लावणीसम्राज्ञी कौसल्याबाई कोपरगावकर छायाचित्र सौजन्य : अनंत पटवर्धन |
... आणि स्वतः बालगंधर्व त्यांना संबोधायचे आर्यगंधर्व! कारण पुण्यातील तत्कालीन आर्यभूषण तमाशा थिएटरवर कोसल्याबाईंचं अनभिषिक्त साम्राज्य होतं. बाईंची पार्टी उभी राहिली की, आर्यभूषणचं आवार रसिकांनी फुलून जायचं. बाई येण्याआधी रंगमंच्यावर तबलजी, ढोलकीवाला आणि पेटीवाल्याने बैठक जमवलेली असायची. त्यांनी जमवलेल्या वाद्यांच्या मेळ्यात आपल्या टाळ्यांच्या नादाची वैशिष्ट्यपूर्ण भर घालत कोसल्याबाई अवतरायच्या आणि बघता बघता लावण्यांचा फड जमून जायचा. दोन हात एकमेकांत गुंफून वाजवलेली टाळी हे बाईंचं खास अस्त्र होतं. बाईंचा हा टाळीनाद ऐकण्यासाठी रसिक हजेरी लावायचे, अशी आठवण पुण्याच्या आर्यभूषण तमाशा थिएटरचे मालक माजिदशेठ तांबे आजही सांगतात. या रसिकांमध्ये कोण नसायचं? मिळालेल्या माहितीनुसार प्रसिद्ध शहनाईवादक बिस्मिल्लाखाँसाहेब, नामवंत तवलावादक अल्लारखाँ आणि थिरकवाखाँसाहेब, मास्टर भगवान, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, बाबासाहेब पुरंदरे यांसारख्या अनेकांनी कौसल्याबाईंच्या लावण्यांचा आस्वाद अनेकवेळा घेतला.
बाईंनी एकदा लावणी म्हणायला सुरुवात केली की, त्या थांबत नाहीत तोपर्यंत रसिक खिळून असायचे. कधी उभ्याने नाचून म्हटलेली द्रुत लयीतली फक्कडशी छक्कड, तर कधी बसून घोळवत म्हटलेली ठाय लयीतली बैठकीची लावणी आणि सोबत अदेचा नखरा... कौसल्याबाईंचे नृत्य आणि गाननिपुणत्व पाहण्यासाठी रसिक पुनपुन्हा हजेरी लावत. बालगंधर्व तर अनेकदा 'देवा देवा' म्हणत बाईंचं कौतुक करत. आर्यभूषणच नाही, तर बाईंच्या रास्तापेठेतील घरीही गंधर्व जात. बाईंची गायकी त्यांच्या विशेष आवडीची होती. कौसल्याबाईंच्या तरुण, पण दमदार आवाजातल्या लावण्या गंधर्वांना मोहात पाडायच्या. विशेष म्हणजे अनेकदा बाई स्वतः पेटी वाजवून त्यावर बैठकीच्या लावण्या म्हणत. त्यामुळे पुणे मुक्कामी असल्यावर गंधर्व आणि कौसल्याबाईंची भेट झाली नाही असं सहसा होत नसे. या भेटीत कोसल्याबाईंनी बैठकीच्या लावण्या म्हणाव्यात आणि बालगंधर्वांनी ‘व्वा देवा, व्वा देवा’ म्हणत तारीफ करावी, ही रीत जणू ठरुनच गेलेली. बालगंधर्व नाट्यव्यवसायाच्या निमित्ताने मुंबईला जाईपर्यंत या भेटीगाठी कायम होत्या. एवढंच नाही, तर कौसल्याबाईंवर जीव असल्यामुळेच बालगंधर्वांनी बाईंचा घरोबा आपल्या गंधर्व नाटकमंडळीतील गायकनट प्रभाकरपंत पटवर्धन यांच्याशी जुळवून दिला.
बालगंधर्वांनाही लोभावणारी कौसल्याबाईंची ही गायकी खास म्हणावी अशीच होती. त्यांना गोड आवाजाची देणगी निसर्गदत्तच लाभलेली होती. खरंतर त्यांचं घराणं तमाशा किंवा लावणीकलावंतांचं नव्हे. त्या गोंधळी समाजातल्या (आडनाव थिटे) होत्या. त्यांचे वडील माधवराव गोंधळकलावंत म्हणून प्रसिद्ध होते, तर आई म्हाळसाबाईकडेही जुन्या लोकगीतांचा मोठा संग्रह होता. या दोघांच्या प्रभावातून गाण्याची आवड फार लहानपणीच कोसल्याबाईंना लागली. परंपरेनं आलेलं गाणं-बजावणं रक्तातच असल्यामुळे पूर्वापार अनेक गोंधळीकलावंत तमाशा-लावणीच्या क्षेत्रातही नाव कमावून होते. कौसल्याबाईंचा लावणीच्या क्षेत्रातला शिरकावही असाच झाला. मात्र एकदा या क्षेत्रात आल्यावर त्यांनी एकलव्यनिष्ठेने पारंपरिक लावणी शिकून घेतली. त्या काळात बाई सुंदराबाई जाधव, चंदा कारवारकरीण, हिराबाई सासवडकर, शेवंता जेजुरीकर, सरस्वती कोल्हापूरकर अशा अनेक नामवंत लावणीगायिका आपला जम बसवून होत्या. बहुतेकींचे पुण्यात दिवाणखाने होते. संध्याकाळ झाली की, या दिवाणखान्यांतून बैठकीच्या लावण्यांचे दीप उजळायचे. यातल्या बहुतेकींच्या आवाजातील लावण्यांच्या त्या काळी म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात रेकॉर्ड निघाल्या होत्या. कौसल्याबाईंचं गाणं या बुजुर्ग लावणीकलावंतांच्या गाण्याशी नातं सांगणारं होतं. त्यामुळेच आजही त्यांची ‘अबोला का रे धरसी, सखया बोला मजसी’सारखी तबकडीवरची लावणी कानावर पडली की अवाक् व्हायला होतं. त्यांचं लावणीगायन ऐकताना त्यांना किमान उपशास्त्रीय प्रकारातील गाण्याचं अंग होतं, असं म्हणावंच लागतं. कारण ही लावणी ऐकताना तिच्यात ठुमरी-कजरीसारख्या उपशास्त्रीय गानप्रकारातली वैशिष्ट्य जाणवत राहतात. ही ठाय लयीतली लावणी ऐकताना आपल्या कानावर बाईंचं नुस्तं गाणं पडत नाही, तर त्यातली बाईंची शब्दांची फेक अशी आहे, गाण्याबरोबरच नजरेसमोर बाईंचं भावकामही सुरू होतं. महत्त्वाचं म्हणजे कोसल्याबाईंचं लावणीगायन एकदम खानदानी होतं. बालगंधर्व संगीत रंगभूमीवर जी घरंदाज करामत करत होते, तीच करामत कौसल्याबाई लावणीच्या रंगमंचावर करत होत्या. योगायोग म्हणजे बालगंधर्वांचा मृत्यूनंतर पुण्यात त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ बालगंधर्व रंगमंदिर सुरू करण्यात आलं, तेव्हा तिथे कार्यक्रम सादर करण्याचा पहिला मान कौसल्याबाईंनाच देण्यात आला होता.
बालगंधर्वांच्या प्रभावातून कौसल्याबाईंना गाण्याचीदेखील विशेष मर्म आकळली असली पाहिजेत. कारण तीन मुलांच्या पाठीवर झालेली मुलगी कमल हिला गाणं शिकवण्यासाठी कौसल्याबाईंनी खास किराना घराण्याचे संस्थापक अब्दुल करीम खाँसाहेब यांचे ज्येष्ठ चिरंजीव सुरेशबाबू माने यांची नेमणूक केली होती. सुरेशबाबू मानेंकडे कमल वर्षभर शास्त्रीय पद्धतीचं गाणं शिकली. त्यावेळी आपल्याबरोबर सुरेशबाबूंकडे आजच्या नामवंत गायिका प्रभा अत्रेदेखील गाणं शिकत असल्याची याद आज ऐंशीच्या घरात असलेल्या कमलबाई हटकून जागवतात. वर्षभरानंतर आपलं गाणं खंडित झाल्याची रुखरुख कमलबाईंना आजही आहे. पण शास्त्रीय गाणं सुटलं, तरी परंपरेतलं गाणं मात्र कमलबाई गात राहिल्या. परंतु हे गाणं लावण्यांपेक्षा वगनाट्यासाठीचं होतं. उदाहरणार्थ लीला गांधी यांचं ‘सोळावं वरीस धोक्याचं’, निळू फुले यांचं ‘कथा अकलेच्या कांद्याची’ यांसारख्या अनेक वगनाट्यांसाठी कमलबाई यांनी गाणी गायली. त्याशिवाय अगदी तरुणपणी ‘भाऊबीज’, ‘शिवलीला’, ‘सुदाम्याचे पोहे’, ‘चिमण्यांची शाळा’ या चित्रपटांत त्यांनी सुलोचना, वसंत शिंदे, आशा काळे यांच्याबरोबर कामही केलं. परंतु या झगमगाटी दुनियेपासून कौसल्याबाईंनी आपल्या लेकीला तसं दूरच ठेवलं होतं. आपल्याबरोबरही त्या क्वचितच तिला घेऊन जात.
कौसल्याबाईंनी मात्र अखेरपर्यंत लावणीशी असलेलं आपलं नातं जपलं आणि वाढवलंही. लावणीगायनाच्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या अनेकींना त्यांनी शिकवलं. कौसल्याबाई, राधाबाई बुधगावकर आणि यशोदाबाई वाईकर या तिघींची तर खास दोस्ती होती. तिघींनी महाराष्ट्र गाजवला होता. पैकी आपल्या मुलीच्या मुलाचं लग्न राधाबाईंच्या नातीशी करुन त्यांनी राधाबाई बुधगावकर यांच्याशी तर नातंही जोडलं. महाराष्ट्र शासन आयोजित तमाशा प्रशिक्षण शिबिरात कौसल्याबाईंनी प्रशिक्षकाची भूमिकाही पार पाडली. तसंच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे दिल्लीत १९६६ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमोरही आपली कला पेश केली. इतकं कौसल्याबाई हे लावणीपरंपरेतलं मानाचं लखलखीत पान आहे.
…अन् तरीही कौसल्याबाई कोपरगावकर यांचं नाव आज जणू इतिहासात गडप झालंय. जणू कौसल्याबाई झाल्याच नाहीत.
पण त्यांच्या मुलीचा म्हणजे कमलबाई पटवर्धन यांचा नातू अनंत पटवर्धन याने आपल्या पणजीला पुन्हा वर्तमानाच्या झळाळीत आणण्याचा निर्णय घेतला आहे. या लेखाच्या निमित्ताने कौसल्याबाईंच्या आयुष्यातले काही मोजके कप्पे पहिल्यांदाच उघड होत आहेत. प्रतिगंधर्व म्हणून नावारुपाला आलेल्या कौसल्याबाईंची आजच्या रसिकांसाठी ही पहिलीच झलक!
'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये पूर्वप्रकाशित (२१ जून २०१५)
या आपल्या लेखाबद्दल आपल्याला फार फार धन्यवाद!
उत्तर द्याहटवा