गुरुवार, १८ ऑगस्ट, २०१६

बहीण-भावाच्या नात्याचे विविध पदरआज राखीपौर्णिमा. या सणाने बहीण-भावाच्या नात्याला एक वेगळा आयाम दिला, तरी याला फार मोठी प्राचीन परंपरा नाही. या सणाने बहीण-भावातील नात्याला एक घट्ट वीण दिली आणि आता तर बहीण-भावाचं नातं रक्षाबंधन किंवा भाऊबीजेसारख्या सणांतून तोललं जातं. मात्र लोकसंस्कृतीने बहीण-भावाच्या या नात्याकडेही थोडं तटस्थपणे पाहिलं आहे. या नात्यांत प्रेम आहेच. पण थोडासा वैरभावही आहे. बहिणीला प्रेमाने माहेरपणाला न्यायला येणारा भाऊ आणि माहेरी आलेल्या बहिणीची बायकोच्या सांगण्यावरून हत्या करणारा भाऊ, अशी दोन्ही रूपं लोकसंस्कृतीने रेखाटलेली आहेत. इतकंच काय पण भावाला बहिणीबद्दल असलेल्या आसक्तीचं रूपही कधी कधी पाहायला मिळतं, पण क्वचितच!
बहीण-भावाच्या नात्याचा अत्यंत सुरेख गोफ लोकसंस्कृतीने विणलेला आहे. कारण लोकसंस्कृतीत मायलेकीच्या नात्यानंतर सहजसुंदर नातं बहीण-भावाचंच आहे. याची उदाहरणंही लोकसंस्कृती अधोरेखित करणा‍ऱ्या लोकवाङ्मयात जागोजागी सापडतात. शेवटी मात्या-पित्याचं छत्र हरपलं, तरी सासुरवाशिणीचं माहेर भावामुळेच कायम राहतं. साहजिकच लहानपणीचं भावा-बहिणीचं अवखळ नातं मोठेपणी अधिक गहिरं होत जातं. बहीण-भावाच्या नात्यातले हे बदलही लोकसंस्कृतीने मनोभावे जपले आहेत. लोकसंस्कृतीतले हे संदर्भ तपासत गेलं, तर बहीण-भावाच्या नात्याची सुरेख उकल होत जाते. या नात्याला खरा रंग चढतो, तो बहीण लग्न होऊन सासरी गेल्यावर. बहीण-भावाला ही ताटातूट सहन होत नाही. मग येणा-या प्रत्येक सणाची बहीण-भाऊ दोघंही वाट पाहतात. कारण त्यानिमित्ताने बहीण माहेरी येते. अर्थात, त्यासाठी बहिणीला आणायला भावाला सासरी जावं लागतं. माहेरी न्यायला येणा-या भाऊरायाची बहीण खूप आतुरतेने वाट पाहत असते. तो कधी येतोय, असं तिला होतं आणि जेव्हा तो येतो, तेव्हा ती आपल्या एखाद्या जवळच्या सखीला म्हणते-
माह्याराचं आलं मूळ, आला ग भाऊराया
सणासुदीच्या दिसात, नेई भैनीला खेळाया...
बहीण नव्या संसारात रमेपर्यंत तिचं सासर-माहेर असं वरचेवर येणं-जाणं सुरू राहतं. पण हळूहळू माहेर सुटत जातं. जन्मदाते हरपल्यावर तर माहेर काहीसं दुरावतंच. मात्र भावा-बहिणीचं मायेचं नातं तुटत नाही. ते राहतंच जिवात जीव असेपर्यंत. म्हणून तर कितीही सासरी रुळली आणि आईबापाच्या सुखाला दुरावली, तरी माहेराचा विषय निघाली की एखादी सासुरवाशीण हक्काने म्हणते-
लाडका माझा बंधु, बंधु किसन मुरारी
भैनीच्या सुखासाठी, बंधु खंबीर माह्यारी... मात्र बहीण-भावाच्या नात्याचा कितीही सुरेख गोफ लोकसंस्कृतीने विणलेला असला, तरी गोफच तो; नेहमीच त्याचे सारे पेड सुटतीलच असं नाही. उलट कधी कधी तो गुंतण्याचीही शक्यता असते. बहीण-भावाच्या नात्यातली ही गुंतागुंतही लोकसंस्कृतीने टिपलेली आहे. त्यामुळेच बहीण-भावाचं नातं नेहमीच मायेचं-प्रेमाचं न रंगवता, त्याला इतरही वेगवेगळ्या छटा देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
लोकसंस्कृती नेहमीच अधिकाधिक प्रकृतीला म्हणजे निसर्गाला धरून असते. साहजिकच मानवी नात्यांबद्दलही तिने हेच धोरण अवलंबलेलं आहे. त्यातूनच बहीण-भावाच्या नात्याकडे थोड्या वेगळ्या नजरने बघण्याचा प्रयत्न झालाय. बहीण-भावाचं रूढ नातं मायेचं, प्रेमाचंच आहे. पण क्वचित कधी त्यात वैरभावही आलेला आहे. लोकवाङ्मयाने हा वैरभावही मोकळेपणाने टिपलेला आहे. त्यासंबंधीच्या अनेक लोककथा आणि लोकगीतं आहेत. बायकोच्या सांगण्यावरून बहिणीची हत्या करणाऱ्या भावाचं कथागीत तर प्रसिद्धच आहे-
सासरी गेलेली बहीण गौरी-गणपतीच्या सणाला माहेरी येते. रात्री सख्यांबरोबर गौरी जागवायला जाताना ती हट्टाने वहिनीची कासई (साडी) नेसून जाते. तिची आई परोपरीने सांगते तिला की, वहिनीची साडी नेसू नको म्हणून. पण माहेरवाशीण ती. ती थोडंच कुणाचं ऐकणार. जाते वहिनीची कासई नेसून. पण भान हरपून खेळता खेळता वहिनीच्या कासईवर पडतो कसला तरी डाग. मग काय, भावजयीला जेव्हा हे कळतं, तेव्हा तिचा जळफळाट होतो. ती सा-यांशी अबोला धरते. नवरा तिला समजवायला जातो, नवीन घेऊन देईन म्हणतो. पण भावजय कसली, ती म्हणते, बहिणीच्या रक्ताने ही कासई भिजवून आणशील; तेव्हाच बोलेन. तेव्हापासून भाऊ बहिणीला सासरी घेऊन जाण्याची वार्ता करू लागतो. जेणेकरून रस्त्यात तिला मारून टाकणं, त्याच्यासाठी सोपं झालं असतं.
पण भावाच्या मनीचा हा हेत बहिणीला कळतो. ती सासरी जाण्याचा विषयच काढत नाही. मात्र माहेरपणाला आलेल्या मुलीला किती दिवस ठेवून घ्यायचं, या चिंतेनं अखेर एक दिवस तिची मायबायच तिला सासरी पाठवण्याची तयारी करते. तेव्हा तिची लाडाची ही लेक म्हणते-
नको नको मायबाई, नको धाडूस सासरी
सोबतीला ग बंधवा, त्याच्या कमरंला सुरी... यावर तिची आई म्हणते,‘अगं तू वेडी का आहेस? तो तुझा भाऊ आहे, तो तुला कसं मारेल?’ यावर बहिणीने दिलेलं उत्तर मार्मिक असतं. ती म्हणते-
भाव भाव म्हनू कोना, भाव नाही घरी दारी
जिवाभावाचा बंधवा, आज झाला माझा वैरी... तरीही शेवटी त्या बहिणीला आपल्या भावाबरोबर सासरी जायला निघावंच लागतं आणि अर्ध्या वाटेत आल्यावर तो भाऊ सुरीने बहिणीची हत्या करतो नि तिच्या रक्तात बायकोची कासई भिजवतो.
... मात्र भावाने बहिणीबरोबर धरलेल्या वैराच्या कथा परवडल्या, असं म्हणावं लागणा-याही काही कथा लोकसंस्कृतीत आहेत. कारण या कथा बहीण-भावाच्या नात्याच्या पल्याड आहेत. त्या बहीण-भावाकडे एकाच उदरातून जन्म घेणारे सहोदर म्हणून बघतच नाहीत. त्या बहीण-भावाच्या नात्याकडेही स्त्री-पुरुष या भिंगातूनच बघतात. या संदर्भातली एक लोककथाही प्रसिद्ध आहे. शिक्षणासाठी घरापासून दूर गेलेला एका मुलगा ब-याच वर्षांनी घरी परतत असतो. त्याच्या गावाच्या वाटेवर नदी असते. त्या नदीत आंघोळ करताना त्याला वाहत येणारा एक सोनेरी रंगाचा केस सापडतो. तो केस बघून तो निश्चयच करतो की, लग्न करीन तर सोनेरी केसांच्या मुलीशीच. घरी आल्यावर तो आई-वडिलांना सानेरी केस दाखवतो आणि आपला निश्चयही सांगतो. त्याचा तो निर्णय ऐकून आई-वडिलांना धक्काच बसतो. कारण सोनेरी केसाची ती मुलगी, म्हणजे त्याची बहीणच असते. ते त्याला नाना परोपरीने समजावतात. पण तो काहीच ऐकून घेत नाही. सरते शेवटी आई-बाप मुलासमोर हरतात. ते मुलीची लग्नासाठी मनधरणी करतात. तेव्हा भावाचा आणि आपल्या आईबापाचा निर्णय ऐकून ती मुलगी चक्रावून जाते. तिला काय करावं, तेच सुचत नाही. त्याच वेळी तिथे एक साधुपुरुष येतो आणि तिला चंदनाची बी देऊन ती पायाखाली दाबायला सांगतो. ती मुलगी ती बी पायाखाली दाबते, तर तिथे चंदनाचं मोठं झाड उगवतं. थेट आभाळाला भिडलेलं. ती मुलगी त्या झाडावर चढते आणि लपून बसते. ती झाडावर चढल्याचं कळल्यावर तिचे आई-बाप तिला बोलवायला येतात. तेव्हा त्यांच्याकडे बघून ती म्हणते-
बाबा तुम्ही माझं बाबा व्हाना, बाबा तुम्ही माझं बाबा व्हाना,
काल तुम्ही व्हतंव माझं बाबा, उद्या तुम्ही व्हताल माझं सासरं
आयं तू माझी आयं होना, आयं तू माझी आयं होना
काल तू व्हतीस माझी आयं, उद्या ती व्हशील माझी सासू... असं म्हणून ती मुलगी शेवटपर्यंत खाली उतरत नाही. उलट चंदनाच्या झाडावर चढत चढत आभाळातच निघून जाते.
लोकसंस्कृतीत रुजलेल्या भावा-बहिणीच्या लग्नाच्या अशा कथांचं मूळ थेट मानवाच्या आदिम अवस्थेतच शोधावं लागतं. कारण विवाह संस्था किंवा कुटुंब व्यवस्था अस्तित्वात येण्याआधीच्या काळात फक्त स्त्री-पुरुष हेच नातं अस्तित्वात होतं. तिथे कुणीच कुणाचे आईबाप नव्हते आणि कुणी बहीण-भाऊही नव्हते. पुराणातली यम-यमीची गोष्टही याचीच निदर्शक आहे. त्याचेच अवशेष लोकसाहित्यातील कथा-गीतांतून आजही शिल्लक राहिलेले दिसतात. महत्त्वाचं म्हणजे लोकसंस्कृतीने भावाबहिणीच्या नात्यातील हे पैलू अव्हेरले नाही. अर्थात, लोकसंस्कृती एकूणच नात्यांकडे किंवा रीती-परंपरांकडे किती लवचीकतेने पाहते, ते सांगण्याचा हा प्रयत्न आहे; त्याचं समर्थन नाही. महत्त्वाचं म्हणजे बहीण-भावाच्या नात्याचे हे पदर या लोकगीतांतून आणि लोककथांतून मला माझ्या आईनेच उलगडून दाखवले होते.

६ टिप्पण्या:

 1. खूपच छान लिहिलंयत. नात्याचे विविध पैलू कथांमधून सुरेख उलगडलेत.

  उत्तर द्याहटवा
 2. खूपच छान लिहिलंयत. नात्याचे विविध पैलू कथांमधून सुरेख उलगडलेत.

  उत्तर द्याहटवा
 3. तुझी आई ही खरंच लोकसंस्कृतीचं चालतंबोलतं विद्यापीठ आहे.

  उत्तर द्याहटवा


 4. 'बहिण भावातील भावनिक वीण' या विषयी तुमचा अनुभव लिहा.

  उत्तर द्याहटवा
 5. ३.

  'बहिण भावातील भावनिक वीण' या विषयी तुमचा अनुभव लिहा.

  उत्तर द्याहटवा