व्हक्का माझा आंबा पिक्का... |
दुपार असेल, तर डोळ्यावर कितीही झोप असली तरी नुस्ता धप् आवाज यायची खोटी; काकूची बोंब ऐकताच आम्ही धावत सुटायचो. रात्रीच्या नीरव शांततेत मात्र त्याचे धप्- धप् आवाज कितीही आले, तरी काळोखात तिकडे जाण्याची कोणाची शामत नव्हती. मग पहाट होण्याची वाट बघायची. या वाट बघण्यातच अनेकदा रात्र सरायची. कोंबडा आरवला की थोड्या वेळानं झुंजुमंजु व्हायचं. बाहेर थोडं धुंदुरकच दिसायचं. पण आता जीवाला अधिक थोपवणं शक्य नसायचं. अंथरुणातनं घेतलेली पहिली उडी थेट लांबोड्याच्या बुंध्याशीच जाऊन पडायची. लांबोड्याच्या बुंध्याशी पिकलेल्या आंब्यांचा सडा पडलेला असायचा. ते पटकन् कसे गोळा करायचे तेच कळायचं नाही. मग अंगात घातलेल्या शर्टाचीच खोळ व्हायची आणि त्यात लांबोड्याचे आंबे गोळा केले जायचे. या गोळा केलेल्या आंब्यांचा फन्ना उडवेपर्यंत न्हेरीचा वकात कधी व्हायचा तेच कळायचं नाही. आयंची घरातून हलकेच हाक यायची. 'न्हेरी करून जा, मला नह्यवर धुवायला जायचंय.' की लगेच घरात हजर. एका अॅल्युमिनियमच्या ताटलीत आयन गरमगरम खिमाट वाढलेला असायचा. सोबत कांद्यात कुस्करलेला कुरकुरीत कोलीम. मग थेट जेवणासारखाच न्हेरीवर ताव मारला की स्वारी पुन्हा बाहेर आंब्यांखाली हुंदडायला मोकळी...
... आणि आमच्या आवाडात फक्त लांबोडा तेवढा थोडाच होता.
लांबोड्याला खेटून असलेला दुसरा एक जाड आंबा होता. एकच खाल्ला तरी पटकन पोट भरणारा. शिवाय एक केसरी लिटी होती. एक दुधी लिटी होती. झालंच तर आमच्या आवाडाच्या बाहेर, आमच्या मालकीचे नसलेले, पण पडलेले आंबे खाण्यासाठी कुणाचीही आडकाठी नसलेले अनेक आंबे होते. मिरमिऱ्या होता. साखरी लिटी होती. गोडांबा होता. पिठांबा होता. ढेरांबा होता... आणि रानात तर काय आंबेच आंबे. नाना तऱ्हांचे, नाना चवीचे. एका आंब्याची चव दुसऱ्या आंब्याला नाही. प्रत्येक आंबा जणू काही स्वत:च्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वासारखा. जेवढी आंब्याची झाडं, तेवढ्या त्याच्या चवी. आज कुणाच्याही पेटीतला, कुठलाही हापूस काढला, तरी जगाच्या पाठीवर त्याची चव सारखीच लागते. पण बांधा-बांधावर पडलेल्या झडलेल्या कोयांतून निर्माण झालेल्या रायवळी-गावठी आंब्यांची लज्जतच न्यारी!
केवळ ही लज्जत चाखण्यासाठीच, परीक्षा संपायच्या आधी गावाचे वेध लागायचे. खरंतर गावचा एसटीचा प्रवास नको वाटायचा. कारण प्रवासात पोटात मळमळून हमखास उलट्या व्हायच्या. त्यामुळे एरव्ही गावाला म्हटलं की नकारघंटा असायची. पण उन्हाळ्याच्या सुट्टीत मात्र आमच्या आवाडातले, परक्यांच्या तनाऱ्यातले, पायवाटेवरचे आणि रानातल्या आडवाटांचेही आंबे खुणावत असायचे. सकाळी पाचला मुंबई सेंट्रलवरून सुटलेली एसटी दुपारी तीन-चार वाजता गावी पोचायची. एसटीच्या प्रवासाने सगळे थकलेले असायचे. प्रत्येकाला जागा मिळेल तिथे आडवं व्हायचं असायचं. मी एकटाच काय तो ताजा-तवाना असायचो. घरात शिरल्या शिरल्या सामान टाकून मला आवाडातल्या आंब्यांच्या झाडांखाली पळायचं असायचं. मी तसंच करायचो. आमच्या वटाणात सामान टाकलं की उडी मारून काकूच्या वटाणात जायचो. दुसरी उडी अंगणात मारायचो आणि तिसरी उडी थेट आवाडातल्या आंब्यांच्या बुंध्यात.
आमच्या घरामागचं हे आवाड म्हणजे देवराईच होतं जणू! तिथे रामफळ, पपनस, पेरू, शेकट आणि आंब्याची झाडं होती. उंचच उंच आणि सरळसोट वाढलेली. ठरावीक उंचीवर झाडांच्या फांद्यांची अशी दाटी झालेली की आवाडावर एक आच्छादनच तयार झालेलं असायचं. त्या आच्छादनातून सूर्याची एक तिरीपही खाली जमिनीपर्यंत पोचायची नाही. ऐन उन्हाळ्यातही आवाडातली माती थंडगार असायची. एकप्रकारचं कोंदट, गूढ, पण आश्वासक वातावरण असायचं आवाडातलं. मग मातीचा, वातावरणातला हा हवाहवासा थंडगारपणा पायात आणि मनात रुजवत मी आंब्यांच्या बुंध्यांना गिरक्या घ्यायचो. एकप्रकारे मी आलो असल्याची त्यांना दिलेली ही वर्दीच असायची. ही वर्दी दिल्यावर मग माझा पाय तिथे ठरायचा नाही. 'आता महिनाभर आहोत सोबत', असं म्हणून मी ललीच्या मागावर निघायचो.
ललिता माझ्यापेक्षा दोनेक वर्षांनी मोठी असलेली बहीण, गावीच माझ्या काकूकडे असायची. ती गुरं घेऊन रानात जायची. रान म्हणजे तिचं दुसरं घरच जणू. या रानाचं पानन् पान तिला ठाऊक असायचं. काजू, आंबे, करवंद, अळू, कुम्हला, तोरणा, ओवळा अशा रानातल्या कितीतरी फळांच्या अनवट जागा तिला माहीत असायच्या. रोज संध्याकाळी गुरं घेऊन घरी येताना तिची टोपली नानाप्रकारच्या रानमेव्याने भरलेली असायची. हे ठाऊक असल्यामुळेच तिला शोधण्याची मोठी उत्सुकता असायची. रानात गुरं घेऊन जाण्याच्या बहुतेक वाटा नदीकडून फुटलेल्या असायच्या. मग सगळ्यात आधी नदी गाठायची. तिथे पाणी भरणाऱ्या किंवा रानातून येणाऱ्या-जाणाऱ्यांना विचारायचं- 'गुरा कुटं गेलीत हाय ठाऊक?' कुणी ना कुणी नेमकी जागा सांगत असे. मग त्याने दाखवलेल्या बोटाने चालायला सुरूवात करायची.
हळूहळू नदीची वहिवाटीची वाट नजरेआड व्हायची. गच्च रान अंगावर यायचं. मनात धाकधूक निर्माण व्हायची. पुढे जाऊ की थांबू असं व्हायचं. ललीचा शोध तर घ्यावासा वाटे, पण पुढे जायचीही भीती वाटे. मग तिथेच थांबून मी कानोसा घेत असे. एवढ्यात लांब कुठेतरी गुरांचा आवाज ऐकू यायचा. त्यांचं हंबरणं, त्यांना घातलेली साद कानावर पडायची. मग तिथेच एखाद्या बांधावर उभा राहून मी जोरात ओरडत असे- 'अगो लली गो......' , 'अगो लली गो......' , 'अगो लली गो......'
असं चार-पाच वेळा झाल्यावर मग समोरून प्रतिसाद मिळायचा- 'कोन हाय रं...?'
'अगो मी मकून.....'
'कंदी रं आलास? आयं-बाबा पण आलंयत?'
'हो गं हो...'
बरीचशी प्रश्नोत्तरं अशी लांबून झाली की, मग लली आहे त्याच वाटेनेपुढे यायला सांगायची. मात्र काही अंतर चालून गेलं तरी ती किंवा गुरं कुणीच दिसायचं नाही. मी कितीही हाका मारल्या, तरी तिचा प्रतिसाद मिळायचा नाही. मग मी घाबरून रडकुंडीला यायचो. अगदी रडण्याच्याच बेतात असायचो अन् एवढय़ात कुणी तरी येऊन भॉक करायचं. आधी मी दचकून घाबरायचोच. पण नंतर हसत सुटायचो. कारण ती लली असायची. मग ती मला घट्ट आवळायची. माझे पटापट मुके घ्यायची. माझी छोटी जीवणी हाताच्या चिमटीत घेऊन म्हणायची- 'ही बघा याची केवढीशी मुस्कुरी.' नंतर गुरं चरत असतील, तिथे नेऊन झाडाखाली ठेवलेल्या टोपलीवरली पानं पटकन् बाजूला करून म्हणायची- 'हे बघ क्काय?'
टोपली आंब्यांनी भरून ओसंडत असायची. लाल, केशरी, गडद पिवळे आंबेच आंबे. लगेच देठाकडचा भाग दगडावर ठेचून तिथून आंबा थोडा पिळून ती आंब्याचा चिक काढून टाकायची आणि मला द्यायची. मग मी थांब म्हणेस्तोवर तिचा हा उद्योग सुरूच राह्यचा. घरी निघताना तोंड-हात आंब्याच्या रसाने माखलेले असायचे...
... तिथूनच खऱ्या अर्थाने माझे आंब्यांचे दिवस सुरू व्हायचे.
त्यानंतर महिनाभर घराच्या आवाडात-रानात नुस्ता आम्रमहोत्सवच सुरू असायचा. नाना तऱ्हेचे, नाना वासाचे, नाना रंगाचे आणि नाना चवीचे रायवळी म्हणजे गावठी आंबे घरात यायचे. नुस्त्या टोपल्याच्या टोपल्या आंब्यानी भरलेल्या असायच्या. त्यासाठी कधी एक दमडीही खर्चावी लागायची नाही. हे आंबे कापून फोडी करून खाण्यात मजा नसायची. रायवळी आंब्यांची गंमत ते चोखून खाण्यातच. देठाकडचा भाग काढून टाकायचा नि आंबा थेट तोंडाला लावायचा. आंबा लहान असो वा मोठा तो चोखून खायचा. यातही काही आंबे फक्त रसाचे असायचे. त्यात गर कमी आणि रसच जास्त. यांचा आकारही साधारण असायचा. याला आम्ही मग आंब्याऐवजी लिटी किंवा बिटकी म्हणायचो. आमच्या घराच्या आवाडात असलेली आंब्याची दोन झाडं याच रूपातली होती. पैकी एका लिटीतला रस केसरी धम्मक होता, म्हणून तिला आम्ही केशरी लिटी म्हणायचो. तर दुसऱ्या लिटीतला रस अगदी दुधासारखा पांढराधम्मक आणि चवीलाही तसाच होता, त्यामुळे तिला आम्ही दुधीलिटी म्हणायचो.
एक जाड मोठा आंबा, लांबोड्या आणि केशरी व दुधीलिटी घराच्या आवाडातच असल्यामुळे कुठेच न जाताही आंब्याच्या मोसमात भरपूर आंबे खायला मिळायचे. पण प्रत्येक रायवळी आंब्याची चव वेगवेगळी असल्यामुळेच नव्यनव्या चवी धुंडाळल्या जायच्या. यातूनच काही घराजवळच्या आणि काही रानातल्या खास आंब्यांचा आम्हाला शोध लागला होता. आमच्या घराच्या जवळ घर असलेल्या गोरिवले यांचा तनारा (म्हणजे गवत साठवायची जागा), आमच्या आवाडाच्या जवळच होता. या तनाऱ्यात गोरिवलेंची दोन आंब्यांची झाडं होती. या दोन्ही आंब्यांची चव सारखी होती, पण इतरांपेक्षा ती एकदम भिन्न होती. या आंब्यांचा रस गोड आणि काहीसा तुरट लागायचा. या वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळेच या आंब्याला सगळेजण मिरमिऱ्या म्हणायचे आणि त्याच्यासाठी या झाडांखाली मुलांची झुंबड उडालेली असायची.
मिरमिऱ्यापासून जवळच एक साखरी लिटी होती. अगदी साखरेसारखी गोड. पाटलांच्या मालकीची. सरळसोट उंच गेलेल्या या झाडावर, पिकल्यावर हिरव्या आणि गडद लाल होणाऱ्या लिट्यांचे घुडच्या घुड लोंबकळत असायचे. एखाद्याने उंचच उंच भिरकावलेला दगडही पोचणार नाही, इतकी साखरीची उंची होती. या लिटीच्या लिट्या दिवसा क्वचितच पडत. सकाळी मात्र झाडाखाली लिट्यांची पाखर असायची. नदीवाटेवर असल्यामुळे भल्या पहाटे पाणी भरायला जाणाऱ्या सासुरवाशिणी आधी या झाडाखाली डोकवायच्या आणि मगच पुढे जायच्या. या सासुरवाशिणींना आंब्यांच्या दिवसात साखरी लिटीने कधीच विन्मुख पाठवलं नाही. दिवसा पडणाऱ्या साखरीच्या लिट्या मात्र आम्हा मुलांच्या वाट्याला येत. मात्र दिवसभरात साखरीची एखादी लिटी खाल्ली, तरी पुरे होत असे, एवढा तिचा रस गोड होता.
याशिवाय गावाच्या आडवाटेवर पीठांबा, गोलांबा होता. पिठांब्याचा रस पिठासारखा, म्हणून तो पिठांबा, तर गोलांबा म्हणजे या झाडाचं फळ अगदी गोल गरगरीत होतं. याशिवाय एक केसांबाही होता. या आंब्याची बाठी आणि साल दोन्ही केसाळ होते. तो खाताना किवा चोखतानाही त्याचे केस दातात अडकायचे. पण त्यामुळेच त्याला केसांबा हे नाव मिळालं. रानातल्या झाडांवर चढण्यासाठी कुणाची परवानगी लागायची नाही. पण गावातली आंब्याची झाडं कुणाकुणाच्या मालकीची होती. या आंब्यांचं पडलेलं फळ खायला कुणी मनाई करत नसे, पण झाडावर चढता मात्र येत नसे. अशा वेळी मग वारा येऊन झाडावरचं पिकलं फळ खाली पडण्याची वाट पाहावी लागे. त्यात झाडाखाली पाच-दहा पोरं असतील, तर फळाची आशाच सोडलेली बरी, अशी स्थिती असायची. अशा वेळी आंबे झाडावरून पटापट पडावेत म्हणून प्रत्येकजण एक क्लृप्ती करत असे. जो-तो जवळच्याच करंवंदीची पाचेक पानं एकत्र करून ती कंरवंदाच्याच काट्याने आंब्याच्या झाडाला टोचत असे आणि म्हणत असे -
'व्हक्का माझा आंबा पिक्का,
कोण घेईल त्याचा डोकाच मोडू दे.'
एकप्रकारे पडणारा आंबा आपल्यालाच मिळावा, यासाठी केलेली ती भाकणूक असायची. अर्थात प्रत्येकजणच आंब्याला अशी कंरवदाची पानं टोचत असल्यामुळे वाऱ्याने आंबा खाली पडला की, प्रत्येकजणच तो उचलायला धावत असे आणि या उचलाउचलीत आंबा एखाद्यालाच मिळत असे, डोकी मात्र अनेकांची फुटत. पण यातच गंमत असायची. पुढ्यात नुस्तेच कुणी आणून टाकलेले आंबे खाण्यात मजा नसायची. जोवर आपली रग त्यात जिरलेली नसायची, तोवर ते आंबे खाण्यात मजा यायची नाही. यासाठीच लली गुरं घेऊन रानात निघाली की तिच्या पाठी लागायचो. तिच्याबरोबर रानात जाण्यात एक गंमत असायची. तिच्या देखरेखीखाली रानात हुंदडता यायचं. मला झाडांवर चढता येत नसे. त्यामुळे ती मला खालीच आंबे गोळा करायला उभी करत असे. ती मात्र झाडावर एखाद्या सरडय़ासारखी चढत असे. झाडं उचं असो वा आडवं पसरलेलं. सपासप वर जाऊन ती एकेक फांदी अशा नजाकतीनं हलवायची की फक्त पिकलेले आंबेच खाली पडायचे. बाकीचे झाडावर कशाही उडय़ा मारून फांद्या हलवायचे. त्यामुळे पिकलेल्या आंब्यांबरोबर कच्चे आंबेही खाली पडून फुकट जात. लली मात्र याविषयी जागरुक होती. तिला उगाच आंबे पाडलेले आवडायचे नाहीत. ती म्हणायची- 'पिकलेल्या आंब्याचा देठ नाजूक असतो. जराशी थरथरही त्याच्यासाठी पुरेशी असते.'
केवळ एकच झाड हलवल्याने एवढे पिक्के आंबे पडायचे की जवळची टोपली भरून जायची. मग दुसऱ्या दिवसासाठी ती दुसरं एखादं झाड हेरून ठेवायची. संपूर्ण आंब्यांच्या मोसमात तेव्हा क्वचितच एखाद्या आंब्याचे आंबे पुन्हा खाल्ले असतील. कारण ललिताला एवढ्या रानवाटा ठाऊक असायच्या की कधी कधी दुसरी कुणी त्या झाडाकडे आयुष्यात कधी फिरकलेलं नसायचं. कधी कधी आंब्यावर फार आंबे नसायचे. अशावेळी दगडानेच तो आंबा अचूक टिपला जायचा. मला एखादा आंबा दगडाने टिपायला किमान पंचवीसेक दगड लागायचे. ललिता मात्र पहिल्या दोन-तीन दगडातच तो आंबा अचूक टपकवायची. तिचं ते कसब बघून तेव्हा अवाक् व्हायला व्हायचं.
गुरं घेऊन रानात जाताना एक टोपली आणि गरकाटी तिच्यासोबत हमखास असायची. गरकाटी म्हणजे बांबूच्या (कळकीच्या) लांब दांड्याला पुढे एक जाड कुटकी तिरपी बांधलेली असायची. यामुळे तयार झालेल्या खोबणीत देठ अडकून फळ अलगद आपला पुढ्यात पडायचं. जर झाडावर चढायचं नसेल, किंवा झाड फार उंच नसेल, तर या गरकाटीचा वापर करतात. ललीचं लक्ष नसेल, तर ही गरकाटी हातात घेऊन मी झाडावर लटकणारं एखादं फळ ओढण्याचा प्रयत्न करायचो. पण बांबूच्या पुढच्या लवचीक-पातळ भागापासून ही गरकाटी तयार केलेली असल्यामुळे ती सतत लवायची. परिणामी वाऱ्याने हलणारा फळाचा देठ आणि सतत लवणारी गरकाटी यांचा मेळ जुळवून आणणं, म्हणजे एक कसबच. मी हातात घेतलेल्या गरकाटीच्या खाचेत फळ कधीच अडकायचं नाही. ललिता मात्र गरकाटीने एका हिसक्यात वरचं फळ जमिनीवर उतरवत असे.
रोज रानातून येताना ललीची टोपली आंब्यांच्या दिवसात आंब्यांनी भरलेली असायची. रोज सकाळ-दुपार-संध्याकाळ नुस्तं आंबे ओरपणं सुरू असायचं. कितीही खाल्ले तरी कंटाळा यायचा नाही आणि कितीही खाल्ले तरी कुणी ओरडायचं नाही. तेव्हा ललिताची टोपली म्हणजे मला कामधेनू किंवा कल्पवृक्षासारखीच वाटायची. कायम रानमेव्याने भरलेली. ललिताचं लग्न होईपर्यंत उन्हाळ्याचे दिवस म्हणजे माझ्यासाठी खरोखरच 'आंब्यांचे दिवस' होते.
... त्यानंतर मात्र कधीच मनसोक्त आंबे खाल्ले नाहीत. गावाकडे जाणं होतं राहिलं, तरी रानातून आंबे आणणारं घरात कुणी उरलंच नाही. ललिताच्या लग्नाच्या दरम्यानच घरामागच्या आवाडात दोघा चुलत्यांनी गुरांसाठी मोठा वाडा बांधला. तो बांधताना मध्ये येतात म्हणून आवाडातली बहुतेक सर्व झाडं तोडली गेली. त्यात लांबोड्यासकट सगळी आंब्याची झाडंही गेली. गच्च देवराई एकदम रिकामी झाली. सारं आवाडच भकास वाटू लागलं.
वीसेक वर्षं तरी झाली असतील. आवाडातली देवराई ओकाबोकीच होती. सुट्टीत गावी जाऊन कधी आवाडात धाव घ्यावी, तर भगभगीत आभाळच यायचं स्वागताला. ते उजाड माळरान बघताना जीव कसनुसा व्हायचा. शेवटी सातेक वर्षांपूर्वी मीच दोन कलमी आंब्यांची झाडं लावली आवाडात. एक-दोन इतरही आणखी कसली तरी.
... आणि बघता बघता झाडं वाढत गेली की! या कलमी आंब्यांच्या जोडीला आता दोन रायवळी आंबेही तरारलेत. सोबत सीतफळ, शेवगाही अचानक भरतं आल्यासारखी वाढताहेत. माळरानाची पुन्हा देवराई होतेय. संसाराच्या जंजाळ्यातून, मुलांच्या वाढीतून मोकळी झालेली ललीही आता माहेरी खेपा टाकून येता-जाता झाडांवरून हात फिरवतेय.
...सरलेले आंब्याचे दिवस पुन्हा येणारसे दिसतायत...!
( 'ऋतुरंग' दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा