शुक्रवार, १ जुलै, २०१६

श्रीआनंदनायक२००९ मध्ये रामचंद्र चिंतामण ढेरे ऊर्फ अण्णा ८० वर्षांचे झाले, तेव्हा त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी मला मिळाली होती. त्या मुलाखतीतला हा काही भाग आता अण्णा नाहीत, पण त्यांनी एकाच आयुष्यात करुन ठेवलेलं काम एवढं आहे की, त्याचा मागोवा घ्यायला आपल्याला कैक जन्मं लागतील   

जाणत्या वयात त्यांनी सुरू केलेलं उत्खननाचं काम आज ८० व्या वर्षात पदार्पण करतानाही अखंडित सुरू आहे. एक उत्खनन संपलं की लगे दुसरं दुसरं झाल की लगेच तिसरं... ही उत्खनन मालिका अव्याहत सुरूच आहे. न थकता न दमता. लवलेशही विश्रांती न घेता. उत्खननात जे जे अमूल्य हाती लागलं ते-ते सारं समाजासाठी उधळून द्यायचं. आपल्याकडे काही राखून झाकून ठेवणं त्यांना पसंतच नाही आणि तरीही त्यांची झोळी कायम भरलेली. अक्षय-अक्षुण्ण कारण उत्खननासाठी त्यांनी ज्या सर्जन-वेदना साहिलेल्या असतात त्या वेदना मातेच्या प्रसववेदनांतक्याच तनामनाच्या रंध्रांचा वेध घेणा‍ऱ्या असतात, साहजिकच बाळ जन्माला आल्यावर मातेला त्याचं मातृत्व कायमचं चिकटतं. तसंच उत्खननात जे जे गसतं ते उधळून दिल्यावरही त्याचं मातृत्व त्यांच्याकडेच उरतं. महत्त्वाचं म्हणजे या उत्खननात जे -जे गवसतं ते, त्यांचंच नाही उभ्या महाराष्ट्राचं जीवन उजळून टाकणारं असतं..
... ते संस्कृतीचं उत्खनन असतं. एका परंपरेचं उत्खनन असतं, पिढ्यान् पिढ्या प्रवास करत आलेल्या लोकमानसाचं उत्खननं असतं आणि या अखंड उत्खननाचा वसा घेणारे असतात ज्ञानमहर्षि रामचंद्र चिंतामण ढेरे र्फ रा. चिं. ढेरे... तपश्चर्येचं तेज आणि ओज काय असतं ते रा. चिं. ढेरे यांच्याकडे पाहिल्यावरच कळतं. रामतीर्थाच्या गुहारूपी मंदिरात ढेरे यांना अंतःस्फूर्तीने शिवप्रिया असलेल्या श्रीआनंदनायकीचं दर्शन घडलं. ढेरेंना भेटल्यावर-पाहिल्यावर आपल्यालाही श्रीआनंदनायक भेटल्याचा आनंद होतो. महाराष्ट्राच्या संस्कृतीचं सार आणि तत्त्व शोधण्यातच आनंद मानणारा श्रीआनंदनायक!
आयुष्यालाही व्यापून उरलेली ही लोकसंस्कृती रा. चिं. ढेरे यांना त्यांच्या बालपणी आजोळच्या गावी गवसली. मावळातलं एक खेडं असलेलं त्यांचं आजोळगाव निगडे, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या लोसकसंस्कृतीचं  लघुरूप होतं. पहाटे दारात येणा‍ऱ्या पिंगळ्यापासून उत्तररात्री रंगणा‍ऱ्या गोंधळ-जागरणापर्यंत आणि कीर्तनापासून तमाशापर्यंत त्यांनी सारं काही त्या छोट्या गावातच एकलं-पाहिलं. लहानपणी कलेल्या-पाहिलेल्या आणि मनाच्या सांदीकोप‍ऱ्यात साठवून ठेवलेल्या या लोकसंस्कृतीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न ते गेली साठ-सत्तर वर्षं करत आहेत.
लोकसंस्कृतीचं उत्खननं एवढं आवश्यक आहे?
निश्चितच. आदिमतेपासून आताच्या आधुनिकतेपर्यंत वाटचाल करणा‍ऱ्या  मानवी संस्कृतीचा वेध घ्यायचा असेल तर, आपल्याला  लोकसंस्कृतीलाच शरण जायला पाहिजे. कारण लोकसंस्कृतीच्या गाभ्यातच मानवी संस्कृतीच्या बदलाचे अंतःस्तर तपासता येतात. महाराष्ट्र किंवा पर्यायाने भारत तर मानवी संस्कृतीचं मूळ शोधण्यासाठीचं उत्तम केंद्र आहे, कारण केवळ भारतातच आदिम युगापासून  आत्ताच्या आधुनिक युगापर्यंत झालेल्या मानवी विकासाचे अवशेष पाहायला मिळतात. आजच्या नागर संस्कृतीत ते अवशेष पटकन नजरेस पडणार नाहीत. पण अनागर संस्कृतीकडे तुम्ही डोळसपणे पाहायला लागलात की विविध सामाजिक स्तर रूढी परंपरांच्या रूपाने जिवंत असल्याचं दिसतं. उदाहरण द्यायचं झाल तर दांडेकर पुलाच्या पलीकडे रामकृष्ण मठात मामा दांडेकर यांचा पौर्वात्य-पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास चालायचा, तेव्हा त्याच पुलाच्या अलीकडच्या वेश्यावस्तीत अगदी आदिम काळातील म्हणता येईल असा अहेवपुनव आणि रांडपुनवचा उत्सव साजरा व्हायचा. म्हणजे दोन संस्कृती आजूबाजूला नांदायच्या. पण त्याची महती आणि माहिती तथाकथित आधुनिकांना कधीच कळली नाही. आजही माझ्या लोकसंस्कृतीच्या संशोधनाकडे अनेकजण तुच्छतेने पाहतात. पण आयुष्याचा होम करून मी जे गेली अनेक दशकं संस्कृतीच्या मुळाचा शोध घेतोय, तोच घ्यायला आता परदेशी अभ्यासक  मोठ्या प्रमाणावर भारतात येत आहेत.ढेरे अतिशय शांतपणे, सात्त्विकतेने, पण ठामपणे  लोकसंस्कृतीच्या अभ्यासाचं महत्त्व उलगडून दाखवत असतात.
लोकसंस्कृतीची अशी मुळं तपासतच आजवर रा. चिं. ढेरे यांनी महाराष्ट्राच्या  बहुविध संस्कृतीचा, विधिविधानांचा आणि देवदेवतांचा अनन्यलक्ष्यी शोध घेतला आहे. विशेषतः भावभक्तिचा मळा असलेल्या पंढरपूरचा विठोबा, आत्मक्लेशातून भक्तांना भेटणारा जेजुरीचा खंडोबा, महाराष्ट्राच्या शौर्याची तेजशलाका असलेली तुळजापूरची श्रीतुळजाभवानी आणि भोसल्यांचं कुलदैवत असलेल्या शिखर-शिंगणापूरच्या महादेवाचा अनेकलक्ष्यी धांडोळा घेऊन त्यांनी मूळ लोकदेवता असलेल्या आणि आज संपूर्ण महाराष्ट्राच्या झालेल्या या देवतांच्या सांस्कृतिक उन्नयनाची प्रक्रिया प्रथमच समाजाच्या निदर्शनास आणली.
लोकदेवतांचं हे उन्नयन कोण,  का आणि कसं करतं? याचं उत्तर देताना रा. चिं. ढेरे म्हणतात, लोकदेवतांच्या सांस्कृतिक उन्नयनाची प्रक्रिया दीर्घ स्वरूपाची असते आणि हा उद्योग त्या त्या काळातला उच्च संस्कृतीचा अभिमान बाळगणारा वर्ग करत असतो. यामुळे छोट्या समूहातील लोकदेवतेचं उदात्तीकरण होऊन उच्चसंस्कृती असलेल्या देवतांमध्ये ती नांदायला लागते. या उदात्तीकरणासाठी  उच्च संस्कृतीचे पुरोहित स्थळमहात्म्य वगैरे रचून मूळ लोकदेवतेची प्रतिष्ठा  वाढवण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्रातील विठोबा, खंडोबा, तुळजाभवानी, रेणुका या देवतांचं असंच उन्नयझालेलं  आहे. विठोबा हा मूळचा दक्षिणेकडील गोपजनांचा देव हे. जेजुरीचा खंडोबादेखील दक्षिणेकडून लेला धनगर समाजाचा देव हे. तसंच तुळजाभवानी किंवा रेणुका या मूळ मातृदेवता हेत. आज त्यांचं जे स्वरूप पाहायला मिळतं, ते त्यांचं मूळ स्वरूप नाही. त्यांचं मूळ रूप पाहायचं तर त्या जिथून आल्या तिथेच आपल्याला सश्रद्ध भावनेनं जायला हवं. देवतांच्या उन्नयनाचा अथवा स्थितीगतीचा वेध हा एका अर्थानं त्या समाजाच्याही स्थितीगतीचा वेध असतो. साहजिकच या देवतांच्या विकसनप्रक्रियेची उकल ही समाजेतिहासाला अत्यंत साहाय्यभूत ठरते. मी देवतांच्या उन्नयन प्रक्रियेचा अभ्यास कायम याच भावनेतून केला. त्यात कुणाच्या श्रद्धा दुखावण्याचा बिलकूल हेतू नव्हता.
मात्र सांस्कृतिक उन्नयनाचा हेतू सर्व देवतांच्या बाबतीत नेहमीच सफल होतो, असं नाही. विठोबाच्या बाबतीत तो सफल झाला मात्र खंडोबाच्या बाबतीत तो अर्धसफल झाला. त्यामागचं कारण सांगताना  ढेरे म्हणतात, ही उन्नयन प्रक्रिया त्या-त्या ठिकाणी असलेल्या त्या-त्या विशिष्ट समाजाच्या बळावर निर्भर असते. एखाद्या लोकदेवतेचं कोणत्या देवतेच्या रूपात उन्नयन होणार, हे त्या त्या समाजाती ताकदच एकप्रकारे ठरवत असते. उदाहरणार्थ विठोबाचं वैष्णवीकरण झालं, कारण त्या परिसरात वैष्णवजनांचा प्रभाव अधिक होता. तसंच खंडोबाचं शैवीकरण झालं. मात्र खंडोबाचा गाजावाजा अधिक झाला नाही, कारण देवतेच्या प्रचार प्रसारात भक्तांचा मोठा वाटा असतो. वैष्णवीकरण झालेल्या विठोबाला नामदेव-ज्ञानदेव-तुकारामांसारखे भक्त भेटले, परिणामी विठोबाचं स्थान सांस्कृतिकदृष्ट्या अधिक उन्नत झालं. याउलट खंडोबाला तसे भक्त न भेटल्यामुळे आजही खंडोबाच्या उपासनेत त्याच्या मूळ उपासनेतले बगाड किंवा मांडीला आकडा टोचून  घेण्यासारखे आत्मक्लेशात्मक विधी कायम  राहिले. उन्नयनाची प्रक्रिया नेमकी कशी होते त्याचं आणखी एक उदाहरण म्हणजे नेवाशाचं मोहिनीराज मंदिर. वस्तुतः हे मंदिर खंडोबापत्नी म्हाळसेचं आहे. म्हाळसा ही शिवपत्नी. पण खंडोबावर रागावल्यामुळे ती आपल्या माहेरी म्हणजे नेवाश्याला आली, पण तिथे असलेल्या वैष्णवांच्या प्राबल्यामुळे म्हाळसेचं मूळ अस्तित्व पुसलं गेलं. त्यांनी तिला मोहिनी करून विष्णूचं एक रूप करून टाकलं. त्यामुळे आज या मूर्तीकडे मोहिनीरूपातील विष्णू म्हणून पाहिल जातं.
लोकसंस्कृती किंवा लोकदेवतांच्या या विकसनाचा अभ्यास रा. चिं. ढेरे एखाद्या साधकाच्या वृत्तीने करतात. तिथे शास्त्रज्ञाची सत्यान्वेषी मर्मदृष्टी असते. पण ते आपल्या अभ्यासाची उकल केवळ या दृष्टीने  करत नाहीत. उलट तर्काधिष्ठि  वास्तवापेक्षा भावसत्ये धिक महत्त्वाची असल्याचं ते मानतात. कारण संस्कृतीची-प्रकृतीची अनेक गुह्य केवळ  या भावसत्यांनीच उलगडतात, असं त्यांना वाटत. आणि त्यांनी याच  पध्दतीने आत्तापर्यंत लोकसंस्कृतीची व लोकदेवतांच्या उन्नयनीकरणाची गुह्य उकलली आहेत.
हे भावसत्य म्हणजे नेमकं काय?

शोधात आणि संशोधनात नेहमीच शास्त्रीयदृष्ट्या योग्य असलेल्या तर्काला महत्त्व दिलं जातं. पण हा निर्णय सगळ्याच गोष्टींना लागू होत नाही. सगळीकडेच शास्त्रीय तर्क उपयोगी पडत नाही. काही वेळा भावविश्वाचाही आधार घ्यावा लागतो. विशेषतः आपला संशोधनविषय जेव्हा मानवी श्रद्धेशी निगडित असतो, तेव्हा भावसत्याचा आधार घ्यावा लागतो. कारण श्रद्धाविषयाच्या गाभ्यात आस्थेने प्रवेश केल्यावरच त्या विषयाचं आकलन होऊ शकतं. माणूस केवळ बुद्धिजीवी प्राणी नाही. बुद्धी आणि  विवेकाने त्याचं आयुष्य बंदिस्त असलं, तरी मूलतः ते भावनांवरच आधारलेलं असतं. साहजिकच त्यामुळे लोकसंस्कृती किंवा देवतांच्या विकसनाचा विचार करताना केव तर्काधिष्ठित बुद्धी वापरुन चालत नाही. भावनेचीही मदत घ्यावी लागते. कारण श्रद्धेच्या मुळाशी बुद्धीपेक्षा भावनाच अधिक असते आणि हा जगातल्या सर्व धमेतिहासतज्ज्ञांचा अनुभव आहे. रा. चिं. ढेरे संशोधनात तर्काधिष्ठित सत्याबरोबरच भावनेचं बळ कसं महत्त्वाचं असतं, ते समजावत असतात.
परंतु त्यांनी स्वतः केवळ भावनेचं हे बळ कधीच पुरेसं मानलं नाही. जिथे जिथे शास्त्रकाट्याची कसोटी वश्यक होती, तिथे तिथे त्यांनी ती स्वीकारली. किंबहुना लहानपणी आपल्या आजोळगावी जे जे संवेदनशीलतेनं त्यांनी टिपलं, तेच ते आजतागायत शास्त्रीय मांडणी करुन पुन्हा सांगत आहेत. म्हणून तर  दैवतशास्त्राच्या आधारे महाराष्ट्रातील देवतांची पुनर्मांडणी करण्याचं श्रेय त्यांना जातं. दैवतशास्त्र ही इतिहासाला पूरक अशी उपयुक्त शाखा असल्याचं महाराष्ट्रात त्यांनीच प्रथम आपल्या संशोधनातून सिद्ध केलं. अर्थात दैवतांच्या पुनर्मांडणीचं त्यांनी आरंभलेलं हे ज्ञानसत्र नेहमीच सगळ्यांना रुचलं असं झालं नाही. उलट अनेकांनी त्यांच्यावर मर्मभेदी टीकाही केली. विशेषतः त्यांनी लज्जागौरीच्या निमित्ताने सर्जनसोहळ्याचा आणि मातृतत्त्वाचा गौरव केला, तेव्हा सनातन्यांच्या प्रचंड रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं. लज्जागौरीत त्यांनी आदिम काळापासून मूर्तिरूपात चालत आलेल्या सर्जनावस्थेचा शोध घेतला होता. पण विषयाची महती न कळलेल्यांनी त्यांच्यावर ढेरे यांनी अक्षरांचा नाइटक्लब चालवला आहे, अशी टीका केली होती. अर्थात या किंवा अशा प्रकारच्या कोणत्याच टीकेला ढेरे कधी भ्याले नाहीत. त्यांना आपल्या अक्षरांचा श्रम ठाऊक होता. ढेरे म्हणतात - वेदपूर्व काळापासून भारतात सर्जनावस्थेतील स्त्री-प्रतिमेची पूजा सुरू आहे. आजही आदिम अवस्थेतील अनेक परंपरांमध्ये तिला भजलं-पुजलं जातं. मी या मातृतत्त्ववाची नीट मांडणी करुन तिला शोभनावस्था आणली. जगाच्या निर्मितीचं केंद्र असलेल्या सर्जनस्थळांचा गौरव करण्याचाच माझा प्रयत्न होता. पण आपल्याकडचे सनातनी सर्जनस्थळाला का लाजतात  ठाऊक नाही?’
विषयातून विषय निघत जातो. ढेरे न थकता, लोकसंस्कृतीत रुजलेल्या परंपरांचा वेध घेत राहतात. त्यांच्या समवेत लोकसंस्कृतीच्या वाक-वळणांवरुन चालणं म्हणजे आपल्यासाठी आनंदनिधानच असतं. मात्र कुठल्या तरी टप्प्यावर त्यांचा हात सोडून आपण निघून जातो. पण त्यांचं संस्कृतीचं उत्खनन सुरूच असतं. कारण तोच त्यांचा ध्यास आणि श्वासही आहे!
(मूळ प्रहार दैनिकात प्रकाशित झालेली मुलाखत)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा