बुधवार, ३ जून, २०१५

राधेच्या घरी होतो सोहळा...


राधेच्या घरी होतो सोहळा...


राधा-कृष्णाचं अप्रतिम शिल्प
अनयाची राधा सुखी होती. सासू थोडा जाच करायची. पण जिवापाड प्रेम करणारा नवरा असल्यावर आणखी काय हवं होतं तिला. सासूचा सारा जाच ती प्रेमाने सहन करायची. पोटी मूलबाळ नव्हतं, म्हणून उदास असायची बिचारी. मात्र अनयानं तिचा कधी राग केला नाही. तसा तो तिच्या शेल्याच्या गाठीला बांधलेलाच होता. कारण सा-या गोकुळात राधेइतकं आरसपानी सुंदर कुणी नव्हतंच ...


... पण कृष्णजन्म झाला नि घात झाला. अनयाच्या आणि राधेच्या प्रेमात वाटेकरी आला. खरंतर सुरुवातीला राधा इतर गवळणींप्रमाणेच जायची यशोदेच्या घरी, कृष्णाला जोजवायला. आपल्याला मूल नाही म्हणून तीही आपल्या प्रेमाचा पान्हा त्याच्यावर रीता करायची. यशोदा आणि गोकुळीच्या सा-या गवळणींनाही राधा-कृष्णाच्या या प्रेमलीलांचं कौतुक वाटायचं. त्यांच्या लेखी त्या मायलेकांच्या लीला होत्या. त्यात त्यांना कधीच विषयबाधा दिसली नाही.


कृष्णाच्या लहानपणी खरोखरच तसं काही नसेलही. पण कृष्ण मोठा होत गेला तरीही राधा-कृष्णाच्या लीला तशाच सुरू राहिल्या. कदंबाच्या तरुतळी दोघेही म्हणे गुपचूप भेटायचे, तासन् तास बोलत बसायचे. काय बोलायचे ते कुणाला कधीच कळलं नाही आणि कळायला त्यांच्यात शब्दांचं बोलणं होतं तरी कुठे? एक अवाक्षरही न बोलता दोघेही एकमेकांच्या मनीचं गुज नेमकं जाणायचे. तो तिच्यासाठी मंजुळ पावा वाजवायचा. तेव्हा राधेला यमुनेकाठचं सारं वेळूचं बनच पावा झाल्यासारखं वाटायचं. मग ती आपल्या रंध्रारंध्रात ते अलौकिक सूर साठवून ठेवायची. जणू पुन्हा कधीच हे सूर ऐकायला मिळणार नाहीत, अशी तिला भीती वाटाची की काय न कळे! पण ती संपूर्ण तनाचाच कान करायची नि बासरीतून निघणारे सूर पिऊन घ्यायची. तिचा हा उद्योग सुरू असताना कृष्ण मात्र शांतच असायचा. त्याला कळायचंच नाही, की हे सूर जीवनाच्या अंतापर्यंत फक्त हिचेच असताना ही का एवढी बावरी होतेय?

कदाचित राधेच्या जागी असता, तर तो हे समजू शकला असता. राधा कितीही त्याची असली, तरी ती अनयाची बायको होती. तिला पत्नीधर्म निभवावा लागणारच होता. इच्छा असो वा नसो... आणि कृष्णाबरोबरच्या नात्याला तरी ती काय नाव देणार होती!

खरोखरच तिला कृष्णाबद्दल किंवा कृष्णाला तिच्याबद्दल नेमकं काय वाटत होतं? पुराणांनी त्यांच्यातल्या प्रेमाला अध्यात्माचंच अवगुंठन चढवलं. मग एकजात सा-याच कवी-लेखकांनीही त्यांचा प्रणय अध्यात्माच्याच चौकटीत बंद केला. त्यांच्या प्रेमाला अलौकिक ठरवून खरंतर सा-यांनीच त्यांच्या प्रेमाची क्रूर चेष्टाच केली. ते अलौकिक प्रेम नव्हतं. ते ख-या अर्थाने लौकिक प्रेमच होतं. एका जीवाला दुस-या जीवाबद्दल वाटणारं. असेल कदाचित त्यांच्यात वयाचं मोठं अंतर. पण त्यांना एकमेकांबद्दल जी भावना वाटत होती, त्या भावनेला कोणतंच वय नव्हतं. म्हणून तर लोकगीतं म्हणतात-

यमुनेच्या तिरी कोन वाजवितो बासरी

राधा म्हणे मनी, आला असेल माझा हरी

राधा कृष्णाचं हे नातं, गावात होतोया बोभाटा

अनयाची राधा मोठी, कृष्णसखा गं धाकुटा

मात्र राधा-कृष्णाने हे वयाचं बंधन नाहीच मानलं. कारण त्यांनी एकमेकांना केवळ शरीरानेच नाही, मनाने स्वीकारलेलं होतं. त्यांच्या या नात्याचा उलगडा आजवर कुणाला झालेला नाही. पण ती निव्वळ सात्त्विक प्रेमभावना नक्कीच नव्हती. तिथे प्रियकर-प्रेयसीचाच तृप्त विलास होता आणि तो हळूहळूच पुष्ट होत गेला होता. कृष्ण लहान असताना राधेने त्याच्याकडे वात्सल्यानेच पाहिलं असेल कदाचित! पण कृष्ण मोठा होत गेला, तसं त्यांच्यातलं नातंही फुलत गेलं. त्याच्या अडनिड्या वयात त्याला तिचं आकर्षण वाटलं असणं स्वाभाविक आहे आणि राधेलाही त्याच्या रूपात आपलं नव्हाळीचं प्रेम सापडलं असणं शक्य आहे. म्हणूनच त्यांचं हे नवथर प्रेम लोकमानस नेमक्या शब्दात व्यक्त करतं-

रुतला बाई काटा, या आडवाटा

नंदाचा गं कारटा हुता जोडीला

हुता जोडीला म्हणून मी आले गोडीला

गोड बोलूनी कसा गं काटा काढीला... गं बाई बाई रुतला बाई काटा

हा कृष्णरूपी काटा राधेच्या पायात नाही, तनामनात रुतलेला आहे. एकाच वेळी तो काढावासाही वाटतो आणि त्याच वेळी तसाच राहू द्यावा, असंही वाटतं. कारण त्याच्या असण्याने त्या वेदनेची जी हुळहुळी असते, ती नेहमीच हवीहवीशी वाटते. राधा-कृष्णाच्या या अनोख्या, पण सच्च्या नात्याचं थेट चित्रण करणं सा-यांनीच टाळलं. प्रत्येकानेच ते केवळ उदात्त करण्याचाच प्रयत्न केला. पण ‘जांभूळआख्यान’ लिहिणाऱ्या लोकसंस्कृतीतील अनाम कर्त्याने मात्र त्याला योग्य शब्दरूप दिलंय. तो म्हणतो-

राधा म्हणे रडू नको घन:श्यामा, यशोदेशी करू द्या घरी कामा

कडेवर घेऊन कृष्णाशी, आली मग आपल्या सदनाशी

शिवकरी मृगनयना बोले, थोर केव्हा होताल या वेळा

पाहताना ‘थोर’ झाला सावळा, राधेच्या घरी होतो सोहळा

बोलता बोले गुजगोष्टी, प्रेमाने घाली मिठी हो कंठी

तो आला भ्रतार पूर्वीचा, लज्जा माझी राखावी हो आता

पाहताना कृष्ण झाला सावळा राधेच्या घरी होतो सोहळा

अनयाचा संसार करतानाच राधा तना-मनाने कृष्णमय झाली. पण तिने दोघांची गल्लत कधीच केली नाही. म्हणून तर गोकुळातून कृष्ण मथुरेला निघून गेल्यावर ना तिने त्याच्याकडे वळून पाहिलं, ना त्याने. शेवटी दोघांनाही आपल्या नात्याच्या सीमारेषा होत्याच ठाऊक!

(प्रहारमध्ये असताना राधा-कृष्णाच्या नात्यावर लिहिलेला एक तुकडा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा