारी घेतलेली होती. एवढ्यात माझी अडचण ओळखून टपरीवर उभे असलेले दोघे-तिघे पुढे आणि म्हणाले आम्ही तुम्हाला बैलगाडीने सोडतो. मनात आलं, कोण कुठले हे, पण देवासारखे धाऊन आले. आम्ही बैलगाडीने निघालो. माझ्यासोबत माझा एक छोटा भाचा तेवढा होता. ढालगावला जाणारा रस्ता घाटीतून जाणारा होता. किर्रर्र अंधार पडला होता आणि मी दोन परक्या माणसांबरोबर प्रवास करत होते. अर्ध्या रस्त्यात आलो असतानाच मधल्या जंगलातल्या रस्त्याने दोघे-तिघे आले आणि आम्हालापण ढालगावला जायचंय म्हणत माझ्या बाजूला येऊन बसले. थोड्या वेळाने त्यांचा हात माझ्या पेटीकडे जाऊ लागला. तेव्हा त्यांच्याकडे रागाने नीट निरखून बघितलं, तर ते मघाशी टपरीवर उभे असल्याचं आठवलं आणि तेव्हाच माझ्या लक्षात आलं की, आपण पेटीत दागिने असल्याचं नकळत बोलून गेलो होतो आणि त्यासाठीच हे आले होते. पहिल्यांदा त्यांना हिंमतीने हटकलं. तरीही दुसऱ्यांदा जेव्हा त्यांचा हात पेटीकडे जाऊ लागला. तेव्हा मी संतापाने त्यांना म्हटलं - ‘पाव्हणं नीट गुमान बसा की, का उगं खंडोबाच्या सेवेकऱ्यांना छळताय?’ मी एवढं म्हणायचा अवकाश, त्यांनी ताडकन् गाडीतून खाली उडी मारली. अन् म्हणाले - ‘तुम्ही खंडोबाच्या मुरळी हाय व्हय, मंग आदी नाय का सांगायचं. आम्ही रामोशी हाव. खंडोबा आमचं कुलदैवत हाय, जा तुम्ही तुम्हाला कोण काय करणार नाय.’ आणि मग खरोखरच कसलंही विघ्न न येता, मी वेळेत ढालगावला पोचले. आमचा सुपारीचा कार्यक्रमही वेळेत पार पडला. मला ही सगळी त्या मल्लुरायाची म्हणजे खंडोबाचीच कृपा वाटते.’
दुसरा प्रसंग खुद्द मुंबईतच घडलेला. दक्षिण मुंबईतच कुठल्या तरी गल्लीत कमलबाईंचा जागरणाचा कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रम संपला आणि अचानक कुठूनशी टोळधाड यावी, तसे दहा-बाराजण आले. त्यातल्या एकाने कमलबाईंना आपल्याबरोबर चलायला सांगितलं. त्याच्या हातात चाकू असल्यामुळे त्याच्याबरोबर जाण्याशिवाय कमलबाईंकडे दुसरा पर्याय नव्हता. कमलबाई सांगतात,‘मी खंडोबारायाचा धावा करतच त्याच्या पाठोपाठ चालले होते. एका क्षणी मनात म्हटलं देवा आता तूच वाचव तुझ्या या मुरळीला. आणि अचानक समोरून एक माणूस आला. मी ज्याच्याबरोबर गुमान चालत होते, त्याला तो माणूस म्हणाला, ’या सभ्य बाईला तू कशाला उचललंस. मी तुला उचलून आणायला सांगितली ती बाई वेगळी होती.’ आणि नंतर मग त्या दोघांनी पुन्हा पुन्हा माझी माफी मागितली. नंतर मला कळलं की, केवळ सारख्या दिसण्यामुळे मला भलतीच समजून उचललं गेलं होतं. पण काहीही असो खंडोबाच्या मेहेरबानीनेच आजवर मी प्रत्येक संकटातून, अवघड परिस्थितीतून बाहेर पडलेय.’
आपण खंडोबाचं व्यवस्थित केलं की तोही आपलं व्यवस्थित करतो अशी बाईंची श्रद्धा आहे. त्यातूनच आज साठी उलटली तरी त्या देवाची सेवा करतात. कुठे जागरणाची सुपारी आली, तर नाही म्हणत नाहीत. कारण त्यांच्यासाठी तो केवळ उपजीविकेचा मार्ग नसतो. ते त्यांच्यासाठी देवाच्या सन्निध राहण्याचा एक उपाय असतो. मग देवासाठी कुठल्याही मार्गाने सेवा करण्याची त्यांची तयारी असते. मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीच्या विद्यार्थ्यांना त्या जागरणनृत्यही याच भावनेतून शिकवतात. ही मुलं काही दारोदार जाऊन जागरणनृत्य करणार नाहीत, हे त्यांना ठाऊक असतं. पण त्यांना शिकवणं म्हणजेही देवाची सेवाच आहे, असं त्या मानतात. तसंच मागे वीसेक वर्षापूर्वी इंडियन नॅशनल थिएटरच्या ‘खंडोबाचं लगीन’ नाटकात काम केलं होतं, तेही याच भावनेतून. एवढंच कशाला बसल्या जागी त्यांना खंडोबाचं एखादं पद म्हणायला सांगितलं तरी त्या कसलेही आढेवढे न घेता पटकन म्हणतात. मुख्य म्हणजे त्यांनी मुरळीच्या भूमिकेत जायला जराही वेळ लागत नाही. कारण तो त्यांचासाठी एक विरंगुळाही आहे. परत देवाचं गाणं ऐकवायला नाही कसं म्हणायचं, हा प्रश्नही असतोच. पण खरा प्रश्न आपल्याला पडतो, जेव्हा त्या आपल्यालाच विचारतात की, कुठलं गाणं गाऊ? कारण त्यांच्या पोतडीत एवढी असतात की आपल्यालाच संभ्रम पडावा. मग आपल्यावरचं धर्मसंकट पाहून त्याच म्हणतात- मघाशी म्हाळसेचं सुखाचं-आनंदाचं पद ऐकवलं होतं, आता तिच्या दु:खाचं ऐका. खंडोबा बानूबाईच्या नादाने घर सोडून गेल्यावर म्हाळसाबाई काय म्हणते ऐका -
देव मल्हारी रुसून आला घोड्यावर बसून
गेला बानूला आनाया मी ग लग्नाची असून
देव चंदनपुरात राखतो मेंढरं
खाई बानूच्या हातची ताक कन्या न् भाकर
बोले बानूशी गोड गोड देव गालात हसून
... गेला बानूला आनाया मी गं लग्नाची असून
... कमलबाई आपल्या गाण्यातून म्हाळसेचं, किंबहुना स्त्रीजातीचं सनातन दु:ख उभं करतात. मघाचं आनंदाचं गाणं गातानाची आणि आताचं दु:खाचं गाणं गातानाची त्यांची भावसमाधी मात्र सारखीच असते.
बरीच वर्षं कमलबाई दुसऱ्याच्या कलापथकातून काम करायच्या. आता त्यांचं घरचंच जागरणाचं कलापथक आहे आणि त्यांचा मुलगा राजू शिंदे त्याची जबाबदारी सांभाळतो. पण कमलबाईंना वाटतं, हे खंडोबाच पार पाडतोय. कारण खंडोबा हाच त्यांचा ध्यास आणि श्वास आहे. म्हणून तर लौकिक जीवनातला साथीदार गमावल्यावरही त्यांनी कपाळावरचं कुंकू तसंच ठेवलं. आणि जेव्हा कुणी विचारलंच, तेव्हा त्या म्हणाल्यात- अहो माझं लगीन झालंय खंडोबाशी. जोवर खंडोबा नावाचं दैवत या पृथ्वीखंडावर आहे, तोवर मी सवाष्णच आहे.
... आता बोला या भक्तीचं मोजमाप कशात करायचं?
                                      

शुक्रवार, १७ एप्रिल, २०१५

रुपखणी बावनखणी


रुपखणी गुणखणी बावनखणी

...................
मुकुंद कुळे
लेखातील चित्र : रोहन पोरे
.................



नजर भिरभिरत असते, दाणेआळीपासून शालुकराच्या बोळापर्यंत आणि ढमढेरे बोळापासून पासोड्या मारुतीपर्यंत... कुठे ओळखीची खूण सापडतेय का ते पाहत. सा‍ऱ्या वस्त्या धुंडाळून होतात. सा‍ऱ्या इमारती निरखून-पारखून होतात. गल्ल्यांतल्या काना-कोप‍ऱ्यांचाही माग काढून होतो. पण कुठेच गवसत नाही, तिच्या अस्तित्वाची एखादीही खूण! ना घुंगरांच्या लयबद्ध किणकिणाटाची, ना तबल्यावर पडलेल्या जडशीळ हाताची, ना सारंगीवर छेडलेल्या नाजुक सुरावटीची, ना गळ्यातून उमटलेल्या अलवार तानेची...

सारंच कसं भग्न आणि भकास. एक बेहोष उदासी सर्वत्र भरुन राहिलेली... जणू पेशवाई बुडाली आणि जाता जाता तिलाही सोबत घेऊन गेली. पण असं तरी कसं म्हणावं, पेशवाईच्या पश्चात किमान शंभर-सव्वाशे वर्षं ती आपला आब राखून होती. कायम महावस्त्रासारखी झळाळत राहिली. अगदीच सात्त्विक-सोज्ज्वळ नव्हतीच ती कधी. पण अगदी बाजारबसवीही नव्हती खास! ज्यानं-त्यानं इज्जतीनं यावं आणि इज्जतीनं जावं, असा तिचा रुबाब. तो तिने अगदी आता-आतापर्यंत म्हणजे पन्नासेक वर्षांपूर्वीपर्यंत जपला आणि मग अचानक गायब झाली. गायब म्हणजे पार परागंदा... अस्तित्वाची एकही खूण मागे न सोडता. मग तिला शोधता शोधता अवस्था थेट वेड्यापिश्यासारखी होऊन जाते. केशवसुतांनी म्हटल्याप्रमाणे- ‘त्रिखंड हिंडुनी धुंडितसे, न परी हरपले ते गवसे...’

पण मजा म्हणून गोलगोल फिरवणा‍ऱ्या घुणघुण्याचंच गतिमानतेमुळे तयार व्हावं एक आवर्त, तसंच मनात एकच एक विचार घोळवल्यामुळे विचारच घेतात एक मूर्त रूप आणि ध्यानीमनी नसताना अचानक तीच समोर येऊन उभी ठाकते...साक्षात् नवयौवना. रुपखणी, गुणखणी, बावनखणी!

... आणि बघता-बघता रातीचा अमल असतानाही शुक्रवारपेठ उजळून निघते. पलित्यांच्या प्रकाशात सरदार-दरकदार, तालेवार मंडळींची वर्दळ सुरू होते. कुणी पालखीतून, कुणी घोड्यावरून, तर कुणी पायीच आपापला जामानिमा सांभाळत अवतरतात... थोडसं गांगरून, थोडसं खाकरून, थोडे कावरेबावरे होत, इकडे-तिकडे बघत, अचानक कुणाला काही कळायच्या आत बावनखणीत गुडुप होतात. त्यांच्या आगमनाने मग बावनखणीतली शमादानं-चिरागदानं उजळत जातात. सुरुदार दिवाणखान्यांतल्या चिकाच्या पडद्यांची सळसळ वाढते. रात्रीचे प्रहर चढत जातात, त्याप्रमाणे सारंगीच्या खुंट्या पिळल्या जातात, तबल्याच्या वाद्या आवळल्या जातात. सुरेख घाट साधलेले विडे एका पाठोपाठ एक रिचवून नजाकतदार गाण्याचं मायाजाल उभं केलं जातं. ते मायाजाल एवढं मोहमयी असतं की रामप्रहर होतो, तरी रात्रीचं भान काही सरत नाही. ही भूल असते बावनखणीतल्या गाण्याची आणि गाणारीचीही. अशी ही बेहोष-मदहोष करणारी बावनखणी... पेशवाईतील सर्व तालेवारांचा रंगीला मिजाज आपल्यात सामावून‌घेणारी बावनखणी.

युद्धाची धामधूम असो की सणासुदीची आतषबाजी की पुण्यावर कोसळलेलं एखादं संकट, शुक्रवारातल्या बावनखणीची रौनक कधीच कमी झाली नाही. कारण बावनखणी होती दर्दी आणि छंदी-फंदींच्या विसाव्याचं हक्काचं ठिकाण. अगदी मोक्याचं. भल्याभल्यांना घायाळ करणारी, ही बावननखणी. जणू- ‘अंगी तारुण्याचा बहर, ज्वानीचा कहर, मारीते लहर, मदनतल्वार...’ एवढंच नाही, बावनखणी म्हणजे पेशवेकालीन पुण्यातलं सांस्कृतिक ठाणंच!

त्यासाठीच तर निर्मिती झाली होती बावनखणीची. पुणे शहरभर विखुरलेल्या नाच-गाणं करणा‍ऱ्या सा‍ऱ्या कसबिणी आणि कलावंतिणी या बावनखणीत एकत्र आणल्या होत्या. त्यांच्यासाठी शहरभर होणारा दंगा, एकाच ठिकाणी व्हावा म्हणून. खास त्यांच्यासाठी बावन्न खणांची म्हणजे बावन्न खोल्यांची दुमजली-दुपाखी चाळ बांधली गेली. नानासाहेब पेशव्यांच्या काळात बांधण्यात आलेल्या या बावनखणीचं वर्णन १८६८मध्ये प्रकाशित झालेल्या नारायण विष्णू जोशी लिखित ‘पुणे शहराचे वर्णन’ या पुस्तकात पुढील प्रमाणे करण्यात आलं आहे- ‘नानासाहेब पेशवे यांच्या काळात तत्कालीन कोतवाल जिवाजीपंत अण्णा खासगीवाले यांनी उदमी लोकांस कौल देऊन ही पेठ वसवली व वाडा बांधला. शेजारी बावन्न खणांची दुघई दुमजली चा‍ळ बांधली आणि ती जागा कसबिणी व कलावंतिणी यांस राहण्यासाठी भाड्याने दिली. ह्याच्या पूर्वी कसबिणी सर्व शहरात पसरलेल्या होत्या. त्या सर्व ह्यांनी आपल्या सन्निध आणून ठेवल्या. त्याही सर्व एकदम तेथे राहण्यास आल्या. याचे कारण की त्या गृहस्थाकडे कोतवाली होती. त्यावेळच्या कोतवालाचा अधिकार इतका असे की, आता तितका कोणासही नाही. तेव्हा काही जरबेने, काही खुशीने, काही प्रीतीने व ममतेने आल्या असतील. ही बावन्नखणी पुण्यातील लोकांस व बाहेरील लोकांस माहीत नाही, असे नाहीच. आबालवृद्धांस ही जागा ऐकून अथवा प्रत्यक्ष पाहून माहीत आहेच.’

पुणं पाहिलेलं असो वा नसो, पुण्याची पेशवाई आणि तिथल्या बावनखणीची ओळख प्रत्येकाला असतेच. तसा बावनखणीचा हा लौकिक अगदी पहिल्यापासूनचा. ती बदनाम होती-आहे, हे तर खरंच. पण बदनामही तेच होतात, ज्यांना काही नाव असतं. तेव्हा, सुरुवातीच्या काळात बावनखणी म्हणजे पुण्यातलं एक सांस्कृतिक केंद्रच होती. दिवसभर काम करून थकलेल्यांचं घटकाभर मनोरंजन करणारी आणि रगेल व रंगेल असणा‍ऱ्यांची रगही जिरवणारी. पण बावनखणी म्हणजे निव्वळ देहाचा व्यापार करणारं केंद्र कधीच नव्हतं. कला आणि सुरतव्यापार यांचा सुरेख मेळ बावनखणीच्या ठायी होता. म्हणून तर त्या काळात गाजलेल्या कलावंतिणी बावनखणीत एकत्र आल्या होत्या. त्यांना गाण्याची-नाचकामाची चांगली पहेचान होती. एकप्रकारे मीनाबाजारच तर होती बावनखणी...

नाच-गाण्याचे ताफे असलेल्या कसबी-कलावंतिणींसाठी ही बावनखणी उभारण्यात आली होती; तरी या बावनखणीत सुरुवातीपासून नेमक्या किती कलावंतीणी होत्या, त्याची माहिती मिळत नाही. पेशवे दफ्तरातील एका कागदात मात्र तत्कालीन कलावंतिणींच्या ३६ ताफ्यांची नोंद सापडते. या कागदात दिलेली कलावंतिणींची यादी पुढीलप्रमाणे आहे- सिवशानी व आनंदी तेलंगी, बहि‍ऱ्या दोघी तेलंगी, मिठा नाईकीण पुणेकर, लातू तेलंगी, बसंत तेलंगी, देवी तेलंगी, महबूबचंदी सातारकर, रहिमती पुणेकर, नूरंदी तेलंगी, चपटीपना औरंगाबादकर, धना चपटीपनाची बहीण, सावनूरवाली पना, करिमी दादा पोतनिसाची, शामा नाईकिणीची राधी, आजबकुवर मिठो औरंगाबादकर, गुजराथणी नारायणदासवाल्या, मथी थेरकरीण, मत‌ी टोपीवाली, नुरा नाईकीण पुणेकर हिरी गुलाबी, साबी आंबडापूरवाली, फुंदन सातारकर, बना नाईकिणीची जना नाइकीण गाववाली, लालन सभाकुवरीची, बदल रणमली, गंगी थेरकरीण, रतनी सातारकर पिरा नाइकिणीची, वाईवासी रंभा, येवलेवाली लालन रणमली, जिवना नाइकिणीची करिमी, गंगी रणमली‌, दिलवाली आखण, बसंती उजनवाली आणि जमना नाईकीण मुंबईवाली... या सगळ्या कलावंतिणींचे आपापले नाच-गाण्याचे ताफे होते. म्हणजे वादकांपासून नृत्यात साथ देणा‍ऱ्या सहनर्तकीपर्यंत सगळे या ताफ्यात असत. त्यामुळेच बावनखणी म्हणजे एकप्रकारे लखनौमधल्या गाणी-बजावणी करणा‍ऱ्या कोठ्यांसारखी कोठीच होती. फक्त लखनौमधली एकेक कोठी म्हणजे राजवाडाच आणि तिथे कोठेवाली एकाचवेळी अनेक नर्तकींना आश्रय द्यायची. याउलट पुण्यात खुद्द पेशव्यांनीच, म्हणजे नानासाहेब पेशव्यांनीच कलावंतिणींसाठी एक मोठी कोठी बांधली- बावनखणी.

खुद्द पेशव्यांच्या मर्जीनेच ही बावनखणी बांधली गेली, तरी या बावनखणीत कोणत्या प्रकारचं नाच-गाणं सादर व्हायचं याचा काहीच थांगपत्ता लागत नाही. त्याच्या नीट नोंदीही कधी झालेल्या नाहीत. मात्र उपलब्ध कलावंतिणींची नावं ज्या पद्धतीने लिहिलेली किंवा रुढ झालेली आढळतात; त्यावरून नंतरच्या काळात महाराष्ट्रात नावारूपाला आलेल्या तमाशा - लावणी कलेची बीजं बावनखणीत आहेत, असं खात्रीने म्हणता येतं. कारण आजही तमाशा क्षेत्रातील महिला कलावंतांची नावं त्याच पद्धतीने उच्चारली वा लिहिली जातात. उदाहरणार्थ कौसल्याबाई कोपरगावकरीण, पारुबाई जेजुरीकरीण, यमुनाबाई वाईकरीण वगैरे... अर्थात यावरून बावनखणीत सादर केल्या जाणा‍ऱ्या तत्कालीन नाच-गाण्याच्या काहीच ठोस अंदाज येत नाही.

मुळात मराठेशाही किंवा पेशवाईच्या काळात महाराष्ट्रात ठोस अशी नाच-गाण्याची परंपराच नव्हती. यादवकाळात महाराष्ट्रात रुजलेली धृपदगायनाची संगीतपरंपरा मुस्लिम आक्रमकांनंतर खंडित झाली होती आणि महाराष्ट्राचं खास प्रातिन‌‌िधिक नृत्य किंवा गायन तेव्हाही नव्हतं. त्यामुळेच बावनखणीत रसिकरंजनासाठी कोणत्या प्रकारचं नाच-गाणं सादर होतं होत, हे कळायला मार्ग नाही. मात्र काही आडाखे जरूर बांधता येतात. उदाहरणार्थ औरंगजेबाच्या कैदेत लहानाचे मोठे झालेल्या सातारच्या छत्रपती शाहूमहाराजांना मोगली मनोरंजनाची आणि खिदमतगारीची चांगलीच जानपहेचान होती. वर्षान‌ुवर्षं कुटुंबापासून दूर राहणा‍ऱ्या सरदार-शिपायांच्या मनोरंजनासाठी छावणीतच असलेले कलावंतिणींचे तंबू आणि त्यातील नाच-गाणंही त्यांनी पाहिलं-अनुभवलं होतं. त्यामुळेच महाराष्ट्रात परत येताच त्यांनी मोगलदरबारच्या धर्तीवर मराठेशाहीतही नाच-गाण्याला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. त्यासाठी खास उत्तरेहून कलावंतांची आयात करायला त्यांनी सुरुवात केली. ‘पेशवेकालीन महाराष्ट्र’ या पुस्तकात लेखक वा. कृ. भावे यांनी यासंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. ते म्हणतात- ‘शाहूमहाराज हा राजश्वैर्यास सर्वस्वी पात्र असा पुरुष असून, त्याला इतर अनेक कलांप्रमाणे संगीताचीही आवड होती. म्हणूनच त्याने मोठ्या प्रयासाने दूरदूरच्या स्थळांहून गवई, नट, भाट, नायकिणी इत्यादिकांचा संच जमविला. दिल्ली, उत्तर हिंदुस्थानातील अनेक शहरे ही गायनवादनाची आगरे होत. यासाठी शाहूने तिकडून गुणिजन मिळवण्याचा प्रयत्न केला. हे काम तो पेशवे व इतर सरदार यांजमार्फत करून घेत असे.’

अशा पद्धतीने पर प्रांतातून आणलेल्या कलावंतांचा सुरेख संग्रह शाहूमहाराजांनी त्यांच्या दरबारात केला होता. आणि या कलावतांच्या कलेचा ते नियमितपणे आस्वादही घेत. मात्र याचबरोबर प्रत्येक वेळी परप्रांतातून कलावंत मागवायला नकोत, म्हणूनही शाहूमहाराज प्रयत्नशील असलेले दिसतात. यासंदर्भातील पेशवे दफ्तरातील एका कागदाचा हवाला देऊन वा. कृ. भावे लिहितात- ‘परप्रांतातून नायकिणी आणविण्यास पैसा फार खर्चावा लागतो, असे पाहून महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातच चांगल्या होतकरू मुली ‌मिळवून त्यांना नृत्यकलेत तरबेज करण्याचे शाहूने मनास आणिले व कोकणात खंडोजी माणकर या अ‌धिका‍ऱ्याकडे ती कामगिरी सोपवली.’

या उदाहरणांवरून शाहूमहाराजांच्या प्रोत्साहनामुळे नंतरच्या काळात महाराष्ट्रातच गायन-नर्तन करणारे चांगले कलाकार निर्माण झाले असतील, असं म्हणण्यास वाव आहे. मात्र हे सारेच कलावंत प्रामुख्याने निम्न जातीतील असण्याची दाट शक्यता आहे. कारण शाहूमहाराजांच्या मागणीनुसार खंडोजी माणकाराला पेशव्यांनी लिहिलेल्या एका पत्रात- ‘बटकीच्या पोरी दोन बहुत चांगल्या, दहा-अकरा वर्षांच्या, निरोगी, नाचावयास लायक अशा पाठवाव्या’, असा स्पष्ट उल्लेख आहे. मराठेशाही किंवा पेशवाईत दासी-बटकींची आणि त्यांच्या मुलांची खुलेआम खरेदी-विक्री होत असे. त्यामुळे नाच-गाण्यात तयार करण्यासाठी या दासी-बटकींच्या मुला-मुलींचाच वापर होत असणार हे नक्की! तसंच ‘धाकटी चंदी सातारकर’ किंवा ‘शामा नायकिणीची राधी’ अशी बावनखणीकालीन कलावंतिणींची नावं आढळतात, ती बहुधा त्यामुळेच!

महाराष्ट्रातच कलावंतांची निर्मिती करण्याच्या शाहूमहाराजांच्या धोरणामुळे एक मात्र नक्की झालं, इथे कलावंत घडण्याची प्रक्रिया सुरू झाली. तीही थेट गुरु-शिष्य पद्धतीने. याचाही दाखला पेशवे दफ्तरात मिळतो. शाहूमहाराजांच्या आज्ञेवरून नानासाहेब पेशव्यांनी कलावंत घडवण्याचं मनावर घेतलं आणि तशी ताकीद आत्माराम राजाराम नावाच्या आपल्या अधिका‍ऱ्याला केली. हा अधिका‍री नानासाहेब पेशव्यांना एका पत्रात कळवतो- ‘साहेबीं, जातेसमयी ताकित केली की, खबरदार रहाणे, पोरींची निगा करणे. तालीम उत्तमप्रकारे करवीत जाणे. त्यानुसार त्यांसी खाणे जेवणे उत्तम प्रकारे होत आहे. व गावयाची तालीम उत्तम प्रकारे काशीबा पांच-सांत घटका देत आहेत. फकीर महंमदही तालीम उत्तम देत आहे...’

शाहूमहाराजांच्या आज्ञेवरून नानासाहेब पेशव्याने स्थानिक कलावंतांना तालीम द्यायला सुरुवात केली, तरी ते गाणं आणि नृत्य नेमकं कोणतं होतं, याचा काही अंदाज बांधता येत नाही. मात्र ते गाणं उत्तरेतील गवयांप्रमाणे धृपदगायकीचं आणि नृत्यही उत्तरेच्या कोठ्यांप्रमाणे कथक स्वरुपाचं असावं. अर्थात ते आजच्या इतकं तयारीचं नसेल कदाचित! किंबहुना ते प्राथमिक स्वरुपाचंच असेल. पण बावनखणीत गाणा‍ऱ्या-नाचणा‍ऱ्या कलावंतिणी ग्रामीण संस्कृतीतील लोकगीतं गात नव्हत्या खास. त्यांचंही गाणं काहीएक तयारीचंच होतं, असेल. कारण पेशव्यांचं पुणे आणि मराठेशाहीची राजधानी असलेल्या साता‍ऱ्यात सांस्कृतिक आणि सांगीतिक वातावरण तयार झालेलं होतं. शाहूमहाराजांचं बालपण मोगलांच्या छावणीत गेल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच या गोष्टी ठाऊक होत्या. तर पेशव्यांना त्या शाहूमहाराज व आपल्या सरदारांमुळे माहीत झाल्या. पहिल्या बाजीरावाने नर्मदा ओलांडून मराठ्यांचं राज्य दिल्लीच्या तख्ताला भिडवलं आणि तिथे जम बसवण्यासाठी शिंदे-होळकर-पवार यांसारख्या सरदारांना तिथेच जहागिरी दिली. परिणामी तिथेच स्थायिक झालेल्या या सरदारांनी उत्तर भारतीय माहौल लवकरच आत्मसात केला आणि त्याची झलक पेशवे-शाहूंनाही दाखवली. पुणे-साता‍ऱ्यातील सांस्कृतिक वातावरण त्यातूनच आकाराला येत होतं. त्यात शाहूमहाराजांचं १५ डिसेंबर १७४९ला निधन झालं आणि कलावंतांची बूज राखण्याचं काम सर्वस्वी नानासाहेब पेशव्यांच्या खांद्यावर आलं. ही बूज त्यांनी उत्तम रीतीने राखली. त्याचा उत्तम दाखला म्हणजे शुक्रवारपेठेत दिमाखात उभी राहिलेली बावनखणी!

नानासाहेबांच्या काळात बावनखणी उभी राहिली, पण त्या बावनखणीतल्या कलेचा प्रत्यक्ष नानासाहेबाने किती उपभोग घेतला शंका आहे. कदाचित विशिष्ट सण-उत्सवकाळात त्याने या बावनखणीतील कलावंतिणींना शनिवारवाड्यावर बोलावलंही असेल, पण तशी नोंद तरी सापडत नाही. अर्थात नानासाहेब पेशव्याची येसू नावाची जी नाटकशाळा होती, ती उत्तम गायची. नानासाहेब पेशव्यापासून दुस‍ऱ्या बाजीरावापर्यंत सर्वच पेशव्यांनी खासगीत बाळगलेल्या बहुतेक नाटकशाळा या नाच-गाण्यात तरबेज होत्या. या नाटकशाळा खुद्द पेशव्यांच्या असल्यामुळे त्यांची राहण्याची-उदरनिर्वाहाची व्यवस्था स्वतंत्र केलेली असायची.

नानासाहेबापासून किमान पुण्यात तरी एकप्रकारचं सांगीतिक वातावरण तयार झालं होतं. खुद्द त्याच्या दरबारात नारो आप्पाजी भावे नावाचे सतारवादक आणि धृपदीये होते. ही संगीत परंपरा शेवटच्या बाजीरावापर्यंत कायम होती. दिवंगत गायक-संगीतसमीक्षक वामनराव देशपांडे यांनी ‘महाराष्ट्रातील संगीताचे कार्य’ या पुस्तकात यासंबंधी एक नोंद केलेली आहे. ते लिहितात- ‘पेशवाईच्या अखेरपर्यंत पावा भीमराव, राणी शिंपी, विठू गुरव, त्र्यंबक आत्माराम, विठोबा पारनेरकर हे थोरले माधवराव आणि सवाई माधवराव पेशवे यांच्या आश्रयाखाली होते. आणि दुस‍ऱ्या बाजीरावाच्या राजवटीत दावलखान, मेंढूसेन, विलासबरसखान आणि चिंतामणी मिश्र यांसारखे अनेक धृपदगायक संगीताची जोपासना करत होते.’ म्हणजे पेशवाईत शास्त्रीय संगीतासाठी आश्वासक असं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि ते शुक्रवारातल्या बावनखणीत अगदीच झिरपलेलं नव्हतं, असं म्हणणं कठीण आहे. किंबहुना नानासाहेब पेशव्यांनंतर सवाई माधवराव आणि दुस‍ऱ्या बाजीरावाच्या काळात नावारुपाला आलेल्या व्यकंट नरसी, चंद्री नायकीण, सगुणी कलावंतीण, लक्ष्मी परभीण या कलावंत महिला बावनखणीतल्याच होत्या. फरक एवढाच होता की, नानासाहेब पेशव्याच्या काळात बावनखणी नावाची कलावंतिणींचे दिवाणखाने असलेली एकच वास्तु होती. सवाई माधवराव आणि दुस‍ऱ्या बाजीरावाच्या काळात बावनखणीचा विस्तार होत गेला. एकेका कलावंतिणीची एकेक स्वतंत्र वास्तू म्हणजे दिवाणखाने उभे राहिले आणि शुक्रवाराचा परिसर बावनखणी म्हणून ओळखला जाऊ लागला.

नानासाहेब पेशव्याच्या काळात उभी राहिलेली बावनखणी ‌कशी होती, त्याचं काहीच रेखाचित्र-कल्पनाचित्र उपलब्ध नाही. कुणी कधी काढल्याचंही ऐकिवात वा वाचण्यात नाही. पण आजच्या पुण्यातील शुक्रवार पेठेतील श्रीनाथ टॉकीजच्या बाजूला मूळ बावनखणीची जागा असल्याचं म्हटलं जातं. ती दुपाखी-दुमजली इमारत होती, असे उल्लेख मात्र पेशवे दफ्तरांत सापडतात. बावन्न खणांतल्या प्रत्येक खणांत वेगवेगळी कलावंतीण असण्याची शक्यता कमी आहे. किंबहुना प्रत्येक कलावंतिणीबरोबर असलेला कलावंतांचा ताफा बघता प्रत्येकीच्या वाट्याला हमखास तीन-चार खण आले असतील. मात्र ही बावनखणी हमखास पेशवाईच्या तेव्हाच्या इतमामाला साजेशी असेल. एक लांबलचक दिवाणखाना, मध्ये बारीक कोरीवकाम केलेले सुरुदार खांब, छताला हंड्या-झुंबर आणि खासेस्वारीसाठी खास भिंतीला टेकून तयार केलेली गाद्यागिर्द्यांची बैठक. नाच-गाण्याची मै‍फल जमायला याहून अधिक काय हवं? मग त्या मैफलीतून उमटणारे सूर ‘मोरी छोडो डगरीया हो श्याम’ असे, तक्रारीचा भाव आळवणा‍ऱ्या ठुमरीचे असोत नाहीतर; ‘शहर बडोदे सोडून गेले, वर्षं झाली बारा... सखे बाई गं’ अशी आर्त हाक घालणा‍ऱ्या लावणीचे असोत. बावनखणीखालून जाताना एखाद्या बाजिंद्या कलावंतिणीचा असा काळीज चिरत जाणारा आवाज ऐकून कुणी बावनखणीची पायरी चढला नसेल, तरच नवल!

नानासाहेब पेशव्यांनी उभारलेल्या बावनखणीची एवढी जादू तर होतीच. नानासाहेबाच्या काळात पेशवाई भरभराटीला आली. मात्र १७६१च्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला आणि काही काळ पुण्याची रया गेली. पण थोरल्या माधवरावांनी पेशवाईची विस्कटलेली घडी पुन्हा बसवली आणि नाना फडणविसांच्या बौद्धिक कारवायांमुळे सवाई माधवरावाच्या काळात पेशवा आणि पुणं पुन्हा भरभराटीला आलं. या काळात पुणं वैभवाच्या अत्युच्च शिखरावर होतं. साहजिकच बावनखणीला पुन्हा बहर आला. हा बहर दुस‍‍ऱ्या बाजीरावाच्या काळात चरमसीमेला पोचला. विशेष म्हणजे दुस‍ऱ्या बाजीरावाने शुक्रवारपेठेत आपल्या मौजमस्तीसाठी वाडा बांधल्यावर नंतर स्वतःच्या मर्जीतल्या कलावंतिणींसाठी बावनखणी परिसरात माड्याही बांधल्या. त्याचे अनेक दाखले पेशवे दफ्तरांत सापडतात. त्याच्या स्वदस्तुरची एक नोंद सापडते ती अशी- ‘शुक्रवारचे वाड्यासमोर जागा, घरे आम्ही पूर्वी खरेदी केल्याच आहेत. त्या मोडून सगुणी कलावंतिणीचे घरचे दक्षिणेस व चंद्रीचे घराचे दक्ष‌िणेस व तालीमखाना नवा शुक्रवारचे वाड्यापुढे रस्ता मधी टाकून बांधिला आहे. त्याचे मुकाबिल्यास पूर्व-पश्चिम लांबीचा रस्ता मधी सोडून आम्ही घर बांधून त्यांत कलावंतिणी बि‍ऱ्हाडासारख्या ठेवल्या आहेत. त्या आमच्या घरास साडे नऊ हजार रुपये लागले असत. लौकिकांत ते घर कलावंतिणीचे म्हणवतो. परंतु ते घर आमचे. कलावंतिणीचे नाही.’

या पत्रात पेशवाईतील बावनखणीतील दोन प्रसिद्ध कलावंतीणींची नावं आढळतात. यातली चंद्री नायकीण बाजीरावाच्या खास मर्जीतली होती. दुस‍ऱ्या बाजीरावाच्या विश्रामबागवाड्यातील नाचीच्या दिवाणखान्यात हिच्या नृत्याचे अनेक कार्यक्रम झाल्याच्या नोंदी आढळतात. कुणी पाहुणेमंडळी आली की त्यांच्या पाहुणाचारासाठी चंद्रीचा नाच खास आयोजित केला जायचा.

सगुणी कलावंतीण तर सवाई माधवरावाच्या काळापासून आपली सेवा पेशवे दरबारी रुजू करत होती. सवाई माधवरावाची तिच्यावर बहुधा खास मर्जी होती. त्यामुळेच एका पत्रात तो लिहितो- ‘सगुणी कलावंतीण, वस्ती पेठ शुक्रवार, शहर पुणे, इणे दत्ताजी साबळा दाळिंबकर याजपासून दीडशे रुपयांस चहू वर्षांची एक मुलगी खरेदी केली आहे. तिचे जकातीचा आकार माफ केला असे, तरी आकार होईल तो माफ खर्च लिहून जकातीचा तगादा न करणे...’

पेशवे रोजनिशींतल्या अनेक पत्रांत अशा कैक कलावंतिणींची नावं सापडतात. पण व्यंकट नरसी या नाचीइतकी लोकप्रियता आणि राजमान्यता क्वचितच कुणाला मिळाली असेल. व्यंकट नरसी होती राजनर्तिका. पण तिचंही वास्तव्य बहुधा बावनखणीतच होतं आणि त्याकाळी ती वारांगना म्हणूनच प्रसिद्ध होती. वाड्यात होणारे मोठमोठे उत्सव असोत किंवा निजाम-इंग्रजांच्या प्रतिचनिधींचं स्वागत करायचं असो, अशा वेळी खास व्यंकट नरसीलाच याद केलं जाई. दुस‍ऱ्या बाजीरावाच्या एका पत्रात एका उत्सवसमयी तीन दिवस सतत व्यंकट नरसीचा नाच आणि रामचंद्र गोसावी पैठणकर यांचं गायन झाल्याचा उल्लेख आलेला आहे. तर एका ठिकाणी बाजीरावाने अहोरात्र दोन दिवस नाचवून तिला २६ हजार रुपये बक्षीस दिल्याचीही नोंद सापडते. हिच्या नावासंबंधीही एक हकिकत आहे. हिचं मूळ नाव नरसी. विश्वगुणादर्श ग्रंथाचा कर्ता पंडित व्यंकटाध्वरी याने तिच्या नाचांत काही दोष काढून ते स्वतः तिला समजावले. तेव्हापासून ती स्वतःला पं. व्यकंटाध्वरी यांची शिष्या मानू लागली आणि आपल्या नावाआधी त्यांचं नाव लावू लागली.

मात्र सगुणी असो, चंद्री असो किंवा व्यंकट नरसी असो, त्या कोणत्या प्रकारचा नाच करीत हे उलगडत नाही. त्यामुळेच बावनखणी म्हणजे निव्वळ शेजेची सोय किंवा छचोरपणा, असा आरोप बावनखणीवर नंतरच्या काळात करण्यात आला. गेल्या शंभर-पन्नास वर्षांत शुक्रवारपेठेचा मूळ बावनखणीचा भाग आणि त्याला जोड मिळालेला बुधवार पेठेचा भाग मिळून जो रेड लाइट एरिया तयार झालाय, तो पाहून कुणाला हा आरोप खराही वाटेल. पण त्यात तथ्य नाही. गायन-नर्तन हीच कायम बावनखणीची मिरास राहिली आहे. अगदी सुरुवातीच्या काळात कदाचित बावनखणीतील नाच-गाण्याला डौलदार रूप लाभलं नसेल कदाचित. पण सवाई माधवराव आणि दुसरा बाजीराव यांच्या काळात बावनखणीत लावणीचा शिरकाव झाला आणि बावनखणीने कात टाकली. ती अक्षरशः झळाळून उठली. याचं श्रेय ख‍ऱ्या अर्थाने जातं दुसरा बाजीराव आणि शाहीर होनाजीबाळाला. कारण दुस‍ऱ्या बाजीरावाने उत्तरतेल्या ठुमरी-कजरीसारख्या ठाय लयीतील गाण्याच्या धर्तीवर लावण्या रचायला होनाजीबाळाला सांगितलं आणि त्याने ते शिवधनुष्य पेललं. एकाच सुरात म्हटल्या जाणा‍ऱ्या पारंपरिक लावणीगीताचे सूर होनाजीबाळाने असे काही खेचले की उत्तरेतल्या बैठक की ठुमरीच्या धर्तीवर महाराष्ट्रात बैठकीची लावणी निर्माण झाली. बावनखणीत अवतरलेल्या या लावणीयुगाचं वर्णन दिवंगत संगीतसमीक्षक अशोक रानडे यांनी आपल्या ‘संगीतविचार’ या पुस्तकात विचक्षणपणे केलं आहे. ते लिहितात- लावणीचा उगम जरी १५६० पर्यंत मागे जात असला, तरी उत्तर पेशवाईत लावणी भरभराटली. त्याला होनाजीने लावणीत घडवून आणलेला तांत्रिक व कलात्म बदल कारणीभूत ठरला. हा बदल पुढीलप्रमाणे नोंदवता येईल. होनाजीने ढाल्या स्वरात गाण्याची ढब स्वीकारली. गाण्याची लय ठाय केली. आश्रयदात्याच्या इच्छेनुसार होनाजीने राग-तालांत लावण्या बांधायला सुरुवात केली. लावणीगायनाकरता लय-ताल साथ देण्याकरता तबला वापरण्यावर होनाजीने भर दिला. लावणीगायिकेने खाली बसून लावणी सादर करण्याची प्रथा होनाजीने उचलून धरली. या व यांसारख्या इतर सर्व विशेषांनी बैठकीच्या लावणीच्या रुपास कलात्मकता प्रदान करण्यात सहाय्य केले. खेचली गेलेली लय आणि बसून गाण्याच्या प्रघातामुळे अदाकारी-ठुमरी गायकांनी प्रसृत केलेल्या गायनाबरोबरच अभिनय संभवला.’

एकूण होनाजीबाळाने लावणी कलेचं रंगरूपच पालटून टाकलं. महाराष्ट्रातील गतिमा‌न लावणीला ठुमरीचा भावोत्कट साजबाज चढवला. मग ही बैठकीची लावणी, हेच पुण्यातील बावनखणीचं वैशिष्ट्य ठरली. बावनखणीतील खणाखणांत आणि दिवाणखान्यांत बैठकीच्या लावणीचेच सूर गुंजायला लागले-

अहो भाऊजी मी कोरा माल मुखी विडा लाल

नरम गोरे गाल, वर तीळ झळझळी

जशी फुलली चाफ्याची कळी गं... बाई गं

आणि वर कलावंतिणीची दिलखेचक अदा. बावनखणी नुस्ती गजबजून गेली. होनाजीसकट सारे शाहीर बाजीरावाचे आश्रित. त्यामुळे सा‍ऱ्यांनीच त्याचा अनुनय करण्यासाठी अश्लील लावणीरचना केली. पण बावनखणीतल्या कलावंतिणींनी त्यात आपल्या भावकामाने असा काही रस ओतला की, बैठकीच्या लावणीचं शास्त्रीय घराणंच निर्माण झालं. आज महाराष्ट्रात रुजलेल्या आणि अजून टिकून असलेल्या बैठकीच्या लावणीचं श्रेय बावनखणीलाच द्यायला हवं. पेशवाईच्या अस्तानंतर सारेच शाहीर देशोधडीला लागले. कुणी बडोद्याला गेलं, कुणी ग्वाल्हेर-इंदुर संस्थान जवळ केलं. पेशवाईनंतर पुणं असं सांस्कृतिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेलं असताना फक्त बावनखणीतल्या बायांनीच नानासाहेब पेशवांच्या काळात पुण्यात रुजलेली सांगीतिक मुळं घट्ट पकडून ठेवली.

म्हणूनच बावनखणी म्हणजे एक कलासंस्कृतीच! आणि ती कलासंस्कृती असल्यामुळेच पेशवाई बुडाल्यावर ब्रिटिश अंमल सुरू झाला तरी, बावनखणीची मिजास कमी झाली नाही. संस्कृतीचे ठेकेदार म्हणवणा‍ऱ्यांनी तिला नावं ठेवली. प्रसंगी नाकंही मुरडली. ‘पुणे शहराचे वर्णन’ पुस्तकात, बावनखणी कुणी वसवली याचं वर्णन करणा‍ऱ्या नारायण विष्णू जोशी यांनीच या वस्तीला दुगाण्या देण्याचंही काम केलं आहे. ते म्हणतात-‘शुक्रवारपेठेत दोन रस्ते आहेत. त्यात एक मुख्य रस्ता बावनखणीचा. मागे ज्या बावनखणीविषयी सांगितले आहे, तिजविषयी येथे थोडे लिहिले पाहिजे. ज्या सभ्य खासगीवाल्याने कसबिणींची सोय करून दिली, त्याने सर्वथैव वाईट केले. ह्या भ्रष्ट बायकांची अशी सोय केल्याने दुस‍ऱ्या बायकांस त्याप्रमाणे होण्यास उत्तेजन आले. पूर्वी पो‍ऱ्यांचे तमाशे रस्त्यांत होत, तेणे करून जसा लोकांस त्रास होत होता, तसा किंबहुना त्याहून अधिक ह्या बावन्नखणींकडून होतो, असे म्हणण्यास चिंता नाही.या नाटकशाळांकडे पाहून मुले बिघडतात. त्यांच्या नादी लागतात. येणेकडून पुष्कळ वाईट परिणाम होतात.’

नारायण विष्णू जोशी यांनी आणि त्यांच्याप्रमाणे अनेकांनी या बावनखणीला नावं ठेवली. पण बावनखणी आपलं काम चोख बजावत राहिली. इतरांच्या भोगांनी प्रसंगी स्वतः भ्रष्ट होत संस्कृतीवहन करत राहिली. ती नुस्तीच बाजारबसवी नव्हती. तिच्या ठायी तसं घेण्याजोगं काही नसतं, तर भालाकार भोपटकरांपासून कृष्णशास्त्री चिपळूणकरांपर्यंत अनेकांनी बावनखणीचे उंबरठे झिजवले नसते. मुख्य म्हणजे ग. त्र्यं. माडखोलकर यांच्यासारख्या विद्वान अभ्यासकानेही यासंदर्भात पुण्याच्या रंगेलपणालाच जबाबदार धरलं आहे. त्यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचं छोटेखानी चरित्र लिहिलं आहे. त्यात तत्कालीन पुण्याचं वर्णन करताना माडखोलकर म्हणतात- ‘शास्त्रीबुवांच्या वेळचे पुणे जसे रसिकतेबद्दल तसेच रंगेलपणाबद्दलही विख्यात होते. रावबाजीचे राज्य जरी पुण्यातून गेले, तरी त्याचा रंगेलपणा मात्र मागे राहिला. पुण्यातील सामान्य लोक आणि सुशिक्षित यांच्यात हा रंगेलपणा जवळजवळ सारख्याच प्रमाणात वसत होता. रात्रीच्या वेळी हातात फुलांचे गजरे घेऊन, मशालींच्या झगझगीत प्रकाशात प्रियाराधनार्थ बाहेर पडणे, हे त्यावेळी कमीपणाचे समजले जात नसे. तत्कालीन सुशिक्षितांप्रमाणेच कृष्णशास्त्री चिपळूणकर हेही रसिक तसेच रंगेलही होते. शास्त्रीबुवांचे एक स्नेही आणि शिक्षणव्यवसायातील पहिले वरिष्ठ बाबा गोखले यांची अशी गोष्ट सांगतात की, त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना केव्हा केव्हा आपल्या या गुरुला त्याच्या प्रेमपात्राच्या महालातून आणायला जावं लागत असे.’

या उदाहरणांवरुन बावनखणीला दोष देण्यात किती अर्थ आहे, ते जाणकारांना कळेलच. अर्थात मीनाबाजार काय किंवा बावनखणी काय, नाच-गाणं म्हटलं की तिथे शौकीन रसिकांची चहलपहल असणारच. मग पुढे त्यातून उद्भवणा‍‍ऱ्या परिस्थितीसाठी केवळ बावनखणीला दोष देण्यात काय अर्थ? उलट बावनखणीने जेवढं धरून ठेवता येईल तेवढं गाणं धरून ठेवलं. प्रसिद्ध गायिका बाई सुंदराबाई यांचा दिवाणखाना बावनखणीतच होता. या सुंदराबाईंना प्रसिद्ध गायकनट बालगंधर्व बहीण मानायचे. तसंच पं. भास्करबुवा बखले नियमितपणे सुंदराबाईंकडे त्यांच्या लावण्या ऐकायला यायचे. त्यांच्या लावण्यांच्या चालींवरूनच त्यांनी संगीत मानापमान नाटकातील पदांना चाली लावल्या आहेत. एवढंच नव्हेतर पंढरपूरच्या उत्पात मंडळींनी जपलेल्या बैठकीच्या लावणीच्या अस्सल चीजांचा स्रोत बावनखणीच आहे.

पेशवाईत जन्माला आलेली बावनखणीतली ही नृत्य-संगीतपरंपरा १९६०-६५ पर्यंत कायम होती. कौसल्याबाई कोपरगावकर, गोदावरीबाई पुणेकर, भामाबाई पंढरपूरकर या लावण्यखणींचे दिवाणखाने याच बावनखणीत होते. तबला आणि सारंगीच्या साथीने रोज संध्याकाळी त्यांची बैठकीची तेजपुंज लावणी उगवत होती आणि चंद्राच्या साक्षीनेच मावळत होती. नामांकित तबलिये आणि सतारिये या बायांच्या साथीला दिमाखात बसत होते. प्रसिद्ध दिवंगत संगीतकार दत्ता डावजेकर यांचे वडील गोदावरीबाई पुणेकर यांच्या बैठकीत त्यांना तबल्याची साथ करायचे. खुद्द डावजेकरांनीही लहानपणी भामाबाई पंढरपूरकरांना तबल्याची साथ केली होती.

या अर्थाने बावनखणी संस्कृतीची खाणच होती. यादव काळानंतर तुटलेला महाराष्ट्रातला संगीताचा दुवा जोडून ठेवण्याचं काम खरंतर बावनखणीनेच केलं. पार अगदी बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर उत्तर भारतात संगीताचं शिक्षण घेऊन परत महाराष्ट्रात येईपर्यंत. बाळकृष्णबुवा ख्यालगायकीचं शिक्षण घेऊन आले आणि त्यानंतरच्या काळात महाराष्ट्रात संगीताचं सुवर्णयुग अवतरलं. पण म्हणून बावनखणीला बोल लावण्याचं काम नाही. बानवखणीने मराठी मातीत संगीताची धुगधुग जागती ठेवण्याचं काम नक्कीच केलं. म्हणून तर वामनराव देशपांडे म्हणतात- ‘दुस‍ऱ्या बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीत लावणीगायनाचा उत्कर्ष झाला. पोवाडे रचणारे शाहीर आणि लावण्यांचे अनेक प्रतिभावंत रचनाकार यावेळी निर्माण झाले. पोवाड्यांच्या सुबोध, पण रांगड्या भाषेला अनुसरून लावलेल्या साध्या चालीला खास गायकीत प्रवेश मिळाला नाही. मात्र लावणी या महाराष्ट्राचे वैशिष्ट्य ठरलेल्या गानप्रकारात माफक प्रमाणात का होईना, रागदारीचा समावेश होऊ शकला.’

वामनरावांसारख्या संगीताच्या जाणकाराने ही पावती दिल्यावर तर, बैठकीची लावणी आणि तिला तगवणा‍ऱ्या बावनखणीकडे कुणी नजर उचलून पाहण्याचंही कारण नाही. बैठकीची लावणी ही बावनखणीने उभ्या महाराष्ट्राला दिलेली सांस्कृतिक-सांग‌ीतिक देणगी आहे.

कालौघात माणसं-संस्था काळाच्या पडद्याआड जातात. तसे बावनखणीचेही बुरुज ढासळले. तिच्या आश्रयाला असलेले कलावंत आपल्या प्रतिभेची झलक दाखवत गावोगाव पांगले. मग ज्यांच्याकडे कला नव्हती, अशांनी या पडक्या बुरुजांचा आधार घेतला. त्यांच्याकडे कला नव्हती, तरी शरीर होतं. मग तेच त्यांचं भांडवल झालं. हेही कुणी हौसेने नसेलच करत. पण त्यामुळे बावनखणी मात्र पार बदनाम झाली...

... इतकी की तिच्या आत आता उगवतच नाही, सर्जनाचं एखादं गाणं, एखादं नृत्य. मग उगाचच तिचा शोध घेत फिरावं लागतं. तरीही लागत नाहीच ती हाती. शोधणा‍ऱ्यालाच व्हावं लागतं मग बावनखणी आणि काढावं लागतं तिला पुन्हा बाहेर भूतकाळाच्या गर्भातून... उद्याच्या कलेचं बीजारोपण करण्यासाठी!
(महाराष्ट्र टाइम्सच्या २०१३च्या दिवाळी अंकातील माझा लेख)


बुधवार, १८ मार्च, २०१५

नवी गाणी नवा बाज

मैफलीत आपले गाणे रंगतीने कसे अदा केले पाहिजे, आणि कंटाळा येण्याच्या आधी चीज बंद करण्याचे धोरण कसे राखावे, यासंबंधीचे व्यवहारज्ञान गुरूने शिष्याला दिले पाहिजे. संगीताचा बुद्धीपेक्षा अंत:करणाशी जास्त संबंध असून, संगीतकला ही अंत:करणास रिझवणारी कला आहे, हा मूलभूत सिद्धान्त गुरूने शिष्याच्या मनावर ठसवला पाहिजे. संगीताचा हा मूळ हेतू विसरून नुस्त्या विद्वत्तेच्या नादी जे गायक लागतात, ते श्रोत्यांना व स्वत:ला शीण देतात. संगीताचा हा मूळ हेतू ध्यानी नेहमी वागवला, म्हणूनच महाराष्ट्रात रहिमतखाँ, अब्दुल करीम खाँ, भास्करबुवा बखले, बालगंधर्व, हिराबाई बडोदेकर, सुंदराबाई यांची नावे सर्वतोमुखी झाली आहेत. हे सत्य महाराष्ट्रातील गायक व त्यांचे शिष्य जेव्हा ध्यानात घेतील, तेव्हाच महाराष्ट्रात अस्सल कलावंत निर्माण होतील.
- केशवराव भोळे, अस्ताई, पृष्ठ १९
प्रसिद्ध गायक आणि समीक्षक केशवराव भोळे यांच्या वरील उद्धृतातून हेच सिद्ध होतं की, शास्त्रीय गायक कितीही बुद्धिमान असला आणि शास्त्रीय संगीत कितीही ज्ञानाधिष्ठित असलं, तरी त्याचा मूळ आणि अंतिम उद्देश स्वत:चं नि रसिकाचं मन रिझवणं, हाच असला पाहिजे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र किंवा एकूणच भारतातील संगीत परंपरेकडे पाहिलं, तर निराशजनक दृश्यच दिसतं. निराशाजनक या अर्थी की, रसिकाचं मन रिझवणं किंवा त्याचं मनोरंजन करणं ही गोष्ट आपल्याकडे कधीच स्वीकारली गेली नाही. उलट लोकानुनय किंवा लोकरंजन ही कायम दुय्यम गोष्ट मानली गेली. परिणामी लोकसंगीताचा बाज घेऊन आलेली गाणी सोडूनच द्या, त्याआधी उपशास्त्रीय संगीतप्रकारांत मोडणाऱ्या ठुमरी, कजरी, चैती, दादरा यांसारख्या गायनालाही संगीतातील विद्वत्त परंपरेने नाकारलंच होतं. उपशास्त्रीय गायनाला कोठ्यावरचं गाणं ठरवून, ‘लौंडियोंका गाना हम नही गाते’, असं ख्यालगायक मोठ्या गुर्मीत सांगायचे. केवळ पुरुषगायकच नाही, तर महिलागायकांनीही आपल्या मैफलीत ठुमरी-कजरी गायला ठामपणे नकार दिलेला आहे. जयपूर-अत्रोली घराण्याच्या दिवंगत गायिका गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांनी आपल्या मैफलीत ख्याल सोडून कधीच उपशास्त्रीय प्रकारातलं गाणं गायलं नाही. ही केवळ आपल्या शास्त्रीय गाण्यावरची श्रद्धा नव्हती. तर त्यामागे रसिकाश्रयी आणि रसिकानुनयी गाण्याबद्दल वाटणारी कमीपणाची भावनाही होती. शास्त्रीय सोडून इतरेतर संगीताबद्दल असलेली ही हीनत्वाची भावना, थोड्याफार प्रमाणात आजही कायम आहे आणि ही भावना अगदी परंपरेने चालत आलेली आहे. परंपरेनेच आपले ‘मार्गीसंगीत’ आणि ‘देशीसंगीत’ असे दोन भेद निर्माण केलेले आहेत. या भेदांचं नेमकेपण सांगताना आणि त्यावर टीका करताना प्रसिद्ध दिवंगत संगीतकार आणि सतारवादक भास्कर चंदावरकर ‘वाद्यवेध’ या आपल्या ग्रंथातील ‘भारतीय संगीताची मूलतत्त्वे’ या लेखात म्हणतात — ‘संगीताची उत्पत्ती जर समाजातून होत असेल, तर समाजातील परिवर्तन हे संगीताला बदलायला भाग पाडणार. पण म्हणूनच यातूनच एक मार्ग असा काढण्यात आला आहे की, मार्गीसंगीत म्हणजे फक्त देवांचेच संगीत आणि देशीसंगीत म्हणजे मर्त्य लोकांचे संगीत. देवाने सांगितलेले संगीत किंवा डिव्हाइन म्युझिक अशा अर्थाचे पद त्याला दिल्यानंतर बाकीच्या लोकांचे बोलणेच बंद होते. शिवाय काही लोकांनी अशी उपपत्ती सांगितली आहे की, अनाहत नाद असतो, तेच खरे मार्गीसंगीत. कारण अनाहत नाद सामान्य माणसाला ऐकूच येत नाही! ते संगीत देश-कालानुरुप बदलत नाही, म्हणून ते अबाधित राहते. तसेच काही लोकांचे असे म्हणणे की, मार्गीसंगीत हेच उस्तादी संगीत, खानदानी संगीत; ज्यात बदल फार सावकाश होतात आणि इतर प्रकारचे जे देशी संगीत असते, ते भरभर बदलते. त्यामुळे नियमांनी बद्ध असलेल्या संगीताला खानदानी संगीत म्हटले आहे. थोडक्यात म्हणजे आपण ज्याला शास्त्रीयसंगीत म्हणतो, ते मार्गीसंगीत आणि देशीसंगीत म्हणजे लोकसंगीत. परंतु शास्त्रीयसंगीत बदलत नाही आणि लोकसंगीत मात्र बदलते, ही समजूत कदाचित बरोबर नसावी. कारण नंतर असे लक्षात येते की, लोकसंगीत हे जीवनाशी अत्यंत निगडित असल्यामुळे, ज्याठिकाणी जीवनशैली खूप सावकाश बदलते, त्याठिकाणी लोकसंगीतातील परिवर्तन अत्यंत सावकाश होते. ते कालानुरुप-देशानुरुप बदलत नाही. मग मार्गी आणि देशीत नेमका फरक काय?’
या पलीकडे जाऊन पं. भास्कर चंदावरकर आपल्या या लेखात म्हणतात — ‘प्रत्येक संस्कृतीतील शास्त्रीय अथवा लोकमानसातील संगीत हे फार मोठ्या परंपरेमधून निर्माण झालेले असते. ही परंपरा शेकडो-हजारो वर्षांची असते. त्या परंपरेला हजारो लोकांचा हातभार लागलेला असतो. त्यात वैचारिकता असते, तशीच मोठ्या प्रमाणावर भावनिकता असते. त्या परंपरेमधले संगीत केवळ बुद्धिजन्य नसते, तर त्यातील भावनिक भाग खूप मोठा असतो.’
मात्र आपल्याकडच्या संगीतपरंपरेने आजवर प्रामुख्याने बुद्धिगम्य ते स्वीकारुन भावगम्य ते नाकारलेलं आहे. किंबहुना शास्त्रीय संगीतापासून ते सिनेमासंगीत-नाट्यसंगीत-भावगीतापर्यंत सर्वत्रच आजवर लोकसांस्कृतिक परंपरेतून आलेलं संगीत-गाणं दुय्यम मानलं गेलेलं आहे. कारण हे संगीत किंवा गाणं बहुजन समाजातून किंवा त्याही खालच्या स्तरातून आकाराला आलेलं होतं, काहींच्या नजरेतून ते अभिजात किंवा अभिरुचीसंपन्न नव्हतं.
... म्हणूनच आज जेव्हा अभिजन, बहुजन आणि इतरेतर असा भेद बाजूला सारून सारी तरुणाई
पहिल्या धारंच्या प्रेमानं स्साला कालीज केलाय बाद
ही पोळी साजुक तुपातली हिला म्हावऱ्याचा लागलाय नाद... या गाण्यावर बेफाम थिरकते किंवा गणपतीची मिरवणूक असो वा बर्थ डे पार्टी,
कामावर जायला उशीर झायला, बघतोय रिक्षावाला
गं वाट माझी बघतोय रिक्षावाला... या गाण्याची डिमांड करते, तेव्हा संगीताच्या क्षेत्रातील ती एक मोठी सामाजिक-सांस्कृतिक क्रांतीच ठरते. कारण आतापर्यंत कला आणि रंजन या दोन गोष्टीत कायम भेद करण्यात आला आहे; अजूनही केला जात आहे. कलामीमांसकांच्या दृष्टीने साहित्य, शिल्प, नृत्य, चित्र आणि संगीत या पाच फाइन आर्ट, म्हणजेच ललित कला, याच कला आहेत आणि त्या उच्च दर्जाच्या असतात. तर बाकीची असते ती कारागिरी. एवढंच नाही, तर कलांच्या मागे काही विचार असतो, काही अर्थ असतो, म्हणून त्यांना शास्त्रीय कला असंही संबोधन दिलं जातं. तर याउलट इतर कलांना लोककलांचं लेबल चिकटवलं जातं. शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीतातही हाच फरक केला जातो. मात्र अशोक रानडे यांच्यासारख्या ज्येष्ठ संगीततज्ञानेही हा भेद ठामपणे नाकारला होता. त्यांच्या मते अभिजनांची कला असो, वा बहुजनांची, त्यामागे शास्त्र असतंच. जसे शास्त्रीय संगीत म्हणवल्या जाणाऱ्या संगीतात कुठला राग कधी गायचा याचे कायदे असतात, तसेच लोकसंगीतात कुठल्या ऋतूत कुठली गाणी गायची याचे कायदे असतात. कुठल्याही प्रकारातलं नृत्य असो वा संगीत, जेव्हा ते कधी, कुठे आणि कसं सादर करायचं याचे संकेत ठरलेले असतात, त्यावेळी ते सारं शास्त्रीयच असतं. आज आपण शास्त्रीयसंगीत, लोकसंगीत, आदिवासीसंगीत असे जे भेद मानतो, ते भेद म्हणजे ती संगीताची वेगवेगळी कोटी (प्रकार) आहे. अन्यथा या सगळ्यांमागे काही ना काही शास्त्र आहेच आणि या अर्थाने सगळं काही शास्त्रीयच असतं.
दिवंगत अशोक रानडे यांचा हा सिद्धान्त संगीतक्षेत्राला किंवा गाण्या-बजावण्याला लावला, तर कलाक्षेत्रातील सगळं काही शास्त्रीय ठरायला हवं. पण तसं झालेलं मात्र नाही. कारण ज्ञानाचं कुठलंही क्षेत्र असो, त्यावर कायम मूठभरांचीच मक्तेदारी राहिलेली आहे. उच्च संस्कृती, उच्च कलात्मकता, उच्च आचार-विचार या साऱ्या कल्पना, संकल्पना मूठभरांनीच राबवल्या आणि त्या त्यांच्या सत्तेच्या सोयीसाठी पूरक होत्या. परंतु यातूनच जीवनशैलीपासून कलाशैलीपर्यंत ते थेट अभिरुची-अभिव्यक्तीपर्यंत भेदाभेद निर्माण झाले. याची झळ संगीतक्षेत्रालाही पुरेपूर बसली आणि त्यातूनच अठराव्या शतकाच्या मध्यापासून ते विसाव्या शतकाच्या शेवटापर्यंत शास्त्रीय संगीताच्या मैफली किंवा नाटक-सिनेमातील गाण्यांतून जे संगीत प्रसृत होत राहिलं, ते प्रामुख्याने बुद्धिजीवी आणि मध्यमवर्गीय होतं. त्यात अभिरुचीचा विचार पहिल्यांदा केला जायचा. त्या गाण्यांतले शब्दही जपून वापरलेले असायचे, अगदी अलवार. संगीतही तसंच. उत्फुल्ल, पण भावनांना थोपवून ठेवणारं. भावनांचा कुठेच उद्रेक होऊ न देणारं. एखाद्या घरंदाज पतिव्रतेसारखं. डोळ्यांत अश्रू आले, तरी ते दिसणार नाहीत, याची खबरदारी घेतल्यासारखं. नि:संशय या काळातलं संगीत-गाणी सुंदर होती. रसिक प्रेक्षकांना मांडीवर ताल-ठेका धरायला लावणारी होती. एकाच वेळी दिल खूश करणारी, पण त्याच वेळी भावना आटोक्यात ठेवायला लावणारी होती. जणू एकप्रकारे सामाजिक साधनशुचिता शिकवणारीच ही गाणी होती.
ही साधनशुचिता समाजात इतकी खोलवर झिरपली आणि रुजली की लोकसंगीताचा बाज असलेलं संगीत, गाणी आणि आवाजदेखील बाजूला सारला गेला. फॉर ए चेंज म्हणून कधी तरी या प्रकारातलं गाणं वाजायचं आणि त्याचा आस्वादही सरसकट सगळे दिलदारपणे घ्यायचे, पण या लोकशैलीतील संगीतप्रकाराला समाजमान्यता कधी मिळाली नाही. त्याकडे कायम उच्छृंखल म्हणूनच पाहिलं गेलं. अशा उपेक्षित राहिलेल्या गाण्याचं आणि गायकाचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रसिद्ध गायिका सुलोचना चव्हाण. त्यांनी गायलेल्या सगळ्याच लावण्या गाजल्या. त्यांच्या लावण्यांवर मराठीरसिकांनी भरभरुन प्रेमही केलं. त्यांच्या लावण्या गाजल्या कारण, त्यांचा आवाज लावण्यांतला आशय रसिकांच्या मनात थेट पोचवायचा. ती सुलोचनाबाईंच्या आवाजाची आणि शब्दफेकीची ताकद होती. परंतु अशा लावण्या गायल्यावर थोड्याच कालावधीत लावणीगायिका असा टॅग लावून सुलोचनाबाईंना गाण्याच्या मुख्य प्रवाहातून बाजूला सारलं गेलं. आशा भोसले यांच्याबाबतीत असं झालं नाही, कारण त्यांनी गायलेल्या लावण्या, या लावण्या कमी आणि भावगीत जास्त होत्या. मराठीत जे सुलोचनाबाईंच्या बाबतीत झालं, ते आशाबाईंच्या बाबतीत हिंदीत मात्र होऊ शकलं असतं. साठ-सत्तर-ऐंशीच्या दशकात त्यांनी गायलेली कॅब्रे गाणी हीच त्यांची ओळख बनू शकली असती. कारण सोज्ज्वळ, सात्त्विक आणि उदात्त गाणी गायला लता मंगेशकर होत्याच. पण आशाबाईंनी वेळीच यातला धोका ओळखला. कदाचित, तेव्हा आशाबाईंना ही कॅब्रेची गाणी नाईलाज म्हणूनच गावी लागली असतील. कारण आज जरी त्याचमुळे आपण आशाबाईंना व्हर्सटाइल आवाजाची गायिका म्हणत असलो, तरी साठच्या दशकात या कॅब्रे गाण्यांकडे किती उदात्तपणे पाहिलं जात असेल, शंकाच आहे. किंबहुना त्यावेळी ही गाणी दर्दी किंवा रसिक प्रेक्षकांसाठी नव्हतीच, ती पिटातल्या हुल्लडबाज प्रेक्षकांसाठीच होती. मात्र तेव्हा, ही गाणी गात असतानाच आशाबाई जाणीवपूर्वक वेगळी गाणी गात राहिल्या आणि म्हणूनच टिकून राहिल्या. अन्यथा संगीतातील भेदाभेदामुळे आशाबाईही बाजूला पडल्या असत्या.
संगीतातील हा भेदाभेद एवढा प्रखर होता की, त्यामुळे आपण एक संगीतपरंपराच बाजूला टाकली. अर्थात बाजूला टाकली, म्हणून ती परंपरा नामशेष झाली नाही. ती बहुजनसमाजात-ग्रामीणभागात फोफावत राहिली. तिथे ती आजही तेवढीच लोकप्रिय आहे. प्रल्हाद शिंदे, आनंद-मिलिंद शिंदे, विठ्ठल शिंदे, छगन चौगुले, गोदावरीबाई मुंडे अशी अनेक गायकमंडळी आजही तुफान लोकप्रिय आहेत आणि त्यांनी गायलेली गाणी ग्रामीण जनतेचं मनोरंजन करीत आहेत. उदाहरण देऊनच बोलायचं, तर आजही ग्रामीण भागात सत्यनारायणाची पूजा असली की, लाऊडस्पीकरवर वाजणारं पहिलं गाणं प्रल्हाद शिंदे यांचं — ‘ऐका सत्यनारायणाची कथा’ हेच असतं. या गाण्याची जादू बहुजन समाजाच्या मनावरुन चाळीसेक वर्षांनंतरही उतरलेली नाही. परंतु सत्यनारायणाचं गाणं असूनही अभिजन समाजाने मात्र ते कधीच स्वीकारलं नाही. याउलट ‘अष्टविनायक’ चित्रपटातील दिवंगत पं. वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं ‘प्रथम तुला वंदितो’ हे गाणं मात्र अभिजनांच्या घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवात आवर्जून लावलं जातं. प्रत्यक्षात ग्रामीण भागात, शहरांतील बहुजनांच्या वस्त्यांत लोकप्रिय असणारी कितीतरी गाणी आहेत, परंतु ती मुख्य प्रवाहात कधीच आली नाहीत. कारण ती अभिजनांच्या सोज्ज्वळ अभिरुचीला मानवणारी नव्हती, ती त्यांच्या कलात्मकतेच्या कसोटीला उतरणारी नव्हती; संगीत, संगीतकार, कवी आणि गायक... अशा कुठल्याच पातळीवर.
पण कलात्मकतेची ही कसोटी ठरवली कुणी? तर ती ठरवली बहुश: मध्यमवर्गाने. कारण शिक्षणाने सुशिक्षित झालेल्या (सुसंस्कृत नव्हे) मध्यमवर्गाकडे तोपर्यंत समाजाच्या सर्व क्षेत्राची अधिसत्ता आलेली होती. त्यामुळे साहित्यापासून संगीतापर्यंत सगळीकडे त्यांनी श्लील-अश्लीलतेच्या आणि घरंदाज-बाजारुपणाच्या कसोट्या लावायला सुरुवात केली होती. त्यामुळेच विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत लावणी, नाट्यसंगीत आणि भावगीत एकमेकांच्या हातात हात घालून मार्गक्रमण करत असतानाही नंतरच्या काळात मात्र त्यात फूट पडलेली दिसते. यासंदर्भात अशोक दा. रानडे यांनी आपल्या ‘संगीतविचार’ या पुस्तकातील एका प्रकरणात अतिशय मार्मिक मत नोंदवलंय. ते म्हणतात — ‘१९२० पर्यंत लावणी जोमदारपणे फोफावलेली दिसते. परंतु या लावणीतील अस्वस्थ करणारी बाब अशी की, लावणीची संहिता — म्हणजे तिचे साहित्यिक स्वरूप — नैतिक मूल्यांची घसरण प्रतिबिंबित करते. तर तिचे संगीत मात्र सांगीतिक मूल्यांचा उत्कर्ष दर्शवते. म्हणजे संगीत हे संहितेला लपवत होते, असा अर्थ लावायचा काय? आधीच्या कालखंडात संस्कृत भाषेने अशीच भूमिका बजावली नव्हती काय? अर्थातच विश्लेषण केल्यास असेही लक्षात येते की, सर्वच लावण्या काही अश्लील नव्हत्या. अश्लील रचना करणारे शाहीर तितक्याच कौशल्याने आध्यात्मिक आशयाच्या लावण्याही लिहीत होते. लावणीच्या या कालखंडाशी सरमिसळ करत करत नाट्यसंगीतही अवतरत होते (१८४३ पासून पुढे), नंतरच्या काळात यात भर पडली ती, फोफावलेल्या भावगीत या प्रकाराची (१९३० पासून निदान १९५० पर्यंत). या दोन्ही संगीतप्रकारांनी शरीरविषयक दृष्टिकोनांत (काही अपवाद सोडता) बदल दर्शवला. अर्थात हा बदल हळूहळू लक्षात यावा अशीच त्याची गती राहिली. उदाहरणार्थ संगीत नाट्याच्या आरंभीच्या कालखंडातील ‘पाटणकर संगीत मंडळीं’च्या नाटकांत ‘झगडा’ नामक दंद्वगीताचा प्रकार होता. (विक्रम शशिकला, १८९१, हात मदंगा लावू नका तुम्ही) त्याच्या सादरीकरणात सूचक हालचाली अशा व इतक्या असत की प्रेक्षागृहांत हलकल्लोळ माजे! भावगीतांतही तशी उदाहरणे आहेत. या प्रकारच्या वाटचालींतील १९५०च्या आसपासच्या मधल्या अवस्थेत शरीर व शारीर यांबद्दल आक्षेपार्हतेने, अनिर्बंध रचना असतात म्हणून वादळ उठले होते. श्री. कृष्णराव मराठे यांची एकहाती चळवळ तेव्हाच गाजली होती! कवी मनमोहन यांची ‘कसा ग बाई झाला, कुणी ग बाई केला, राधे सैल तुझा अंबाडा’ ही रचना अश्लील म्हणून टीकाविषय झाली होती. प्रस्तुत आक्षेप का घेतले गेले, हा विचार करण्याचा विषय आहे. याचे उत्तर असे की, या सुमारास नवा मध्यमवर्ग अधिकाधिक बोलू लागला होता व आपल्या आवडी-निवडींना सामाजिक अभिरुचीचे आसन बहाल करण्याचा त्याने प्रयत्न चालविला होता! ही धडपड अर्थातच चिंत्य म्हटली पाहिजे.’
मध्यमवर्गाच्या या दबावतंत्राचा परिणाम असा झाला की, पुढच्या काळात निर्माण झालेलं संगीत सुरेल होतं, पण आव्हानात्मक नव्हतं. अगदी सिनेसंगीतापसून भावगीतापर्यंत हेच पाहायला मिळतं. मराठीतील भावगीतं भावनांचा कल्लोळ उभा करतात, पण त्यात शृंगाररसाला स्थान नाही. तर सिनेमात इथूनतिथून सगळीच प्रेमगीतं. प्रेमातल्या आव्हानाला त्यात जागाच नव्हती. ती जागा किंवा अवकाश मराठीत पहिल्यांदा प्राप्त करून दिला तो, तमाशापटांनी. लावण्या लोकप्रिय होण्याचं महत्त्वाचं कारण हेच होतं की, त्यातून शृंगाररसाची बरसात होत होती. पण या लावणीपटांचा खरा चाहतावर्गही शहरात नव्हता, तो दूर ग्रामीण भागातच होता. कारण शृंगार हा त्यांनी आपल्या जगण्याचाही भाग मानला होता. शहरांतून वास्तव्य करून असलेल्या मध्यमवर्गाला मात्र कायमच शृंगार हा लपवून (तो सार्वजनिक ठिकाणी करणं चुकीचंच आहे) करण्याची बाबच वाटत राहिला. गंमत म्हणजे याबाबतीत मध्यमवर्गाची कायमच गोची झाली. बहुजन समाज जे-जे उघडपणे करतो, ते सारंच आपणही करावं, असं मध्यमवर्गाला कायम वाटत आलेलं आहे. पण संस्कृतीचा बुरखा पांघरल्यामुळे ते त्याला कधीच शक्य झालं नाही. परिणामी आपापसांत कुजबुजत बोलताना सगळे लिंगवाचक शब्द हिरिरीने आणि चवीचवीने वापरायचे, जाहीरपणे बोलताना मात्र तेंडात गुळणी धरायची, अशा दुटप्पीपणे मध्यमवर्ग वागत आला आहे. परंतु यामुळे झालं काय की साहित्यापासून संगीतापर्यंत सगळीकडेच श्लील-अश्लीलवाद सुरू झाला आणि त्यात जे-जे ग्रामीण-खेडवळ-बहुजनांचं ते-ते सारंच कलाबाह्य ठरत गेलं. किंवा त्याचा वेगळा असा प्रवाह निर्माण होत गेला.
याचा परिणाम म्हणूनच मराठी सिनेमासंगीतात लाजरी-बुजरी प्रेमगीतं-भावगीतं रसिकप्रिय होत असतानाच दुसरीकडे सगळ्यात जास्त लोकप्रिय झालेला पॅटर्न कोळीगीतांचा होता. हा पॅटर्नही मध्यमवर्गीय जाणिवांनी थोडा सुधारुन आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. मी डोलकर डोलकर, डोलकर दर्याचा राजा किंवा राजा सारंगा, माझ्या सारंगा ही त्याचीच उदाहरणं आहेत. यातले शब्द कोळीसंस्कृतीतील आहेत. पण यातलं संगीत मात्र भावगीतांशी मेळ खाणारं आहे. त्यामुळेच हृदयनाथ मंगेशकर यांनी अप्रतिम चाली दिलेली ही कोळीगीतं ऐकताना, त्यातल्या संगीताने माना डोलावतात, पण पाय मात्र थिरकत नाहीत. पाय थिरकण्यासाठी —
डोंगराच्या आडून इत बाय चांद उगवला
चांद उगवला नि चांदण्या बघावं निघाल्या....
किंवा
चांदणं चांदणं पीठभर चादणं, चांदण्या रातीचा वारा
या बाजेवर कोण देव निजे गं, कृष्णदेव निजे ग... अन् राधाबाय घालिते वारा... ही अस्सल कोळीवाड्यात निपजलेली कोळीगीतंच लागतात. कारण या गाण्यांत तथाकथितांच्या दृष्टीने सांगीतिक सौंदर्य कमी असेल, एकवेळ, पण भावनांचा निचरा (कॅथॉर्सिस) होण्यासाठी, शरीरातील ऊर्जा बाहेर पडण्यासाठी आवश्यक असलेला ऱ्हिदम मात्र ठासून भरलेला आहे. महाराष्ट्राचं लोकनृत्य म्हणून लावणीबरोबर कोळीनृत्य-संगीताचा गाजावाजा झाला, तो त्यामुळेच. कोळीगीतांच्या या परंपरेने आपली वेगळी वाट कायम वाजती-गाजती ठेवली आणि ती राहिलीदेखील. कारण त्यांच्यात जो जगण्याचा बेछुटपणा-मोकळेपणा होता, तो सिनेमासंगीत किंवा भावगीतांत नव्हता.
मध्यमवर्गीयांच्या संगीताच्या बंदिस्त चौकटीपलीकडे कोळीगीतांचं असं बस्तान बसलेलं असतानाच वीसेक वर्षांपूर्वी आनंद-मिलिंद शिंदे जोडीने धमाल उडवून दिली. त्यांनी द्वयर्थी गीतांचा खजिनाच बाहेर काढला-
आवड मला ज्याची मी त्यालाच आनलं
तुझ्या वं बोलण्याला आता मी मानलं
शेजारची ही काळी मैना लागली डोलायला...लागली डोलायला
जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला... किंवा नव्या वर्षाचं काढू या कॅलेंडर, लावलं रताळं आलंय केळं... या त्यांच्या गाण्यांनी अक्षरश: कल्ला केला. वाडीवस्ती, रस्तोगल्ली हीच गाणी कितीतरी वर्षं वाजत होती. या गाण्यांची लोकप्रियता एवढी होती की, यातलं पोपटाचं गाणं थेट हिंदी सिनेमात घेतलं गेलं. या गाण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या धतिंगपणात केवळ बहुजनच सामील झाले असं नाही, छुपेपणाने का होईना पण पांढरपेशीही सामील झाले होते. त्यांच्यासाठी ते फुल टू धम्माल होतं. त्यांच्यासाठी ही गाणी म्हणजे मनाची-शरीराची वाफ बाहेर काढणारं प्रेशर कुकर होतं.
संस्कृतीच्या, सोज्ज्वळतेच्या, श्लील-अश्लीलतेच्या चौकटी ठरवताना ज्या समाजासाठी आपण हे सारं करत आहोत, त्या समाजाच्या भावनिक निचऱ्याचाही विचार व्हायला हवा. पूर्वीच्या काळी समुद्राच्या-खाडीच्या भरतीचं पाणी सामावून घेण्यासाठी काही जमिनी मोकळ्या सोडलेल्या असायच्या. परिणामी कितीही भरती आली तरी, वाढलेल्या पाण्याचं नीट नियोजन होत असे. अशाच पद्धतीने मनाच्या-शरीराच्या आवेगाचा तोल सावरण्याचं काम लोकसंगीत-लोकनृत्यं करत असतं. परंतु कला आणि सौंदर्याच्या काटेकोर कसोट्या तयार करून आजवर बहुजनांच्या या कलांना गावकुसाबाहेरच ठेवण्यात आलं. त्यातल्या कलेचा शोध घेण्याऐवजी, त्यातली ग्राम्यता, त्यातली अश्लीलता, त्यातला हीनकसपणा शोधून त्याच्यावरच बोट ठेवलं गेलं. पण प्युअर सोन्यातही दागिने घडत नाहीत, दागिन्यांच्या घडणीसाठी सोन्यात थोडं हीन, म्हणजे तांबं मिसळावंच लागतं, हे आमच्या संस्कृतीरक्षकांच्या आजवर कधीच ध्यानात आलं नाही.
... मात्र त्यांच्या लक्षात आलं नाही, तरी काळ त्याच्यापरीने इलाज करतच असतो. सिनेमासंगीतच नाही, तर त्याच्या बाहेरच्या संगीतविश्वात अवतरलेलं नव्या गाण्यांचं, नव्या संगीताचं युग तरी तेच दर्शवतं. एकूणच संगीतविश्वातील आजचं युग नवी गाणी आणि नव्या बाजाचं आहे. नवीन संगीतकार आणि नव्या गायकांचं आहे. विसाव्या शतकातील साठच्या दशकात सिनेसंगीतात मेलडीचं युग अवतरलं ते विसाव्या शतकाच्या अंतापर्यंत जवळपास कायम होतं. ते एकापरीने ठीकही होतं. कारण तोपर्यंत भारतीय मध्यमवर्गीय जीवनशैली संथच होती. परंतु १९९०पासून राबवण्यात आलेल्या आर्थिक उदारीकरणामुळे आणि जागतिकीकरणामुळे नंतरच्या काळात भारतीय जीवनशैली कमालीची वेगवान झाली. या वेगाने पांढरपेशांनाही मुळांपासून हलवून टाकलं. मग मात्र त्यांना आपल्या वेगवान जीवनशैलीशी मेळ खाणारी गाणी हवीहवीशी वाटू लागली. जुनी गाणी आजही त्यांनी ऐकावीशी वाटतात, पण ती वीकेण्ड साजरी करण्याजोगी नक्कीच नसतात. यातूनच आजचा गाण्याचा नवा बाज आकाराला आलेला आहे. कारण तो नवीन जीवनशैलीला साजेसा आहे.
ही नवी गाणी किंवा नवा बाज नेमका काय आहे?
तर गाण्यांचा हा नवा बाज विमुक्ततेचा-उन्मुक्ततेचा आहे. आपल्याला आपल्यापासूनही मुक्त करणारा आहे. अगदी हिंदी-मराठी गाण्यातला ट्रेण्ड बघा — बहुतेक सगळी गाणी ही ‘धिंगाणा गाणी’ आहेत. त्यांतले शब्द जरा जास्तच थेट आहेत, किंवा निरर्थक तरी! पण त्यांचं संगीत जे आहे, होष उडवणारं आहे. ते ऐकणाऱ्याला स्वस्थ बसूच देत नाही. विजेचा करंट लागल्यावर जशा झिणझिण्या येतात, तशाच झिणझिण्या हे संगीत, ही गाणी ऐकून येतात. ही झिंग केवळ गाणी किंवा संगीताचीही नसते, ती थोडीशी आवाजाचीही असते. मराठीत ऊर्मिला धनगर, रेश्मा सोनवणे किंवा हिंदीत अलीकडे रेखा भारद्वाजच्या आवाजात अशी झिंग आहे. आजवर सुरेल आवाज, हीच गायकांसाठीची पहिली अट असायची. त्यात थोडा बेसचा आवाज असलेले, किंचित जाड आवाज असलेले मारलेच जायचे. पण आता वेगळा आवाज, आवाजाची वेगळी क्वालिटी हा गायक-गायिकांचा प्लस पॉइंट ठरू लागला आहे. ऊर्मिला धनगरने ‘फेरारी’ चित्रपटात गायलेली ‘मला जाऊ दे...’ ही लावणी म्हणूनच हीट्ट होती. त्यात ऊर्मिलाच्या आवाजाचा जो लगाव होता, तो जबरदस्त होता. तसंच टाइमपास सिनेमात रेश्माने गायलेलं ‘ही पोळी साजूक तुपातली, हिला म्हावऱ्याचा लागलाय नाद’ हे हळदीचं गाणं बेभान करणारं होतं. त्यात रेश्माचा काहीसा किनरा आणि खेचलेला आवाज करामत करून जातो. रेश्माच्या आवाजाची हीच ताकद आहे. टाइमपासमधल्या या गाण्याच्या आधी रेश्माने गायिलेली ‘नाखवा जंजिरा दाखवाल का’ किंवा ‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’ या गाण्यांच्या लोकप्रियतेमागेही हीच, आवाज आणि बेभान संगीताची ताकद आहे. अगदी रेखा भारद्वाजचं ‘देढ इश्किया’मधलं ‘हमरी अटरिया पें आवो सावरिया, जोराजोरी बलम हुई जाए’ गाणं घ्या किंवा त्याआधीचं तिचं ‘जुबाँ पे लागा लागारे, नमक इश्क का’ हे गाणं घ्या, ही दोन्ही गाणीही गाजली ती, लोकसंगीताचा बाज असलेलं संगीत आणि तिने लावलेला बेसचा आवाज यामुळेच.
एवढंच नाही, तर अलीकडे आयटम साँग म्हणून जे फॅड आलंय, त्याकडेही निव्वळ ‘फॅड’ म्हणून दुर्लक्ष नाही करता येणार. सिनेमातील गोड सुरांच्या सुरावटीला थोड्या (खरंतर जास्त) लाऊड लोकसंगीताच्या मोकळ्याढाकळ्या बाजाच्या आयटम साँगची फोडणी द्यावीच लागते. कारण ती आयटम साँग आजच्या वेगवान जीवनशैलीची ‘गरमी’ बाहेर काढतात. समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने ते गरजेचंच असतं. पूर्वीच्या काळी हेच काम सिनेमातील कॅब्रेगीतं करायची. पण त्यांकडे काहीशा उपेक्षेनेच पाहिलं गेलं. लताबाईंनी म्हणूनच कॅब्रेगीतं (एखादं अपवाद करता) गायली नाहीत. पण आजवर दडपलेला हाच सूर, दडपलेला हाच आवाज, आता सिनेमा किंवा एकूणच संगीतविश्वाचा महत्त्वाचा घटक झाला आहे. आजच्या पिढीची, वेगळ्या आवाजाची आणि वेगळ्या संगीताची गरज-भूक, हे आतापर्यंत दडपलेले आवाज आणि संगीतच करत आहे. तोच आजचा नवा बाज आणि नवा ढंग आहे. आता या लोकशैलीच्या बाजाला अपेक्षेने किंवा आशेने उच्चभ्रूंच्या संगीताकडे पाहावं लागत नाही. कारण आज तेच लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार झालेलं आहे आणि या लोकप्रियतेने अभिजन व बहुजन असा भेदाभेदच मिटवून टाकला आहे. ही लोकप्रियता केवळ आभासी नाही, आणि अल्पकाळाचीही नाही. ती टिकाऊ असेल, कारण हे आजच्या जीवनशैलीला साजेसं असं जीवनसंगीत आहे.
अर्थात आजच्या गतिमान जीवनशैलीला साजेसं आहे, म्हणून सदासर्वकाळ कुणी हेच संगीत गात किंवा ऐकत बसेल असं नाही. काळ, वेळ आणि परिस्थिती या सगळ्याशी संगीताचंही नातं जुळावंच लागतं. कामाच्या ठिकाणी कुणी धतिंग गाणी लावणार नाही, तिथे बॅकग्राऊंडला मंद म्युझिकच लागतं. कारण ते ऐकणाऱ्याला आतल्या आत शांत करत जातं. एकाग्र करतं. पण जेव्हा शरीरात साठलेली ऊर्जा बाहेर टाकायची असते, तेव्हा धतिंग गाणीच लागतात. ऊर्जेचं हे उत्सर्जन आवश्यक असतं.
खूप काळाने संगीतविश्वाला मोकळेपणाचा मार्ग गवसला आहे. खरंतर तो आजवर होताच, पण संगीताच्या उच्च-नीचतेच्या कल्पनांनी हा मार्ग काहीसा बुजला होता, अलक्षित राहिला होता. आज तो पहिल्यांदा मोकळा होतो आहे, तो आजच्या पिढीचा बाज ठरला आहे.
... आणि संगीत किंवा कुठलीही कला ही सगळ्यात आधी ‘कला’ असते, मग ती कुठल्याही समाजाची का असेना! कारण भावनांच्या अभिव्यक्तीतूनच तर या कला जन्माला आलेल्या आहेत. भावना वेगवेगळ्या माध्यमांतून अभिव्यक्त करता येणं, ही निसर्गाची मानवाला मिळालेली सगळ्यात मोठी देणगी आहे. मग तिला छोटी-मोठी किंवा उच्च-नीच ठरवणारे आपण कोण? स्थल-काल सापेक्षतेनुसार त्यात काही बदल होणं, स्वाभाविक आहे. तसंच एकाच काळात, एकाच सांस्कृतिक अवकाशात वेगवेगळे प्रवाह निर्माण होणंही साहजिकच आहे. त्यामुळेच एकीकडे भावनांच्या जोरदार प्रकटीकरणाचा उत्सव सुरू असताना दुसरीकडे ‘ओ कबीरा मान जा’, ‘इकतारा इकतारा’... यांसारखी गाणी जीवनाचं काही तत्त्वज्ञान सांगू पाहत आहेत. या गाण्यांत उत्तम संगीत आहेच, पण त्याचवेळी मनाला शांत करणारं, रिझवणारंही काहीतरी आहे. मात्र या गाण्यांतलं तत्त्वज्ञान-आशय मनाला उदास करत नाही, उलट जगण्यासाठी आवश्यक असलेली एक वेगळीच ऊर्जा देतं.
संगीताच्या-भावनेच्या जल्लोषाचा नवा बाज आजच्या पिढीला बहिर्मुख करत आहे, त्यांना व्यक्त व्हायला मदत करत आहे. त्याचवेळी संगीताचा संयमी आणि तात्त्विक बाज मात्र आजच्या पिढीला अंतर्मुखही करत आहे. 
आजच्या पिढीला या दोन्ही बाजांची सारखीच गरज आहे!
(माझा हा लेख मूळ ‘कालनिर्णय २०१४’च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे.)