मंगळवार, ५ जुलै, २०१६

आषाढ बिलोरी ऐना…


एकदा का आषाढधारा झडझडून बरसून गेल्या की मग सृष्टीचं, मनामनाचं रुप पालटतं. एक नवी उमेद, नवा उत्साह त्यांना व्यापून उरतो. जणू आषाढाचं सर्जनशीलत्व त्यांच्यात उतरतं. त्यांच्या कल्पनेला-प्रतिभेला नवे धुमारे, नवे पंख फुटतात...
 

केवळ आषाढाच्या भरवशावर संपूर्ण सजीव सृष्टी सारा वैशाखवणवा सहन करते. आषाढ उंबरठ्यावर आहे, हे तिला दिसत असतं. बघता-बघता आषाढउभ्या धारेने कोसळेल आणि आपल्याला न्हाऊ-माखु घालेल याची तिला खात्री असते. खरंतर आषाढाच्या आधी ज्येष्ठच असतो, वैशाखाला बिलगून. पण तो वैशाखाच्या एवढा कह्यात असतो की, त्याचं स्वतंत्र अस्तित्वच जाणवत नाही. वास्तविक रोहिणीसारखी सुरुवातीची पावसाळी नक्षत्र ज्येष्ठातच लागतात. त्यामुळे गावोगावच्या कृषिकर्मांना सुरुवातही ज्येष्ठातच होते. पण जोवर आषाढधारांनी संपूर्ण सृष्टी धुऊन निघत नाही, तोवर सृष्टी आणि भारतीय जनमानसातही चैतन्य संचारत नाही, वैशाखाने आणलेली मरगळ दूर होत नाही. मात्र एकदा का आषाढधारा झडझडून बरसून गेल्या की मग सृष्टीचं, मनामनाचं रुप पालटतं. एक नवी उमेद, नवा उत्साह त्यांना व्यापून उरतो. जणू आषाढाचं सर्जनशीलत्व त्यांच्यात उतरतं. त्यांच्या कल्पनेला-प्रतिभेला नवे धुमारे, नवे पंख फुटतात...
... जसे आषाढाच्या पहिल्या दिवशी कालिदासाच्या प्रतिभेला फुटले होते. कालिदासाच्या मेघदूतातल्या यक्षाला का माहीत नव्हतं, हत्ती जसा मस्तीत डोंगरांना टकरा देतो, तसा आपल्यासमोर डोंगराच्या शिखराला येऊन भिडलेला हा मेघ निर्जीव आहे...! परंतु प्रियाविरहाने व्याकूळ झालेल्या यक्षाला त्या आषाढघनाने भारावून टाकलं. आषढघनांबरोबर आलेल्या आषाढधारांनी त्याला सजर्नत्व बहाल केलं आणि मग... यक्षाने त्या श्यामलसुंदर घननीळालाच बनवला आपल्या निरोप्या. आपला दूत. प्रियेला संदेश घेऊन जाणारा... पाण्याने संपृक्त झालेल्या त्या मेघाला यक्ष म्हणतो-
संतप्तानां त्वमसि शरणं तत्पयोद, प्रियायाः
संदेशं मे हर घनपतिक्रोधविश्लेषितस्य... म्हणजे पाण्याने ओतप्रोत भरलेल्या हे मेघा, मी तुला शरण आलेलो आहे. माझ्यासारख्या विरहाग्नीने पोळणा‍ऱ्यांना तुझाच आसरा आहे. मग नेशील का माझा निरोप? आणि मेघाच्या उत्तराची वाटही न पाहता यक्ष त्या मेघाला आपल्या प्रियेचं वास्तव्य असलेल्या अलकानगरीचा मार्ग सांगायला सुरुवातही करतो. हा मार्ग कसा कुठून-कसा जातो आणि मार्गात मेघाला कोणकोण भेटेल, याचं यक्षाने म्हणजेच कालिदासाने जे अप्रतिम वर्णन केलंय, त्याच्या अनुभूतीसाठी मेघदूत प्रत्यक्षच वाचायला हवं. कारण ते वाचताना केवळ मेघच तो सारा प्रवास करत नाही, त्याच्या सोबती-संगतीने वाचकही प्रवास करतो. मेघदूत वाचताना क्षणभर भारतीय मनालाच विसर पडतो की, मेघ निर्जीव आहे. पण यक्ष आणि पर्यायाने कालिदासाला सुचलेली ही कविकल्पनाच इतकी बहारदार आहे की, ही कविकल्पना भारतीय साहित्यातील चिरंतन-सुंदर कल्पना बनून गेलीय. म्हणूनच तर कालिदासाच्या या कल्पनाविलासाचा मोह कुणाकुणाला पडला नाही? सा‍ऱ्यांनाच पडला. कविकुळातील महोदयांना पडलाच. पण काहीशा रुक्ष क्षेत्रांत काम करणार्यांनाही पडला. मराठीतच मेघदूताचे कितीतरी अनुवाद उपलब्ध आहेत. कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, वसंत बापट, शांता शेळके यांसारख्या महारथींनी हे अनुवाद केलेले आहेतच, पण अर्थशास्त्रज्ञ असलेल्या सी. डी. देशमुखांनाही मेघदूताचा मोह सुटला नाही. त्यांनीही मेघदूताचा नितांतसुंदर अनुवाद केला आहे. पैकी बा.भ. बोरकर यांना तर संस्कृतही येत नव्हतं. पण मेघदूत त्यांच्या मनाला असं भिडलं की, ते त्यात गुरफटतच गेले. त्यांना मेघदूतातील काव्याचा रात्री चैतन्यमय भास व्हायचा आणि सकाळी ते तो कागदावर उतरवून काढायचे. इतके ते मेघदूताशी तादात्म्य पावले होते. कुसुमाग्रजांनी तर मेघदूताविषयी असे उद्गार काढलेत की-
‘एखाद्या निर्जन बेटावर जाताना एकच काव्य बरोबर नेण्याचे जर माझ्यावर बंधन घालण्यात आले तर मी ‘मेघदूत’ या काव्याचीच निवड करेन. कारण रसिकाच्या मनाला अथपासून इतिपर्यंत मंत्रमुग्ध करण्याचे, एक वेगळे भावविश्व त्याच्या सभोवार विणून त्याला उन्मनावस्थेत पोहोचविण्याचे सामर्थ्य मेघदूतात जितके आहे, तितके अन्यत्र आढळणे फार कठीण आहे...’
कालिदासाच्या मेघदूताने भारतीय जनमन असं व्यापून टाकलं आहे. ही किमया त्याच्या प्रतिभेची आहेच. पण त्याची प्रातिभशक्ती जागविणा‍‍‍ऱ्या आषाढाचीही आहे. मेघदूताचा लेखनकाल कुणालाच ठाऊक नाही. जिथे कालिदासाच्या काळाविषयी अजून एकमत झालेलं नाही, तिथे मेघदूत नेमकं कोणत्या काळात (मासात) लिहिलं गेलं, याविषयी सांगणं कठीणच. पण खचितच तो आषाढमास आणि आषाढाचा पहिला दिवस असेल. आषाढाच्या त्या पहिल्याच दिवशी आषाढघनांनी केलेल्या दाटीने कालिदास वेडावून गेला असेल. आषाढ बिलोरी ऐना होऊन कालिदासाच्या तना-मनात उतरला असेल आणि मग सा‍ऱ्या सृष्टीचं प्रतिबिंब त्यात पडून कालिदासाच्या लेखणीतून अलगद शब्द झरले असतील-
आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श... म्हणजे आषाढाच्या पहिल्या दिवशी त्या यक्षाला तो मेघ दिसला, जो एखाद्या हत्तीप्रमाणे पर्वताच्या शिखराला ढुशा देत होता...
आषाढ म्हटला की भारतीय मनाला कालिदासाचं मेघदूत हे असं हटकून आठवतं. त्या मेघदूताचं गारुड अजून कमी झालेलं नाही, होणारही नाही. कारण चेतनगुणोक्ती अलंकाराचं (अचेतनावर सचेतनाचा आरोप करण्याचं) एवढं सुंदर उदाहरण भारतीय साहित्यात दुसरं नाही. म्हणूनच आषाढ म्हटला की, मेघदूत आठवतं आणि मेघदूताचा उल्लेख निघाला की आषाढसरी बरसायला सुरुवात होते.
अन् तरीही आषाढ लागला की थोडंसं भानावरही यावं लागतं. कारण कालिदासाला आषाढाच्या पहिल्याच दिवशी पाऊस भेटला, तसा इथल्या शेतकरी राजाला भेटेलच असं नाही. अन् कधीकधी तर पहिल्याच दिवशी नाही, आषाढ सरत आला तरी भेटत नाही. शेतकरी राजाच नव्हे, तर शहरांतील लोकही आकाशाकडे पाहत बसतात. वरून जाणारे कोरडे ढग दिसले की चुकचुकतात. शेतक‍ऱ्याला शेतीच्या पाण्याची चिंता, तर शहरी माणसाला रोजच्या वापरासाठीच्या पाण्याची.
तरीही आषाढ लागूनही पावसाने ओढ दिली की, धास्तावतो तो भारतीय शेतकरीच... कारण त्याचा गावगाडाच पावसावर आणि त्यातून पिकणा‍ऱ्या शेतीवर अवलंबून असतो. आज शहरातला माणूस नेट-इंटरनेटसारख्या सोयीसुविधांत गुरफटून गेला असेल कदाचित... पण भूक लागली की त्याला अन्नच खावं लागतं. अन्नाविना जगण्याचं तंत्र अजून तरी विकसीत व्हायचंय. निदान तोपर्यत तरी भारतातल्या शेतक‍ऱ्याने आपल्या खळ्यात पिकवलेल्या धनधान्यावरच त्याला अवलंबून राहावं लागणार आहे. आणि भारतातली ऐंशी टक्के जनता अजूनही ग्रामीण भागातच आहे. साहजिकच पावसाची ओढ त्याला दुखावते, चिंताग्रस्त करते. जणू भूमिपुत्राच्या गळ्यालाच फास लागतो. म्हणूनच आषाढाला सुरुवात झाल्यापासूनच तो पाऊसदेवाला आळवायला सुरुवात करतो. जमीन सारवतो, जमिनीवर सुरेखशी रांगोळी रेखतो आणि एका भांड्यात पाणी घेऊन ते सारवलेल्या-सजवलेल्या भूमीवर ठेऊन त्या पाण्याची पूजा करतो. भांड्यातलं हे पाणी त्याच्यासाठी आकाशातलं सर्जनशील पाणीच असतं. ते पावसाच्या रुपाने धरतीवर महामूर बरसावं म्हणूनच त्याची ही पूजा चाललेली असते. कधीतरी वरुणदेव त्याची ही पूजा मान्य करतो आणि एखाद्या साळसूद मुलासारखा धरतीवर बरसतो. पण कधी कधी तो लहरी, हट्टी मुलासारखाही वागतो. अडून बसतो आणि बरसतच नाही. मग मात्र त्याची वेगवेगळ्या पद्धतीने आळवणी करण्याशिवाय शेतकरी राजाकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो.
     पावसाला थोडा जरी विलंब झाला की, शहरी भागांत मंदिरांतून यज्ञयाग करण्याचे प्रकार सर्रास होताना दिसतात. त्यासाठी यज्ञातील समिधांवर किलोकिलोने तूप ओतलं जातं. उच्चरवात मंत्रघोष केले जातात. यात पैशाची किती नासाडी होते, ते कुणीच सांगत नाही. म्हणूनच मग शहरांतून होणा‍ऱ्या या वैदिक विधी-विधानांपेक्षा गावाकडे होणारे पाऊसविधी बरे वाटतात. त्यात खर्च काहीच नसतो. फक्त निसर्गाला केलेलं आवाहन असतं. लोकपरंपरेने चालत आलेले पाऊसदेवाच्या आळवणीचे असे अनेक प्रकार आजही ग्रामीण भागत तग धरून आहेत. केवळ महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण भारतात पूर्वापार असे विधी चालत आलेले आहेत. या विधींमुळेच पाऊस पडतो, हा भ्रम आहे. पण मनुष्याने आदिम अवस्थेत असताना निसर्गाशी ऐक्य, साम्य शोधण्याच्या प्रयत्नांतून सुरू केलेले हे विधी आहेत. एकप्रकारे ते प्रतीकात्मक विधी आहेत. या विधीमागील विज्ञानाचा शोध घ्यायला कुणीही जात नाही. तिथे फक्त लोकभावनाच श्रेष्ठ ठरते. ही लोकभावना आदिम असते.


     रोहिणी गेल्या, मृग नक्षत्रही कारेडंच आलं नि गेलं की, महाराष्ट्रातल्या खेड्याखेड्यात धोंडी-भुंडी या अज्ञात लोकदेवतांच्या नावाने गा‍ऱ्हाणं गायला सुरुवात होते. गावागावातली मुलं एकत्र येतात आणि ‘धोंडी धोंडी पाणी दे’ म्हणत गावभर हुंदडतात. याला धोंडी काढणं असंही म्हणतात. मुलांची एक मिरवणूकच निघते. मिरवणुकीतील दोन मुलं निर्वस्त्र असतात. त्यांनी आपल्या अंगाभोवती फक्त कडुलिंबाच्या पाल्याच्या डहाळ्या गुंडाळलेल्या असतात. या दोघांच्या खांद्यावर एक आडवी काठी देऊन त्या काठीला मध्यभागी एक बेडूक उलटा लटकावलेला असतो. या उलट्या लटकावलेल्या बेडकाला गावभर फिरवलं जातं. मिरवणुकीची सुरुवात गावच्या मंदिरातून होते. त्यावेळी केवळ छोटी मुलंच नाही, जाणती माणसंही उपस्थित असतात. मंदिरातून निघाल्यावर
धोंडी धोंडी पाणी दे
धोंडीच्या दिवसात
पाणी भारी येऊ दे
पीक मोठं होऊ दे ... असं म्हणत ही बालसेना गावातील प्रत्येकाच्या घरी जाते आणि ही धोंडी दारात आल्यावर घरातघरातील महिला रिवाजानुसार प्रथम धोंडीच्या काठीवर आणि बेडकावर लोटाभर पाणी ओततात. नंतर हळद-कुंकू वाहून बेडकाची पूजा करतात. यावेळी प्रत्येक घरातून आपापल्या ऐपतीनुसार गहू, ज्वारी किंवा इतर धान्याचा शिधा मुलांना दिला जातो. असं गावातील प्रत्येक घर घेऊन झालं, की ही मिरवणूक पुन्हा देवळात येते. तिथे मिरवणूक काढलेल्या बेडकाला मुक्त केलं जातं. नंतर मिरवणुकीत मिळालेला शिधा एकत्र केला जातो आणि कुणाच्या तरी घरुन जाडसर दळून आणून तिखट-मीठाची फोडणी देऊन तो गावच्या मंदिरातच शिजवला जातो. या शिजवलेल्या प्रसादाला गावकरी कण्या म्हणतात. या कण्यांचाच नैवेद्य गावदेवाला दाखवून नंतर तो प्रसाद म्हणून सा‍ऱ्या गावाला वाटला जातो. हा प्रसाद खाताना आता मोठा पाऊस येईल असंच प्रत्येकाला मनोमनी वाटत असतं. कारण उलट्या टांगलेल्या बेडकाचं तरी डराव डराव वरुणदेवापर्यंत पोचलं असेल, असा लोकमानसाचा समज असतो.
     विदर्भात धोंडीच्या नावाने पावसासाठी गा‍ऱ्हाणं घालायची पद्धत आहे, तर कोकणात हेच गा‍ऱ्हाणं भुंडीच्या नावाने घातलं जातं-
भुंडे भुंडे पाऊस दे
भुंडी गेली डोंगरात
पाऊस पडला आगरात... भुंडे भुंडे पाऊस दे
भुंडी गेली आगरात
पाऊस पडला डोंगरात... भुंडे भुंडे पाऊस दे
भुंडी गेली शेतावर
पाऊस पडला माळावर...भुंडे भुंडे पाऊस दे
भुंडी गेली माळावर
पाऊस पडला शेतावर...भुंडे भुंडे पाऊस दे
अशा पद्धतीने भुंडीच्या नावाने हाका मारत मुलं संपूर्ण गावाचं रान-शिवार, घर-दार ङ्गिरतात आणि तिच्याकडे पाण्यासाठी गा‍‍ऱ्हाणं घालतात.
धोंडी आणि भुंडीच्या नावाने निघणा‍ऱ्या या मिरवणुका महाराष्ट्रात कदाचित आणखीही वेगवेगळ्या नावाने निघत असतील. कारण धोंडी काय किंवा भुंडी काय यांचं लोकरहाटीत तसं अस्तित्वच नसतं. त्यांच्या नावाचा दगड किंवा मूर्तीही नसते. लोकरहाटीतलाच एखादा रुढ पण वैचित्र्यपूर्ण स्त्रीवाचक शब्द घ्यायचा आणि तिलाच पाऊसदेवता कल्पून तिच्या नावाने पावसाचं गा‍ऱ्हाणं गायचं. असंच पूर्वापार चालत आलंय.
पाऊस पडावा म्हणून महाराष्ट्रभर केल्या जाणा‍ऱ्या या विधींत खूपच वैविध्यही आहे. कारण प्रत्येक समाजाने आपापल्या समजूतींप्रमाणे निवडलेले हे मार्ग आहेत. म्हणूनच पश्चिम महाराष्ट्रात गाढवाचं लग्न लावलं जातं, विदर्भात बेडकाची मिरवणूक काढली जाते, तर खानदेशात अनेक ठिकाणी पाऊसविधी म्हणून जिवंत माणसाची अंत्ययात्रा काढली जाते. तसंच अहमदनगर जिल्ह्यातल्या गावपरिसरात बेडकांची मिरवणूक किंवा गाढवाच्या लग्नाबरोबरच अंधा‍ऱ्या रात्री काही महिला पावसाचं गा‍ऱ्हाणं गात गावभर फिरतात. त्यांचं हे गा‍ऱ्हाणं म्हणजे पावसाची खरोखर केलेली तक्रारच असते. कारण त्या आपल्या गाण्यातून पावसावर राग काढत म्हणतात-
पाऊसराजानं कुणीकडे केलं काळं
वैतागली नार टाकून गेली तान्हं बाळ...
अशी तक्रार करतच लहानथोर सा‍ऱ्या महिला गावातलं घरन् घर घेतात. ही तक्रारीची गाणी म्हणायचीही त्यांची अशी खास पद्धत आहे. या महिलांचं म्होरकेपण करणारी महिला सगळ्यांच्या पुढे असते. तिच्या हातात घुंगरू बांधलेलं मुसळ असतं. हे मुसळ ती प्रत्येक घराच्या दारात वाजवते आणि त्याच्या ताला-सुरावरच पावसाची गा‍ऱ्हाण्याची गाणी गायली जातात. हे गा‍ऱ्हाणं गाताना मुसळच वापरलं जातं कारण मुसळासारखा पाऊस पडावा, अशी त्यांची इच्छा असते.
महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशातील ग्रामीण भागात सर्वत्रच असे पाऊसविधी केले जातात आणि त्यात विविधताही आढळते. मात्र या सा‍ऱ्या विधींमध्ये एक समान आदिम तत्त्व दिसतं- ते म्हणजे सारख्यातून सारखं (होमोजिनियस मॅजिक) निघतं, ही आदिम भावना. या भावनेतूनच आपल्या जी गोष्ट हवी आहे किंवा साध्य करायची आहे, त्यासारखाच एक विधी कल्पनेने करायचा. हे विधी म्हणजे सरळसरळ प्रतीकात्मक विधीच असतात.
आषाढ लागला की असं काय काय आठवायला लागतं. आधी मेघदूत काव्य आठवतं. आषाढसरी चांगल्या कोसळल्या तर मेघदूताची रंगत वाढत जाते. कारण तोवर निसर्गाने कात टाकलेली असते. संपूर्ण आषढच सृष्टीत उतरलेला असतो. हिरवं रान, हिरवं मन आणि सुरेख हिरवी हुरहुर... पण आषढसरी कोसळल्या नाहीत, तर मन भयभीत होतं. त्याला अरिष्टाची चाहुल लागते. एकवेळ आषाढ चांगला गेला तरी तो काहीसा निश्चिंत होतो. कारण पेरण्या झालेल्या असतात. पीकपाणी मार्गी लागलेलं असतं. पण जिथे रुजणंच आषाढाच्या भरवशावर असतं, तिथे आषाढसरी कोसळल्या नाही, तर सारं गणितच चुकून जातं. मग नांगरट, पेरण्या, लावण्या... असं परंपरेनं चालत आलेलं शेतीचं सगळंच वेळापत्रक बिघडून जातं.
... याही परिस्थितीत आषाढाची चाहूल लागली की सर्वप्रथम पंढरपूरच्या वाटेवर वारक‍ऱ्यांची पावलं उमटू लागतात. भक्तांचे जत्थेच्या जत्थे विठोबाच्या दर्शनासाठी धावू लागतात. जणू विठोबा त्यांना पहिल्यांदाच भेटणार असतो. पण विठोबा पहिल्यांदा भेटो किंवा वर्षानुवर्षं, त्याची गोडी, त्याची ओढ थोडीच कमी होते... ती कायमच असते.
आषढाचंही तसंच तर आहे. तो दरवर्षीच येतो, बिलोरी ऐन्याचं स्वप्न दाखवत पावसाचं आवतन घेऊन...
(पुनर्प्रकाशित)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा