शुक्रवार, १७ एप्रिल, २०१५

रुपखणी बावनखणी


रुपखणी गुणखणी बावनखणी

...................
मुकुंद कुळे
लेखातील चित्र : रोहन पोरे
.................



नजर भिरभिरत असते, दाणेआळीपासून शालुकराच्या बोळापर्यंत आणि ढमढेरे बोळापासून पासोड्या मारुतीपर्यंत... कुठे ओळखीची खूण सापडतेय का ते पाहत. सा‍ऱ्या वस्त्या धुंडाळून होतात. सा‍ऱ्या इमारती निरखून-पारखून होतात. गल्ल्यांतल्या काना-कोप‍ऱ्यांचाही माग काढून होतो. पण कुठेच गवसत नाही, तिच्या अस्तित्वाची एखादीही खूण! ना घुंगरांच्या लयबद्ध किणकिणाटाची, ना तबल्यावर पडलेल्या जडशीळ हाताची, ना सारंगीवर छेडलेल्या नाजुक सुरावटीची, ना गळ्यातून उमटलेल्या अलवार तानेची...

सारंच कसं भग्न आणि भकास. एक बेहोष उदासी सर्वत्र भरुन राहिलेली... जणू पेशवाई बुडाली आणि जाता जाता तिलाही सोबत घेऊन गेली. पण असं तरी कसं म्हणावं, पेशवाईच्या पश्चात किमान शंभर-सव्वाशे वर्षं ती आपला आब राखून होती. कायम महावस्त्रासारखी झळाळत राहिली. अगदीच सात्त्विक-सोज्ज्वळ नव्हतीच ती कधी. पण अगदी बाजारबसवीही नव्हती खास! ज्यानं-त्यानं इज्जतीनं यावं आणि इज्जतीनं जावं, असा तिचा रुबाब. तो तिने अगदी आता-आतापर्यंत म्हणजे पन्नासेक वर्षांपूर्वीपर्यंत जपला आणि मग अचानक गायब झाली. गायब म्हणजे पार परागंदा... अस्तित्वाची एकही खूण मागे न सोडता. मग तिला शोधता शोधता अवस्था थेट वेड्यापिश्यासारखी होऊन जाते. केशवसुतांनी म्हटल्याप्रमाणे- त्रिखंड हिंडुनी धुंडितसे, न परी हरपले ते गवसे...

पण मजा म्हणून गोलगोल फिरवणा‍ऱ्या घुणघुण्याचंच गतिमानतेमुळे तयार व्हावं एक आवर्त, तसंच मनात एकच एक विचार घोळवल्यामुळे विचारच घेतात एक मूर्त रूप आणि ध्यानीमनी नसताना अचानक तीच समोर येऊन उभी ठाकते...साक्षात् नवयौवना. रुपखणी, गुणखणी, बावनखणी!

... आणि बघता-बघता रातीचा अमल असतानाही शुक्रवारपेठ उजळून निघते. पलित्यांच्या प्रकाशात सरदार-दरकदार, तालेवार मंडळींची वर्दळ सुरू होते. कुणी पालखीतून, कुणी घोड्यावरून, तर कुणी पायीच आपापला जामानिमा सांभाळत अवतरतात... थोडसं गांगरून, थोडसं खाकरून, थोडे कावरेबावरे होत, इकडे-तिकडे बघत, अचानक कुणाला काही कळायच्या आत बावनखणीत गुडुप होतात. त्यांच्या आगमनाने मग बावनखणीतली शमादानं-चिरागदानं उजळत जातात. सुरुदार दिवाणखान्यांतल्या चिकाच्या पडद्यांची सळसळ वाढते. रात्रीचे प्रहर चढत जातात, त्याप्रमाणे सारंगीच्या खुंट्या पिळल्या जातात, तबल्याच्या वाद्या आवळल्या जातात. सुरेख घाट साधलेले विडे एका पाठोपाठ एक रिचवून नजाकतदार गाण्याचं मायाजाल उभं केलं जातं. ते मायाजाल एवढं मोहमयी असतं की रामप्रहर होतो, तरी रात्रीचं भान काही सरत नाही. ही भूल असते बावनखणीतल्या गाण्याची आणि गाणारीचीही. अशी ही बेहोष-मदहोष करणारी बावनखणी... पेशवाईतील सर्व तालेवारांचा रंगीला मिजाज आपल्यात सामावून‌घेणारी बावनखणी.

युद्धाची धामधूम असो की सणासुदीची आतषबाजी की पुण्यावर कोसळलेलं एखादं संकट, शुक्रवारातल्या बावनखणीची रौनक कधीच कमी झाली नाही. कारण बावनखणी होती दर्दी आणि छंदी-फंदींच्या विसाव्याचं हक्काचं ठिकाण. अगदी मोक्याचं. भल्याभल्यांना घायाळ करणारी, ही बावननखणी. जणू- अंगी तारुण्याचा बहर, ज्वानीचा कहर, मारीते लहर, मदनतल्वार...एवढंच नाही, बावनखणी म्हणजे पेशवेकालीन पुण्यातलं सांस्कृतिक ठाणंच!

त्यासाठीच तर निर्मिती झाली होती बावनखणीची. पुणे शहरभर विखुरलेल्या नाच-गाणं करणा‍ऱ्या सा‍ऱ्या कसबिणी आणि कलावंतिणी या बावनखणीत एकत्र आणल्या होत्या. त्यांच्यासाठी शहरभर होणारा दंगा, एकाच ठिकाणी व्हावा म्हणून. खास त्यांच्यासाठी बावन्न खणांची म्हणजे बावन्न खोल्यांची दुमजली-दुपाखी चाळ बांधली गेली. नानासाहेब पेशव्यांच्या काळात बांधण्यात आलेल्या या बावनखणीचं वर्णन १८६८मध्ये प्रकाशित झालेल्या नारायण विष्णू जोशी लिखित पुणे शहराचे वर्णनया पुस्तकात पुढील प्रमाणे करण्यात आलं आहे- नानासाहेब पेशवे यांच्या काळात तत्कालीन कोतवाल जिवाजीपंत अण्णा खासगीवाले यांनी उदमी लोकांस कौल देऊन ही पेठ वसवली व वाडा बांधला. शेजारी बावन्न खणांची दुघई दुमजली चा‍ळ बांधली आणि ती जागा कसबिणी व कलावंतिणी यांस राहण्यासाठी भाड्याने दिली. ह्याच्या पूर्वी कसबिणी सर्व शहरात पसरलेल्या होत्या. त्या सर्व ह्यांनी आपल्या सन्निध आणून ठेवल्या. त्याही सर्व एकदम तेथे राहण्यास आल्या. याचे कारण की त्या गृहस्थाकडे कोतवाली होती. त्यावेळच्या कोतवालाचा अधिकार इतका असे की, आता तितका कोणासही नाही. तेव्हा काही जरबेने, काही खुशीने, काही प्रीतीने व ममतेने आल्या असतील. ही बावन्नखणी पुण्यातील लोकांस व बाहेरील लोकांस माहीत नाही, असे नाहीच. आबालवृद्धांस ही जागा ऐकून अथवा प्रत्यक्ष पाहून माहीत आहेच.

पुणं पाहिलेलं असो वा नसो, पुण्याची पेशवाई आणि तिथल्या बावनखणीची ओळख प्रत्येकाला असतेच. तसा बावनखणीचा हा लौकिक अगदी पहिल्यापासूनचा. ती बदनाम होती-आहे, हे तर खरंच. पण बदनामही तेच होतात, ज्यांना काही नाव असतं. तेव्हा, सुरुवातीच्या काळात बावनखणी म्हणजे पुण्यातलं एक सांस्कृतिक केंद्रच होती. दिवसभर काम करून थकलेल्यांचं घटकाभर मनोरंजन करणारी आणि रगेल व रंगेल असणा‍ऱ्यांची रगही जिरवणारी. पण बावनखणी म्हणजे निव्वळ देहाचा व्यापार करणारं केंद्र कधीच नव्हतं. कला आणि सुरतव्यापार यांचा सुरेख मेळ बावनखणीच्या ठायी होता. म्हणून तर त्या काळात गाजलेल्या कलावंतिणी बावनखणीत एकत्र आल्या होत्या. त्यांना गाण्याची-नाचकामाची चांगली पहेचान होती. एकप्रकारे मीनाबाजारच तर होती बावनखणी...

नाच-गाण्याचे ताफे असलेल्या कसबी-कलावंतिणींसाठी ही बावनखणी उभारण्यात आली होती; तरी या बावनखणीत सुरुवातीपासून नेमक्या किती कलावंतीणी होत्या, त्याची माहिती मिळत नाही. पेशवे दफ्तरातील एका कागदात मात्र तत्कालीन कलावंतिणींच्या ३६ ताफ्यांची नोंद सापडते. या कागदात दिलेली कलावंतिणींची यादी पुढीलप्रमाणे आहे- सिवशानी व आनंदी तेलंगी, बहि‍ऱ्या दोघी तेलंगी, मिठा नाईकीण पुणेकर, लातू तेलंगी, बसंत तेलंगी, देवी तेलंगी, महबूबचंदी सातारकर, रहिमती पुणेकर, नूरंदी तेलंगी, चपटीपना औरंगाबादकर, धना चपटीपनाची बहीण, सावनूरवाली पना, करिमी दादा पोतनिसाची, शामा नाईकिणीची राधी, आजबकुवर मिठो औरंगाबादकर, गुजराथणी नारायणदासवाल्या, मथी थेरकरीण, मत‌ी टोपीवाली, नुरा नाईकीण पुणेकर हिरी गुलाबी, साबी आंबडापूरवाली, फुंदन सातारकर, बना नाईकिणीची जना नाइकीण गाववाली, लालन सभाकुवरीची, बदल रणमली, गंगी थेरकरीण, रतनी सातारकर पिरा नाइकिणीची, वाईवासी रंभा, येवलेवाली लालन रणमली, जिवना नाइकिणीची करिमी, गंगी रणमली‌, दिलवाली आखण, बसंती उजनवाली आणि जमना नाईकीण मुंबईवाली... या सगळ्या कलावंतिणींचे आपापले नाच-गाण्याचे ताफे होते. म्हणजे वादकांपासून नृत्यात साथ देणा‍ऱ्या सहनर्तकीपर्यंत सगळे या ताफ्यात असत. त्यामुळेच बावनखणी म्हणजे एकप्रकारे लखनौमधल्या गाणी-बजावणी करणा‍ऱ्या कोठ्यांसारखी कोठीच होती. फक्त लखनौमधली एकेक कोठी म्हणजे राजवाडाच आणि तिथे कोठेवाली एकाचवेळी अनेक नर्तकींना आश्रय द्यायची. याउलट पुण्यात खुद्द पेशव्यांनीच, म्हणजे नानासाहेब पेशव्यांनीच कलावंतिणींसाठी एक मोठी कोठी बांधली- बावनखणी.

खुद्द पेशव्यांच्या मर्जीनेच ही बावनखणी बांधली गेली, तरी या बावनखणीत कोणत्या प्रकारचं नाच-गाणं सादर व्हायचं याचा काहीच थांगपत्ता लागत नाही. त्याच्या नीट नोंदीही कधी झालेल्या नाहीत. मात्र उपलब्ध कलावंतिणींची नावं ज्या पद्धतीने लिहिलेली किंवा रुढ झालेली आढळतात; त्यावरून नंतरच्या काळात महाराष्ट्रात नावारूपाला आलेल्या तमाशा - लावणी कलेची बीजं बावनखणीत आहेत, असं खात्रीने म्हणता येतं. कारण आजही तमाशा क्षेत्रातील महिला कलावंतांची नावं त्याच पद्धतीने उच्चारली वा लिहिली जातात. उदाहरणार्थ कौसल्याबाई कोपरगावकरीण, पारुबाई जेजुरीकरीण, यमुनाबाई वाईकरीण वगैरे... अर्थात यावरून बावनखणीत सादर केल्या जाणा‍ऱ्या तत्कालीन नाच-गाण्याच्या काहीच ठोस अंदाज येत नाही.

मुळात मराठेशाही किंवा पेशवाईच्या काळात महाराष्ट्रात ठोस अशी नाच-गाण्याची परंपराच नव्हती. यादवकाळात महाराष्ट्रात रुजलेली धृपदगायनाची संगीतपरंपरा मुस्लिम आक्रमकांनंतर खंडित झाली होती आणि महाराष्ट्राचं खास प्रातिन‌‌िधिक नृत्य किंवा गायन तेव्हाही नव्हतं. त्यामुळेच बावनखणीत रसिकरंजनासाठी कोणत्या प्रकारचं नाच-गाणं सादर होतं होत, हे कळायला मार्ग नाही. मात्र काही आडाखे जरूर बांधता येतात. उदाहरणार्थ औरंगजेबाच्या कैदेत लहानाचे मोठे झालेल्या सातारच्या छत्रपती शाहूमहाराजांना मोगली मनोरंजनाची आणि खिदमतगारीची चांगलीच जानपहेचान होती. वर्षान‌ुवर्षं कुटुंबापासून दूर राहणा‍ऱ्या सरदार-शिपायांच्या मनोरंजनासाठी छावणीतच असलेले कलावंतिणींचे तंबू आणि त्यातील नाच-गाणंही त्यांनी पाहिलं-अनुभवलं होतं. त्यामुळेच महाराष्ट्रात परत येताच त्यांनी मोगलदबारच्या धर्तीवर मराठेशाहीतही नाच-गाण्याला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. त्यासाठी खास उत्तरेहून कलावंतांची आयात करायला त्यांनी सुरुवात केली. पेशवेकालीन महाराष्ट्रया पुस्तकात लेखक वा. कृ. भावे यांनी यासंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. ते म्हणतात- शाहूमहाराज हा राजश्वैर्यास सर्वस्वी पात्र असा पुरुष असून, त्याला इतर अनेक कलांप्रमाणे संगीताचीही आवड होती. म्हणूनच त्याने मोठ्या प्रयासाने दूरदूरच्या स्थळांहून गवई, नट, भाट, नायकिणी इत्यादिकांचा संच जमविला. दिल्ली, उत्तर हिंदुस्थानातील अनेक शहरे ही गायनवादनाची आगरे होत. यासाठी शाहूने तिकडून गुणिजन मिळवण्याचा प्रयत्न केला. हे काम तो पेशवे व इतर सरदार यांजमार्फत करून घेत असे.

अशा पद्धतीने पर प्रांतातून आणलेल्या कलावंतांचा सुरेख संग्रह शाहूमहाराजांनी त्यांच्या दरबारात केला होता. आणि या कलावतांच्या कलेचा ते नियमितपणे आस्वादही घेत. मात्र याचबरोबर प्रत्येक वेळी परप्रांतातून कलावंत मागवायला नकोत, म्हणूनही शाहूमहाराज प्रयत्नशील असलेले दिसतात. यासंदर्भातील पेशवे दफ्तरातील एका कागदाचा हवाला देऊन वा. कृ. भावे लिहितात- परप्रांतातून नायकिणी आणविण्यास पैसा फार खर्चावा लागतो, असे पाहून महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातच चांगल्या होतकरू मुली ‌मिळवून त्यांना नृत्यकलेत तरबेज करण्याचे शाहूने मनास आणिले व कोकणात खंडोजी माणकर या अ‌धिका‍ऱ्याकडे ती कामगिरी सोपवली.

या उदाहरणांवरून शाहूमहाराजांच्या प्रोत्साहनामुळे नंतरच्या काळात महाराष्ट्रातच गायन-नर्तन करणारे चांगले कलाकार निर्माण झाले असतील, असं म्हणण्यास वाव आहे. मात्र हे सारेच कलावंत प्रामुख्याने निम्न जातीतील असण्याची दाट शक्यता आहे. कारण शाहूमहाराजांच्या मागणीनुसार खंडोजी माणकाराला पेशव्यांनी लिहिलेल्या एका पत्रात- बटकीच्या पोरी दोन बहुत चांगल्या, दहा-अकरा वर्षांच्या, निरोगी, नाचावयास लायक अशा पाठवाव्या’, असा स्पष्ट उल्लेख आहे. मराठेशाही किंवा पेशवाईत दासी-बटकींची आणि त्यांच्या मुलांची खुलेआम खरेदी-विक्री होत असे. त्यामुळे नाच-गाण्यात तयार करण्यासाठी या दासी-बटकींच्या मुला-मुलींचाच वापर होत असणार हे नक्की! तसंच धाकटी चंदी सातारकरकिंवा शामा नायकिणीची राधीअशी बावनखणीकालीन कलावंतिणींची नावं आढळतात, ती बहुधा त्यामुळेच!

महाराष्ट्रातच कलावंतांची निर्मिती करण्याच्या शाहूमहाराजांच्या धोरणामुळे एक मात्र नक्की झालं, इथे कलावंत घडण्याची प्रक्रिया सुरू झाली. तीही थेट गुरु-शिष्य पद्धतीने. याचाही दाखला पेशवे दफ्तरात मिळतो. शाहूमहाराजांच्या आज्ञेवरून नानासाहेब पेशव्यांनी कलावंत घडवण्याचं मनावर घेतलं आणि तशी ताकीद आत्माराम राजाराम नावाच्या आपल्या अधिका‍ऱ्याला केली. हा अधिका‍री नानासाहेब पेशव्यांना एका पत्रात कळवतो- साहेबीं, जातेसमयी ताकित केली की, खबरदार रहाणे, पोरींची निगा करणे. तालीम उत्तमप्रकारे करवीत जाणे. त्यानुसार त्यांसी खाणे जेवणे उत्तम प्रकारे होत आहे. व गावयाची तालीम उत्तम प्रकारे काशीबा पांच-सांत घटका देत आहेत. फकीर महंमदही तालीम उत्तम देत आहे...

शाहूमहाराजांच्या आज्ञेवरून नानासाहेब पेशव्याने स्थानिक कलावंतांना तालीम द्यायला सुरुवात केली, तरी ते गाणं आणि नृत्य नेमकं कोणतं होतं, याचा काही अंदाज बांधता येत नाही. मात्र ते गाणं उत्तरेतील गवयांप्रमाणे धृपदगायकीचं आणि नृत्यही उत्तरेच्या कोठ्यांप्रमाणे कथक स्वरुपाचं असावं. अर्थात ते आजच्या इतकं तयारीचं नसेल कदाचित! किंबहुना ते प्राथमिक स्वरुपाचंच असेल. पण बावनखणीत गाणा‍ऱ्या-नाचणा‍ऱ्या कलावंतिणी ग्रामीण संस्कृतीतील लोकगीतं गात नव्हत्या खास. त्यांचंही गाणं काहीएक तयारीचंच होतं, असेल. कारण पेशव्यांचं पुणे आणि मराठेशाहीची राजधानी असलेल्या साता‍ऱ्यात सांस्कृतिक आणि सांगीतिक वातावरण तयार झालेलं होतं. शाहूमहाराजांचं बालपण मोगलांच्या छावणीत गेल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच या गोष्टी ठाऊक होत्या. तर पेशव्यांना त्या शाहूमहाराज व आपल्या सरदारांमुळे माहीत झाल्या. पहिल्या बाजीरावाने नर्मदा ओलांडून मराठ्यांचं राज्य दिल्लीच्या तख्ताला भिडवलं आणि तिथे जम बसवण्यासाठी शिंदे-होळकर-पवार यांसारख्या सरदारांना तिथेच जहागिरी दिली. परिणामी तिथेच स्थायिक झालेल्या या सरदारांनी उत्तर भारतीय माहौल लवकरच आत्मसात केला आणि त्याची झलक पेशवे-शाहूंनाही दाखवली. पुणे-साता‍ऱ्यातील सांस्कृतिक वातावरण त्यातूनच आकाराला येत होतं. त्यात शाहूमहाराजांचं १५ डिसेंबर १७४९ला निधन झालं आणि कलावंतांची बूज राखण्याचं काम सर्वस्वी नानासाहेब पेशव्यांच्या खांद्यावर आलं. ही बूज त्यांनी उत्तम रीतीने राखली. त्याचा उत्तम दाखला म्हणजे शुक्रवारपेठेत दिमाखात उभी राहिलेली बावनखणी!

नानासाहेबांच्या काळात बावनखणी उभी राहिली, पण त्या बावनखणीतल्या कलेचा प्रत्यक्ष नानासाहेबाने किती उपभोग घेतला शंका आहे. कदाचित विशिष्ट सण-उत्सवकाळात त्याने या बावनखणीतील कलावंतिणींना शनिवारवाड्यावर बोलावलंही असेल, पण तशी नोंद तरी सापडत नाही. अर्थात नानासाहेब पेशव्याची येसू नावाची जी नाटकशाळा होती, ती उत्तम गायची. नानासाहेब पेशव्यापासून दुस‍ऱ्या बाजीरावापर्यंत सर्वच पेशव्यांनी खासगीत बाळगलेल्या बहुतेक नाटकशाळा या नाच-गाण्यात तरबेज होत्या. या नाटकशाळा खुद्द पेशव्यांच्या असल्यामुळे त्यांची राहण्याची-उदरनिर्वाहाची व्यवस्था स्वतंत्र केलेली असायची.

नानासाहेबापासून किमान पुण्यात तरी एकप्रकारचं सांगीतिक वातावरण तयार झालं होतं. खुद्द त्याच्या दरबारात नारो आप्पाजी भावे नावाचे सतारवादक आणि धृपदीये होते. ही संगीत परंपरा शेवटच्या बाजीरावापर्यंत कायम होती. दिवंगत गायक-संगीतसमीक्षक वामनराव देशपांडे यांनी महाराष्ट्रातील संगीताचे कार्यया पुस्तकात यासंबंधी एक नोंद केलेली आहे. ते लिहितात- पेशवाईच्या अखेरपर्यंत पावा भीमराव, राणी शिंपी, विठू गुरव, त्र्यंबक आत्माराम, विठोबा पारनेरकर हे थोरले माधवराव आणि सवाई माधवराव पेशवे यांच्या आश्रयाखाली होते. आणि दुस‍ऱ्या बाजीरावाच्या राजवटीत दावलखान, मेंढूसेन, विलासबरसखान आणि चिंतामणी मिश्र यांसारखे अनेक धृपदगायक संगीताची जोपासना करत होते.म्हणजे पेशवाईत शास्त्रीय संगीतासाठी आश्वासक असं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि ते शुक्रवारातल्या बावनखणीत अगदीच झिरपलेलं नव्हतं, असं म्हणणं कठीण आहे. किंबहुना नानासाहेब पेशव्यांनंतर सवाई माधवराव आणि दुस‍ऱ्या बाजीरावाच्या काळात नावारुपाला आलेल्या व्यकंट नरसी, चंद्री नायकीण, सगुणी कलावंतीण, लक्ष्मी परभीण या कलावंत महिला बावनखणीतल्याच होत्या. फरक एवढाच होता की, नानासाहेब पेशव्याच्या काळात बावनखणी नावाची कलावंतिणींचे दिवाणखाने असलेली एकच वास्तु होती. सवाई माधवराव आणि दुस‍ऱ्या बाजीरावाच्या काळात बावनखणीचा विस्तार होत गेला. एकेका कलावंतिणीची एकेक स्वतंत्र वास्तू म्हणजे दिवाणखाने उभे राहिले आणि शुक्रवाराचा परिसर बावनखणी म्हणून ओळखला जाऊ लागला.

नानासाहेब पेशव्याच्या काळात उभी राहिलेली बावनखणी ‌कशी होती, त्याचं काहीच रेखाचित्र-कल्पनाचित्र उपलब्ध नाही. कुणी कधी काढल्याचंही ऐकिवात वा वाचण्यात नाही. पण आजच्या पुण्यातील शुक्रवार पेठेतील श्रीनाथ टॉकीजच्या बाजूला मूळ बावनखणीची जागा असल्याचं म्हटलं जातं. ती दुपाखी-दुमजली इमारत होती, असे उल्लेख मात्र पेशवे दफ्तरांत सापडतात. बावन्न खणांतल्या प्रत्येक खणांत वेगवेगळी कलावंतीण असण्याची शक्यता कमी आहे. किंबहुना प्रत्येक कलावंतिणीबरोबर असलेला कलावंतांचा ताफा बघता प्रत्येकीच्या वाट्याला हमखास तीन-चार खण आले असतील. मात्र ही बावनखणी हमखास पेशवाईच्या तेव्हाच्या इतमामाला साजेशी असेल. एक लांबलचक दिवाणखाना, मध्ये बारीक कोरीवकाम केलेले सुरुदार खांब, छताला हंड्या-झुंबर आणि खासेस्वारीसाठी खास भिंतीला टेकून तयार केलेली गाद्यागिर्द्यांची बैठक. नाच-गाण्याची मै‍फल जमायला याहून अधिक काय हवं? मग त्या मैफलीतून उमटणारे सूर मोरी छोडो डगरीया हो श्यामअसे, तक्रारीचा भाव आळवणा‍ऱ्या ठुरीचे असोत नाहीतर; ‘शहर बडोदे सोडून गेले, वर्षं झाली बारा... सखे बाई गंअशी आर्त हाक घालणा‍ऱ्या लावणीचे असोत. बावनखणीखालून जाताना एखाद्या बाजिंद्या कलावंतिणीचा असा काळीज चिरत जाणारा आवाज ऐकून कुणी बावनखणीची पायरी चढला नसेल, तरच नवल!

नानासाहेब पेशव्यांनी उभारलेल्या बावनखणीची एवढी जादू तर होतीच. नानासाहेबाच्या काळात पेशवाई भरभराटीला आली. मात्र १७६१च्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला आणि काही काळ पुण्याची रया गेली. पण थोरल्या माधवरावांनी पेशवाईची विस्कटलेली घडी पुन्हा बसवली आणि नाना फडणविसांच्या बौद्धिक कारवायांमुळे सवाई माधवरावाच्या काळात पेशवा आणि पुणं पुन्हा भरभराटीला आलं. या काळात पुणं वैभवाच्या अत्युच्च शिखरावर होतं. साहजिकच बावनखणीला पुन्हा बहर आला. हा बहर दुस‍‍ऱ्या बाजीरावाच्या काळात चरमसीमेला पोचला. विशेष म्हणजे दुस‍ऱ्या बाजीरावाने शुक्रवारपेठेत आपल्या मौजमस्तीसाठी वाडा बांधल्यावर नंतर स्वतःच्या मर्जीतल्या कलावंतिणींसाठी बावनखणी परिसरात माड्याही बांधल्या. त्याचे अनेक दाखले पेशवे दफ्तरांत सापडतात. त्याच्या स्वदस्तुरची एक नोंद सापडते ती अशी- शुक्रवारचे वाड्यासमोर जागा, घरे आम्ही पूर्वी खरेदी केल्याच आहेत. त्या मोडून सगुणी कलावंतिणीचे घरचे दक्षिणेस व चंद्रीचे घराचे दक्ष‌िणेस व तालीमखाना नवा शुक्रवारचे वाड्यापुढे रस्ता मधी टाकून बांधिला आहे. त्याचे मुकाबिल्यास पूर्व-पश्चिम लांबीचा रस्ता मधी सोडून आम्ही घर बांधून त्यांत कलावंतिणी बि‍ऱ्हाडासारख्या ठेवल्या आहेत. त्या आमच्या घरास साडे नऊ हजार रुपये लागले असत. लौकिकांत ते घर कलावंतिणीचे म्हणवतो. परंतु ते घर आमचे. कलावंतिणीचे नाही.

या पत्रात पेशवाईतील बावनखणीतील दोन प्रसिद्ध कलावंतीणींची नावं आढळतात. यातली चंद्री नायकीण बाजीरावाच्या खास मर्जीतली होती. दुस‍ऱ्या बाजीरावाच्या विश्रामबागवाड्यातील नाचीच्या दिवाणखान्यात हिच्या नृत्याचे अनेक कार्यक्रम झाल्याच्या नोंदी आढळतात. कुणी पाहुणेमंडळी आली की त्यांच्या पाहुणाचारासाठी चंद्रीचा नाच खास आयोजित केला जायचा.

सगुणी कलावंतीण तर सवाई माधवरावाच्या काळापासून आपली सेवा पेशवे दरबारी रुजू करत होती. सवाई माधवरावाची तिच्यावर बहुधा खास मर्जी होती. त्यामुळेच एका पत्रात तो लिहितो- सगुणी कलावंतीण, वस्ती पेठ शुक्रवार, शहर पुणे, इणे दत्ताजी साबळा दाळिंबकर याजपासून दीडशे रुपयांस चहू वर्षांची एक मुलगी खरेदी केली आहे. तिचे जकातीचा आकार माफ केला असे, तरी आकार होईल तो माफ खर्च लिहून जकातीचा तगादा न करणे...

पेशवे रोजनिशींतल्या अनेक पत्रांत अशा कैक कलावंतिणींची नावं सापडतात. पण व्यंकट नरसी या नाचीइतकी लोकप्रियता आणि राजमान्यता क्वचितच कुणाला मिळाली असेल. व्यंकट नरसी होती राजनर्तिका. पण तिचंही वास्तव्य बहुधा बावनखणीतच होतं आणि त्याकाळी ती वारांगना म्हणूनच प्रसिद्ध होती. वाड्यात होणारे मोठमोठे उत्सव असोत किंवा निजाम-इंग्रजांच्या प्रतिचनिधींचं स्वागत करायचं असो, अशा वेळी खास व्यंकट नरसीलाच याद केलं जाई. दुस‍ऱ्या बाजीरावाच्या एका पत्रात एका उत्सवसमयी तीन दिवस सतत व्यंकट नरसीचा नाच आणि रामचंद्र गोसावी पैठणकर यांचं गायन झाल्याचा उल्लेख आलेला आहे. तर एका ठिकाणी बाजीरावाने अहोरात्र दोन दिवस नाचवून तिला २६ हजार रुपये बक्षीस दिल्याचीही नोंद सापडते. हिच्या नावासंबंधीही एक हकिकत आहे. हिचं मूळ नाव नरसी. विश्वगुणादर्श ग्रंथाचा कर्ता पंडित व्यंकटाध्वरी याने तिच्या नाचांत काही दोष काढून ते स्वतः तिला समजावले. तेव्हापासून ती स्वतःला पं. व्यकंटाध्वरी यांची शिष्या मानू लागली आणि आपल्या नावाआधी त्यांचं नाव लावू लागली.

मात्र सगुणी असो, चंद्री असो किंवा व्यंकट नरसी असो, त्या कोणत्या प्रकारचा नाच करीत हे उलगडत नाही. त्यामुळेच बावनखणी म्हणजे निव्वळ शेजेची सोय किंवा छचोरपणा, असा आरोप बावनखणीवर नंतरच्या काळात करण्यात आला. गेल्या शंभर-पन्नास वर्षांत शुक्रवारपेठेचा मूळ बावनखणीचा भाग आणि त्याला जोड मिळालेला बुधवार पेठेचा भाग मिळून जो रेड लाइट एरिया तयार झालाय, तो पाहून कुणाला हा आरोप खराही वाटेल. पण त्यात तथ्य नाही. गायन-नर्तन हीच कायम बावनखणीची मिरास राहिली आहे. अगदी सुरुवातीच्या काळात कदाचित बावनखणीतील नाच-गाण्याला डौलदार रूप लाभलं नसेल कदाचित. पण सवाई माधवराव आणि दुसरा बाजीराव यांच्या काळात बावनखणीत लावणीचा शिरकाव झाला आणि बावनखणीने कात टाकली. ती अक्षरशः झळाळून उठली. याचं श्रेय ख‍ऱ्या अर्थाने जातं दुसरा बाजीराव आणि शाहीर होनाजीबाळाला. कारण दुस‍ऱ्या बाजीरावाने उत्तरतेल्या ठुमरी-कजरीसारख्या ठाय लयीतील गाण्याच्या धर्तीवर लावण्या रचायला होनाजीबाळाला सांगितलं आणि त्याने ते शिवधनुष्य पेललं. एकाच सुरात म्हटल्या जाणा‍ऱ्या पारंपरिक लावणीगीताचे सूर होनाजीबाळाने असे काही खेचले की उत्तरेतल्या बैठक की ठुमरीच्या धर्तीवर महाराष्ट्रात बैठकीची लावणी निर्माण झाली. बावनखणीत अवतरलेल्या या लावणीयुगाचं वर्णन दिवंगत संगीतसमीक्षक अशोक रानडे यांनी आपल्या संगीतविचारया पुस्तकात विचक्षणपणे केलं आहे. ते लिहितात- लावणीचा उगम जरी १५६० पर्यंत मागे जात असला, तरी उत्तर पेशवाईत लावणी भरभराटली. त्याला होनाजीने लावणीत घडवून आणलेला तांत्रिक व कलात्म बदल कारणीभूत ठरला. हा बदल पुढीलप्रमाणे नोंदवता येईल. होनाजीने ढाल्या स्वरात गाण्याची ढब स्वीकारली. गाण्याची लय ठाय केली. आश्रयदात्याच्या इच्छेनुसार होनाजीने राग-तालांत लावण्या बांधायला सुरुवात केली. लावणीगायनाकरता लय-ताल साथ देण्याकरता तबला वापरण्यावर होनाजीने भर दिला. लावणीगायिकेने खाली बसून लावणी सादर करण्याची प्रथा होनाजीने उचलून धरली. या व यांसारख्या इतर सर्व विशेषांनी बैठकीच्या लावणीच्या रुपास कलात्मकता प्रदान करण्यात सहाय्य केले. खेचली गेलेली लय आणि बसून गाण्याच्या प्रघातामुळे अदाकारी-ठुमरी गायकांनी प्रसृत केलेल्या गायनाबरोबरच अभिनय संभवला.

एकूण होनाजीबाळाने लावणी कलेचं रंगरूपच पालटून टाकलं. महाराष्ट्रातील गतिमा‌न लावणीला ठुमरीचा भावोत्कट साजबाज चढवला. मग ही बैठकीची लावणी, हेच पुण्यातील बावनखणीचं वैशिष्ट्य ठरली. बावनखणीतील खणाखणांत आणि दिवाणखान्यांत बैठकीच्या लावणीचेच सूर गुंजायला लागले-

अहो भाऊजी मी कोरा माल मुखी विडा लाल

नरम गोरे गाल, वर तीळ झळझळी

जशी फुलली चाफ्याची कळी गं... बाई गं

आणि वर कलावंतिणीची दिलखेचक अदा. बावनखणी नुस्ती गजबजून गेली. होनाजीसकट सारे शाहीर बाजीरावाचे आश्रित. त्यामुळे सा‍ऱ्यांनीच त्याचा अनुनय करण्यासाठी अश्लील लावणीरचना केली. पण बावनखणीतल्या कलावंतिणींनी त्यात आपल्या भावकामाने असा काही रस ओतला की, बैठकीच्या लावणीचं शास्त्रीय घराणंच निर्माण झालं. आज महाराष्ट्रात रुजलेल्या आणि अजून टिकून असलेल्या बैठकीच्या लावणीचं श्रेय बावनखणीलाच द्यायला हवं. पेशवाईच्या अस्तानंतर सारेच शाहीर देशोधडीला लागले. कुणी बडोद्याला गेलं, कुणी ग्वाल्हेर-इंदुर संस्थान जवळ केलं. पेशवाईनंतर पुणं असं सांस्कृतिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेलं असताना फक्त बावनखणीतल्या बायांनीच नानासाहेब पेशवांच्या काळात पुण्यात रुजलेली सांगीतिक मुळं घट्ट पकडून ठेवली.

म्हणूनच बावनखणी म्हणजे एक कलासंस्कृतीच! आणि ती कलासंस्कृती असल्यामुळेच पेशवाई बुडाल्यावर ब्रिटिश अंमल सुरू झाला तरी, बावनखणीची मिजास कमी झाली नाही. संस्कृतीचे ठेकेदार म्हणवणा‍ऱ्यांनी तिला नावं ठेवली. प्रसंगी नाकंही मुरडली. पुणे शहराचे वर्णनपुस्तकात, बावनखणी कुणी वसवली याचं वर्णन करणा‍ऱ्या नारायण विष्णू जोशी यांनीच या वस्तीला दुगाण्या देण्याचंही काम केलं आहे. ते म्हणतात-शुक्रवारपेठेत दोन रस्ते आहेत. त्यात एक मुख्य रस्ता बावनखणीचा. मागे ज्या बावनखणीविषयी सांगितले आहे, तिजविषयी येथे थोडे लिहिले पाहिजे. ज्या सभ्य खासगीवाल्याने कसबिणींची सोय करून दिली, त्याने सर्वथैव वाईट केले. ह्या भ्रष्ट बायकांची अशी सोय केल्याने दुस‍ऱ्या बायकांस त्याप्रमाणे होण्यास उत्तेजन आले. पूर्वी पो‍ऱ्यांचे तमाशे रस्त्यांत होत, तेणे करून जसा लोकांस त्रास होत होता, तसा किंबहुना त्याहून अधिक ह्या बावन्नखणींकडून होतो, असे म्हणण्यास चिंता नाही.या नाटकशाळांकडे पाहून मुले बिघडतात. त्यांच्या नादी लागतात. येणेकडून पुष्कळ वाईट परिणाम होतात.

नारायण विष्णू जोशी यांनी आणि त्यांच्याप्रमाणे अनेकांनी या बावनखणीला नावं ठेवली. पण बावनखणी आपलं काम चोख बजावत राहिली. इतरांच्या भोगांनी प्रसंगी स्वतः भ्रष्ट होत संस्कृतीवहन करत राहिली. ती नुस्तीच बाजारबसवी नव्हती. तिच्या ठायी तसं घेण्याजोगं काही नसतं, तर भालाकार भोपटकरांपासून कृष्णशास्त्री चिपळूणकरांपर्यंत अनेकांनी बावनखणीचे उंबरठे झिजवले नसते. मुख्य म्हणजे ग. त्र्यं. माडखोलकर यांच्यासारख्या विद्वान अभ्यासकानेही यासंदर्भात पुण्याच्या रंगेलपणालाच जबाबदार धरलं आहे. त्यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचं छोटेखानी चरित्र लिहिलं आहे. त्यात तत्कालीन पुण्याचं वर्णन करताना माडखोलकर म्हणतात- शास्त्रीबुवांच्या वेळचे पुणे जसे रसिकतेबद्दल तसेच रंगेलपणाबद्दलही विख्यात होते. रावबाजीचे राज्य जरी पुण्यातून गेले, तरी त्याचा रंगेलपणा मात्र मागे राहिला. पुण्यातील सामान्य लोक आणि सुशिक्षित यांच्यात हा रंगेलपणा जवळजवळ सारख्याच प्रमाणात वसत होता. रात्रीच्या वेळी हातात फुलांचे गजरे घेऊन, मशालींच्या झगझगीत प्रकाशात प्रियाराधनार्थ बाहेर पडणे, हे त्यावेळी कमीपणाचे समजले जात नसे. तत्कालीन सुशिक्षितांप्रमाणेच कृष्णशास्त्री चिपळूणकर हेही रसिक तसेच रंगेलही होते. शास्त्रीबुवांचे एक स्नेही आणि शिक्षणव्यवसायातील पहिले वरिष्ठ बाबा गोखले यांची अशी गोष्ट सांगतात की, त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना केव्हा केव्हा आपल्या या गुरुला त्याच्या प्रेमपात्राच्या महालातून आणायला जावं लागत असे.

या उदाहरणांवरुन बावनखणीला दोष देण्यात किती अर्थ आहे, ते जाणकारांना कळेलच. अर्थात मीनाबाजार काय किंवा बावनखणी काय, नाच-गाणं म्हटलं की तिथे शौकीन रसिकांची चहलपहल असणारच. मग पुढे त्यातून उद्भवणा‍‍ऱ्या परिस्थितीसाठी केवळ बावनखणीला दोष देण्यात काय अर्थ? उलट बावनखणीने जेवढं धरून ठेवता येईल तेवढं गाणं धरून ठेवलं. प्रसिद्ध गायिका बाई सुंदराबाई यांचा दिवाणखाना बावनखणीतच होता. या सुंदराबाईंना प्रसिद्ध गायकनट बालगंधर्व बहीण मानायचे. तसंच पं. भास्करबुवा बखले नियमितपणे सुंदराबाईंकडे त्यांच्या लावण्या ऐकायला यायचे. त्यांच्या लावण्यांच्या चालींवरूनच त्यांनी संगीत मानापमान नाटकातील पदांना चाली लावल्या आहेत. एवढंच नव्हेतर पंढरपूरच्या उत्पात मंडळींनी जपलेल्या बैठकीच्या लावणीच्या अस्सल चीजांचा स्रोत बावनखणीच आहे.

पेशवाईत जन्माला आलेली बावनखणीतली ही नृत्य-संगीतपरंपरा १९६०-६५ पर्यंत कायम होती. कौसल्याबाई कोपरगावकर, गोदावरीबाई पुणेकर, भामाबाई पंढरपूरकर या लावण्यखणींचे दिवाणखाने याच बावनखणीत होते. तबला आणि सारंगीच्या साथीने रोज संध्याकाळी त्यांची बैठकीची तेजपुंज लावणी उगवत होती आणि चंद्राच्या साक्षीनेच मावळत होती. नामांकित तबलिये आणि सतारिये या बायांच्या साथीला दिमाखात बसत होते. प्रसिद्ध दिवंगत संगीतकार दत्ता डावजेकर यांचे वडील गोदावरीबाई पुणेकर यांच्या बैठकीत त्यांना तबल्याची साथ करायचे. खुद्द डावजेकरांनीही लहानपणी भामाबाई पंढरपूरकरांना तबल्याची साथ केली होती.

या अर्थाने बावनखणी संस्कृतीची खाणच होती. यादव काळानंतर तुटलेला महाराष्ट्रातला संगीताचा दुवा जोडून ठेवण्याचं काम खरंतर बावनखणीनेच केलं. पार अगदी बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर उत्तर भारतात संगीताचं शिक्षण घेऊन परत महाराष्ट्रात येईपर्यंत. बाळकृष्णबुवा ख्यालगायकीचं शिक्षण घेऊन आले आणि त्यानंतरच्या काळात महाराष्ट्रात संगीताचं सुवर्णयुग अवतरलं. पण म्हणून बावनखणीला बोल लावण्याचं काम नाही. बानवखणीने मराठी मातीत संगीताची धुगधुग जागती ठेवण्याचं काम नक्कीच केलं. म्हणून तर वामनराव देशपांडे म्हणतात- दुस‍ऱ्या बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीत लावणीगायनाचा उत्कर्ष झाला. पोवाडे रचणारे शाहीर आणि लावण्यांचे अनेक प्रतिभावंत रचनाकार यावेळी निर्माण झाले. पोवाड्यांच्या सुबोध, पण रांगड्या भाषेला अनुसरून लावलेल्या साध्या चालीला खास गायकीत प्रवेश मिळाला नाही. मात्र लावणी या महाराष्ट्राचे वैशिष्ट्य ठरलेल्या गानप्रकारात माफक प्रमाणात का होईना, रागदारीचा समावेश होऊ शकला.

वामनरावांसारख्या संगीताच्या जाणकाराने ही पावती दिल्यावर तर, बैठकीची लावणी आणि तिला तगवणा‍ऱ्या बावनखणीकडे कुणी नजर उचलून पाहण्याचंही कारण नाही. बैठकीची लावणी ही बावनखणीने उभ्या महाराष्ट्राला दिलेली सांस्कृतिक-सांग‌ीतिक देणगी आहे.

कालौघात माणसं-संस्था काळाच्या पडद्याआड जातात. तसे बावनखणीचेही बुरुज ढासळले. तिच्या आश्रयाला असलेले कलावंत आपल्या प्रतिभेची झलक दाखवत गावोगाव पांगले. मग ज्यांच्याकडे कला नव्हती, अशांनी या पडक्या बुरुजांचा आधार घेतला. त्यांच्याकडे कला नव्हती, तरी शरीर होतं. मग तेच त्यांचं भांडवल झालं. हेही कुणी हौसेने नसेलच करत. पण त्यामुळे बावनखणी मात्र पार बदनाम झाली...

... इतकी की तिच्या आत आता उगवतच नाही, सर्जनाचं एखादं गाणं, एखादं नृत्य. मग उगाचच तिचा शोध घेत फिरावं लागतं. तरीही लागत नाहीच ती हाती. शोधणा‍ऱ्यालाच व्हावं लागतं मग बावनखणी आणि काढावं लागतं तिला पुन्हा बाहेर भूतकाळाच्या गर्भातून... उद्याच्या कलेचं बीजारोपण करण्यासाठी!
(महाराष्ट्र टाइम्सच्या २०१३च्या दिवाळी अंकातील माझा लेख)


२ टिप्पण्या:

  1. लखनौला आज ही जसा मुजरा जिवंत आहे,तशी बावणखणी पुण्यात का जिवंत नाही?बावणीखणी पुण्यात कधीपासून मुकी झाली?

    उत्तर द्याहटवा
  2. मुकुंदा खूप छान लिहिलंस. मनापासून अभिनंदन आणि कौतुकही ....

    उत्तर द्याहटवा