गुरुवार, ११ मे, २०१७

किशोरी आमोणकरांच्या जाण्याच्या निमित्ताने...

किशोरीताईंकडे कलावंत म्हणून न पाहता सामान्य व्यक्ती म्हणून पाहिलं असतं, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील काही अगम्य पेड कदाचित सोडवता आले असते आपल्याला. ती संधी आपण आता गमावलेली आहे. आता मोगुबाई नाहीत, किशोरीताईं नाहीत आणि त्यांच्या आयुष्याला वेढून उरलेली वेदनाही नाही मनात येतं, ही वेदनाच त्यांचं गाणं होऊन अवतरली होती का?

(मुक्त शब्द मासिकाच्या मेच्या अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख.)




कोणत्याही कलावंताचं मूल्यमापन त्याच्या कलेच्या संदर्भात होणं साहजिकच आहे, परंतु त्याचबरोबर ते एकूणच सामाजिक-सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात होणंही तितकंच गरजेचं आहे. शेवटी कलावंत हादेखील एक सामाजिक प्राणीच आहे. सर्वसामान्यांच्या वाट्याला जशी भौतिक सुखदुःखं येतात, तशीच ती कलावंताच्या वाट्यालाही येतात. या सुखदुःखाने सर्वसामान्य जसा कधी खूप आनंदित होतो, तर कधी गळाठून जातो. क्वचित कधी असीम वेदना त्याच्या मनाच्या खोल गर्भगृही वास करुन राहते, आणि ती तो आयुष्यभर वागवत राहतो, कुरवाळत राहतो. कधी प्रेमाने, कधी दुःखी-कष्टी होऊन. तर कधी त्या वेदनेलाच बनवतो, तो आपली ताकद. कलावंताचंही अगदी असंच असू शकतं. परंतु त्याच्या ‘कलावंत म्हणून असलेल्या कवचकुंडलांपलीकडच्या सत्याकडे, वास्तवाकडे आपण सहसा पाहत नाही. परिणामी गमावून बसतो एक संधी, कलावंताच्या आतल्या सर्वसामान्य माणसाला भेटण्याची... जी आता कायमची हुकलेली आहे, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या संदर्भात...!
किशोरी आमोणकर जयपूर-अत्रोली घराणं आणि त्या घराण्यापल्याडचंही संगीत कोळून प्यायल्या होत्या. ‘मी म्हणेन ते संगीत’ असा रुतबा त्यांनी आपल्या संगीत तपश्चर्येने प्राप्त केला होता. संगीत हे ‘संगीत’ आहे, अन् ते घराण्यांच्या पल्याड आहे. गडुतून गंगेचं पाणी आणून ते देव्हाऱ्यात ठेवलं म्हणून गंगाच घरात आणली असं कुणी म्हणू नये, असं त्या सांगत. एखादा राग गाताना माझ्या मनात जो भाव निर्माण होतो, तोच जर रसिकाच्याही मनात निर्माण होत असेल तर माझं संगीत खरं, असं त्या म्हणत आण‌ि या ही पलीकडे जाऊन शास्त्रीय संगीत हे भावसंगीत कसं आहे, ते त्यांनी ‘स्वरार्थरमणी’ पुस्तक लिहून सिद्ध केलं. संगीत हाच त्यांचा ध्यास आण‌ि श्वासही होता. त्यातूनच उभं केलं त्यांनी आपल्या संगीताचं अपूर्व मायाजाल नि दिपवून टाकलं अखिल संगीतविश्वाला परंतु संगीताच्या या अलौकिक दुनियेत स्वतः रमताना आणि रसिकांना रमवताना त्यांनी रिचवले होते, असंख्य कडुजार पेले. म्हणूनच संगीताच्या बरोबरीने या कडू विषाचाही दंश होत राहिला कधी कधी रसिकाला-समाजाला. त्यावरुन 'चिडखोर', 'विक्षिप्त', 'हेकट'... अशी काय काय विशेषणंही मिळाली त्यांना. अर्थात त्यांच्या अलौकिक गाण्यापुढे सगळेच शरण होते. नतमस्तक होते. त्यामुळे किशोरीताईंच्या हृदयाच्याही अंतहृदयाला काय बोचतंय, हे कधी कुणीच पाहिलं नाही. परिणामी किशोरीताई थोर गायिका म्हणून आकळल्या. पण कलावंताच्या पलीकडे, एक व्यक्ती म्हणून त्या कायम अगम्यच राहिल्या. मात्र त्यांच्या या व्यक्तित्वाचाच शोध सामाजिक-सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात घ्यायला गेलं की, या थोर गायिकेला आयुष्यभर काय सलत होतं ते उमगतं. एवढंच नाही तर त्या संशोधनातून तथाकथित उच्चभ्रू समाजाची अतिशय घाणेरडी बाजू समोर येते आणि मन विदीर्ण होतं...

... याची सुरुवात होते, माईंपासून म्हणजे किशोरीताईंच्या आई आणि गुरू गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांच्यापासून. मोगुबाईंचा जन्म १९०४चा. गोव्यातील कुर्डीचा. त्यांच्या घरात परंपरेनं आलेलं संगीत होतं. तरीही छोट्या मोगुचा आवाज अलौकिक नैसर्गिक देणगी घेऊन आला आहे, हे त्यांच्या आईला, म्हणजे जयश्रीबाईंना उमगलं आणि त्यांनी मोगुबाईंना शास्त्रीय ढंगाचं गाणं शिकवण्याचा ध्यास घेतला. त्यासाठी गावोगाव भटकत राहिल्या. परंतु मोगुबाई दहा-बारा वर्षांच्या असतानाच जयश्रीबाई वारल्या. त्यानंतर मोगुबाईंची मावशी त्यांच्या पाठीशी ताठ कण्याने उभी राहिली आणि आपल्या भाचीला शास्त्रोक्त संगीताचं शिक्षण मिळावं, म्हणून तिला घेऊन गोवा-सांगली ते थेट मुंबईभर भटकली. या भटकंतीत चिंतुबुवा गुरव, लयभास्कर खाप्रुमाम पर्वतकर यांच्यापासून ते जयपूर घराण्याचे हैदरखाँ आणि अल्लादिया खाँसाहेब यांच्यापर्यंत थोर थोर गवयांची तालीम मोगुबाईंना मिळाली. या सर्व संगीतशिक्षकांनी दिलेल्या तालमीचं मोगुबाईंनी सोनं केलं. आपल्या शास्त्रपूत गायकीकडे कुणी जराही बोट दाखवू नये, म्हणून त्या कधी साधी ठुमरी-दादराही गायल्या नाहीत. केवळ ख्याल आणि ख्यालाचाच ध्यास घेतला. आपल्या मुलायम आणि चपळ आवाजाने त्यांनी गानरसिकांना दिपवून टाकलं. नव्हे संगीत शिक्षणासाठी एखाद्या तापसी प्रमाणे असिधाराव्रत केलं, त्यामुळे रसिकांनीच त्यांना गानतपस्विनी ही पदवी दिली. गोव्यातील एका छोट्या  गावात जन्मलेली मोगु, आपल्या गानतपस्येने गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर झाल्या...



... पण त्याने फरक काय पडला? त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेत काही बदल झाला? मुळीच नाही. जयपूर-अत्रौली घराण्याच्या नामवंत गायिका म्हणून नाव कमावल्यावरही, गोव्यातील तथाकथित भद्र समाजासाठी, देवळांमध्ये महाजनपद मिरवणाऱ्यांसाठी त्या नुस्त्या 'मोगु'च राहिल्या. जत्रेत-उत्सवात देवासमोर गायन-नर्तन करणाऱ्या कलावंत समाजातली निव्वळ एक मुलगी - मोगु. अन् तसं दाखवून देण्याची एकही संधी या भद्र मंडळींनी सोडली नाही. देशासाठी-जगासाठी असशील तू कदाचित गानतपस्विनी मोगुबाई, पण आमच्यासाठी फक्त - मोगु!
खरंतर परंपरेने लादलेल्या या शृंखला तोडण्यासाठीच जयश्रीबाईंनी आपल्या लेकीला शास्त्रीय संगीत शिकवण्याचा ध्यास घेतला होता. देवासमोर-महाजनांसमोर मनोरंजनपर काही न गाता तिने विद्वत्तापूर्ण गाणं गाऊन नावलौकिक कमवावा, अशीच त्यांची इच्छा होती. आईची ही इच्छा, तसंच गाणं आणि नाव कमावून मोगुबाईंनी पूर्ण केली. परंतु मोगुबाई समाजाची मानसिकता बदलवू शकल्या नाहीत. देवावर श्रद्धा असल्यामुळे त्या आयुष्यभर गोव्याला जात राहिल्या आणि देवासाठी म्हणून आपलं उच्च कोटीचं शास्त्रीय गाणं त्याला ऐकवत राहिल्या; पण सोबत,  गोव्याच्या मंदिरांत आणि समाजातही सत्तास्थान असलेल्या गौड सारस्वत समाजातील महाजनांकडून त्यांना कायम अवहेलनाही सहन करावी  लागली.
आपल्या ऋजु स्वभावामुळे माईंनी या वेदनेचा साधा हुंकारही कधी कुणाला जाणवू दिला नाही. आपलं प्राक्तन म्हणून त्यांनी ते स्वीकारलं. मात्र आयुष्यभर उन्हाचे हे चटके सहन केल्यावर वयाच्या पंच्याहत्तरीत त्यांनी फक्त एकदाच हे दुःख समाजासमोर उगाळलं. नादब्रह्मवादिनी झाल्यानंरही हा उच्चवर्णीय समाज आपल्याला अंगणात उभं करुन करवंटीतून चहा देतो, तारा-मोगु-केशर अशा एकेरी नावाने संबोधतो याबद्दल त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. त्यांच्या पंच्याहत्तरी निमित्ताने गोव्यातील ‘गोमंतक’ दैनिकाने त्यांच्याकडे दिवाळी अंकासाठी लेखाची विचारणा केली होती. त्या लेखासाठी वामन राधाकृष्ण यांच्याकडे बोलताना पहिल्यांदाच माईंनी आपलं मन मोकळं केलं होतं. त्या लेखातले काही दाखले दिले, तर कदाचित आज शरमेने आपल्यालाच मान खाली घालावी लागेल!

दाखला - १
- मी गोव्याला गेले असताना कुर्प्याचा एक माणूस आला आणि म्हणाला कार्यक्रमाचे बोलावणे आहे, येणार का?
मी म्हटले येऊ की... मानधन किती देणार?
तो म्हणाला - पन्नास रुपये देतील.
मी मनात म्हटले, ठीक आहे. गोव्यातील गोव्यात पन्नास रुपये काही वाईट नाही. मी ठरल्याप्रमाणे साथीदारांबरोबर पोचले. तिथे गेल्यावर त्यांनी आमचा आदरसत्कार काय करावा? त्यांनी मला गायला बोलावले, पण मी अंगणात उभी. कुणी तरी आत जाऊन सांगितले- ‘मोगू आली आहे.’
माझ्या कानाला कसेसेच झाले, नुस्ते मोगू ऐकून. पण मी गप्प राहिले. मग चहा-कॉफी काय घेणार अशी विचारणा झाली. मी म्हटले काय द्याल ते.
थोड्या वेळाने चहा आला, पण नारळाच्या करवंटीतून. मी करवंटी बाजूला सारली.

दाखला - २
- आणखी एक प्रसंग मला आठवतो. गावाला गेले की, कमल नावाच्या मैत्रिणीशी मी गप्पा मारत बसत असे. एकदा अशीच कमलबरोबर घराच्या सोप्यात गप्पा मारत बसले होते. संध्याकाळची वेळ होती. एक महाजन तिकडून पाणवठ्यावर आंघोळ करायला गेला. आम्ही पान खात गप्पा मारत होतो. त्या महाजनाला जाताना पाहून कमल जागेवरुन लगेच उठायला लागली. मी तिला उठू दिले नाही. आमच्या घरात आम्ही बसलो आहोत, मग महाजन रस्त्यावरुन जाताना आम्ही कशाला उठायचं? झालं, त्यांनी लगेच दत्तूदादाला बोलावून घेतलं आणि म्हटलं- काय रे तुझी ती भाची, तिला मस्ती आलीय का? आम्ही पाणवठ्यावर जात होतो, तरी तुझी भाची जागेवरुन हलली नाही.

दाखला - ३
- एकदा मी आजारी असताना माझे मावसे सालेलकर यांनी सांग्याच्या देवाला नवस केला होता. त्यांची  माझ्यावर मुलीसारखी माया होती. बरी झाल्यावर ते मला म्हणाले की, तुला नवसाप्रमाणे देवासमोर गायला हवे. मी म्हटले ठीक आहे. ठरल्याप्रमाणे आम्ही गायला गेलो. पण आम्हाला बसायला जागा दिली मंदिराच्या खाली. महाजन वर चौकीवर बसले होते. मोठ्या लोकांनी वर बसायचे आणि आम्ही खाली बसून गायचे, हे मला आवडले नाही. मी म्हटलं बाप्पा हे काय? देव तिथं, लोक तिथे आणि मी इथे? महाजन बसलेत तिथे बसून गाईन मी. त्यावर महाजन लगेच म्हणाले- तसं गाता येणार नाही. लेव्हल सारखी होईल... अशा या  लेव्हलच्या गोष्टी अनुभवून अनुभवून तिटकारा आलाय मला या लोकांचा...   



मोगुबाईंनी वामन राधाकृष्ण यांच्याशी मारलेल्या गप्पांत अशा अनेक लेव्हलच्या गोष्टी सांगितल्यात खरंतर. महाजनांचे हे अनुभव मोगुबाई लहानपणापासून घेतच होत्या. परंपरेनं आपल्या समाजाच्या वाट्याला आलेले भोग त्यांनी, त्यांची आई-आजीनेही भोगलेच होते. परंतु आश्चर्य याचं वाटतं की, गोव्याबाहेर पडून परिस्थितीशी संघर्ष करत मोगुबाईंनी शास्त्रीय गायिका म्हणून एवढी ख्याती मिळवली, त्याचं मोल या भद्र महाजनांना काहीच नव्हतं?
याचं उत्तर तेव्हा आणि कदाचित आताही बहुधा ‘होय, असंच असावं. कारण गोव्यातील धर्म आणि संस्कृतीकारणावर वर्चस्व असलेली मंडळी अजूनही तीच आहेत. गोव्यातील नामांकित श्री शांतादुर्गा, श्री मंगेशी देवस्थानं काय किंवा गावागावांत असलेली मंदिरं काय, प्रत्येक ठिकाणी आजही गौड सारस्वत समाजाचंच वर्चस्व आहे आणि प्रत्येक ठिकाणी परंपरांचं पूर्वीचंच सोवळंओवळं आहे. तेव्हा, अगदी कोकणस्थ ब्राह्मणांनाही आपल्यापेक्षा कमी लेखणाऱ्या या गौड सारस्वत समाजाने पूर्वी आपल्याच गावरहाटीतल्या इतर समाजबांधवांवर परंपरांच्या नावाखाली किती धार्मिक-सांस्कृतिक अत्याचार केले असतील, त्याची कल्पनाही न केलेली बरी... वर हे अन्याय-अत्याचार कुणाकडे सांगण्याचीही सोय नव्हती. कुंपणच शेत खायला लागल्यावर तक्रार करणार तरी कुणाकडे?  
वास्तविक हे अनुभव फक्त मोगुबाईंच्याच वाट्याला आलेले नाही. देवाच्या मनोरंजनासाठी गायन-नर्तन करणाऱ्या कलावंत समाजातील स्त्री-पुरुष सर्वांच्याच वाट्याला हे भोग आलेले आहेत. परंतु प्रत्येकानेच ते विधिलिखित म्हणून स्वीकारले. प्रसिद्ध कवी बाकीबाब ऊर्फ बा. भ. बोरकर यांनी त्यांच्या चरित्रपर पुस्तकात लयभास्कर खाप्रुमाम पर्वतकर यांच्यासंबंधी लिहिलेला अनुभव या दृष्टीने पाहण्यासारखा आहे. बोरकर लिहितात- ‘अद्वितीय तालज्ञ म्हणून भारतभर पर्वतकरांचे नाव झाले होते. पण आमच्या गोव्यात मात्र ते खाप्रू. असोळड्याला माझ्या आतेच्या घरी त्यांना पंगतीपासून लांब पत्रावळीवर वाढलेले मी पाहिले होते. जेवण उरकल्यावर पत्रावळ उचलून तिथे शेणगोळा फिरवतानाही मी त्यांना पाहिले होते. कलावंत म्हणून त्यांची थोरवी असोळडेकर मंडळींना अमान्य होती असे नव्हे. पण ते चंद्रेश्वराचे महाजन, तर खाप्रूमाम देवळी. त्यामुळे परंपरेने त्यांच्या वाट्याला ही अशी अपमानास्पद वागणूक आलेली. मला लहानपणापासून या गोष्टीची चीड होती. मी ही परंपरा मोडण्याचे ठरवले...’
बाकिबाबनी नंतर खाप्रुमाम पर्वतकरांचा गोव्यात मोठा सत्कार घडवून आणला, अर्थात त्यामुळे अनेक महाजनांच्या कपाळावर आठ्या उमटल्या. परंतु त्या कुणाची पर्वा न करता, बाकिबाबनी नंतरच्या काळात अशा कैक जुन्या चालीरीतांना फाटा दिला. बाकिबाबनी उल्लेखलेली ही घटना १९३५-४०च्या आसपासची आहे. पण एवढ्या वर्षांनंतरही गोव्यातील देवस्थानांच्या महाजनांच्या मानसिकतेत काही फरक पडलाय का शंकाच आहे. कारण पस्तीसेक वर्षांपर्यंत तरी गोव्यातील देवस्थानांच्या प्रथापरंपरा जुन्याच पद्धतीने सुरू होत्या. १९७०च्या दशकात ‘श्री शांतादुर्गा चतुःशताब्दी महोत्सव ग्रंथ प्रसिद्ध झाला होता. त्यातील देवतेच्या उत्सवाचा साग्रसंगीत जामानिमा वाचताना, सगळ्या परंपरा तशाच कायम असल्याचा दाखला मिळतो. देवस्थानाची माहिती देताना महाजनांपासून देवाच्या पालखीसमोर गाणाऱ्या-नाचणाऱ्यांपर्यंत सगळ्या नोंदी या पुस्तकात आहेत. या पुस्तकात अ. को. प्रियोळकर, रा. भि. गुंजीकर यांच्यापासून ते डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर, विठ्ठल सदाशिव सुखठणकर यांच्यापर्यंत सगळ्या महान 'सारस्वतां'चे लेख आहेत. सगळ्यांनी सारस्वत समाज, त्यांच्या देवदेवता आणि मठांचं गुणगायन केलं आहे. पण त्या देवस्थानांतून चालणाऱ्या वाईट प्रथांबद्दल किंवा इतरांना देण्यात येणाऱ्या हीन वागणुकीबद्दल मात्र कुणी साधा ब्रदेखील उच्चारलेला नाही.
तो ब्र उच्चारण्याची आणि प्रत्यक्षात आणण्याची हिंमत मोगुबाईंनी दाखवली. १९७९ साली ‘गोमंतक’मध्ये मोगुबाईंचा हा लेख प्रसिद्ध झाल्यावर गोव्यातील देवस्थानांमध्ये काय हलकल्लोळ माजला असेल, हे कळायला आता मार्ग नाही. परंतु गहजब तर झालाच असेल. कारण आजवर ज्यांना केवळ आपल्या इशाऱ्यांवर नाचवलं होतं, अशा समाजातील कुणी तरी महाजनांच्या विरोधात प्रथमच तोंड उघडलं होतं. महत्त्वाचं म्हणजे माई आता गोव्याच्या कह्यात राहिलेल्या नव्हत्या. गोवा जन्मभूमी असली, तरी मुंबई-महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी होती. याहून अधिक म्हणजे भारत सरकारने पद‌्मविभूषणसारखा किताब देऊन त्यांचा नागरी सत्कार केला होता. म्हणजे एका परीने त्या राष्ट्राचा सांस्कृतिक वारसा होत्या. त्यामुळे मोगुबाईंसारख्या ज्येष्ठ गायिकेने दिलेल्या कानपिचक्या सहन करण्यावाचून महाजनांपुढे दुसरा पर्याय नव्हता.
पण माईंचाही एकसारखी तीच तीच गोष्ट उगाळण्याचा स्वभाव नव्हता. झालं गेलं गंगेला मिळालं म्हणायचं अन् पुढे चालू पडायचं हा माईंचा स्वभाव. सोस सोस सोसायचं आणि काळाच्या पडद्याआड ढकलून द्यायचं हा माईंचा खाक्या म्हणजे पुन्हा स्वच्छ-नितळ जगायला आपण मोकळे! शेवटी क्षमाशील असणं, हे बुद्धाचं तत्त्वज्ञानच सगळ्यात भारी असतं हे माईंना उमगलेलं होतं, बहुधा! पण तेच त्यांच्या लेकीच्या म्हणजे किशोरीताईंच्या आवाक्यातलं नव्हतं. त्या कायम अस्वस्थ राहिल्या, आपल्या माईला उच्चभ्रू समाजाने दिलेल्या वागणुकीमुळे. तो विषय निघाला की त्यांचा अगदी संताप संताप व्हायचा. रागाने थरथरायच्या. कारण माईंनी घेतलेले हे अनुभव त्यांनी फक्त वाचले वा ऐकलेले नव्हते, प्रत्यक्षात अनुभवलेही होते.
माईंच्या आयुष्यातील वरील कटू दाखले १९४०-५०च्या दशकातले आहेत. त्या काळात किशोरीताई दहा-पंधरा वर्षांच्या होत्या आणि त्या सतत माईंबरोबर असायच्या. साहजिकच माईंना आलेल्या कितीतरी भयानक अनुभवांच्या त्या स्वतः साक्षीदारही होत्या. केवळ साक्षीदार नव्हे, माई म्हणजे किशोरीताईंचं अभिन्न अंगच. मायलेकींचं हे अभिन्नत्व किती? तर एकीला लागलं, तर पाणी दुसरीच्या डोळ्यांत इतकं! त्यामुळे माईंच्या वेदना-कळ किशोरीताईंनीही सोसल्या होत्या. आधी विद्या शिकण्यासाठी माईला करावा लागलेला संघर्ष आणि महत्प्रयासाने विद्या मिळवून नावारुपाला आल्यानंतरही तथाकथित उच्चवर्णीयांकडून वाट्याला आलेले हे अनुभव... हे सारं किशोरीताईंना कधीच विसरता आलं नाही. अजाणत्या वयात समाजातल्या ज्या भीषण वास्तवाला त्यांना सामोरं जावं लागलं, त्याचं त्यांना कधीच विस्मरण झालं नाही. त्यांची ती जखम कधीच बुजली नाही, त्यांनी ती बुजूही दिली नाही. वरवर खपली धरल्यासारखी वाटायची. पण एकीकडे संगीताचा अखंड झरा जसा वाहत असायचा, तसाच दुसरीकडे या तथाकथित उच्चभ्रू समाजाबद्दलचा राग पाझरत असायचा. परिणामी समाज आणि आपण यात किशोरीताईंनी एक अदृश्य भिंतच उभी करुन टाकली कायमची... कधीही न तुटणारी! 
किशोरीताईंच्या स्वभावातली कटुता अशी पूर्वानुभवांतून आलेली होती. ही कटुता कधीच संपली नाही, किंबहुना त्यांनी संपू दिली नाही. कारण ही कटुता विसरणं, म्हणजे त्यांच्यासाठी माईंचा झालेला अपमान विसरणं होतं आणि ते बापजन्मात शक्य नव्हतं. मग समोर कुणीही की असेना! म्हणूनच शक्य असेल तिथे त्या समाजाला दूर ठेवायच्या आणि आलाच कधी संबंध, तर त्याने काही शेरेबाजी करण्याआधी किशोरीताईच त्याला शब्दांच्या फटकाऱ्याने फोडून काढायच्या
'त्या उगाच तंबोरा जुळवायला वेळ लावतायत', 'मैफलीत मध्यंतरात भेटायला गेलो, तर ओळखही दाखवली नाही', 'बघितलं कसं फटकारलं रसिकांना' हे सगळं त्यांचं वर्तन म्हणजे किशोरीताईंनी समाजावर उगवलेला सूड होता. अस्थानी असेल तो कदाचित, परंतु त्यात त्यांचं काही चुकत होतं, असं मला तरी कधी वाटलं नाही. एक वेळ शरीरावरच्या जखमा भरुन निघतील, पण मनावरच्या जखमा बुजणं अशक्यच असतं.
किशोरीताईंकडे कलावंत म्हणून न पाहता, असं सामान्य व्यक्ती म्हणून पाहिलं असतं, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील असे काही अगम्य पेड कदाचित सोडवता आले असते आपल्याला. ती संधी आपण आता गमावलेली आहे. असो. आता मोगुबाई नाहीत, किशोरीताईं नाहीत आणि त्यांच्या आयुष्याला वेढून उरलेली वेदनाही नाही.
मनात येतं, ही वेदनाच त्यांचं गाणं होऊन अवतरली होती का?

( विशेष आभार- दैनिक गोमंतकचे संपादक श्रीराम पचिंद्रे आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या बोरीवली शाखेच्या अध्यक्ष उमा नाबर. या दोघांमुळेच १९७९चा गोमंतकचा दिवाळी अंक उपलब्ध झाला.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा