शुक्रवार, ८ जून, २०१८

पाणी, नदी आणि आई…


माझ्या गावची इळणे नदी
प्रत्यक्ष बघण्याआधीच आमच्या इळणे गावची नदी मला भेटली होती, आईच्या गप्पा-गोष्टींतून. पावसाळ्यातलं तिचं बेभान होऊन वाहणं, हिवाळ्यातलं तिचं आत्ममग्न होणं आणि उन्हाळ्यातली तिची विरक्ती... असं काही बाही सांगायची ती नदीचे उमाळे नि उसासे. ते तिचे होते की नदीचे ते लहानपणी कळलंच नाही... तसंही तिला स्वत:ला एकूणच निसर्ग तत्त्वाशी जोडून घ्यायची सवय... 'बब्या एकदा नं काय झाला, मी गेला व्हता नह्यवर...', अशी तिने सांगायला सुरुवात केली की मी समजून जायचो, की आता काही तरी चमत्कारिक ऐकायला मिळणार आणि तसंच व्हायचं. नदीच्या वेड्या वाकड्या वाक-वळणांविषयी सांगताना ती हमखास नदीतल्या भोवर्‍यांविषयी, डोहांविषयी सांगत बसायची. हे भोवरे-डोह नदीतले होतेच, पण तिच्या मनातलेही होते. 
माझ्या जन्मानंतर, दम्याच्या उपचारासाठी गाव सोडून मुंबईला यावं लागलं, हे तिला मानवलं नव्हतंच बहुदा. वयाची चाळीस-बेचाळीस वर्षं गावात काढल्यावर ती भिन्न राहिलीच नव्हती गावापासून आणि तिथल्या निसर्गापासून. झाडापेडापासून नदी-तळ्यांपर्यंत तिची एक स्वत:ची दुनिया होती... आणि त्यात नदी म्हणजे तर ती स्वत:च होती. वाटेत आलेलं स्वीकारणारी, स्वत:त सामावून घेणारी, डोहासारखे काही खोल खाचखळगे तसेच ठेवून पुढे वाहत जाणारी... जणू काही सगळंच वश तिला, सगळेच नतमस्तक तिच्यासमोर.
... वातावरण असं ताब्यात आल्या नंतर तिची नदीची गोष्ट हमखास सुरू व्हायची ती गिर्‍ह्याच्या डोहापासून. आमच्या गावच्या नदीतील हा खोल डोह म्हणजे भयाची जातिवंत जाणीव. अर्थात पाणवठ्याच्या एखाद्या जागी वस्ती करुन असणारा पिशाच योनीतील गिर्‍हा हा तसा त्रासदायक नाही. भर दुपारी मध्याह्नी किंवा मावळतीला किंवा चांदण्या रात्री एखादा आलाच याच्या प्रभावक्षेत्रात तर तो त्याला छळतो, पण मारत नाही. उगाच नदीत बुचकळवून काढ, उगाच लहान-मोठं रूप धारण करुन घाबरवून सोड, हे याचे उद्योग. पण ज्याच्या वाटेला ते यायचे तो भीतीनेच अर्धमेला झालेला असायचा... अशा या गिर्‍ह्याच्या कचाट्यात सापडलेल्यांची गोष्ट आई हसत रंगवून सांगायची. पण ऐकणार्‍याच्या मनात भीतीचं सावट निर्माण होईल, याची पुरेशी काळजी घ्यायची.
... जसा गिर्‍ह्याचा डोह, तसाच म्हैसधाड. हाही डोहच. कभिन्न काळा आणि भयाचं तांडवच! तिथलं लाल-काळं-निळं पाणी म्हणजे सर्जन-विसर्जनाचं मूर्तिमंत रूप. जणू आदिम काळोखच त्या डोहात दडून राहिलेला... या डोहात कधी काळी प्रत्येक वर्षी म्हशीचा बळी दिला जायचा, म्हणून हा म्हैसधाड... अशा या म्हैसधाडात दिवसाउजेडी गायब झालेल्यांच्या हकिकती आई सांगायची, तेव्हा अंगावर काटा यायचा... आजूबाजूला सगळ्यांचा वावर असताना नदीत पोहायला उतरलेला चुकून डोहाच्या जवळ जायचा आणि काही कळायच्या आतच त्याचा स्वाहा व्हायचा... वर यायचा केवळ एक बुडबुडा... शेवटचा श्वास घेतल्याचा. आई म्हणायची- म्हैसधाडाचा चकवा भारी वाईट. इच्छा असली-नसली, तरी माणूस तिकडं वढला जातं!
घाबरवून टाकणार्‍या नदीतल्या या डोहांच्या बरोबरीने आई नदीतल्या आसरांची गोष्टही सांगायची. या आसरा म्हणजे जलअप्सरा, आईसारख्याच प्रेमळ असायच्या… नदीत पोहायला उतरलेला एखादा बाळजीव नाकातोंडात पाणी जाऊन गुदमरला की या आसरा येतात पाण्याच्या तळ्यातनं, अन् त्या जीवाला अलगद झेलून वर आणून सोडतात पाण्यावरती… या आसरांची गोष्ट ऐकताना वाटायचं आपणही पाण्यात बुडावं, म्हणजे आसरा आपल्याला पण अलगद वर आणतील… पण नदीच्याच काय कुठल्याच पाण्यात उतरण्याचं धाडस मला कधीही झालं नाही. कारण आईनं एकदा तिच्या भावसृष्टीत घेऊन सांगितलं होतं- बब्या, पाण्याशी कधी खेळू नकोस. तू पोटात व्हतास तवा मला पाण्याची लय सपना पडायची!... तिच्या त्या स्वप्नांचा अर्थ मला कधीच उलगडला नाही, परंतु मला स्वत:ला लहानपणापासून आतापर्यंत मी नदीत, विहिरीत बुडत असल्याची स्वप्नं मात्र अनेकदा पडतात.
लहानपणी आईच्या तोंडून ऐकलेल्या नदीच्या गोष्टी थोडा जाणता झाल्यावर तिच्याचबरोबर फिरुन पाहिल्या. तिचा हात घट्ट धरुन. तिनेही त्या दाखवल्या, अगदी गिऱ्ह्याच्या डोहापासून ते म्हैसधाडापर्यंत. मात्र आईबरोबर असताना त्या पाण्यात उतरण्याची जराही भीती वाटली नाही. कारण वेळ आलीच तर ती पाण्यालाही पालथी पाडील याची खात्री मला होती… किंबहुना तसा अनुभवच माझ्या गाठीशी होता. मी चार-पाच वर्षांचा असेन. एकदा पावसाळ्यात मामाच्या गावाला पूजा होती म्हणून मी आणि आई-बाबा, असे आम्ही तिघेजण निघालो. अचानक धो-धो पावसाला सुरुवात झाली. बघता बघता नदीला पूर आला. मामाच्या गावाला जायचं, तर नदी ओलांडून जाण्याशिवाय पर्याय नव्हता आणि पूजेला जायचं हा आईचा हट्ट. बाबांनी एका कातकरीदादाला सोबत घेतलं. त्याने बाबांचा हात धरला, आईने बाबांचा आणि मी आईच्या कडेवर… कातकरीदादानी तिरकं चालत पाणी छेदायला सांगितलं. त्याप्रमाणेच आम्ही चाललो होतो. मात्र हळूहळू पाण्याची पातळी वाढू लागली. आता मागे फिरणंही शक्य नव्हतं. पाणी छातीपर्यंत आलं, तसं बाबा आईला म्हणाले- बब्याला दे माझ्या खांद्यावर. तशी आई म्हणाली- काय नको, वेळ आली तर द्याल त्याला सोडून. पण मी त्याला माझ्या पदराला बांधून घातलाय, पाणी पण नाय सोडवणार आमची गाठ!
… अशी लहानपणापासून नदी, पाणी, आई आणि मी, आमची एकमेकांशी अगम्य गाठ बांधली गेलीय. मोठेपणी कृष्णा, कोयना, गोदावरी, नर्मदा, अगदी नाईलही पाहिली… तरी प्रत्येक नदी मला आमच्या गावच्या नदीसारखीच भासते… आणि प्रत्येक नदीच्या लोकसंस्कृतीतील गोष्टी ऐकताना, त्या आईच माझ्या कानात सांगतेय, असं वाटत राहतं!
- मुकुंद कुळे

मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०१८

देवदासी : कलांच्या स्वामिनी

देवदासी या थेट वेश्या कधीच नव्हत्या. सगळ्यात आधी त्या कलावंत होत्या, त्याच संगीत-नृत्य कलांच्या उद्गात्या होत्या. त्यांच्यामुळेच आज आपण विविध कलांचा आस्वाद घेतोय... शक्य होतं, तोवर त्यांनी आपल्या कलेवरच पोट भरलं. जेव्हा समाजाने नाईलाज केला, तेव्हाच त्यांनी स्वतःला विकायला काढलं... भारतातील देवदासी परंपरेचा केवळ सामाजिक अंगाने विचार केला, तर ती निश्चितच एक वाईट प्रथा होती आणि आहे. परंतु भारतीय कलावारशाचा विचार केला, तर या देवदासीप्रथेतूच आजच्या बहुतांशी कलांचा जन्म झाला, असं ठामपणे म्हणता येईल...!


टी. बालसरस्वती

खजुराहो मंदिर परिसराचा आसमंत काळोखाने झाकोळून गेला असताना, फक्त रंगमंचाचा तुकडा प्रकाशाने उजळून निघाला होता... आणि तिथे प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना शुभदा पराडकर ‘कनुप्रिया’ सादर करत होत्या... कनु म्हणजे कृष्ण. कृष्णाची प्रिया. अर्थात राधा. राधेचे विविध विभ्रम त्या एवढ्या नजाकतीने आणि तन्मयतेने सादर करत होत्या, क्षणभर वाटलं, त्या पुरीच्या जगन्नाथ मंदिरात थेट कृष्णाच्याच समोर नाचत आहेत. त्याच्या साक्षीनेच विकसित झालेलं नृत्य त्यालाच सादर करुन, त्याचं मन रिझवत आहेत... इतकं तादात्म्य, इतकी एकरुपता!
... आणि अचानक मला आठवल्या होत्या, तेव्हा हयात असलेल्या शशिमणी. पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील देवदासी. वयाच्या ९३व्या वर्षीही पुरीच्या जगन्नाथाची आस लावून बसलेल्या. गात्रं थकलेली, पण मन ताजंतवानं.  थेट जगन्नाथाशीच भावक्रीडा करायला उत्सुक.  मग अंथरुणात बसल्या जागेवरच त्या हस्तमुद्रा सुरू करायच्या... बघता बघता त्या बारा वर्षांच्या व्हायच्या. तेव्हापासूनच तर देवदासी म्हणून त्या चढवत होत्या पुरीच्या जगन्नाथाला- रंगभोग.
....
अशीच एक संगीत मैफल. प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर समोर गायला बसलेल्या. वेगवेगळ्या रागांची सुरेल बरसात सुरू असतानाच, रसिकांमधून ‘सरदारी बेगम’मधल्या ठुमऱ्यांची फर्माइश होते... आरतीताई क्षणभर गळा खाकरतात नि सुरू होतात- ‘मोरे सैंया जो आए पलटके, अब की होरी मैं खेलुंगी दटके...’ मग एका पाठोपाठ एक ‘सरदारी’मधल्या ठुमऱ्यांची लड उलगडत जाते आणि उपस्थित रसिक बेहोश होत जातात...
... आणि अचानक मला आठवतात विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात संपूर्ण उत्तर भारताला पागल करणाऱ्या विद्याधरी. आपल्या गाण्यातल्या नजाकतीनं त्यांनी भल्याभल्यांना वेडं केलं होतं. तेव्हा अशी एखादीच रियासत किंवा संस्थान असेल, जिथे विद्याधरींचं गाणं झालं नसेल...  तवायफ परंपरेतून आलेल्या त्यांच्या ठुमरीचा अंदाज आणि मिजाजच तसा होता.
....
अलीकडेच एका कार्यक्रमात प्रसिद्ध भरतनाट्यम नर्तिका लीला सॅम्सन यांचं नृत्य बघितलं होतं. सर्वप्रथम शुद्ध नृत्ताचं अडवुमधून सुरेख दर्शन घडवल्यावर, कालांतराने त्या वर्णमकडे वळल्या होत्या. पुरंदरदास का अन्य कुणाच्या तरी रचनांवरचं त्यांचं अलवार नृत्यकौशल्य पाहून उपस्थित रसिक चकित झाले होते. त्यांचे पदन्यास, त्यांच्या हस्तमुद्रा आणि एकूणच शरीराची लय... निव्वळ कसबच. वर्णम संपताच त्यांनी कुणाच्या तरी गीतरचनेवर पदम् साकारायला सुरुवात केली...
... आणि मला एकदम टी. बालसरस्वतीअम्मांची आठवण झाली. सत्यजित रे यांनी त्यांच्यावर केलेल्या डॅाक्युमेंटरीतलं बालम्मांनी ‘कृष्णानी बेगने बरो’ या गाण्यावर केलेलं पदम् बघितलं होतं. कृष्णा लवकर ये रे आणि मला तुझं ते मुख दाखव असा भावार्थ असलेल्या या पदम्-मध्ये बालसरस्वती अम्मानी जो अभिनय केलाय, तो निव्वळ सुंदर आहे. पदम् मध्ये नृत्यापेक्षा अभिनयाला अधिक वाव असतो. साहजिकच या पदममध्ये बालम्मांनी आपल्या अभिनयाचा कस लावलाय... ते साहजिकही होतं. कारण त्यांच्या रक्तातच ही देवदासींची नृत्य-गीत परंपरा होती. त्यांची आई जयम्माळ प्रसिद्ध गायिका होती आणि आजी वीणा धनम्माळ तंजावरच्या राजदरबारातील नामंवत वीणावादक तसंच संगीतज्ञ.
....
टी. बालसरस्वती काय, विद्याधरीदेवी काय किंवा शशिमणी काय... या तिघींची परंपरा देवदासींची होती… आणि तशी असली म्हणून काय झालं?
किंबहुना या तिघी आणि त्यांची कला देवदासी परंपरेतून आलेली होती, म्हणून तर शुभदा पराडकर, आरती अंकलीकर आणि लीला सॅम्सन यांची आजची कला जिवंत आहे. देवदासीच तर होत्या, ज्यांनी गेल्या हजारो वर्षांपासून या नृत्य-गायन कलेचं वहन केलं आणि त्या इथवर पोचवल्या. अन्यथा शास्त्रीय नामाभिधान मिरवायला दुसरं होतं काय आमच्याकडे? अन् तरीही आजच्या शास्त्रीय नृत्य-गायन कलांची परंपरा सांगताना देवदासी परंपरेचा कुठेही उल्लेख होत नाही. किंबहुना तो नाकारण्याकडेच कल असतो.

पुरीच्या जगन्नाथाच्या अखेरच्या देवदासी शशिमणी

... कारण देवदासी म्हणजे केवळ भोगदासीच वाटते साऱ्यांना. देवदासींना थेट वेश्याच करुन टाकलंय आजच्या स्वतःला कलावादी म्हणून मिरवणाऱ्या तथाकथित बुद्धिवाद्यांनी. मात्र परंपरेचे धागे नीट जुळवत गेलं तर समोर येतो एक मोठा कलावारसा. ज्याच्या अनभिषिक्त सम्राज्ञी असतात, केवळ आणि केवळ देवदासी. आधी मंदिरात नाचायच्या म्हणून त्या देवदासी होत्या. नंतर त्या दरबारात नाचायला लागल्या म्हणून राजदासी झाल्या आणि ब्रिटिश काळात मात्र त्या सर्वार्थाने भोगदासी झाल्या. कारण त्यांना ना ब्रिटिशांनी आश्रय दिला, ना त्यांना लोकाश्रय लाभला. उज्ज्वल परंपरा असलेलं देवदासींचं हे संगीत-नृत्य ब्रिटिशांच्या कल्पनेपलीकडचं होतं. कारण त्यांचा आस्वाद घेण्यासाठी ज्या भारतीय परंपरांचं-संस्कृतीचं संचित आवश्यक होतं, ते त्यांच्याकडे नव्हतं. त्यांना फक्त चित्रकला कळत होती, कारण ती कला त्या काळात त्यांच्याकडे पूर्ण विकसित झाली होती. म्हणून त्यांनी चित्रकलेला उदार आश्रय दिला, परंतु संगीत-नृत्याला बाजूला सारलं. त्यांच्याबरोबरच ब्रिटिश आमदनीत इंग्रजीचं शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या पहिल्या शिक्षित, म्हणजेच तत्कालीन उच्चभ्रू मध्यमवर्गानेही त्यांच्या कलेला नाकारलं. कारण या मंदिरमार्गी कला नंतर दरबारमार्गी झाल्यावर त्यांत काहीसा शृंगार वाढला होता. अर्थात तो कलेच्या पातळीवरच होता आणि शृंगार तर नवरसांचा मुकुटशिरोमणी. परंतु इंग्रजी शिकलेल्या मध्यमवर्गावर तत्कालीन व्हिक्टोरियन मोरॅलिटीचा, म्हणजे नैतिकतेचा प्रभाव पडला होता. व्हिक्टोरिया राणीच्या काळात खुद्द लंडनमध्ये अभिव्यक्तीविषयी काही संकेत निर्माण झाले होते. सार्वजनिक ठिकाणच्या वागण्या-बोलण्यात आणि व्यक्त होण्यात कुठल्याही प्रकारची अश्लीलता येणार नाही याची काळजी घेतली जायची. किंबहुना तसे कडक निर्बंधच लादण्यात आले होते. इंग्रजी शिकून बाहेर पडलेल्या एतद्देशीयांवर राणीच्या या नैतिक आग्रहाचा मोठाच प्रभाव पडला आणि त्यातून देवदासींच्या नृत्य-गायन कलांना अश्लील ठरवत त्यांनी संपूर्ण भारतीय कलापरंपरा नासवून टाकली. परिणामी जगण्यासाठी कधी कला, तर कधी शरीर विकण्याशिवाय मग या देवदासींसमोर दुसरा कुठला पर्यायच उरला नाही... आणि कालांतराने या देवदासी सरसकट वेश्या म्हणूनच ओळखल्या जाऊ लागल्या. जणू काही शरीरविक्रय हाच त्यांचा मुख्य व्यवसाय होता.
... प्रत्यक्षात त्या होत्या कलाकार... आणि आपण जर खरोखरच इंद्र आणि त्याचा देवांचा दरबार हे मिथक स्वीकारणार असू, तर तिथूनच सुरू होतो हा कलावारसा. कारण इंद्राच्या दरबारातील उर्वशी, रंभा, मेनका, तिलोत्तमा याच तर होत्या पहिल्या देवदासी. देवासमोर त्याच्या मनोरंजनासाठी नृत्य-गायन करण्याची परंपरा त्यांच्यापासूनच सुरू होते. मात्र थेट इंद्राच्या दरबारातून सुरू झालेली ही देवदासींची परंपरा म्हणजे केवळ भोगदासींची परंपरा नव्हती, ती एक मोठी कलापरंपरा आणि कलांचा मोठा स्रोतही होती. सगळ्याच अप्सरा कलानिपुण होत्या.
हीच कलापरंपरा देवतांच्या निवासासाठी मंदिरं बांधल्यावर कायम ठेवण्यात आली. वेदकाळाआधी भारतात मंदिरांची मोठी परंपरा नव्हती. तत्पूर्वी भारतात ऋषिपरंपरा होती, तसंच निसर्गातील विविध तत्त्वांनाच देव मानण्यात आलं होतं आणि आभासी पातळीवरच त्यांची पूजा-अर्चा चालायची. परंतु वेदकाळानंतरचा जो पुराणांचा काळ मानला जातो, त्याकाळात समाजमनावरील मिथकांच्या प्रभावाचा वापर करुन, देवदेवतांना मनुष्यरूप देण्यात आलं आणि त्यांच्यासाठी मोठमोठी मंदिरं उभारण्यात आली. ही मंदिरसंस्था निर्माण झाल्यावरच खऱ्या अर्थाने भारतभरात देवदासी परंपरा उदयाला आली. कारण जे माणूस करतो, तेच त्यांचा देव करणार, म्हणून मग सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माणूस जे जे करतो, ते सारं त्यांचे देवही करू लागले. तो सकाळी उठू लागला, दुपारी जेवून वामकुक्षी घेऊ लागला. एवढंच नाही, तर रात्री शेजारती झाल्यावर झोपूही लागला. मात्र झोपण्याआधी त्याला रंगभोग आणि शय्याभोग हवाच! मग तो कुणी द्यायचा, तर त्यासाठी समाजातील विविध युवतींची देवाच्या दासी म्हणून नेमणूक व्हायला लागली. त्यासाठी कधी समाजाच्या निम्नस्तरातील मुली उचलण्यात आल्या, तर कधी भक्तांनीच आपल्या इच्छापूर्तीप्रीत्यर्थ मुली देवाला वाहिल्या. देवाला वाहिलेल्या मुली मंदिरात कशाच्या जोरावर ठेवायच्या, मग त्यांची थेट देवाशीच लग्न लावण्याची परंपरा निर्माण झाली आणि त्यांना मंदिरातील कामांचं वाटप करण्यात आलं. कुणी मंदिरात झाडू मारु लागली, कुणी देवासाठी फुलं वेचू लागली, कुणी देवावर छत्र-चामर ढाळू लागली. तर कुणी देवाच्या रंगभोगासाठी म्हणजे मनोरंजनासाठी नाचू-गाऊ लागली. प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये या देवदासींचे पुढील सात प्रकार सांगितले आहेत. १) दत्त - जी समर्पित वृत्तीने स्वतःला मंदिराच्या सेवेसाठी वाहून घेते. २) विक्रिता - ही विशिष्ट हेतूने स्वतःला मंदिराच्या सेवेत वाहून घेते. ३) भृत्या - हिला कुटुंबाच्या समृद्धिसाठी देवाला वाहिलं जातं. ४) भक्त - भक्तिभावाने देवाला वाहून घेणारी ५) हृता - हिला फूस लावून पळवून नेलं जातं आणि नंतर देवाला अर्पण केलं जातं. ६) अलंकार- ही विविध व्यवसायात पारंगत असते आणि हिला श्रीमंत वर्ग मंदिराला अर्पण करतो. ७) रुद्रगणिका - हिची नेमणूक खास देवासमोर नृत्यगायन करण्यासाठीच केली जाते. मंदिरात देवदासी म्हणून कार्यरत असलेल्या सगळ्याच देवदासींना सरावाने थोडंफार नृत्य-गायन येत असलं, तरी मंदिराची खऱ्या अर्थाने शोभा होत्या, त्या रुद्रगणिकाच. कारण त्यांच्याकडे असलेली नृत्य-गायनाची कला. मंदिरात वेगवेगळी कामं करणाऱ्या या सर्वच गणिकांना त्या-त्या राज्यांत वेगवेगळी नावं आहेत. उदाहरणार्थ ओरिसामध्ये (आता ओदिशा) देवदासींचे भितरा गौनी, बहारा गौनी, नचुअनी, पटुडी, राज अंगिला, गहन महरी आणि रुद्रगणिका अशी नावं आहेत. तशीच ती तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, गुजरात, काश्मीर अशा राज्यांत वेगवेगळी आहेत. मात्र मंदिर कुठेही आणि कुणाचंही असो मंदिरांचं वैभव वाढवण्यासाठी कलावंत देवदासी आवश्यक असायच्या.

तंजावरदरबारातून बडोदादरबारकडे गेलेल्या भरतनाट्यमनृत्यांगना

पुरातन मंदिरांवरील शिल्पांमध्ये आजही जी नृत्य-वादन करणारी शिल्पं आढळतात, त्यांची रचना किंवा घडण या कलावंत देवदासी, म्हणजे रुद्रगणिकांना समोर ठेवूनच केली गेली आहे. एवढंच नव्हे, तर या कलेमुळे त्यांना मंदिर आणि मंदिराबाहेर समाजात आदरही प्राप्त झाला होता. देवाचे उत्सव, देवाच्या यात्रा-जत्रांत नृत्य-गायन करणं, तसंच रोज देवाचं मनोरंजन म्हणून कला सादर करणं हेच त्यांचं मुख्य काम होतं. रोजच्या रोज कला सादर करण्यातूनच त्यांच्या नृत्य-गायनात शिस्त निर्माण झाली. महत्त्वाचं म्हणजे प्राचीन काळात सर्वसामान्य स्त्रियांना लेखन-वाचनाचा अधिकार नसताना तो फक्त या रुद्रगणिकांना मात्र मिळाला होता. त्यांना शिकवण्यासाठी मंदिराकडून खास गुरुंची नेमणूक केली जात असे. परिणामी मंदिरातील या देवदासी सर्वगुणसंपन्न व्हायच्या. एवढंच नाही, तर अशा विद्यानिपुण-कलानिपुण देवदासी या मंदिराच्या वैभव मानल्या जायच्या. त्यामुळे ज्या मंदिराकडे अशा कलासंपन्न देवदासी अधिक, त्याचा सांस्कृतिक जगतावर वरचष्मा असायचा. किंबहुना त्यासाठीच राजेमंडळी, समाजातील श्रीमंत व्यापारी, जमीनदारवगैरे कलासंपन्न देवदासींना पैशा-अडक्यापासून सगळ्या भेटवस्तू द्यायचे. या देवदासींना चरितार्थासाठी मंदिराचं उत्पन्न असायचंच, त्या व्यतिरिक्त समाजाकडूनही कारणपरत्वे इनाम मिळायचं. या बदल्यात त्यांनी आपली कला जोपासावी, वाढवावी ही इच्छा मात्र असायची. यातूनच एखाद्या नवीन मंदिराची उभारणी झाल्यावर त्या मंदिरासाठी म्हणून देवदासी प्रदान करण्याची प्रथाही सुरू झाली आणि त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणच्या नामवंत आणि कलानिपुण देवदासी निवडल्या जाऊ लागल्या. याचं उत्तम उदाहरण म्हणजे तमिळनाडूमधील तंजावर येथील प्रसिद्ध बृहदिश्वर मंदिर. चोलवंशीय राजा राजराजा पहिला याने इसवीसन ९८५ मध्ये या मंदिराची निर्मिती केली आणि त्याने मंदिराला तब्बल ४०० देवदासी अर्पण केल्या. या सगळ्या देवदासी त्याने वेगवेगळ्या मंदिरातून आणलेल्या होत्या. त्यात पुंपुहार येथील मंदिरातील प्रसिद्ध नाकन उदारी, नाकन आरंगम या देवदासींचाही समावेश असलेला आढळतो. बृहदिश्वर मंदिराच्या लिहिलेल्या इतिहासात याची सविस्तर माहिती मिळते. राजराजाने देवदासींना आणलं एवढंच नाही, तर त्यांच्या घरांसाठी मंदिरासमोरील रस्ता खास राखून ठेवला. त्यांना जमिनी देण्यात आल्या आणि त्यांना वारसा हक्कही त्याने प्रदान केला.


प्रसिद्ध कुचिपुडी आणि देवदासी नृत्यांगना यशोदा राव ठाकोर

मंदिरांना देवदासी प्रदान करण्याची ही परंपरा प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासात सर्वत्र होती. इसवीसनाच्या पाचव्या-सहाव्या शतकात बांधल्या गेलेल्या गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथाच्या मंदिरातही देवाच्या सेवेसाठी आणि मनोरंजनासाठी शेकडो देवदासी असल्याचे उल्लेख आहेत. आचार्य चतुरसेन शास्त्री यांनी ‘सोमनाथ’ या पुस्तकात त्याविषयी चर्चाही केली आहे. अगदी चौदाव्या शतकात तुंगभद्रेच्या किनारी विजयनगर साम्राज्य निर्माण झालं आणि हंपी-बदामी-हळेबीड, ऐहोळे अशी मोठी मंदिरपरंपरा या साम्राज्यात निर्माण झाली. या मंदिरात देवदासींची जी मोठी कलापरंपरा निर्माण झाली, त्याची दखल तर परदेशी प्रवाशांनीही घेतली होती. पंधराव्या शतकाच्या पूर्वार्धात १४२० ला दसऱ्याच्या सणाला विजनगरमध्ये उपस्थित असलेल्या निकोल कोंटी (Niccolo de’ Conti) या इटलीच्या व्यापाऱ्याने केलेली नोंद या दृष्टीने पाहण्यासारखी आहे. तो लिहितो- ‘मंदिरातून निघालेल्या देवाच्या मिरवणुकीत नृत्यांगना (यासाठी त्याने बायोडेरस हा शब्द वापरला आहे. जो त्यांच्याकडे देवदासींसाठी वापरला जातो.) तीन दिवस सतत नाचत होत्या आणि गाणी सादर करत होत्या. देवाच्या मिरवणुकीच्या काळात मार्गात त्यांच्या नृत्यासाठी खास मंच उभारण्यात आले होते. या मंचावर नृत्य करताना त्यांची पावलं अशी काही नजाकतीने थिरकत होती की, कुणाही माणसाला त्याची मोहिनी पडेल.’
या सर्व वर्णनावरुन मंदिरांतील ज्या नृत्यांगना होत्या, त्या खरोखरच कलाकुशल होत्या, असं म्हणण्यास पुरेसा वाव आहे आणि त्याचे दाखलेही अनेक प्राचीन ग्रंथांत आढळतात. देवदासींची ही सगळी नृत्यं आधी मंदिरांत देवाच्या सेवेसाठी व्हायची, कालांतराने ती स्वतःला भूतलावरचे देव म्हणवणाऱ्या पुरोहित आणि राजांसाठीही व्हायला लागली. परंतु मुख्यतः मंदिर हेच नृत्य-गायनाचं मुख्य स्थान राहिल्यामुळे या सगळ्या कला भक्तिमार्गीच राहिल्या. देवदासींच्या नृत्य-गायनातला मुख्य आशय भक्तीच असायचाच. अर्थात शृंगार देवालाही वर्ज्य नव्हता. त्यामुळे भक्तिकाव्याप्रमाणेच शृंगारिक काव्यही त्याला ऐकवलं जायचं, त्यावर आधारित नृत्यं त्याच्या समोर सादर केली जायची. याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. अगदी अलीकडे म्हणजे पंधराएक वर्षांपूर्वी नवरात्र काळात जेजुरीत उपस्थित असताना, खंडोबाचं मूळ स्थान असलेल्या कऱ्हे पठारावरच्या मंदिरात कोल्हाटी समाजातील देवाच्या स्त्री-भक्तांनी त्याच्यासाठी म्हटलेल्या, अतिशय अश्लील आशय असलेल्या लावण्या मी ऐकल्या आहेत. आणि ही शतकानुशतकांची परंपरा असल्याचं तेव्हा सांगितलं गेलं होतं. अर्थात कलांमध्ये नवरस असणारच. परंतु या सगळ्या कला आणि त्या सादर करणाऱ्या देवदासी किमान पंधराव्या शतकापर्यंत आपला मंदिराश्रय टिकवून होत्या. अकराव्या शतकात आधी उत्तर भारत आणि पंधराव्या शतकानंतर दक्षिण भारतावर मुस्लिम शासकांनी आक्रमण केल्यावर नंतरच्या काळात भारतातील मंदिरसंस्था काहीशी विस्कळीत झाली. परिणामी देवदासींचा आश्रय तुटला. त्याच परिवर्तनाच्या काळात या कला देवदासींसकट विविध राजांच्या दरबारात विसावल्या आणि दरबारमार्गी झाल्या.
मात्र इथपर्यंत देवदासींच्या नृत्य-गायनादी कलांचा काहीएक विकास झाला होता. भरतमुनीचं ‘नाट्यशास्त्र’ असेल,  नंदिकेश्वराचा ‘अभिनयदर्पण’ असेल किंवा चालुक्यवंशीय तिसऱ्या सोमेश्वराने लिहिलेलं ‘मानसोल्लास’ असेल, या सर्व ग्रंथांत नृत्यांचे प्रकार किंवा ज्या हस्तमुद्रा-पदन्यास सांगितले होते, तेच या देवदासींच्या नृत्यात असायचे. मग या देवदासी तमिळनाडूमधल्या असोत किंवा आंध्र, कर्नाटक, केरळ वा ओदिशामधल्या. फक्त स्थानिक भाषेनुसार त्यांची नावं आणि नृत्य करायची पद्धत वेगवेगळी होती. ती पद्धत देवदासींनी स्वतःच विकसित केलेली असली पाहिजे. उदाहरणार्थ ओडिसी नृत्य हे त्रिभंगी आहे. म्हणजे संपूर्ण नृत्याचं चलनवलन तीन भागात होतं- धड, मग कंबरेपर्यंतचा भाग आणि नंतर कंबरेखालचा पायांपर्यंतचा सरळ भाग, अशा तीन भागांत शरीरयष्टी भंग पावलेली दिसते. याउलट भरतनाट्यम द्विभंगी आहे. ढोपरापर्यंतचं शरीर सरळ ठेवून नंतर ढोपरं वाकवून पदन्यास केला जातो. कथक मात्र संपूर्ण शरीर सरळ ताठ ठेवूनच सादर केलं जातं.
भारताच्या वेगवेगळ्या भागांतील मंदिरांतून आकाराला आलेली ही नृत्यं कालांतराने ते नृत्य ज्या सादर करायच्या, त्या देवदासींच्या नावावरुनच ओळखली जायला लागली. उदाहरणार्थ ओदिशात जगन्नाथाच्या मंदिरात नृत्य करणाऱ्या महिलांना महारी म्हटलं जायचं. मग त्यांच्या नृत्याला महारी नृत्यच म्हटलं जाऊ लागलं. तर आंध्र प्रदेशातील मंदिरात देवदासींना सानी आणि बोगम (याचं संस्कृतीकरण म्हणजे विलासिनी, स्वामिनी आणि भोगिनी) म्हटलं जायचं, साहजिकच त्यांनी जी नृत्यपरंपरा जपली, ती विलासिनीनाट्यम म्हणून नावारुपाला आली, तर तमिळनाडूमधील मंदिरांतील नृत्यपरंपरा दासीआटम (म्हणजे दासींचा खेळ) म्हणून नावारुपाला आली. सतराव्या-अठराव्या शतकापर्यंत या कला कधी मंदिरांत तर कधी राजदरबारात सादर होत राहिल्या. मुस्लिम आक्रमकांनी काही मंदिरं संपत्तीसाठी उध्वस्त केली, तरी जी उरली त्यातील हिंदूंच्या धार्मिक रीतीरिवाजांना त्यांनी हानी पोचवली नाही. त्यामुळे दक्षिणेतील अनेक मंदिरांत देवदासीपरंपरा कायम राहिली. कर्नाटकात अगदी टिपू सुलतानाच्या काळातही काही मंदिरांत देवदासी परंपरा जिवंत असल्याची उदाहरणं  आहेत. त्याच्या दरबारातही देवदासी होत्या आणि दसऱ्याच्या सणाला त्यांचं नाचगाणं व्हायचं. दक्षिणेला तमिळनाडूच्या तंजावर संस्थानातील भोसले वंशीय मराठा राजांनी तर मंदिरातील देवदासींना आपल्या दरबारात मानाचं स्थान दिलं आणि त्यांच्या नृत्याची जोपासना केली. त्यांच्या दरबारात, म्हणजेच सदरेत देवदासींचं नृत्य सादर व्हायला लागलं आणि कालांतराने या नृत्याला ‘सादिर आटम’ असं नाव मिळालं.
जे नृत्याचं तेच गायनकलेचं. नृत्याप्रमाणेच सर्वच दरबारांत गायनकलेलाही उदार आश्रय मिळाला. संगीत क्षेत्रातील पहिला भारतरत्न पुरस्कार ज्या एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांना देण्यात आला, त्यांची मातृपरंपरा तंजावर दरबारातील गायनपरंपरेशीच जोडलेली होती. तसंच देश-विदेशात भरतनाट्यम लोकप्रिय केल्याचा मान ज्यांना दिला जातो, त्या टी. बालसरस्वती अम्मा तंजावर दरबारातील गायन-नृत्य सादर करणाऱ्या देवदासी परंपरेतूनच आलेल्या होत्या. एवढंच कशाला तंजावरात भोसल्यांची राजवट सुरू व्हायच्या आधी ज्या नायक राजांची राजवट होती, त्यांच्या दरबारातही अनेक नामांकित देवदासी होत्या. अशाच एका रघुनाथनायकाच्या दरबारातील रामभद्रम्बा एक प्रसिद्ध कवी आणि नृत्यांगना होती. या रघुनाथ नायकासंबंधीच्या एका दस्तावेजात लिहिलंय – ‘राजा रघुनाथ याच्या दरबारातील दासी या शिकलेल्या व धार्मिक होत्या. राजकन्यांच्या बरोबरीने त्यांचा दर्जा होता आणि त्यांना तेवढाच मान समाजात मिळत होता.’
याचबरोबर रघुनाथनायकाच्या दरबारात देवदासींनी नृत्य-गायनातले विविध कलाप्रकार  सादर केल्याची वर्णंनंही सापडतात. म्हणजे १७-१८व्या शतकापर्यंत दरबार आणि मंदिरात सादर केल्या जाणाऱ्या या कलांना तोपर्यंत काहीएक शास्त्रीय अधिष्ठान या देवदासींनीच प्राप्त करुन दिलं होतं आणि त्यांच्या या कलेच्या प्रती असलेल्या आदरातूनच अनेक श्रीमंत दात्यांनी देवदासींना जमीन, सोनं-नाणं बहाल केलं होतं. यातून अनेक देवदासींकडे कुबेरालाही लाजवेल असा खजिना जमा झाल्याचीही माहिती जुन्या कागदपत्रांत मिळते. परंतु त्याचप्रमाणे या देवदासींनी आपल्याकडचा पैसा देवकार्यासाठी आणि समाजकार्यासाठी वापरल्याची उदाहरणंही खूप आहेत. मंदिरासाठी पाण्याच्या टाक्या बांधणं, लोकांना शेतीच्या पाण्यासाठी कालवे बांधून देणं, गरिबांसाठी अन्नछत्रं उभारणं, अशी अनेक कामं देवदासींनी आपल्या पैशातून केल्याची अनेक उदाहरणं दक्षिणेतील संस्थानांच्या कागदपत्रांत सापडतात. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेलेली नामवंत देवदासी बेंगलोर नागरत्नम्मा ही तर टॅक्स भरणारी पहिली देवदासी होती.
देवदासी मग त्या मंदिरातील असोत किंवा कालांतराने राजदरबारात जाऊन स्थायिक झालेल्या असोत, १८व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत त्यांच्याविषयी समाजात एक आदराचं स्थानच होतं. त्यांच्या कलेबद्दल राजा आणि समाज दोघांनाही आदर होता. महत्त्वाचं म्हणजे त्यांनीच आपली कलापरंपरा जपलीय याची संस्थानिक आणि जनता दोघांनाही जाण होती... पुराणकळात उदयाला आलेल्या देवदासी परंपरेतून १८व्या शतकापर्यंत एक झळझळीत, लखलखीत कलापरंपरा निर्माण झाली होती...
... मात्र १८१८ला ब्रिटिशांनी पेशवाई बुडवली. त्यानंतर संपूर्ण हिंदुस्थानावर त्यांची राजवट आली. आपली राजवट येताच ब्रिटिशांनी सगळी संस्थानं ताब्यात घेऊन संस्थानिकांना तनखे द्यायला सुरुवात केली. या तनख्यांत संस्थानिकांचा खर्च भागणंच मुश्कील होतं. साहजिकच त्यांनी पदरी बाळगलेल्या कलावतांच्या ताफ्यांना सोडचिठ्टी दिली आणि देवदासींसकट कलावंतांचा एक मोठा वर्ग रस्त्यावर आला. शासक म्हणून खरंतर ब्रिटिशांनी या कलाकारांना आश्रय द्यायला हवा होता. परंतु त्यांनीही लक्ष दिलं नाही आणि तत्कालीन समाजानेही. कारण मधल्या काळात ‘नृत्यविरोधी चळवळी’ने (Anti nautch movement) या कलावंत महिलांबद्दल सगळ्यांचंच मन कलुषित करुन टाकलं होतं.
भारतावर राज्य करायचं, तर राजवट चालवण्यासाठी ब्रिटिशांना इंग्रजी येणारे एतद्देशीय हवे होते. त्यासाठी त्यांनी इंग्रजी शिक्षणाची सोय केली. त्यातून पहिली शिक्षित फळी बाहेर पडली, त्यांनी ब्रिटिशांचा अनुनय करत आपली कलापरंपरा नाकारली. भारतीयांच्या मनात त्यांच्या परंपरेबद्दल घृणा निर्माण केली नाही, तर आपल्याला त्यांच्यावर राज्य करणं कठीण जाईल, हे ब्रिटिशांना उमगलं होतं. त्यातूनच त्यांनी हा डाव टाकला आणि शिक्षित वर्ग त्याचा बळी ठरला. परंतु या शिक्षित वर्गाचा महत्त्वाचा बळी ठरल्या त्या देवदासी. कारण याच मंडळींनी देवदासी म्हणजे वेश्या असल्याचं सांगून त्यांच्या कला अश्लील असल्याचा बोभाटा केला, त्यांनीच संपूर्ण देशभर ‘नृत्यविरोधी चळवळ’ उभारुन मंदिरांतून देवदासींच्या माध्यमातून निर्माण झालेल्या नि जोपासल्या गेलेल्या नृत्य-गायन कला बंद पाडल्या... आणि खरोखरच देवदासींवर पोटापाण्यासाठी शरीर विकण्याची वेळ आली.
त्याअधी देवदासी शरीरविक्रय करायच्या नाहीत का? तर याचं उत्तर ठामपणे नाही, असं देताच येणार नाही. मंदिरांतून देवदासी प्रथा सुरू झाली, त्या क्षणापासून तिचा भोग कधी पुरोहितांनी, तर कधी राजांनी घेतला. मात्र तेव्हा ती सरसकट वेश्या नव्हती. क्वचितकधी तिची इच्छाही सामील असायची. महत्त्वाचं म्हणजे वेळप्रसंगी नकार द्यायचा अधिकारही तिला होता. पुरोहित आणि राजाने तिच्यावर अधिकार मिळवला असला, तरी ती पूर्ण समाजाच्या मालकीची कधीच नव्हती. महत्त्वाचं म्हणजे तिची कला अबाधित नि निष्कलंक होती. नृत्यविरोधी चळवळीने देवदासींची कला कलंकित केलीच, शिवाय त्यांना बाजारबसवी केली. जिथे मोती-हिरे-माणकं वेचली होती, तिथेच कसंबसं स्वतःचं पोट भरण्यासाठी त्यांच्यावर शरीर विकण्याची पाळी आली... यात त्यांची कला तर पुरतीच बाद झाली. तिचं जणू नामोनिशाणच मिटलं.
... यात पन्नासेक वर्षांचा कालावधी गेला. भारतीय कलांसाठी हे तमोयुगच होतं. मात्र २०व्या शतकाच्या पूर्वार्धात तथाकथित संस्कृतीरक्षकांना पुन्हा एकदा आपल्या कलापरंपरांची आठवण झाली. त्याची सुरुवात भरतनाट्यमपासून झाली. ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेल्या रुक्मिणीदेवी अरुंडेल यांनी देवदासी परंपरेतील गौरीअम्मा यांच्याकडून पारंपरिक दासीआटमचं शिक्षण घेतलं आणि कालांतराने तेच रसिकांसमोर नव्याने सादर केलं. मात्र ते करताना त्यांनी मूळ दासीआटममधील ‘जावळी’ नावाचा शृंगारिक भाग काढून टाकला, कारण म्हणे तो तत्कालीन पांढरपेशी रसिकांना रुचला नसता… तसंच ‘दासीआटम’चं नाव बदलून ‘भरतनाट्यम’ केलं. परिणामी या नृत्यावर देवदासींची जी नाममुद्रा होती, ती पुसली गेली. प्रसिद्ध नृत्यांगना टी. बालसरस्वतीअम्मा यांचा रुक्मिणीदेवींना जो विरोध होता, तो याचसाठी. रुक्मिणीदेवींनी आमचं दासीअटम ब्राह्मणी करुन टाकलं, असं त्यांचं म्हणणं होतं. तसंच नवरसातला महत्त्वाचा रस असलेला शृंगार त्या कसा काय बाद ठरवू शकतात, असा बालसरस्वती यांचा सवाल होता.
ज्या काळात दासीआटमचं भरतनाट्यम झालं, त्याच्याच पुढेमागे महारी नृत्याचं ओडिसी झालं, विलासिनीनाट्यमचं कुचिपुडी झालं, मोहिनीअट्टमचा प्रवासही असाच. काही ठिकाणी मूळ परंपरेतील कलाकारांनीच आपल्या नृत्याला ऊर्जितावस्था दिली, तर काही ठिकाणी पांढरेपशा समाजातील कलाकारांनी देवदासींची कला आत्मसात करुन ती शास्त्रीय म्हणून मिरवली...
काहीही असलं, तरी आज संगीत-नृत्यासारख्या ज्या शास्रीय कला आहेत, त्यांच्या मूळ स्वामिनी या देवदासी आहेत. परंतु मधल्या काळात ही परंपरा एवढी बदनामी केली गेली की, परंपरेनं आलेले कलागुण अंगात असतानाही, कुणीही उघडपणे आपली परंपरा सांगायला नकार दिला. समाजाच्या नीतिमत्तेच्या खोट्या अहंकारापायी एखाद्याला आपला सांस्कृतिक वारसा लपवावा लागावा, यासारखी वाईट गोष्ट दुसरी नाही. आज संगीत-नृत्यादी कलांना मानाचं स्थान मिळाल्यावरही अद्याप कुणी आपला कलावारसा उघड करायला तयार नाही.
म्हणूनच या पार्श्वभूमीवर हैद्राबादमधील प्रसिद्ध कुचिपुडी नृत्यांगना यशोदा राव-ठाकोर यांचं कौतुक करावंसं वाटतं. वयाच्या पाचव्या वर्षापासून कुचिपुडी शिकणाऱ्या यशोदा यांनी एम.ए.ला असताना एकदा ८० वर्षं वयाच्या मदुरालक्ष्मी नारायणन् या देवदासीचं विलासिनीनाट्यम पाहिलं आणि त्या भारावून गेल्या. मग त्यांनी कुचिपुडीबरोबरच विलासिनीनाट्यमचाही ध्यास घेतला आणि प्रसिद्ध नृत्यांगना स्वप्नसुंदरी यांच्याकडे त्याचं सलग पाच वर्षं शिक्षणही घेतलं. दरम्यानच्या काळात त्यांना कळलं की आपण जे विलासिनीनाट्यम शिकतोय, ते सादर करणाऱ्या कलावंतुलु समाजातलाच आपला जन्म आहे. आपणही देवदासी परंपरेतल्याच आहोत...
... आणि त्यांना दुःख व्हायच्या ऐवजी आनंदच झाला आणि आता तर त्याच जगाला ओरडून सांगतायत की मी देवदासी परंपरेतील आहे. सुरुवातीला माहेर आणि सासर दोन्हीकडच्यांना त्यांचा हा निर्णय आवडला नाही. परंतु यशोदा यांची नृत्यकलेवरची  निष्ठा बघून आता त्यांनीही यशोदा यांना पाठिंबा दिलाय. त्या बळावरच यशोदा यांनी गेल्या काही वर्षांच्या आपल्या परंपरेच्या अभ्यासातून एका नव्या नृत्याला जन्माला दिलाय आणि ते नृत्य त्या आता देश-विदेशात करत असतात. या त्यांच्या नवीन नृत्याचं नाव आहे – देवदासी नृत्य. त्या म्हणतात - ‘माझी नृत्यपरंपरा थोर आहे, मग मी ती लपवून कशाला ठेवू ?’ 
यशोदा यांच्यासारखं धाडस दाखवायला अजूनही कुणी तयार होणार नाही कदाचित... कारण देवदासी या जातीवर बसलेला कलंक अजून पुसला जायचाय. पण प्रत्येकाने आपल्या मनात तेवढी खूणगाठ बांधली, तरी पुरेशी आहे.
शेवटी देवदासी ही थेट वेश्या कधीच नव्हती. सगळ्यात आधी ती कलावंत होती, तीच संगीत-नृत्य कलांची उद्गाती होती. केवळ तिच्यामुळेच आज कलांचा आपण आस्वाद घेतोय... शक्य होतं, तोवर तिने आपल्या कलेवरच पोट भरलं. जेव्हा समाजाने नाईलाज केला, तेव्हाच तिने स्वतःला विकायला काढलं.               
अशा या भारतातील देवदासी परंपरेचा केवळ सामाजिक अंगाने विचार केला, तर ती निश्चितच एक वाईट प्रथा होती आणि आहे. परंतु भारतीय कलावारशाचा विचार केला, तर या देवदासीप्रथेतूच आजच्या बहुतांशी कलांचा जन्म झाला, असं ठामपणे म्हणता येईल...!
(२०१७च्या 'वसा' दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख.)