बुधवार, २० मे, २०१५

दोन टिपणं : पाणी आणि नागाची


पाण्याची ओढ आणि भीती

.

ज्याची भीती वाटते, त्याचीच ओढ माणसाला का लागते? हे कसलं जीवघेणं आकर्षण आहे? काय नातं आहे भीतीचं न् ओढीचं? की एक मन नको नको म्हणत असताना, दुसरं मन तेच पुनःपुन्हा करायला धजावतं... ? पाण्याविषयी अशीच ओढ न् भीती मनात खोलवर रुजलीय. एकीकडे पाण्यात जाणंही नकोसं वाटत असताना, दुसरीकडे मात्र पाण्याच्या गूढगर्भी जाऊन त्याचं अंतरंग जाणून घ्यावंसं वाटतं. एका क्षणी पाण्याला दूर लोटावंसं वाटत असताना, दुसऱ्याच क्षणी त्यात गुरफटून जावंसं वाटतं.

कधी निर्माण झाली असेल, पाण्याची ही ओढ न् भीती मनात? काय नातं असेल पाण्याचं नि माझं? की जीवनदायी पाणी अचानक मरणदायी वाटू लागावं!

आठवणींचे डोह उपसायला लागलं की थेट बालपणात जायला होतं. शांत मौनाची रात्र असते. आईच्या कुशीत नितांतगाढ झोप लागलेली असते...

... आणि अचानक पाण्याचे तरंग भोवती उमटू लागतात. आधी मजा वाटते, पाण्यात हात आपटत थबक थबक करताना. पण लवकरच लक्षात येतं, पाणी नेहमीप्रमाणे जमिनीवर पसरलेलं नाही. त्यानं कोंडाळं केलंय आपल्याभोवती. मग आधीची पाण्याच्या ओढीची जागा भीती घेते आणि लहानग्या जीवाचा एकच आटापिटा सुरू होतो, जीव वाचवण्याचा. तो बालजीव जोरजोराने पाण्यात हात आपटू लागतो, पाणी पसरून जावं म्हणून. पण पाणी नाहीच हटत. ते घालत राहतं वेढा आणि घुसमटत जातो मग जीव...नि तोंडातून फुटते एक प्राणांतिक किंकाळी!

ती किंकाळी ऐकून आई जागी होते नि विचारते- बा सपान पाह्यलास? नीज, घाबरू नकोस. सटवाय आली असंल माझ्या लेकराला खेळवायला!

तो सटवाईचा खेळ होता की कुणाचा ठाऊक नाही, पण पाण्याची ओढ आणि भीती तिथेच निर्माण झाली एवढं नक्की! जी पुढे वाढतच गेली... किंबहुना वाढत्या वयात पावलोपावली भेटत राहिली. कधी गावातल्या नदीत असलेल्या डोहाच्या निमित्ताने, कधी आईनेच दाखवलेल्या तिच्या माहेरच्या विहिरीच्या निमित्ताने, तर कधी भटकंतीत गावोगावी भेटणाऱ्या तलावांच्या निमित्ताने.

नदी, डोह, विहीर, तलाव... सगळ्याच एका परीने पाणवठ्याच्या जागा. सगळ्यांची तृष्णा भागवणाऱ्या. पण तहानलेल्यांची तहान भागवतानाच, अडल्या-नडलेल्यांच्या जीवाचा स्वाहादेखील करणाऱ्या. म्हणजे एकाच वेळी तारक आणि मारकही. पाण्याच्या आणि पाणवठ्याच्या अशा चित्तचक्षुचमत्कारिक कथा आईने लहानपणी कितीतरी सांगितलेल्या.  स्वप्नांत पाहिलेल्या पाण्याची ओढ अन् भीती त्या कथांतून अधिकच गडद होत गेलेली.

आजही सगळ्यात पहिला आठवतो तो, तिने दाखवलेला गावच्या नदीतला गिऱ्होबाचा डोह. खोल खोल काळंशार पाणी असलेला. सबंध विश्वातला काळोख जणू त्या डोहाच्या तळाशी साठवलेला असावा, असं तो डोह पाहून वाटायचा. त्या काळोख्या पाण्याची भीती आजही मनातून गेलेली नाही. पण त्या काळ्याशार पाण्यातच काहीतरी सर्जनशील होतं, असं मात्र कायम वाटत आलंय. कदाचित विश्वाचं आर्त त्यातच सामावलेलं होतं की काय कुणास ठाऊक... आणि आर्ततेतच सर्जन दडलेलं असतं.

तिने दाखवलेली माहेरची विहीरही खास होती. तिच्या माहेरच्या वाटेवरच होती. पहिल्यांदा बालसुलभ वृत्तीने डोकावलो विहिरीत, तिने खसकन् मागे ओढलं. पण नंतर त्या विहिरीची कथा सांगितली. त्या विहिरीचा तळ खुणावतो म्हणे कुणाकुणाला. त्या विहिरीत एक मासा होता आणि त्याच्या नाकात मोती होता, म्हणे... तो मासा कुणाला दिसला की त्याला विहिरीत उडी घेण्याचा मोह व्हायचा.

लोकरहाटीतल्या पाण्याच्या आणि पाणवठ्याच्या अशा अनेक गोष्टी आई सांगायची. तिच्या तोंडून त्या ऐकताना सगळ्यात आधी त्या सगळ्याची भीती वाटायची. पाणी आपल्याला त्याच्याकडे खेचून घेतंय असं वाटत राह्यचं. पण पाण्याच्या गोष्टींचा शेवट ती गोड करायची, सात आसरांची गोष्ट सांगून. ती सांगायची- पाणवठ्यांच्या तळाशी कितीही बुडालेले आत्मे असले, तरी त्यांच्या काठाशी मात्र असतात सात आसरा. या आसरा म्हणजेच जलअप्सरा. पाण्यात उतरताना त्यांची आठवण ठेव, त्या सगळ्यांपासून तुझं रक्षण करतील!

...तेव्हापासून पाण्याची भीती असली, तरी आईने सांगितलेल्या जलअप्सरा असतीलच, पाठीशी, याची खात्रीही असते....

................................

नागाच्या माणूसपणाच्या गोष्टी


लहानपणी श्रावणात कधीतरी गावाला असताना आईबरोबर नाग पूजायला गेलो होतो. गावाबाहेर नदीच्या काठावर कळकीचं बेट होतं. त्या बेटात कंबरभर उंचीचं आडवं पसरलेलं वारुळ होतं. लालभोर मातीचं. आडव्या पसरलेल्या त्या वारुळात लहान-मोठ्या उंचीची आठ-दहा शिखरं होती. आडवा पसरलेला छोटा हिमालयच जणू! आईसकट जमलेल्या सगळ्या महिलांनी पूजा करून वारुळावर लाह्या-फुलं उधळली. लोटीत आणलेलं दूध वेगवेगळ्या शिखरांत ओतलं. अन् नंतर वारुळाभोवती फेर धरून साऱ्याजणी गाणी म्हणू लागल्या. गाणी रंगात आलेली असतानाच वारुळातल्या एका शिखरात काहीतरी हालचाल दिसली. थोड्याच वेळात दहाचा आकडा असलेला फडा उभारून काळा कुळकुळीत नाग बाहेर आला. मी घाबरून पटकन आईला बिलगलो. तसं लोकरहाटीतल्या श्रद्धेला जागून ती लगेच म्हणाली- घाबरू नको. आम्हा बहिणींना भेटायला आलाय तो. आलाय तसा जाईल. ज्यांना भाऊ नसतो, त्यांना तोच तर येतो माघारी म्हणून... त्यानंतर आई कितीतरी गोष्टी सांगत राहिली. नागाच्या माणूसपणाच्या! कधी तो भाऊ म्हणून कसा येतो, तर कधी प्रियकर म्हणून कसा येतो, त्याच्याही. आणि तेव्हापासून नाग हा माझ्या कल्पनासृष्टीतला एक अविभाज्य घटक झालाय. तो मला सर्पकुळातला वाटतच नाही. आपल्यासारखाच हाडामांसाचा माणूस वाटतो. तो दिसला की त्याची भीती वाटते, तरीही त्याला पाहायचा मोह मात्र आवरत नाही. जिथे-कुठे त्याचं दर्शन घडतं - वाटत राहतं, तो कुणाला तरी संकेतस्थळी भेटायला आलाय. किंवा कुणाला तरी माहेरपणाला न्यायला तरी... मग उगीचच इकडे-तिकडे पाहतो, त्याच्या अस्तित्वाच्या खुणा शोधत राहतो. खास करून त्याच्या वारुळाभोवती...

खरंतर वारुळ हे त्याचं घर नव्हेच. ते मुंग्यांनी केलेलं असतं. पण मुंग्यांनी केलेल्या आयत्या घरात, म्हणजे बिळात नाग जाऊन राहतो आणि तोच त्याचा स्वामी होतो. आता वारुळ आणि नाग हे समीकरण लोकसंस्कृतीत छान रुजलंय. वारुळ हे सर्जनशील भूमीरूपाचं-स्त्रीतत्त्वाचं प्रतीक. तर नाग हे पुरुषतत्त्वाचं चैतन्याचं प्रतीक. 

म्हणूनच आजही भारतीय ग्रामीण महिलांची श्रद्धा आहे की नाग हा त्यांचा भाऊ तरी आहे, किंवा प्रियकर तरी. त्यामुळे शेतात, रानात, वाटेत कुठेही वारुळ दिसलं की, त्या आदराने नमस्कार करतात आणि आपल्या भाऊरायाचं कुशल चिंततात. तसंच त्याची कामनाही करतात.

नागाच्या या मनुष्यरूपाचा आईने लहानपणी माझ्यावर केलेला संस्कार अजून पुसला गेलेला नाही. किंबहुना मनात खोलवर रुजलेल्या त्या श्रद्धेतून माझी अजून सुटका झालेली नाही. पत्रकारितेच्या कामानिमित्ताने कुठेकुठे भटकावं लागतं. कधी हौसेपोटीही भटकणं होतं. या भटकंतीत वाटेत कुठेही वारुळ दिसलं की मी थांबतो. मग ते जंगलात असो वा शेतात. आणि मग माझ्याही नकळत माझी पावलं त्या वारुळाकडे वळतात. वारुळाची आणि त्याच्या आत राहणाऱ्या त्याच्या मालकाची वास्तपुस्त करायला. खरंतर मनात प्रचंड भीती असते. कुठून नाग आला आणि चावला तर, याची. तरीही वारुळ दिसलं की ते खोलवर निरखून पाहण्याचा मोह आवरत नाही.

अलीकडेच खानापूरहून बेळगावकडे येत असताना वाटेवरच्या जंगलात एकदम दोन-तीन वारुळं दिसली आणि मी गाडी थांबवली. जवळ जाऊन ती लालभोर मातीची वारुळं निरखू-पारखू लागलो. त्या वारुळांचे उंचवटे, म्हणजे शिखरं अतिशय सुरेख होती. अगदी आखीवरेखीव. नागाच्या डौलदार चालीला शोभतील अशी. ते निरखणं सुरू असतानाच जवळच्या झुडुपात काही तरी सळसळलं. अन् भीतीने अंगावर काटा उभा राहिला. त्या भीतीचा मनातून निचरा होण्याआधीच पुन्हा झाडात सळसळ झाली. आवाजाचा मागोवा घेत तिकडे पाहिलं, तर एक काळाशार नाग तिथून जात होता. त्याच्या दर्शनाने मन सुन्न झालं. लगेच तिथून बाहेर पडण्याची घाईही झाली.

...अन् तरीही परवा अकलूजजवळच्या वेळापूरच्या वाटेवर शेतात दिसलेलं काळंभोर वारुळ पाहण्याचा मोह आवरला नाहीच. ते पाहण्यासाठी खाली उतरलोच. ते पाहताना उगाचंच वाटत राहिलं, या वारुळातला भाऊराया गेला असेल का कुणा बहिणाबाईला आणायला किंवा आपल्या प्रेयसीला भेटायला...

नाग दिसेल ना दिसेल. त्याचं वारुळ दिसलं की आईने सांगितलेल्या त्याच्या माणूसपणाच्या गोष्टी आठवत राहतातच...


सोमवार, ११ मे, २०१५

लावणी 'शास्त्रीय' होऊ शकते?

महाराष्ट्राने शास्त्रीय संगीत आणि शास्त्रीय नृत्याची चांगली जोपासना केली आहे.राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्तृत्व गाजवणारे कलाकार इथल्या मातीत जन्माला आलेले आहेत.तरीही महाराष्ट्राचं स्वतःचं असं शास्त्रीय नृत्य आकाराला आलेलं नाही. मात्र आजवर पांढरपेशा समाजाने गावकुसाबाहेर ठेवलेल्या लावणीत शास्त्रीय नृत्याची सगळी लक्षणं दिसतात...
(संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेत्या लावणी कलावंत शकुंतलाबाई नगरकर, छाया : श्रेयांश जाधव)
(संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेत्या लावणी कलावंत शकुंतलाबाई नगरकर, छाया : श्रेयांश जाधव)
शास्त्रीय संगीत असो वा शास्त्रीय नृत्य, या कलांच्या संगोपन-संवर्धनात महाराष्ट्र कायम अग्रेसर राहिला आहे. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर १९व्या शतकाच्या उत्तरार्धात उत्तरेतून ख्यालगायकी शिकून महाराष्ट्रात आले आणि इथे महाराष्ट्र देशी संगीताचं सुवर्णयुग अवतरलं. तसंच विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात पं. मोहनराव कल्याणपूरकर, आचार्य पार्वतीकुमार यांसारख्या नृत्यगुरुंनी महाराष्ट्रात कथक, भरतनाट्यमसारख्या शास्त्रीय नृत्यांची पायाभरणी केली आणि आज उभा महाराष्ट्र विविध शास्त्रीय नृत्यांचं प्रशिक्षण घेत आहे. महाराष्ट्राची भूमीच अशी आहे की इथे कलांची नीट निगराणी आणि जोपासना होते. इतर कुठल्याही राज्यांपेक्षा महाराष्ट्राची रसिकता संपन्न आणि जाणकार आहे. त्यामुळेच शास्त्रीय संगीतातील अनेक नामवंत बुजुर्गांनी महाराष्ट्राची कायम सराहनादेखील केली आहे... आणि म्हणूनच प्रश्न निर्माण होतो की, शास्त्रीय संगीत-नृत्याची जोपासना करणा‍ऱ्या महाराष्ट्रात स्वतःचं शास्त्रीय नृत्य का आकाराला आलं नाही? महाराष्ट्राला स्वतःची अशी खास नृत्यशैली नव्हती का? किंवा एकही अशी नृत्यशैली नव्हती, जी इतर शास्त्रीय नृत्यांच्या शेजारी ठामपणे उभी राहील? तर याचं उत्तर ठामपणे ‘अशी नृत्यशैली महाराष्ट्रात होती आणि आहे’, असंच द्यावं लागेल. महाराष्ट्रात नृत्यशैली तर अनेक आहेत आणि त्या प्रादेशिकतेनुसार भिन्न भिन्न आहेत. परंतु ‘शास्त्रीय नृत्य’ या नामाभिधानाला साजेशी अशी एकच नृत्यशैली महाराष्ट्रात आहे आणि ती म्हणजे, तमाशा या लोककलाप्रकाराचं एक उपांग असलेली आणि तरीही स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जपणारी — लावणी! मात्र आजतागायत महाराष्ट्राची लोकप्रिय लोककला असलेल्या लावणीला शास्त्रीय साज चढवण्याचा प्रयत्न कुणी केलेला नाही आणि ज्या कुणी क्वचित केला, त्यांना धमकी दिली गेली — ‘ही महाराष्ट्राची मोकळीढाकळी लोककला आहे, तिला तशीच ठेवा.’ यातल्या ‘मोकळीढाकळी’ या शब्दाला वेगळाच वास होता. जर लावणी मोकळीढाकळी राहिली नाही, तर तिचा (लावणीचा आणि लावणीनर्तकीचा) मोकळाढाकळा आस्वाद आम्हाला घेता येणार नाही, असा गर्भित हेतू त्यामागे होता. मात्र लावणीला शास्त्रीय बाज चढवण्यामागे असे कुणाकुणाचे अंतस्थ हेतू असले, तरी लावणीत शास्त्रीय नृत्य होण्यासाठीचे निकष खरोखरच आहेत की नाहीत, हे मात्र नक्कीच तपासून पाह्यला पाहिजे. कारण कुणी कितीही स्वतःहून ठरवलं, म्हणून लावणीला शास्त्रीय नृत्याचा दर्जा प्राप्त होणार नाही. त्यासाठी संगीत नाटक अकादमीने आखून दिलेल्या निकषात तुमची नृत्यशैली बसायला हवी. काय आहेत, हे संगीत नाटक अकादमीचे निकष? तर, संगीत नाटक अकादमीने भरतमुनींचा नाट्यशास्त्र हा ग्रंथ यासाठी प्रमाण मानला आहे. वास्तविक भरतमुनींनी आपल्या नाट्यग्रंथात आजच्या कुठल्याही शास्त्रीय नृत्यशैलींचा उल्लेख केलेला नाही. मात्र त्यांनी आपल्या ग्रंथात दाक्षिणात्य, अर्धमागधी, अवंती आणि पांचाली या चार नृत्यप्रवृत्तींचा उल्लेख केलेला आहे. या नृत्यप्रवृत्तींचा मागोवा घेतला, तर दाक्षिणात्य या नृत्यप्रवृत्तीत दक्षिणेकडच्या नृत्यशैलींचा समावेश होतो. अर्धमागधी नृत्यप्रवृत्तीत आजच्या इशान्येकडील ओडिसी, मणिपुरी किंवा शास्त्रीय नृत्यांच्या यादीत नव्याने समावेश झालेल्या सत्तारिया या नृत्यांचा समावेश होऊ शकतो. अवंती किंवा पांचाली या नृत्यशैली म्हणजे नेमक्या कोणत्या, याबद्दल मात्र संशोधकांमध्ये एकमत नाही. तसंच नाट्यशास्त्रात या नृत्यप्रवृत्तींचा उल्लेख असला, तरी त्यांची एकच सर्वसमावेशक किंवा वेगळेपणाची व्याख्या त्यात नाही. त्यामुळे भरतमुनींनी नाट्यशास्त्रात सरसकट नृत्याविषयी जे विवेचन केलं आहे, तेच शास्त्रीय नृत्यासाठीचे निकष मानले जातात. उदाहरणार्थ भरतमुनींनी नर्तकाला (स्त्री-पुरुष दोन्ही) नट मानून त्याने आंगिक, वाचिक, आहार्य आणि सात्त्विक अभिनयातून व्यक्त झालं पाहिजे, त्याने आपल्या अंग-उपांगांचा भावप्रदर्शनासाठी वापर केला पाहिजे, त्याने आपल्या नृत्यात एकल आणि संयुक्त हस्तमुद्रांचा वापर केला पाहिजे, तसंच त्याच्या सादरीकरणात नवरसांचा (भरतमुनींनी प्रत्यक्षात आठच रस सांगितले आहेत) परिपोष असला पाहिजे, असं म्हटलं आहे, भरतमुनींनी कुठल्याही प्रकारच्या नर्तनासाठी सांगितलेले हे निकषच, आजच्या भारतीय शास्त्रीय नृत्यशैलींचे निकष आहेत. याच निकषांवर भरतनाट्यम, कथक, ओडिसी, कुचिपुडी, मोहिनीअट्टम, कथकली, मणिपुरी आणि आसामचं सत्तारिया या आठ नृत्यशैलींची आज भारतीय शास्त्रीय नृत्यांत गणना केली जात आहे. ...आणि हेच निकष लावायचे, तर महाराष्ट्राची लावणीदेखील बहुतांशी हे सगळेच निकष पूर्ण करते. तब्बल साडेचारशे वर्षांची परंपरा असलेली महाराष्ट्राची लावणी कुठेच मागे नाही. भावप्रदर्शनासाठी लावणीनर्तिका आपल्या अंगउपांगांचा वापर करते, त्याला लावणीच्या परिभाषेत ‘अदा’ म्हटलं जातं. शास्त्रीय नर्तनात चेह‍ऱ्यावरील भावाभिव्यक्तीला ‘अभिनय’ म्हणण्याची पद्धत आहे, लावणीपरंपरेत त्याला ‘भावकाम’ म्हणतात. गोल फिरण्याला कथकच्या शास्त्रीय परंपरेत चक्री म्हटलं जातं, तर लावणीवाले तिला ‘गिरकी’ म्हणतात. शास्त्रीय नृत्यात ज्याप्रमाणे तबला किंवा घटमवर तोडे वाजवून पदन्यासातलं कौशल्य दाखवलं जातं, त्याचप्रमाणे लावणीनृत्यात ढोलकीवर तोडे वाजवून नर्तकी आपलं पदन्यासकौशल्य दाखवते. एवढंच नव्हे, तर शास्त्रीय संगीताप्रमाणेच शास्त्रीय नृत्यात जसं धीम्या आणि जलद संगीतावर नृत्याचं सादरीकरण होतं, तसंच ते लावणीतही होतं. खडी म्हणजे उभ्याने सादर केलेली लावणी ही गतिमान नृत्यासाठी प्रसिद्ध आहे, तर बैठकीची लावणी संथ लयीतील अदाकारी सादर करते. अगदी शास्त्रीय नृत्याप्रमाणेच लावणीत हस्तमुद्राही आहेत. फक्त या हस्तमुद्रांना आजवर नाव देण्याचा प्रयत्न झाला नाही. तसंच शास्त्रीय नृत्यातून जसं विविध रसांचं दर्शन घडवलं जातं, तसंच ते लावणीतूनही घडतं. फक्त लावणीचा कल श्रृंगाररसाकडे अधिक आहे. कारण ती रसिकाश्रयी कला आहे. आणि खरं सांगायचं तर आज ज्या नृत्यशैली ‘शास्त्रीय नृत्य’ या अभिधानाला पोचल्या आहेत, त्या सा‍ऱ्याच नृत्यशैलींचा गाभा हा मूलतः शृंगाररसाचाच होता. कारण या बहुतांशी नृत्यशैली मूळच्या देवदासी नृत्याचंच परिष्कृत रूप आहे. भारतातील देवदासीपरंपरा प्राचीन आहे. देवपत्नी म्हणून त्यांना जेव्हा रोज देवासमोर, त्याची झोपायची वेळ झाली की, रंगभोग सादर करावा लागायचा, तो रंगभोग वैषयिकच असायचा. आज जरी त्याला आध्यात्मिकतेचा आणि सात्त्विकतेचा मुलामा चढवण्यात आलेला असला, तरी देवदासींचं मूळ गाणं आणि नृत्याचा आशय श्रृंगारिकच होता. त्याचे अनेक दाखले आजही दक्षिणेतील मूळ परंपरेत सापडतात. महाराष्ट्रातला त्याचा एक उत्तम दाखला म्हणजे नवरात्रीत आजही जेजुरीच्या कडेपठारावर (गडावर नव्हे), जिथे खंडोबाचं मूळ ठाणं आहे; तिथे लावणीपरंपरा जपणा‍ऱ्या कलावंत महिला जातात आणि त्याला पारंपरिक श्रृंगारिक लावण्या ऐकवतात. मुख्य म्हणजे द‌क्षिणेकडे किंवा भारतात सर्वत्रच देवासमोर सादर होणारा रंगभोग कला म्हणूनच नावाजला गेला आणि रक्षिलाही गेला. पण विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मात्र त्याला अश्लील ठरवून तो त्यागला गेला. परिणामी देवदासींचंच नृत्य पुढे शास्त्रीय म्हणून ओळखलं जायला लागलं, परंतु त्याचा श्रृंगारसाचा आत्मा मात्र त्यातून काढून टाकण्यात आला. कारण तो श्रृंगार पांढरपेशा समाजाला मानवणारा नव्हता. हाच श्रृंगाररसाचा आत्मा लावणीला बाधक ठरू शकतो. शास्त्रीय नृत्यासाठी आवश्यक असलेल्या इतर सर्वच निकषांवर लावणी कदाचित पात्र ठरेल. परंतु तिचा थेटपणा मात्र संगीत नाटक अकादमीच्या समितीवर बसलेल्यांना मान्य होणार नाही. अर्थात लावणीला शास्त्रीय नृत्य म्हणून मान्यता मिळावी म्हणून महाराष्ट्रातून आजवर रीतसर प्रयत्न झालेले नाहीत. तसंच शास्त्रीय नृत्याच्या रूपबंधात लावणीला बांधण्याचा प्रयत्नही कुणी केलेला नाही. तसा प्रयत्न झालाच, तर मात्र लावणीपुढे श्रृंगारिकतेचं काय करायचं, हा प्रश्न उभा राहू शकतो. कारण याच कारणासाठी आंध्रप्रदेशातील विलासिनीनाट्यम या देवदासींच्या नृत्यावर ते प्राचिन असतानाही शास्त्रीय नृत्य म्हणून मोहोर उमटलेली नाही. तसंच दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, जर कुणी लावणीला शास्त्रीय नृत्याच्या कसोटीत बांधण्याचा प्रयत्न केला, तर ही कला आजवर ज्या समाजाने जपली, तो कोल्हाटी समाज याला मान्यता देणार का? कारण आजही तमाशा किंवा लावणी हाच या समाजाचा उपजीविकेचा मुख्य व्यवसाय आहे. तेव्हा महाराष्ट्राचं शास्त्रीय नृत्य म्हणून लावणी या नृत्यशैलीचा विकास होऊ शकतो. पण तो कोण आणि कसा करणार हा खरा प्रश्न आहे! 
(१० मेच्या 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रकाशित झालेला माझा लेख)

बुधवार, ६ मे, २०१५

व्हक्का माझा आंबा पिक्का, कोण घेईल त्याचा डोकाच मोडू दे…


व्हक्का माझा आंबा पिक्का
व्हक्का माझा आंबा पिक्का...
वारा गपगार पडलेला असायचा. वा‍ऱ्याचं पानही हलत नसायचं. सगळं चिडीचूप. एखाद्या सुस्तावलेल्या अजगरासारखं. अशा शांत-टळटळीत दुपारी अचानक 'धप्' असा आवाज व्हायचा. अन् तो आवाज विरायच्या आत अख्ख्या घराला घुमवून टाकणारी काकूची आरोळी कानावर पडायची- 'कार्ट्यानू धावा, आंबा पडलाय.' की घरातल्या पोरांची टोळधाड आवाडात धावत सुटायची. लांबोड्याच्या झाडाखाली खरोखरच आंबा पडलेला असायचा. हिरवाजर्द आणि हातभर लांबीचा. जो पहिला पोचायचा, तोच तो आंबा उचलायचा. तो अख्खा आंबा मग त्याच्याच मालकीचा. तिथे वाटणी बिटणी काही नाही. 'जो उचलेल, तो खाईल' हाच खासा न्याय. मग उचलणाराही एखाद्या विजयी वीराप्रमाणे लांबोडा चोखून चोखून खायचा. डोळे मिचकावत. इतरांना दाखवत. या लांबोड्याची खासीयत म्हणजे याची साल एकदम पातळ होती. अगदी नरम-मुलायम. त्याच्यावरून हात फिरवतानाही गुदगुल्या व्हायच्या. अलगद हात फिरवून झाला की, मग त्याच्यावर हलकेच गाल घासायचे. लांबोड्याच्या सालीचा, पातळपणा-नितळपणा मनाला सुखावून जायचा. मात्र साल कितीही पातळ असली, तरी लांबोडा कधीच फुटायचा नाही. लांबोड्याचं झाड हे सरळसोट वाढलेलं. किमान तीस-पस्तीस फूट. पण कितीही उंचावरून खाली पडला, तरी त्याच्यावर साधा ओरखडाही उमटलेला नसायचा. अलगद खाली आल्यासारखा यायचा आणि जमिनीवर पडताना 'धप्' असा आवाज करायचा. हा आवाज हीच लांबोडा पडल्याची पक्की खूण. एरव्ही कितीही वारा सुटलेला असो, फांद्या इकडून तिकडे गदागदा डोलत असोत, पण नाजूक सालीचा अन् नाजूक देठाचा लांबोडा पडायचाच नाही. रात्रीचा आणि दुपारचा शांत प्रहर मात्र त्याच्या आवडीचा. सगळं शांत असल्यावरच तो धप् आवाज करत जमिनीवर आदळायचा. हा आवाजही सगळ्यांना ऐकू जाईल असा. गपगुमान पडण्याचा त्याचा स्वभावच नव्हता.
दुपार असेल, तर डोळ्यावर कितीही झोप असली तरी नुस्ता धप् आवाज यायची खोटी; काकूची बोंब ऐकताच आम्ही धावत सुटायचो. रात्रीच्या नीरव शांततेत मात्र त्याचे धप्- धप् आवाज कितीही आले, तरी काळोखात तिकडे जाण्याची कोणाची शामत नव्हती. मग पहाट होण्याची वाट बघायची. या वाट बघण्यातच अनेकदा रात्र सरायची. कोंबडा आरवला की थोड्या वेळानं झुंजुमंजु व्हायचं. बाहेर थोडं धुंदुरकच दिसायचं. पण आता जीवाला अधिक थोपवणं शक्य नसायचं. अंथरुणातनं घेतलेली पहिली उडी थेट लांबोड्याच्या बुंध्याशीच जाऊन पडायची. लांबोड्याच्या बुंध्याशी पिकलेल्या आंब्यांचा सडा पडलेला असायचा. ते पटकन् कसे गोळा करायचे तेच कळायचं नाही. मग अंगात घातलेल्या शर्टाचीच खोळ व्हायची आणि त्यात लांबोड्याचे आंबे गोळा केले जायचे. या गोळा केलेल्या आंब्यांचा फन्ना उडवेपर्यंत न्हेरीचा वकात कधी व्हायचा तेच कळायचं नाही. आयंची घरातून हलकेच हाक यायची. 'न्हेरी करून जा, मला नह्यवर धुवायला जायचंय.' की लगेच घरात हजर. एका अॅल्युमिनियमच्या ताटलीत आयन गरमगरम खिमाट वाढलेला असायचा. सोबत कांद्यात कुस्करलेला कुरकुरीत कोलीम. मग थेट जेवणासारखाच न्हेरीवर ताव मारला की स्वारी पुन्हा बाहेर आंब्यांखाली हुंदडायला मोकळी...
... आणि आमच्या आवाडात फक्त लांबोडा तेवढा थोडाच होता.
लांबोड्याला खेटून असलेला दुसरा एक जाड आंबा होता. एकच खाल्ला तरी पटकन पोट भरणारा. शिवाय एक केसरी लिटी होती. एक दुधी लिटी होती. झालंच तर आमच्या आवाडाच्या बाहेर, आमच्या मालकीचे नसलेले, पण पडलेले आंबे खाण्यासाठी कुणाचीही आडकाठी नसलेले अनेक आंबे होते. मिरमि‍ऱ्या होता. साखरी लिटी होती. गोडांबा होता. पिठांबा होता. ढेरांबा होता... आणि रानात तर काय आंबेच आंबे. नाना त‍ऱ्हांचे, नाना चवीचे. एका आंब्याची चव दुस‍ऱ्या आंब्याला नाही. प्रत्येक आंबा जणू काही स्वत:च्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वासारखा. जेवढी आंब्याची झाडं, तेवढ्या त्याच्या चवी. आज कुणाच्याही पेटीतला, कुठलाही हापूस काढला, तरी जगाच्या पाठीवर त्याची चव सारखीच लागते. पण बांधा-बांधावर पडलेल्या झडलेल्या कोयांतून निर्माण झालेल्या रायवळी-गावठी आंब्यांची लज्जतच न्यारी!
केवळ ही लज्जत चाखण्यासाठीच, परीक्षा संपायच्या आधी गावाचे वेध लागायचे. खरंतर गावचा एसटीचा प्रवास नको वाटायचा. कारण प्रवासात पोटात मळमळून हमखास उलट्या व्हायच्या. त्यामुळे एरव्ही गावाला म्हटलं की नकारघंटा असायची. पण उन्हाळ्याच्या सुट्टीत मात्र आमच्या आवाडातले, परक्यांच्या तना‍ऱ्यातले, पायवाटेवरचे आणि रानातल्या आडवाटांचेही आंबे खुणावत असायचे. सकाळी पाचला मुंबई सेंट्रलवरून सुटलेली एसटी दुपारी तीन-चार वाजता गावी पोचायची. एसटीच्या प्रवासाने सगळे थकलेले असायचे. प्रत्येकाला जागा मिळेल तिथे आडवं व्हायचं असायचं. मी एकटाच काय तो ताजा-तवाना असायचो. घरात शिरल्या शिरल्या सामान टाकून मला आवाडातल्या आंब्यांच्या झाडांखाली पळायचं असायचं. मी तसंच करायचो. आमच्या वटाणात सामान टाकलं की उडी मारून काकूच्या वटाणात जायचो. दुसरी उडी अंगणात मारायचो आणि तिसरी उडी थेट आवाडातल्या आंब्यांच्या बुंध्यात.
आमच्या घरामागचं हे आवाड म्हणजे देवराईच होतं जणू! तिथे रामफळ, पपनस, पेरू, शेकट आणि आंब्याची झाडं होती. उंचच उंच आणि सरळसोट वाढलेली. ठरावीक उंचीवर झाडांच्या फांद्यांची अशी दाटी झालेली की आवाडावर एक आच्छादनच तयार झालेलं असायचं. त्या आच्छादनातून सूर्याची एक तिरीपही खाली जमिनीपर्यंत पोचायची नाही. ऐन उन्हाळ्यातही आवाडातली माती थंडगार असायची. एकप्रकारचं कोंदट, गूढ, पण आश्वासक वातावरण असायचं आवाडातलं. मग मातीचा, वातावरणातला हा हवाहवासा थंडगारपणा पायात आणि मनात रुजवत मी आंब्यांच्या बुंध्यांना गिरक्या घ्यायचो. एकप्रकारे मी आलो असल्याची त्यांना दिलेली ही वर्दीच असायची. ही वर्दी दिल्यावर मग माझा पाय तिथे ठरायचा नाही. 'आता महिनाभर आहोत सोबत', असं म्हणून मी ललीच्या मागावर निघायचो.
ललिता माझ्यापेक्षा दोनेक वर्षांनी मोठी असलेली बहीण, गावीच माझ्या काकूकडे असायची. ती गुरं घेऊन रानात जायची. रान म्हणजे तिचं दुसरं घरच जणू. या रानाचं पानन् पान तिला ठाऊक असायचं. काजू, आंबे, करवंद, अळू, कुम्हला, तोरणा, ओवळा अशा रानातल्या कितीतरी फळांच्या अनवट जागा तिला माहीत असायच्या. रोज संध्याकाळी गुरं घेऊन घरी येताना तिची टोपली नानाप्रकारच्या रानमेव्याने भरलेली असायची. हे ठाऊक असल्यामुळेच तिला शोधण्याची मोठी उत्सुकता असायची. रानात गुरं घेऊन जाण्याच्या बहुतेक वाटा नदीकडून फुटलेल्या असायच्या. मग सगळ्यात आधी नदी गाठायची. तिथे पाणी भरणा‍ऱ्या किंवा रानातून येणा‍ऱ्या-जाणा‍ऱ्यांना विचारायचं- 'गुरा कुटं गेलीत हाय ठाऊक?' कुणी ना कुणी नेमकी जागा सांगत असे. मग त्याने दाखवलेल्या बोटाने चालायला सुरूवात करायची.
हळूहळू नदीची वहिवाटीची वाट नजरेआड व्हायची. गच्च रान अंगावर यायचं. मनात धाकधूक निर्माण व्हायची. पुढे जाऊ की थांबू असं व्हायचं. ललीचा शोध तर घ्यावासा वाटे, पण पुढे जायचीही भीती वाटे. मग तिथेच थांबून मी कानोसा घेत असे. एवढ्यात लांब कुठेतरी गुरांचा आवाज ऐकू यायचा. त्यांचं हंबरणं, त्यांना घातलेली साद कानावर पडायची. मग तिथेच एखाद्या बांधावर उभा राहून मी जोरात ओरडत असे- 'अगो लली गो......' , 'अगो लली गो......' , 'अगो लली गो......'
असं चार-पाच वेळा झाल्यावर मग समोरून प्रतिसाद मिळायचा- 'कोन हाय रं...?'
'अगो मी मकून.....'
'कंदी रं आलास? आयं-बाबा पण आलंयत?'
'हो गं हो...'
बरीचशी प्रश्नोत्तरं अशी लांबून झाली की, मग लली आहे त्याच वाटेनेपुढे यायला सांगायची. मात्र काही अंतर चालून गेलं तरी ती किंवा गुरं कुणीच दिसायचं नाही. मी कितीही हाका मारल्या, तरी तिचा प्रतिसाद मिळायचा नाही. मग मी घाबरून रडकुंडीला यायचो. अगदी रडण्याच्याच बेतात असायचो अन् एवढय़ात कुणी तरी येऊन भॉक करायचं. आधी मी दचकून घाबरायचोच. पण नंतर हसत सुटायचो. कारण ती लली असायची. मग ती मला घट्ट आवळायची. माझे पटापट मुके घ्यायची. माझी छोटी जीवणी हाताच्या चिमटीत घेऊन म्हणायची- 'ही बघा याची केवढीशी मुस्कुरी.' नंतर गुरं चरत असतील, तिथे नेऊन झाडाखाली ठेवलेल्या टोपलीवरली पानं पटकन् बाजूला करून म्हणायची- 'हे बघ क्काय?'
टोपली आंब्यांनी भरून ओसंडत असायची. लाल, केशरी, गडद पिवळे आंबेच आंबे. लगेच देठाकडचा भाग दगडावर ठेचून तिथून आंबा थोडा पिळून ती आंब्याचा चिक काढून टाकायची आणि मला द्यायची. मग मी थांब म्हणेस्तोवर तिचा हा उद्योग सुरूच राह्यचा. घरी निघताना तोंड-हात आंब्याच्या रसाने माखलेले असायचे...
... तिथूनच ख‍ऱ्या अर्थाने माझे आंब्यांचे दिवस सुरू व्हायचे.
त्यानंतर महिनाभर घराच्या आवाडात-रानात नुस्ता आम्रमहोत्सवच सुरू असायचा. नाना त‍ऱ्हेचे, नाना वासाचे, नाना रंगाचे आणि नाना चवीचे रायवळी म्हणजे गावठी आंबे घरात यायचे. नुस्त्या टोपल्याच्या टोपल्या आंब्यानी भरलेल्या असायच्या. त्यासाठी कधी एक दमडीही खर्चावी लागायची नाही. हे आंबे कापून फोडी करून खाण्यात मजा नसायची. रायवळी आंब्यांची गंमत ते चोखून खाण्यातच. देठाकडचा भाग काढून टाकायचा नि आंबा थेट तोंडाला लावायचा. आंबा लहान असो वा मोठा तो चोखून खायचा. यातही काही आंबे फक्त रसाचे असायचे. त्यात गर कमी आणि रसच जास्त. यांचा आकारही साधारण असायचा. याला आम्ही मग आंब्याऐवजी लिटी किंवा बिटकी म्हणायचो. आमच्या घराच्या आवाडात असलेली आंब्याची दोन झाडं याच रूपातली होती. पैकी एका लिटीतला रस केसरी धम्मक होता, म्हणून तिला आम्ही केशरी लिटी म्हणायचो. तर दुस‍ऱ्या लिटीतला रस अगदी दुधासारखा पांढराधम्मक आणि चवीलाही तसाच होता, त्यामुळे तिला आम्ही दुधीलिटी म्हणायचो.
 एक जाड मोठा आंबा, लांबोड्या आणि केशरी व दुधीलिटी घराच्या आवाडातच असल्यामुळे कुठेच न जाताही आंब्याच्या मोसमात भरपूर आंबे खायला मिळायचे. पण प्रत्येक रायवळी आंब्याची चव वेगवेगळी असल्यामुळेच नव्यनव्या चवी धुंडाळल्या जायच्या. यातूनच काही घराजवळच्या आणि काही रानातल्या खास आंब्यांचा आम्हाला शोध लागला होता. आमच्या घराच्या जवळ घर असलेल्या गोरिवले यांचा तनारा (म्हणजे गवत साठवायची जागा), आमच्या आवाडाच्या जवळच होता. या तना‍ऱ्यात गोरिवलेंची दोन आंब्यांची झाडं होती. या दोन्ही आंब्यांची चव सारखी होती, पण इतरांपेक्षा ती एकदम भिन्न होती. या आंब्यांचा रस गोड आणि काहीसा तुरट लागायचा. या वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळेच या आंब्याला सगळेजण मिरमि‍ऱ्या म्हणायचे आणि त्याच्यासाठी या झाडांखाली मुलांची झुंबड उडालेली असायची.
 मिरमि‍ऱ्यापासून जवळच एक साखरी लिटी होती. अगदी साखरेसारखी गोड. पाटलांच्या मालकीची. सरळसोट उंच गेलेल्या या झाडावर, पिकल्यावर हिरव्या आणि गडद लाल होणा‍ऱ्या लिट्यांचे घुडच्या घुड लोंबकळत असायचे. एखाद्याने उंचच उंच भिरकावलेला दगडही पोचणार नाही, इतकी साखरीची उंची होती. या लिटीच्या लिट्या दिवसा क्वचितच पडत. सकाळी मात्र झाडाखाली लिट्यांची पाखर असायची. नदीवाटेवर असल्यामुळे भल्या पहाटे पाणी भरायला जाणा‍ऱ्या सासुरवाशिणी आधी या झाडाखाली डोकवायच्या आणि मगच पुढे जायच्या. या सासुरवाशिणींना आंब्यांच्या दिवसात साखरी लिटीने कधीच विन्मुख पाठवलं नाही. दिवसा पडणा‍ऱ्या साखरीच्या लिट्या मात्र आम्हा मुलांच्या वाट्याला येत. मात्र दिवसभरात साखरीची एखादी लिटी खाल्ली, तरी पुरे होत असे, एवढा तिचा रस गोड होता.
याशिवाय गावाच्या आडवाटेवर पीठांबा, गोलांबा होता. पिठांब्याचा रस पिठासारखा, म्हणून तो पिठांबा, तर गोलांबा म्हणजे या झाडाचं फळ अगदी गोल गरगरीत होतं. याशिवाय एक केसांबाही होता. या आंब्याची बाठी आणि साल दोन्ही केसाळ होते. तो खाताना किवा चोखतानाही त्याचे केस दातात अडकायचे. पण त्यामुळेच त्याला केसांबा हे नाव मिळालं. रानातल्या झाडांवर चढण्यासाठी कुणाची परवानगी लागायची नाही. पण गावातली आंब्याची झाडं कुणाकुणाच्या मालकीची होती. या आंब्यांचं पडलेलं फळ खायला कुणी मनाई करत नसे, पण झाडावर चढता मात्र येत नसे. अशा वेळी मग वारा येऊन झाडावरचं पिकलं फळ खाली पडण्याची वाट पाहावी लागे. त्यात झाडाखाली पाच-दहा पोरं असतील, तर फळाची आशाच सोडलेली बरी, अशी स्थिती असायची. अशा वेळी आंबे झाडावरून पटापट पडावेत म्हणून प्रत्येकजण एक क्लृप्ती करत असे. जो-तो जवळच्याच करंवंदीची पाचेक पानं एकत्र करून ती कंरवंदाच्याच काट्याने आंब्याच्या झाडाला टोचत असे आणि म्हणत असे -
'व्हक्का माझा आंबा पिक्का,
कोण घेईल त्याचा डोकाच मोडू दे.'
एकप्रकारे पडणारा आंबा आपल्यालाच मिळावा, यासाठी केलेली ती भाकणूक असायची. अर्थात प्रत्येकजणच आंब्याला अशी कंरवदाची पानं टोचत असल्यामुळे वा‍ऱ्याने आंबा खाली पडला की, प्रत्येकजणच तो उचलायला धावत असे आणि या उचलाउचलीत आंबा एखाद्यालाच मिळत असे, डोकी मात्र अनेकांची फुटत. पण यातच गंमत असायची. पुढ्यात नुस्तेच कुणी आणून टाकलेले आंबे खाण्यात मजा नसायची. जोवर आपली रग त्यात जिरलेली नसायची, तोवर ते आंबे खाण्यात मजा यायची नाही. यासाठीच लली गुरं घेऊन रानात निघाली की तिच्या पाठी लागायचो. तिच्याबरोबर रानात जाण्यात एक गंमत असायची. तिच्या देखरेखीखाली रानात हुंदडता यायचं. मला झाडांवर चढता येत नसे. त्यामुळे ती मला खालीच आंबे गोळा करायला उभी करत असे. ती मात्र झाडावर एखाद्या सरडय़ासारखी चढत असे. झाडं उचं असो वा आडवं पसरलेलं. सपासप वर जाऊन ती एकेक फांदी अशा नजाकतीनं हलवायची की फक्त पिकलेले आंबेच खाली पडायचे. बाकीचे झाडावर कशाही उडय़ा मारून फांद्या हलवायचे. त्यामुळे पिकलेल्या आंब्यांबरोबर कच्चे आंबेही खाली पडून फुकट जात. लली मात्र याविषयी जागरुक होती. तिला उगाच आंबे पाडलेले आवडायचे नाहीत. ती म्हणायची- 'पिकलेल्या आंब्याचा देठ नाजूक असतो. जराशी थरथरही त्याच्यासाठी पुरेशी असते.'
केवळ एकच झाड हलवल्याने एवढे पिक्के आंबे पडायचे की जवळची टोपली भरून जायची. मग दुस‍ऱ्या दिवसासाठी ती दुसरं एखादं झाड हेरून ठेवायची. संपूर्ण आंब्यांच्या मोसमात तेव्हा क्वचितच एखाद्या आंब्याचे आंबे पुन्हा खाल्ले असतील. कारण ललिताला एवढ्या रानवाटा ठाऊक असायच्या की कधी कधी दुसरी कुणी त्या झाडाकडे आयुष्यात कधी फिरकलेलं नसायचं. कधी कधी आंब्यावर फार आंबे नसायचे. अशावेळी दगडानेच तो आंबा अचूक टिपला जायचा. मला एखादा आंबा दगडाने टिपायला किमान पंचवीसेक दगड लागायचे. ललिता मात्र पहिल्या दोन-तीन दगडातच तो आंबा अचूक टपकवायची. तिचं ते कसब बघून तेव्हा अवाक् व्हायला व्हायचं.
गुरं घेऊन रानात जाताना एक टोपली आणि गरकाटी तिच्यासोबत हमखास असायची. गरकाटी म्हणजे बांबूच्या (कळकीच्या) लांब दांड्याला पुढे एक जाड कुटकी तिरपी बांधलेली असायची. यामुळे तयार झालेल्या खोबणीत देठ अडकून फळ अलगद आपला पुढ्यात पडायचं. जर झाडावर चढायचं नसेल, किंवा झाड फार उंच नसेल, तर या गरकाटीचा वापर करतात. ललीचं लक्ष नसेल, तर ही गरकाटी हातात घेऊन मी झाडावर लटकणारं एखादं फळ ओढण्याचा प्रयत्न करायचो. पण बांबूच्या पुढच्या लवचीक-पातळ भागापासून ही गरकाटी तयार केलेली असल्यामुळे ती सतत लवायची. परिणामी वा‍ऱ्याने हलणारा फळाचा देठ आणि सतत लवणारी गरकाटी यांचा मेळ जुळवून  आणणं, म्हणजे एक कसबच. मी हातात घेतलेल्या गरकाटीच्या खाचेत फळ कधीच अडकायचं नाही. ललिता मात्र गरकाटीने एका हिसक्यात वरचं फळ जमिनीवर उतरवत असे.
 रोज रानातून येताना ललीची टोपली आंब्यांच्या दिवसात आंब्यांनी भरलेली असायची. रोज सकाळ-दुपार-संध्याकाळ नुस्तं आंबे ओरपणं सुरू असायचं. कितीही खाल्ले तरी कंटाळा यायचा नाही आणि कितीही खाल्ले तरी कुणी ओरडायचं नाही. तेव्हा ललिताची टोपली म्हणजे मला कामधेनू किंवा कल्पवृक्षासारखीच वाटायची. कायम रानमेव्याने भरलेली. ललिताचं लग्न होईपर्यंत उन्हाळ्याचे दिवस म्हणजे माझ्यासाठी खरोखरच 'आंब्यांचे दिवस' होते.
 ... त्यानंतर मात्र कधीच मनसोक्त आंबे खाल्ले नाहीत. गावाकडे जाणं होतं राहिलं, तरी रानातून आंबे आणणारं घरात कुणी उरलंच नाही. ललिताच्या लग्नाच्या दरम्यानच घरामागच्या आवाडात दोघा चुलत्यांनी गुरांसाठी मोठा वाडा बांधला. तो बांधताना मध्ये येतात म्हणून आवाडातली बहुतेक सर्व झाडं तोडली गेली. त्यात लांबोड्यासकट सगळी आंब्याची झाडंही गेली. गच्च देवराई एकदम रिकामी झाली. सारं आवाडच भकास वाटू लागलं.
वीसेक वर्षं तरी झाली असतील. आवाडातली देवराई ओकाबोकीच होती. सुट्टीत गावी जाऊन कधी आवाडात धाव घ्यावी, तर भगभगीत आभाळच यायचं स्वागताला. ते उजाड माळरान बघताना जीव कसनुसा व्हायचा. शेवटी सातेक वर्षांपूर्वी मीच दोन कलमी आंब्यांची झाडं लावली आवाडात. एक-दोन इतरही आणखी कसली तरी.
 ... आणि बघता बघता झाडं वाढत गेली की! या कलमी आंब्यांच्या जोडीला आता दोन रायवळी आंबेही तरारलेत. सोबत सीतफळ, शेवगाही अचानक भरतं आल्यासारखी वाढताहेत. माळरानाची पुन्हा देवराई होतेय. संसाराच्या जंजाळ्यातून, मुलांच्या वाढीतून मोकळी झालेली ललीही आता माहेरी खेपा टाकून येता-जाता झाडांवरून हात फिरवतेय.
...सरलेले आंब्याचे दिवस पुन्हा येणारसे दिसतायत...!

( 'ऋतुरंग' दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख )

शुक्रवार, १७ एप्रिल, २०१५

रुपखणी बावनखणी


रुपखणी गुणखणी बावनखणी

...................
मुकुंद कुळे
लेखातील चित्र : रोहन पोरे
.................



नजर भिरभिरत असते, दाणेआळीपासून शालुकराच्या बोळापर्यंत आणि ढमढेरे बोळापासून पासोड्या मारुतीपर्यंत... कुठे ओळखीची खूण सापडतेय का ते पाहत. सा‍ऱ्या वस्त्या धुंडाळून होतात. सा‍ऱ्या इमारती निरखून-पारखून होतात. गल्ल्यांतल्या काना-कोप‍ऱ्यांचाही माग काढून होतो. पण कुठेच गवसत नाही, तिच्या अस्तित्वाची एखादीही खूण! ना घुंगरांच्या लयबद्ध किणकिणाटाची, ना तबल्यावर पडलेल्या जडशीळ हाताची, ना सारंगीवर छेडलेल्या नाजुक सुरावटीची, ना गळ्यातून उमटलेल्या अलवार तानेची...

सारंच कसं भग्न आणि भकास. एक बेहोष उदासी सर्वत्र भरुन राहिलेली... जणू पेशवाई बुडाली आणि जाता जाता तिलाही सोबत घेऊन गेली. पण असं तरी कसं म्हणावं, पेशवाईच्या पश्चात किमान शंभर-सव्वाशे वर्षं ती आपला आब राखून होती. कायम महावस्त्रासारखी झळाळत राहिली. अगदीच सात्त्विक-सोज्ज्वळ नव्हतीच ती कधी. पण अगदी बाजारबसवीही नव्हती खास! ज्यानं-त्यानं इज्जतीनं यावं आणि इज्जतीनं जावं, असा तिचा रुबाब. तो तिने अगदी आता-आतापर्यंत म्हणजे पन्नासेक वर्षांपूर्वीपर्यंत जपला आणि मग अचानक गायब झाली. गायब म्हणजे पार परागंदा... अस्तित्वाची एकही खूण मागे न सोडता. मग तिला शोधता शोधता अवस्था थेट वेड्यापिश्यासारखी होऊन जाते. केशवसुतांनी म्हटल्याप्रमाणे- त्रिखंड हिंडुनी धुंडितसे, न परी हरपले ते गवसे...

पण मजा म्हणून गोलगोल फिरवणा‍ऱ्या घुणघुण्याचंच गतिमानतेमुळे तयार व्हावं एक आवर्त, तसंच मनात एकच एक विचार घोळवल्यामुळे विचारच घेतात एक मूर्त रूप आणि ध्यानीमनी नसताना अचानक तीच समोर येऊन उभी ठाकते...साक्षात् नवयौवना. रुपखणी, गुणखणी, बावनखणी!

... आणि बघता-बघता रातीचा अमल असतानाही शुक्रवारपेठ उजळून निघते. पलित्यांच्या प्रकाशात सरदार-दरकदार, तालेवार मंडळींची वर्दळ सुरू होते. कुणी पालखीतून, कुणी घोड्यावरून, तर कुणी पायीच आपापला जामानिमा सांभाळत अवतरतात... थोडसं गांगरून, थोडसं खाकरून, थोडे कावरेबावरे होत, इकडे-तिकडे बघत, अचानक कुणाला काही कळायच्या आत बावनखणीत गुडुप होतात. त्यांच्या आगमनाने मग बावनखणीतली शमादानं-चिरागदानं उजळत जातात. सुरुदार दिवाणखान्यांतल्या चिकाच्या पडद्यांची सळसळ वाढते. रात्रीचे प्रहर चढत जातात, त्याप्रमाणे सारंगीच्या खुंट्या पिळल्या जातात, तबल्याच्या वाद्या आवळल्या जातात. सुरेख घाट साधलेले विडे एका पाठोपाठ एक रिचवून नजाकतदार गाण्याचं मायाजाल उभं केलं जातं. ते मायाजाल एवढं मोहमयी असतं की रामप्रहर होतो, तरी रात्रीचं भान काही सरत नाही. ही भूल असते बावनखणीतल्या गाण्याची आणि गाणारीचीही. अशी ही बेहोष-मदहोष करणारी बावनखणी... पेशवाईतील सर्व तालेवारांचा रंगीला मिजाज आपल्यात सामावून‌घेणारी बावनखणी.

युद्धाची धामधूम असो की सणासुदीची आतषबाजी की पुण्यावर कोसळलेलं एखादं संकट, शुक्रवारातल्या बावनखणीची रौनक कधीच कमी झाली नाही. कारण बावनखणी होती दर्दी आणि छंदी-फंदींच्या विसाव्याचं हक्काचं ठिकाण. अगदी मोक्याचं. भल्याभल्यांना घायाळ करणारी, ही बावननखणी. जणू- अंगी तारुण्याचा बहर, ज्वानीचा कहर, मारीते लहर, मदनतल्वार...एवढंच नाही, बावनखणी म्हणजे पेशवेकालीन पुण्यातलं सांस्कृतिक ठाणंच!

त्यासाठीच तर निर्मिती झाली होती बावनखणीची. पुणे शहरभर विखुरलेल्या नाच-गाणं करणा‍ऱ्या सा‍ऱ्या कसबिणी आणि कलावंतिणी या बावनखणीत एकत्र आणल्या होत्या. त्यांच्यासाठी शहरभर होणारा दंगा, एकाच ठिकाणी व्हावा म्हणून. खास त्यांच्यासाठी बावन्न खणांची म्हणजे बावन्न खोल्यांची दुमजली-दुपाखी चाळ बांधली गेली. नानासाहेब पेशव्यांच्या काळात बांधण्यात आलेल्या या बावनखणीचं वर्णन १८६८मध्ये प्रकाशित झालेल्या नारायण विष्णू जोशी लिखित पुणे शहराचे वर्णनया पुस्तकात पुढील प्रमाणे करण्यात आलं आहे- नानासाहेब पेशवे यांच्या काळात तत्कालीन कोतवाल जिवाजीपंत अण्णा खासगीवाले यांनी उदमी लोकांस कौल देऊन ही पेठ वसवली व वाडा बांधला. शेजारी बावन्न खणांची दुघई दुमजली चा‍ळ बांधली आणि ती जागा कसबिणी व कलावंतिणी यांस राहण्यासाठी भाड्याने दिली. ह्याच्या पूर्वी कसबिणी सर्व शहरात पसरलेल्या होत्या. त्या सर्व ह्यांनी आपल्या सन्निध आणून ठेवल्या. त्याही सर्व एकदम तेथे राहण्यास आल्या. याचे कारण की त्या गृहस्थाकडे कोतवाली होती. त्यावेळच्या कोतवालाचा अधिकार इतका असे की, आता तितका कोणासही नाही. तेव्हा काही जरबेने, काही खुशीने, काही प्रीतीने व ममतेने आल्या असतील. ही बावन्नखणी पुण्यातील लोकांस व बाहेरील लोकांस माहीत नाही, असे नाहीच. आबालवृद्धांस ही जागा ऐकून अथवा प्रत्यक्ष पाहून माहीत आहेच.

पुणं पाहिलेलं असो वा नसो, पुण्याची पेशवाई आणि तिथल्या बावनखणीची ओळख प्रत्येकाला असतेच. तसा बावनखणीचा हा लौकिक अगदी पहिल्यापासूनचा. ती बदनाम होती-आहे, हे तर खरंच. पण बदनामही तेच होतात, ज्यांना काही नाव असतं. तेव्हा, सुरुवातीच्या काळात बावनखणी म्हणजे पुण्यातलं एक सांस्कृतिक केंद्रच होती. दिवसभर काम करून थकलेल्यांचं घटकाभर मनोरंजन करणारी आणि रगेल व रंगेल असणा‍ऱ्यांची रगही जिरवणारी. पण बावनखणी म्हणजे निव्वळ देहाचा व्यापार करणारं केंद्र कधीच नव्हतं. कला आणि सुरतव्यापार यांचा सुरेख मेळ बावनखणीच्या ठायी होता. म्हणून तर त्या काळात गाजलेल्या कलावंतिणी बावनखणीत एकत्र आल्या होत्या. त्यांना गाण्याची-नाचकामाची चांगली पहेचान होती. एकप्रकारे मीनाबाजारच तर होती बावनखणी...

नाच-गाण्याचे ताफे असलेल्या कसबी-कलावंतिणींसाठी ही बावनखणी उभारण्यात आली होती; तरी या बावनखणीत सुरुवातीपासून नेमक्या किती कलावंतीणी होत्या, त्याची माहिती मिळत नाही. पेशवे दफ्तरातील एका कागदात मात्र तत्कालीन कलावंतिणींच्या ३६ ताफ्यांची नोंद सापडते. या कागदात दिलेली कलावंतिणींची यादी पुढीलप्रमाणे आहे- सिवशानी व आनंदी तेलंगी, बहि‍ऱ्या दोघी तेलंगी, मिठा नाईकीण पुणेकर, लातू तेलंगी, बसंत तेलंगी, देवी तेलंगी, महबूबचंदी सातारकर, रहिमती पुणेकर, नूरंदी तेलंगी, चपटीपना औरंगाबादकर, धना चपटीपनाची बहीण, सावनूरवाली पना, करिमी दादा पोतनिसाची, शामा नाईकिणीची राधी, आजबकुवर मिठो औरंगाबादकर, गुजराथणी नारायणदासवाल्या, मथी थेरकरीण, मत‌ी टोपीवाली, नुरा नाईकीण पुणेकर हिरी गुलाबी, साबी आंबडापूरवाली, फुंदन सातारकर, बना नाईकिणीची जना नाइकीण गाववाली, लालन सभाकुवरीची, बदल रणमली, गंगी थेरकरीण, रतनी सातारकर पिरा नाइकिणीची, वाईवासी रंभा, येवलेवाली लालन रणमली, जिवना नाइकिणीची करिमी, गंगी रणमली‌, दिलवाली आखण, बसंती उजनवाली आणि जमना नाईकीण मुंबईवाली... या सगळ्या कलावंतिणींचे आपापले नाच-गाण्याचे ताफे होते. म्हणजे वादकांपासून नृत्यात साथ देणा‍ऱ्या सहनर्तकीपर्यंत सगळे या ताफ्यात असत. त्यामुळेच बावनखणी म्हणजे एकप्रकारे लखनौमधल्या गाणी-बजावणी करणा‍ऱ्या कोठ्यांसारखी कोठीच होती. फक्त लखनौमधली एकेक कोठी म्हणजे राजवाडाच आणि तिथे कोठेवाली एकाचवेळी अनेक नर्तकींना आश्रय द्यायची. याउलट पुण्यात खुद्द पेशव्यांनीच, म्हणजे नानासाहेब पेशव्यांनीच कलावंतिणींसाठी एक मोठी कोठी बांधली- बावनखणी.

खुद्द पेशव्यांच्या मर्जीनेच ही बावनखणी बांधली गेली, तरी या बावनखणीत कोणत्या प्रकारचं नाच-गाणं सादर व्हायचं याचा काहीच थांगपत्ता लागत नाही. त्याच्या नीट नोंदीही कधी झालेल्या नाहीत. मात्र उपलब्ध कलावंतिणींची नावं ज्या पद्धतीने लिहिलेली किंवा रुढ झालेली आढळतात; त्यावरून नंतरच्या काळात महाराष्ट्रात नावारूपाला आलेल्या तमाशा - लावणी कलेची बीजं बावनखणीत आहेत, असं खात्रीने म्हणता येतं. कारण आजही तमाशा क्षेत्रातील महिला कलावंतांची नावं त्याच पद्धतीने उच्चारली वा लिहिली जातात. उदाहरणार्थ कौसल्याबाई कोपरगावकरीण, पारुबाई जेजुरीकरीण, यमुनाबाई वाईकरीण वगैरे... अर्थात यावरून बावनखणीत सादर केल्या जाणा‍ऱ्या तत्कालीन नाच-गाण्याच्या काहीच ठोस अंदाज येत नाही.

मुळात मराठेशाही किंवा पेशवाईच्या काळात महाराष्ट्रात ठोस अशी नाच-गाण्याची परंपराच नव्हती. यादवकाळात महाराष्ट्रात रुजलेली धृपदगायनाची संगीतपरंपरा मुस्लिम आक्रमकांनंतर खंडित झाली होती आणि महाराष्ट्राचं खास प्रातिन‌‌िधिक नृत्य किंवा गायन तेव्हाही नव्हतं. त्यामुळेच बावनखणीत रसिकरंजनासाठी कोणत्या प्रकारचं नाच-गाणं सादर होतं होत, हे कळायला मार्ग नाही. मात्र काही आडाखे जरूर बांधता येतात. उदाहरणार्थ औरंगजेबाच्या कैदेत लहानाचे मोठे झालेल्या सातारच्या छत्रपती शाहूमहाराजांना मोगली मनोरंजनाची आणि खिदमतगारीची चांगलीच जानपहेचान होती. वर्षान‌ुवर्षं कुटुंबापासून दूर राहणा‍ऱ्या सरदार-शिपायांच्या मनोरंजनासाठी छावणीतच असलेले कलावंतिणींचे तंबू आणि त्यातील नाच-गाणंही त्यांनी पाहिलं-अनुभवलं होतं. त्यामुळेच महाराष्ट्रात परत येताच त्यांनी मोगलदबारच्या धर्तीवर मराठेशाहीतही नाच-गाण्याला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. त्यासाठी खास उत्तरेहून कलावंतांची आयात करायला त्यांनी सुरुवात केली. पेशवेकालीन महाराष्ट्रया पुस्तकात लेखक वा. कृ. भावे यांनी यासंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. ते म्हणतात- शाहूमहाराज हा राजश्वैर्यास सर्वस्वी पात्र असा पुरुष असून, त्याला इतर अनेक कलांप्रमाणे संगीताचीही आवड होती. म्हणूनच त्याने मोठ्या प्रयासाने दूरदूरच्या स्थळांहून गवई, नट, भाट, नायकिणी इत्यादिकांचा संच जमविला. दिल्ली, उत्तर हिंदुस्थानातील अनेक शहरे ही गायनवादनाची आगरे होत. यासाठी शाहूने तिकडून गुणिजन मिळवण्याचा प्रयत्न केला. हे काम तो पेशवे व इतर सरदार यांजमार्फत करून घेत असे.

अशा पद्धतीने पर प्रांतातून आणलेल्या कलावंतांचा सुरेख संग्रह शाहूमहाराजांनी त्यांच्या दरबारात केला होता. आणि या कलावतांच्या कलेचा ते नियमितपणे आस्वादही घेत. मात्र याचबरोबर प्रत्येक वेळी परप्रांतातून कलावंत मागवायला नकोत, म्हणूनही शाहूमहाराज प्रयत्नशील असलेले दिसतात. यासंदर्भातील पेशवे दफ्तरातील एका कागदाचा हवाला देऊन वा. कृ. भावे लिहितात- परप्रांतातून नायकिणी आणविण्यास पैसा फार खर्चावा लागतो, असे पाहून महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातच चांगल्या होतकरू मुली ‌मिळवून त्यांना नृत्यकलेत तरबेज करण्याचे शाहूने मनास आणिले व कोकणात खंडोजी माणकर या अ‌धिका‍ऱ्याकडे ती कामगिरी सोपवली.

या उदाहरणांवरून शाहूमहाराजांच्या प्रोत्साहनामुळे नंतरच्या काळात महाराष्ट्रातच गायन-नर्तन करणारे चांगले कलाकार निर्माण झाले असतील, असं म्हणण्यास वाव आहे. मात्र हे सारेच कलावंत प्रामुख्याने निम्न जातीतील असण्याची दाट शक्यता आहे. कारण शाहूमहाराजांच्या मागणीनुसार खंडोजी माणकाराला पेशव्यांनी लिहिलेल्या एका पत्रात- बटकीच्या पोरी दोन बहुत चांगल्या, दहा-अकरा वर्षांच्या, निरोगी, नाचावयास लायक अशा पाठवाव्या’, असा स्पष्ट उल्लेख आहे. मराठेशाही किंवा पेशवाईत दासी-बटकींची आणि त्यांच्या मुलांची खुलेआम खरेदी-विक्री होत असे. त्यामुळे नाच-गाण्यात तयार करण्यासाठी या दासी-बटकींच्या मुला-मुलींचाच वापर होत असणार हे नक्की! तसंच धाकटी चंदी सातारकरकिंवा शामा नायकिणीची राधीअशी बावनखणीकालीन कलावंतिणींची नावं आढळतात, ती बहुधा त्यामुळेच!

महाराष्ट्रातच कलावंतांची निर्मिती करण्याच्या शाहूमहाराजांच्या धोरणामुळे एक मात्र नक्की झालं, इथे कलावंत घडण्याची प्रक्रिया सुरू झाली. तीही थेट गुरु-शिष्य पद्धतीने. याचाही दाखला पेशवे दफ्तरात मिळतो. शाहूमहाराजांच्या आज्ञेवरून नानासाहेब पेशव्यांनी कलावंत घडवण्याचं मनावर घेतलं आणि तशी ताकीद आत्माराम राजाराम नावाच्या आपल्या अधिका‍ऱ्याला केली. हा अधिका‍री नानासाहेब पेशव्यांना एका पत्रात कळवतो- साहेबीं, जातेसमयी ताकित केली की, खबरदार रहाणे, पोरींची निगा करणे. तालीम उत्तमप्रकारे करवीत जाणे. त्यानुसार त्यांसी खाणे जेवणे उत्तम प्रकारे होत आहे. व गावयाची तालीम उत्तम प्रकारे काशीबा पांच-सांत घटका देत आहेत. फकीर महंमदही तालीम उत्तम देत आहे...

शाहूमहाराजांच्या आज्ञेवरून नानासाहेब पेशव्याने स्थानिक कलावंतांना तालीम द्यायला सुरुवात केली, तरी ते गाणं आणि नृत्य नेमकं कोणतं होतं, याचा काही अंदाज बांधता येत नाही. मात्र ते गाणं उत्तरेतील गवयांप्रमाणे धृपदगायकीचं आणि नृत्यही उत्तरेच्या कोठ्यांप्रमाणे कथक स्वरुपाचं असावं. अर्थात ते आजच्या इतकं तयारीचं नसेल कदाचित! किंबहुना ते प्राथमिक स्वरुपाचंच असेल. पण बावनखणीत गाणा‍ऱ्या-नाचणा‍ऱ्या कलावंतिणी ग्रामीण संस्कृतीतील लोकगीतं गात नव्हत्या खास. त्यांचंही गाणं काहीएक तयारीचंच होतं, असेल. कारण पेशव्यांचं पुणे आणि मराठेशाहीची राजधानी असलेल्या साता‍ऱ्यात सांस्कृतिक आणि सांगीतिक वातावरण तयार झालेलं होतं. शाहूमहाराजांचं बालपण मोगलांच्या छावणीत गेल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच या गोष्टी ठाऊक होत्या. तर पेशव्यांना त्या शाहूमहाराज व आपल्या सरदारांमुळे माहीत झाल्या. पहिल्या बाजीरावाने नर्मदा ओलांडून मराठ्यांचं राज्य दिल्लीच्या तख्ताला भिडवलं आणि तिथे जम बसवण्यासाठी शिंदे-होळकर-पवार यांसारख्या सरदारांना तिथेच जहागिरी दिली. परिणामी तिथेच स्थायिक झालेल्या या सरदारांनी उत्तर भारतीय माहौल लवकरच आत्मसात केला आणि त्याची झलक पेशवे-शाहूंनाही दाखवली. पुणे-साता‍ऱ्यातील सांस्कृतिक वातावरण त्यातूनच आकाराला येत होतं. त्यात शाहूमहाराजांचं १५ डिसेंबर १७४९ला निधन झालं आणि कलावंतांची बूज राखण्याचं काम सर्वस्वी नानासाहेब पेशव्यांच्या खांद्यावर आलं. ही बूज त्यांनी उत्तम रीतीने राखली. त्याचा उत्तम दाखला म्हणजे शुक्रवारपेठेत दिमाखात उभी राहिलेली बावनखणी!

नानासाहेबांच्या काळात बावनखणी उभी राहिली, पण त्या बावनखणीतल्या कलेचा प्रत्यक्ष नानासाहेबाने किती उपभोग घेतला शंका आहे. कदाचित विशिष्ट सण-उत्सवकाळात त्याने या बावनखणीतील कलावंतिणींना शनिवारवाड्यावर बोलावलंही असेल, पण तशी नोंद तरी सापडत नाही. अर्थात नानासाहेब पेशव्याची येसू नावाची जी नाटकशाळा होती, ती उत्तम गायची. नानासाहेब पेशव्यापासून दुस‍ऱ्या बाजीरावापर्यंत सर्वच पेशव्यांनी खासगीत बाळगलेल्या बहुतेक नाटकशाळा या नाच-गाण्यात तरबेज होत्या. या नाटकशाळा खुद्द पेशव्यांच्या असल्यामुळे त्यांची राहण्याची-उदरनिर्वाहाची व्यवस्था स्वतंत्र केलेली असायची.

नानासाहेबापासून किमान पुण्यात तरी एकप्रकारचं सांगीतिक वातावरण तयार झालं होतं. खुद्द त्याच्या दरबारात नारो आप्पाजी भावे नावाचे सतारवादक आणि धृपदीये होते. ही संगीत परंपरा शेवटच्या बाजीरावापर्यंत कायम होती. दिवंगत गायक-संगीतसमीक्षक वामनराव देशपांडे यांनी महाराष्ट्रातील संगीताचे कार्यया पुस्तकात यासंबंधी एक नोंद केलेली आहे. ते लिहितात- पेशवाईच्या अखेरपर्यंत पावा भीमराव, राणी शिंपी, विठू गुरव, त्र्यंबक आत्माराम, विठोबा पारनेरकर हे थोरले माधवराव आणि सवाई माधवराव पेशवे यांच्या आश्रयाखाली होते. आणि दुस‍ऱ्या बाजीरावाच्या राजवटीत दावलखान, मेंढूसेन, विलासबरसखान आणि चिंतामणी मिश्र यांसारखे अनेक धृपदगायक संगीताची जोपासना करत होते.म्हणजे पेशवाईत शास्त्रीय संगीतासाठी आश्वासक असं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि ते शुक्रवारातल्या बावनखणीत अगदीच झिरपलेलं नव्हतं, असं म्हणणं कठीण आहे. किंबहुना नानासाहेब पेशव्यांनंतर सवाई माधवराव आणि दुस‍ऱ्या बाजीरावाच्या काळात नावारुपाला आलेल्या व्यकंट नरसी, चंद्री नायकीण, सगुणी कलावंतीण, लक्ष्मी परभीण या कलावंत महिला बावनखणीतल्याच होत्या. फरक एवढाच होता की, नानासाहेब पेशव्याच्या काळात बावनखणी नावाची कलावंतिणींचे दिवाणखाने असलेली एकच वास्तु होती. सवाई माधवराव आणि दुस‍ऱ्या बाजीरावाच्या काळात बावनखणीचा विस्तार होत गेला. एकेका कलावंतिणीची एकेक स्वतंत्र वास्तू म्हणजे दिवाणखाने उभे राहिले आणि शुक्रवाराचा परिसर बावनखणी म्हणून ओळखला जाऊ लागला.

नानासाहेब पेशव्याच्या काळात उभी राहिलेली बावनखणी ‌कशी होती, त्याचं काहीच रेखाचित्र-कल्पनाचित्र उपलब्ध नाही. कुणी कधी काढल्याचंही ऐकिवात वा वाचण्यात नाही. पण आजच्या पुण्यातील शुक्रवार पेठेतील श्रीनाथ टॉकीजच्या बाजूला मूळ बावनखणीची जागा असल्याचं म्हटलं जातं. ती दुपाखी-दुमजली इमारत होती, असे उल्लेख मात्र पेशवे दफ्तरांत सापडतात. बावन्न खणांतल्या प्रत्येक खणांत वेगवेगळी कलावंतीण असण्याची शक्यता कमी आहे. किंबहुना प्रत्येक कलावंतिणीबरोबर असलेला कलावंतांचा ताफा बघता प्रत्येकीच्या वाट्याला हमखास तीन-चार खण आले असतील. मात्र ही बावनखणी हमखास पेशवाईच्या तेव्हाच्या इतमामाला साजेशी असेल. एक लांबलचक दिवाणखाना, मध्ये बारीक कोरीवकाम केलेले सुरुदार खांब, छताला हंड्या-झुंबर आणि खासेस्वारीसाठी खास भिंतीला टेकून तयार केलेली गाद्यागिर्द्यांची बैठक. नाच-गाण्याची मै‍फल जमायला याहून अधिक काय हवं? मग त्या मैफलीतून उमटणारे सूर मोरी छोडो डगरीया हो श्यामअसे, तक्रारीचा भाव आळवणा‍ऱ्या ठुरीचे असोत नाहीतर; ‘शहर बडोदे सोडून गेले, वर्षं झाली बारा... सखे बाई गंअशी आर्त हाक घालणा‍ऱ्या लावणीचे असोत. बावनखणीखालून जाताना एखाद्या बाजिंद्या कलावंतिणीचा असा काळीज चिरत जाणारा आवाज ऐकून कुणी बावनखणीची पायरी चढला नसेल, तरच नवल!

नानासाहेब पेशव्यांनी उभारलेल्या बावनखणीची एवढी जादू तर होतीच. नानासाहेबाच्या काळात पेशवाई भरभराटीला आली. मात्र १७६१च्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला आणि काही काळ पुण्याची रया गेली. पण थोरल्या माधवरावांनी पेशवाईची विस्कटलेली घडी पुन्हा बसवली आणि नाना फडणविसांच्या बौद्धिक कारवायांमुळे सवाई माधवरावाच्या काळात पेशवा आणि पुणं पुन्हा भरभराटीला आलं. या काळात पुणं वैभवाच्या अत्युच्च शिखरावर होतं. साहजिकच बावनखणीला पुन्हा बहर आला. हा बहर दुस‍‍ऱ्या बाजीरावाच्या काळात चरमसीमेला पोचला. विशेष म्हणजे दुस‍ऱ्या बाजीरावाने शुक्रवारपेठेत आपल्या मौजमस्तीसाठी वाडा बांधल्यावर नंतर स्वतःच्या मर्जीतल्या कलावंतिणींसाठी बावनखणी परिसरात माड्याही बांधल्या. त्याचे अनेक दाखले पेशवे दफ्तरांत सापडतात. त्याच्या स्वदस्तुरची एक नोंद सापडते ती अशी- शुक्रवारचे वाड्यासमोर जागा, घरे आम्ही पूर्वी खरेदी केल्याच आहेत. त्या मोडून सगुणी कलावंतिणीचे घरचे दक्षिणेस व चंद्रीचे घराचे दक्ष‌िणेस व तालीमखाना नवा शुक्रवारचे वाड्यापुढे रस्ता मधी टाकून बांधिला आहे. त्याचे मुकाबिल्यास पूर्व-पश्चिम लांबीचा रस्ता मधी सोडून आम्ही घर बांधून त्यांत कलावंतिणी बि‍ऱ्हाडासारख्या ठेवल्या आहेत. त्या आमच्या घरास साडे नऊ हजार रुपये लागले असत. लौकिकांत ते घर कलावंतिणीचे म्हणवतो. परंतु ते घर आमचे. कलावंतिणीचे नाही.

या पत्रात पेशवाईतील बावनखणीतील दोन प्रसिद्ध कलावंतीणींची नावं आढळतात. यातली चंद्री नायकीण बाजीरावाच्या खास मर्जीतली होती. दुस‍ऱ्या बाजीरावाच्या विश्रामबागवाड्यातील नाचीच्या दिवाणखान्यात हिच्या नृत्याचे अनेक कार्यक्रम झाल्याच्या नोंदी आढळतात. कुणी पाहुणेमंडळी आली की त्यांच्या पाहुणाचारासाठी चंद्रीचा नाच खास आयोजित केला जायचा.

सगुणी कलावंतीण तर सवाई माधवरावाच्या काळापासून आपली सेवा पेशवे दरबारी रुजू करत होती. सवाई माधवरावाची तिच्यावर बहुधा खास मर्जी होती. त्यामुळेच एका पत्रात तो लिहितो- सगुणी कलावंतीण, वस्ती पेठ शुक्रवार, शहर पुणे, इणे दत्ताजी साबळा दाळिंबकर याजपासून दीडशे रुपयांस चहू वर्षांची एक मुलगी खरेदी केली आहे. तिचे जकातीचा आकार माफ केला असे, तरी आकार होईल तो माफ खर्च लिहून जकातीचा तगादा न करणे...

पेशवे रोजनिशींतल्या अनेक पत्रांत अशा कैक कलावंतिणींची नावं सापडतात. पण व्यंकट नरसी या नाचीइतकी लोकप्रियता आणि राजमान्यता क्वचितच कुणाला मिळाली असेल. व्यंकट नरसी होती राजनर्तिका. पण तिचंही वास्तव्य बहुधा बावनखणीतच होतं आणि त्याकाळी ती वारांगना म्हणूनच प्रसिद्ध होती. वाड्यात होणारे मोठमोठे उत्सव असोत किंवा निजाम-इंग्रजांच्या प्रतिचनिधींचं स्वागत करायचं असो, अशा वेळी खास व्यंकट नरसीलाच याद केलं जाई. दुस‍ऱ्या बाजीरावाच्या एका पत्रात एका उत्सवसमयी तीन दिवस सतत व्यंकट नरसीचा नाच आणि रामचंद्र गोसावी पैठणकर यांचं गायन झाल्याचा उल्लेख आलेला आहे. तर एका ठिकाणी बाजीरावाने अहोरात्र दोन दिवस नाचवून तिला २६ हजार रुपये बक्षीस दिल्याचीही नोंद सापडते. हिच्या नावासंबंधीही एक हकिकत आहे. हिचं मूळ नाव नरसी. विश्वगुणादर्श ग्रंथाचा कर्ता पंडित व्यंकटाध्वरी याने तिच्या नाचांत काही दोष काढून ते स्वतः तिला समजावले. तेव्हापासून ती स्वतःला पं. व्यकंटाध्वरी यांची शिष्या मानू लागली आणि आपल्या नावाआधी त्यांचं नाव लावू लागली.

मात्र सगुणी असो, चंद्री असो किंवा व्यंकट नरसी असो, त्या कोणत्या प्रकारचा नाच करीत हे उलगडत नाही. त्यामुळेच बावनखणी म्हणजे निव्वळ शेजेची सोय किंवा छचोरपणा, असा आरोप बावनखणीवर नंतरच्या काळात करण्यात आला. गेल्या शंभर-पन्नास वर्षांत शुक्रवारपेठेचा मूळ बावनखणीचा भाग आणि त्याला जोड मिळालेला बुधवार पेठेचा भाग मिळून जो रेड लाइट एरिया तयार झालाय, तो पाहून कुणाला हा आरोप खराही वाटेल. पण त्यात तथ्य नाही. गायन-नर्तन हीच कायम बावनखणीची मिरास राहिली आहे. अगदी सुरुवातीच्या काळात कदाचित बावनखणीतील नाच-गाण्याला डौलदार रूप लाभलं नसेल कदाचित. पण सवाई माधवराव आणि दुसरा बाजीराव यांच्या काळात बावनखणीत लावणीचा शिरकाव झाला आणि बावनखणीने कात टाकली. ती अक्षरशः झळाळून उठली. याचं श्रेय ख‍ऱ्या अर्थाने जातं दुसरा बाजीराव आणि शाहीर होनाजीबाळाला. कारण दुस‍ऱ्या बाजीरावाने उत्तरतेल्या ठुमरी-कजरीसारख्या ठाय लयीतील गाण्याच्या धर्तीवर लावण्या रचायला होनाजीबाळाला सांगितलं आणि त्याने ते शिवधनुष्य पेललं. एकाच सुरात म्हटल्या जाणा‍ऱ्या पारंपरिक लावणीगीताचे सूर होनाजीबाळाने असे काही खेचले की उत्तरेतल्या बैठक की ठुमरीच्या धर्तीवर महाराष्ट्रात बैठकीची लावणी निर्माण झाली. बावनखणीत अवतरलेल्या या लावणीयुगाचं वर्णन दिवंगत संगीतसमीक्षक अशोक रानडे यांनी आपल्या संगीतविचारया पुस्तकात विचक्षणपणे केलं आहे. ते लिहितात- लावणीचा उगम जरी १५६० पर्यंत मागे जात असला, तरी उत्तर पेशवाईत लावणी भरभराटली. त्याला होनाजीने लावणीत घडवून आणलेला तांत्रिक व कलात्म बदल कारणीभूत ठरला. हा बदल पुढीलप्रमाणे नोंदवता येईल. होनाजीने ढाल्या स्वरात गाण्याची ढब स्वीकारली. गाण्याची लय ठाय केली. आश्रयदात्याच्या इच्छेनुसार होनाजीने राग-तालांत लावण्या बांधायला सुरुवात केली. लावणीगायनाकरता लय-ताल साथ देण्याकरता तबला वापरण्यावर होनाजीने भर दिला. लावणीगायिकेने खाली बसून लावणी सादर करण्याची प्रथा होनाजीने उचलून धरली. या व यांसारख्या इतर सर्व विशेषांनी बैठकीच्या लावणीच्या रुपास कलात्मकता प्रदान करण्यात सहाय्य केले. खेचली गेलेली लय आणि बसून गाण्याच्या प्रघातामुळे अदाकारी-ठुमरी गायकांनी प्रसृत केलेल्या गायनाबरोबरच अभिनय संभवला.

एकूण होनाजीबाळाने लावणी कलेचं रंगरूपच पालटून टाकलं. महाराष्ट्रातील गतिमा‌न लावणीला ठुमरीचा भावोत्कट साजबाज चढवला. मग ही बैठकीची लावणी, हेच पुण्यातील बावनखणीचं वैशिष्ट्य ठरली. बावनखणीतील खणाखणांत आणि दिवाणखान्यांत बैठकीच्या लावणीचेच सूर गुंजायला लागले-

अहो भाऊजी मी कोरा माल मुखी विडा लाल

नरम गोरे गाल, वर तीळ झळझळी

जशी फुलली चाफ्याची कळी गं... बाई गं

आणि वर कलावंतिणीची दिलखेचक अदा. बावनखणी नुस्ती गजबजून गेली. होनाजीसकट सारे शाहीर बाजीरावाचे आश्रित. त्यामुळे सा‍ऱ्यांनीच त्याचा अनुनय करण्यासाठी अश्लील लावणीरचना केली. पण बावनखणीतल्या कलावंतिणींनी त्यात आपल्या भावकामाने असा काही रस ओतला की, बैठकीच्या लावणीचं शास्त्रीय घराणंच निर्माण झालं. आज महाराष्ट्रात रुजलेल्या आणि अजून टिकून असलेल्या बैठकीच्या लावणीचं श्रेय बावनखणीलाच द्यायला हवं. पेशवाईच्या अस्तानंतर सारेच शाहीर देशोधडीला लागले. कुणी बडोद्याला गेलं, कुणी ग्वाल्हेर-इंदुर संस्थान जवळ केलं. पेशवाईनंतर पुणं असं सांस्कृतिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेलं असताना फक्त बावनखणीतल्या बायांनीच नानासाहेब पेशवांच्या काळात पुण्यात रुजलेली सांगीतिक मुळं घट्ट पकडून ठेवली.

म्हणूनच बावनखणी म्हणजे एक कलासंस्कृतीच! आणि ती कलासंस्कृती असल्यामुळेच पेशवाई बुडाल्यावर ब्रिटिश अंमल सुरू झाला तरी, बावनखणीची मिजास कमी झाली नाही. संस्कृतीचे ठेकेदार म्हणवणा‍ऱ्यांनी तिला नावं ठेवली. प्रसंगी नाकंही मुरडली. पुणे शहराचे वर्णनपुस्तकात, बावनखणी कुणी वसवली याचं वर्णन करणा‍ऱ्या नारायण विष्णू जोशी यांनीच या वस्तीला दुगाण्या देण्याचंही काम केलं आहे. ते म्हणतात-शुक्रवारपेठेत दोन रस्ते आहेत. त्यात एक मुख्य रस्ता बावनखणीचा. मागे ज्या बावनखणीविषयी सांगितले आहे, तिजविषयी येथे थोडे लिहिले पाहिजे. ज्या सभ्य खासगीवाल्याने कसबिणींची सोय करून दिली, त्याने सर्वथैव वाईट केले. ह्या भ्रष्ट बायकांची अशी सोय केल्याने दुस‍ऱ्या बायकांस त्याप्रमाणे होण्यास उत्तेजन आले. पूर्वी पो‍ऱ्यांचे तमाशे रस्त्यांत होत, तेणे करून जसा लोकांस त्रास होत होता, तसा किंबहुना त्याहून अधिक ह्या बावन्नखणींकडून होतो, असे म्हणण्यास चिंता नाही.या नाटकशाळांकडे पाहून मुले बिघडतात. त्यांच्या नादी लागतात. येणेकडून पुष्कळ वाईट परिणाम होतात.

नारायण विष्णू जोशी यांनी आणि त्यांच्याप्रमाणे अनेकांनी या बावनखणीला नावं ठेवली. पण बावनखणी आपलं काम चोख बजावत राहिली. इतरांच्या भोगांनी प्रसंगी स्वतः भ्रष्ट होत संस्कृतीवहन करत राहिली. ती नुस्तीच बाजारबसवी नव्हती. तिच्या ठायी तसं घेण्याजोगं काही नसतं, तर भालाकार भोपटकरांपासून कृष्णशास्त्री चिपळूणकरांपर्यंत अनेकांनी बावनखणीचे उंबरठे झिजवले नसते. मुख्य म्हणजे ग. त्र्यं. माडखोलकर यांच्यासारख्या विद्वान अभ्यासकानेही यासंदर्भात पुण्याच्या रंगेलपणालाच जबाबदार धरलं आहे. त्यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचं छोटेखानी चरित्र लिहिलं आहे. त्यात तत्कालीन पुण्याचं वर्णन करताना माडखोलकर म्हणतात- शास्त्रीबुवांच्या वेळचे पुणे जसे रसिकतेबद्दल तसेच रंगेलपणाबद्दलही विख्यात होते. रावबाजीचे राज्य जरी पुण्यातून गेले, तरी त्याचा रंगेलपणा मात्र मागे राहिला. पुण्यातील सामान्य लोक आणि सुशिक्षित यांच्यात हा रंगेलपणा जवळजवळ सारख्याच प्रमाणात वसत होता. रात्रीच्या वेळी हातात फुलांचे गजरे घेऊन, मशालींच्या झगझगीत प्रकाशात प्रियाराधनार्थ बाहेर पडणे, हे त्यावेळी कमीपणाचे समजले जात नसे. तत्कालीन सुशिक्षितांप्रमाणेच कृष्णशास्त्री चिपळूणकर हेही रसिक तसेच रंगेलही होते. शास्त्रीबुवांचे एक स्नेही आणि शिक्षणव्यवसायातील पहिले वरिष्ठ बाबा गोखले यांची अशी गोष्ट सांगतात की, त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना केव्हा केव्हा आपल्या या गुरुला त्याच्या प्रेमपात्राच्या महालातून आणायला जावं लागत असे.

या उदाहरणांवरुन बावनखणीला दोष देण्यात किती अर्थ आहे, ते जाणकारांना कळेलच. अर्थात मीनाबाजार काय किंवा बावनखणी काय, नाच-गाणं म्हटलं की तिथे शौकीन रसिकांची चहलपहल असणारच. मग पुढे त्यातून उद्भवणा‍‍ऱ्या परिस्थितीसाठी केवळ बावनखणीला दोष देण्यात काय अर्थ? उलट बावनखणीने जेवढं धरून ठेवता येईल तेवढं गाणं धरून ठेवलं. प्रसिद्ध गायिका बाई सुंदराबाई यांचा दिवाणखाना बावनखणीतच होता. या सुंदराबाईंना प्रसिद्ध गायकनट बालगंधर्व बहीण मानायचे. तसंच पं. भास्करबुवा बखले नियमितपणे सुंदराबाईंकडे त्यांच्या लावण्या ऐकायला यायचे. त्यांच्या लावण्यांच्या चालींवरूनच त्यांनी संगीत मानापमान नाटकातील पदांना चाली लावल्या आहेत. एवढंच नव्हेतर पंढरपूरच्या उत्पात मंडळींनी जपलेल्या बैठकीच्या लावणीच्या अस्सल चीजांचा स्रोत बावनखणीच आहे.

पेशवाईत जन्माला आलेली बावनखणीतली ही नृत्य-संगीतपरंपरा १९६०-६५ पर्यंत कायम होती. कौसल्याबाई कोपरगावकर, गोदावरीबाई पुणेकर, भामाबाई पंढरपूरकर या लावण्यखणींचे दिवाणखाने याच बावनखणीत होते. तबला आणि सारंगीच्या साथीने रोज संध्याकाळी त्यांची बैठकीची तेजपुंज लावणी उगवत होती आणि चंद्राच्या साक्षीनेच मावळत होती. नामांकित तबलिये आणि सतारिये या बायांच्या साथीला दिमाखात बसत होते. प्रसिद्ध दिवंगत संगीतकार दत्ता डावजेकर यांचे वडील गोदावरीबाई पुणेकर यांच्या बैठकीत त्यांना तबल्याची साथ करायचे. खुद्द डावजेकरांनीही लहानपणी भामाबाई पंढरपूरकरांना तबल्याची साथ केली होती.

या अर्थाने बावनखणी संस्कृतीची खाणच होती. यादव काळानंतर तुटलेला महाराष्ट्रातला संगीताचा दुवा जोडून ठेवण्याचं काम खरंतर बावनखणीनेच केलं. पार अगदी बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर उत्तर भारतात संगीताचं शिक्षण घेऊन परत महाराष्ट्रात येईपर्यंत. बाळकृष्णबुवा ख्यालगायकीचं शिक्षण घेऊन आले आणि त्यानंतरच्या काळात महाराष्ट्रात संगीताचं सुवर्णयुग अवतरलं. पण म्हणून बावनखणीला बोल लावण्याचं काम नाही. बानवखणीने मराठी मातीत संगीताची धुगधुग जागती ठेवण्याचं काम नक्कीच केलं. म्हणून तर वामनराव देशपांडे म्हणतात- दुस‍ऱ्या बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीत लावणीगायनाचा उत्कर्ष झाला. पोवाडे रचणारे शाहीर आणि लावण्यांचे अनेक प्रतिभावंत रचनाकार यावेळी निर्माण झाले. पोवाड्यांच्या सुबोध, पण रांगड्या भाषेला अनुसरून लावलेल्या साध्या चालीला खास गायकीत प्रवेश मिळाला नाही. मात्र लावणी या महाराष्ट्राचे वैशिष्ट्य ठरलेल्या गानप्रकारात माफक प्रमाणात का होईना, रागदारीचा समावेश होऊ शकला.

वामनरावांसारख्या संगीताच्या जाणकाराने ही पावती दिल्यावर तर, बैठकीची लावणी आणि तिला तगवणा‍ऱ्या बावनखणीकडे कुणी नजर उचलून पाहण्याचंही कारण नाही. बैठकीची लावणी ही बावनखणीने उभ्या महाराष्ट्राला दिलेली सांस्कृतिक-सांग‌ीतिक देणगी आहे.

कालौघात माणसं-संस्था काळाच्या पडद्याआड जातात. तसे बावनखणीचेही बुरुज ढासळले. तिच्या आश्रयाला असलेले कलावंत आपल्या प्रतिभेची झलक दाखवत गावोगाव पांगले. मग ज्यांच्याकडे कला नव्हती, अशांनी या पडक्या बुरुजांचा आधार घेतला. त्यांच्याकडे कला नव्हती, तरी शरीर होतं. मग तेच त्यांचं भांडवल झालं. हेही कुणी हौसेने नसेलच करत. पण त्यामुळे बावनखणी मात्र पार बदनाम झाली...

... इतकी की तिच्या आत आता उगवतच नाही, सर्जनाचं एखादं गाणं, एखादं नृत्य. मग उगाचच तिचा शोध घेत फिरावं लागतं. तरीही लागत नाहीच ती हाती. शोधणा‍ऱ्यालाच व्हावं लागतं मग बावनखणी आणि काढावं लागतं तिला पुन्हा बाहेर भूतकाळाच्या गर्भातून... उद्याच्या कलेचं बीजारोपण करण्यासाठी!
(महाराष्ट्र टाइम्सच्या २०१३च्या दिवाळी अंकातील माझा लेख)