बुधवार, १८ मे, २०१६

पिंगळ्याचा शकुन ऐका वं माय


तांबडं फुटायला अंमळ अवकाश असतो. कोंबड्याच्या आरवण्याचाही मागमूस नसतो. रातकिड्यांची किर्रर्र किरकिर अजून सुरूच असते. अन् एवढ्यातच पिंगळ्यांच्या पालाला जाग येते. गावाकुसाबाहेर पडलेल्या पालातलं एवढुसं खोपटं. कंबरभर उंचीचं. त्यात कोण कुठे झोपलाय त्याचा ठावठिकाणा नसतो. पण चंद्र डावीकडे कलला की पिंगळ्यांच्या वस्तीवरल्या पुरुषाला आपोआप जाग येते. वर्षानुवर्षाची सवय. रात्रीच्या काळोखातच तो आपली धोपटी काढतो. धोपटीतला जामानिमा तपासतो. पिंजरीची डबी, भस्माची वडी, क पाळाच्या फेट्यावर बांधायचा चांद सगळं बाहेर काढतो. मग आधी कसून धोतर नेसतो. त्यावर बंडी घालतो. बंडीवर काळं जाकीट. डोक्याला ८ मीटर लांबीचा फेटा करकचून बांधतो. फेटा बांधून झाला की, त्याच्यावर देवदेवतांचे चांदीचे-पितळेचे मुखवटे, नाणी असलेली साखळी किंवा पट्टी (यालाच चांद म्हणतात) बांधतो. मग भस्माच्या वडीने कपाळावर आडवे फराटे ओढतो. भस्माने कपाळ पांढरशुभ्र झालं की त्यावर कुंकवाचं उभं बोट लावतो. मग खांद्याला भिक्षेची धोपटी लटकवतो. रात्रीच्या अंधारात दिसावं म्हणून एका हातात कंदील घेतो. तर दुसर्या हातात आपण आल्याची वर्दी लोकांना मिळावी म्हणून छोटा डमरू म्हणजे कुडमुडं घेतो आणि निघतो गावमागणीला...

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातल्या वेळापूरच्या चव्हाणवस्तीतील अर्जुन श्यामराव जाधव, सर्जेराव श्यामराव जाधव आणि सोनबा सोपान जाधव या पिंगळ्यांबरोबर पहाटे चार वाजता निघालो, तेव्हा बाहेर मिट्ट काळोख होता. पिंगळ्यांच्या हातात कंदील असले, तरी वाटेतल्या दगड-धोंड्यांनी मला ठेचकाळायला होत होतं. अर्जुन, सर्जेराव, सोनबा मात्र पायाखालचीच वाट असल्यासारखे निश्चिंत, पण तरातरा चालले होते. दिवस उगवण्याआधी दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वेळापूरमध्ये दान मागून त्यांना पुन्हा वस्तीवर यायचं होतं. त्यामुळे धडपडत चाललेल्या माझी खरंतर त्यांना अडचणच झाली होती. पण वेळापूर परिसरात  भटक्या-विमुक्तांसाठी गेली पंचवीसहून अधिक वर्षं काम करणाऱ्या सूर्यकांत भिसे यांनी, त्यांना सांगून ठेवलं होतं- ‘हा माझा पाव्हणा आहे, नीट सांभाळून आणा.’ म्हणून त्यांचा नाईलाज झाला होता. अन्यथा बाहेरच्या माणसाला भटक्यांच्या वस्तीवर राहायला मिळणं, म्हणजे दुर्मीळ गोष्ट. पण ओळखीने का होईना, मला ती साध्य झाली होती आणि गैरसोईने का होईना पण, त्या तिघांनी ती मान्य केली होती.
साधारणपणे पाऊणेक तासाच्या तंगडतोडीनंतर वेळापूरची वेस जवळ आली. गावातल्या अर्ध नारीनटेश्वराच्या मंदिराचा कळस मिट्ट काळोखातही त्यांच्या नजरेला पडला. तसे तिघे तीन वाटांनी निघाले. मला कुणाबरोबर जावं, ते कळेना. तरीही मी अर्जुन पिंगळ्याची पाठ पकडली आणि त्यांच्या मागोमाग जाऊ लागलो. गावात शिरताच तिघांनी एव्हाना कुडमुडं वाजवायला सुरुवात केली होती. त्या कुडमुड्याच्या आवाजाने गावाला जणू अवेळीच जाग आली. कुठेकुठे घरात दिवे-लाइटी पेटू लागल्या. ज्यांना जाग आली त्या माय-माऊल्या पिंगळा दारात येण्याआधीच दाराच्या उंबरठ्यात पसाभर डाळ-तांदूळ घेऊन उभ्या राहिल्या. सोबत एक-दोन रुपयाचं एखादं नाणं. आता क्वचित पाच रुपयाचं. हे दान मिळताच अर्जुनराव जागेवरच उडी घ्यायचे आणि दान मिळाल्याची पावती द्यायचे. तोंडानं देवादिकांची नावं घेत आणि तोंडानं शकुन ऐक ग माय म्हणत तासाभरात सगळं गाव घेऊन झालं. शंभर-दीडशे उंबर्याच्या गावात सगळ्यांनीच काही दान दिलं नाही. जेमतेम दहा-पंधरा घरांतून कोरडा शिधा मिळाला. एकाही घरातून शकुन सांगण्याचं निमंत्रण मिळालं नाही, म्हणून अर्जुनराव थोडे हिरमुसले. कारण कुणी शकुन विचारलं, तर थोडी वरकमाई अधिक होते. पण आजच्या विज्ञानाच्या काळात भविष्यावर नि शकुनावर कुणाचा विश्वास उरलेला नाही, याची त्यांनाही आता अनुभवाने माहिती झाली आहे. त्यामुळे तांबडं फुटण्याची चिन्ह दिसताच, त्यांनी गुमान परतीची वाट धरली. इतर दोन दिशांनी गेलेले सर्जेराव आणि सोनबाही गावाच्या वेशीवर येऊन थांबणार होते. ‘पुन्हा वस्तीवर येताय का?’ अर्जुनरावांनी विचारलं. खरंतर मला पुन्हा जायचंच होतं वस्तीवर (त्यांच्या प्रथा-परंपरा जाणून घेण्यासाठी, समाजाची आजची स्थिती माहीत करुन घेण्यासाठी), पण लगेच नाही. थोडावेळ गावातच रेंगाळायचं होतं, परंपरेचा मागोवा घेत आणि गावगाड्यात असलेलं पिंगळ्यासारख्या मागत्यांचं स्थान हुडकत. मी लगेच अर्जुनरावांना म्हटलं - तुम्ही व्हा पुढं, दिवस उगवला की मी येतोच चहा प्यायला.’
अर्जुनराव, सर्जेराव आणि सोनबा चव्हाणवस्तीच्या दिशेने जायला लागले आणि माझी पावलं गावातील अर्धनारीनटेश्वराच्या मंदिराच्या दिशेने वळली. अजून तसं फटफटायचं होतं. तरीही बाहेरगावी जाणार्यांची वर्दळ सुरू झाली होती. मंदिराजवळ उभ्या असलेल्या माझ्याकडे अनोळखी, संशयी नजर टाकून जो-तो फटफटीवर बसून भुर्रकन निघून जात होता. दुसरीकडे साखरकारखान्यात घालण्यासाठी ऊस नेणाऱ्या ट्रॅक्टर्सचीही धडधड सुरू होती. या सगळ्या काळ बदलल्याच्या खुणा होत्या. गावगाडा बदलला होता. या बदललेल्या गावगाड्यात आता पहाटेच्या पारी दारी येणाऱ्या पिंगळ्याला काही स्थान नव्हतं. गावगाड्याची थोडीफार धुगधुगी अजून शाबुत आहे, तोपर्यंत पिंगळ्याला कुणीकुणी दान घालत राहील. पण पिंगळ्यांची नवी पिढीही आता दान मागायला तयार नाही. आम्ही का कुणापुढे लाचारीने हात पसरावेत, असा त्यांचा सवाल असतो. त्यामुळे तेही पारंपरिक शकुन-भविष्य सांगण्याचा धंदा सोडून आता वेगवेगळ्या उद्योग-व्यवसायाच्या शोधात आहेत. अर्जुन-सोनबा-सर्जेरावांसारखी महाराष्ट्रात आता काही थोडीफारच जुनी खोडं आहेत, जी कधीमधी परंपरेची चाल म्हणून ‘मागतं’ मागायला जातात.



पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत ग्रामीण समाजव्यवस्था ही बलुते-अलुते आणि फिरस्ते अशा गावगाड्यावर आधारलेली होती. बलुतेदारीत वस्तुच्या मोबदल्यात वस्तू असा व्यवहार होता. उदाहरणार्थ कुंभाराने मडकी घडवून द्यावीत, सुताराने शेतीची लाकडी अवजारं बनवून द्यावीत, चर्मकारानं चामडी वस्तू बनवून द्याव्यात आणि त्याबदल्यात, शेतकर्याने त्यांना धान्य द्यावं. पण यापलीकडे अनेक अलुते आणि फिरस्ते असे होते, ज्यांचा शेतकर्याला प्रत्यक्ष उपयोग काही नव्हता. पण परंपरेने ते मागणारे म्हणजे ‘मागते’ होते आणि ते देव-धर्माच्या नावाने दान-भिक्षा मागायचे. आता-आतापर्यंतचा नीतीव्यवहार हा देवधर्मावर आधारित असल्यामुळे, आपल्या गाठीशी पुण्य जमा करण्यासाठी शेतकर्याला अशा मागत्यांची गरज लागायची. आपण या मागत्यांना दानधर्म केला, तर आपल्याला पुण्य लागेल, या भावनेतून शेतकरीवर्ग दान देत राहिला आणि त्यातूनच मागत्यांची परंपरा निर्माण झाली. ती जपली-जोपासलीही गेली. या मागत्यांच्याच नानाविध भेदांपैकी एक म्हणजे पिंगळा ऊर्फ कुडमुडे जोशी उर्फ पांगुळ. खरंतर भटक्या-विमुक्तामंध्ये ‘जोशी’ नावाचा एक समाज आहे. वासुदेव-गोंधळी-नंदीबैलवाला आणि पांगुळ ऊर्फ कुडमुडे हे सारे वेगवेगळे व्यवसाय करणारे भटके कलावंतसमाज याच जोशी समाजाच्या अंतर्गत येतात. हे सगळे देवादिकांची गाणी म्हणून भिक्षा किंवा दान मागतात आणि त्यावरच आपला उदरनिर्वाह करतात. मात्र भिक्षा हेच उपजीविकेचं मुख्य साधन असल्यामुळे हे भटके समाज आजवर कधीच कुठेच स्थिर झाले नाहीत. ते महाराष्ट्राच्या गावोगावी भटकंती करत राहिले आणि आपल्या दात्यासाठी, त्याच्या भल्यासाठी देवाकडे प्रार्थना करत राहिले. त्याचाच परिणाम म्हणून की काय दाते श्रीमंत झाले आणि भटका समाज मात्र कायम गरीबच राहिला. परंतु या मागत्या-भटक्या समाजांचा विशेष म्हणजे त्यांनी कधीच निव्वळ भिक्षा स्वीकारली नाही. भिक्षेच्या-दानाच्या बदल्यात त्यांनी, दान देणाऱ्या दात्याची करमणूक केली किंवा मानसिकदृष्ट्या त्याला स्थिर, शांतचित्त करण्याचं काम केलं. अशा या मागत्यांमध्ये वासुदेव, नंदीबैलवाले, गोंधळी प्रसिद्ध आहेत. कारण ते दिवसाउजेडी येतात. पण पहाटेच्या काळोखात येऊन घरोघरच्या चिंताग्रस्तांना आश्वस्त करणारा पिंगळा मात्र तसा अजूनही उपेक्षितच. कारण तो येऊन कधी जातो, हेच कधी कुणाला कळत नाही. अगदी पहाटे उठणारी घरातली ज्येष्ठ मंडळी सोडली, तर त्याचा कुणालाच थांग लागत नाही. पण सर्वसामान्यांना त्याचा थांग लागला नाही, तरी सर्व भटक्या कलावंतांमध्ये पिंगळा ऊर्फ कुडमुडे जोशी पहिल्या स्थानावर आहे. कारण परंपरेत एकप्रकारे तो मानसोपचारतज्ज्ञाची भूमिका बजावत असतो. त्याच्याइतकी सूक्ष्मनिरीक्षण शक्ती क्वचितच कुणाकडे असेल. त्यामुळेच आज एकूणच मागत्यांचं प्रमाण कमी झालेलं असलं, तरी गावगाड्यात कधीतरी-कुठेतरी पहाटेच्या पारी कानावर पिंगळ्याचं गाणं पडतं -            
               
पांगुळ आला वं माय
दान दे वं माय
शकुन जाणून घे वं माय
तुझं भलं व्हईल वं माय...

सोबत त्याच्या कुडमुड्याची, म्हणजे डमरुचीही लुडबुड ऐकू येते आणि एखाद्या घरातली सासुरवाशीण पसाभर तांदुळ किंवा डाळ घेऊन घराच्या उंबरठ्यात येते. कधी कधी दान देताना, शिधा देताना एखाद्या सासुरवाशीणीचा चेहरा चिंताक्रांत दिसतो. की मग पिंगळ्याचा होरा लगेच सुरू होतो -

त्रासलेली दिसतेस ग माय
काल रातच्याला भांडण झालं ग माय
मनाला लावून घेऊ नकोस ग माय
सुखाचा संसार करशील ग माय...

त्याने अंदाजाची चंची अशी सोडली की, आधीच सैरभैर झालेला महिलावर्ग लगेच विरघळतो आणि घळाघळा त्याला संसारकथा सांगायला सुरुवात करतो. मग तोही तोडपाण्याचे उपाय सांगतो आणि वर हक्काचे थोडे पैसे मिळवतो.


पिंगळा जात्याच हुशार. एखाद्या घरातली मायबाय शिधा आणायला गेली की, लगेच तो घरादारावर नजर टाकतो. घरादारातले सूक्ष्म बदल नजरेने टिपतो आणि घरातली महिला किंवा पुरुष काहीबाही द्यायला आला की सुरू करतो -

‘पिंगळ्याला दान कराया घेऊ नका हरकत
सोनपावलांनी तुमच्या घराला आलीया बरकत’

किंवा

‘नाव काय पाटीलबुवांचे, पुढील भविष्य सांगेन साचे
एका बायकोची संगत घडली, तेणे तुझी महिमा बुडाली...’

असे अंदाजपंचे काही ठोकताळे मांडले की त्यातलं काही ना काही लागू होतं. मग आपोआपच त्या घरातली महिला किंवा पुरुष पिंगळ्याच्या जाळ्यात अडकतो आणि पिंगळा आपला कार्यभाग साधतो. ही एकप्रकारे चलाखीच असते. कारण ‘त’ वरुन ताकभात ओळखण्याची कला पिंगळ्यांना अनुभवाने सिद्ध झालेली असते. पण अडचणीत असणारा माणूस पिंगळ्यावर भरवसा ठेवतो आणि त्याचं भविष्य खरो ठरो अथवा खोटं, त्या व्यक्तीच्या मनाला उभारी मिळते, हे मात्र मान्य करावंच लागतं.
ग्रामीण लोकपरंपरेत ‘मागता’ असलेल्या या समाजाच्या अस्तित्त्वाचे पुरावे थेट दहा-बाराव्या शतकापासून सापडतात. महानुभावांच्या लीळाचरित्रात, ज्ञानदेव-एकनाथांच्या ओव्या-अभंगांत या समाजाचे उल्लेख आहेत. त्याअर्थी हा समाज प्राचिनच आहे. तसंच तेव्हापासूनच हा समाज भटकाही आहे. महत्त्वाचं म्हणजे हा समाज पिंगळा, पांगुळ, कुडमुड्या अशा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. त्यांच्या हातातल्या छोट्या डमरूचा ‘कुडमुड’ असा आवाज येतो, म्हणून ते कुडमुडे जोशी. ते भल्या पहाटे ज्या प्रहरी बाहेर पडतात, तो काळ पिंगळा (म्हणजेच घुबड) पक्षाच्या किजबिजण्याचा असतो. ते किजबिजणं म्हणजे बोलणं या समाजाला समजतं आणि त्यावरून ते शुभ-अशुभ शकुन सांगतात, म्हणून ते पिंगळा जोशी. यांनाच पांगुळ असंही म्हणतात. कारण ते ज्या प्रहरी दान मागायला बाहेर पडतात, तो काळ सूर्योदयापूर्वीचा असला, तरी त्या काळात सूर्याचा सारथी असलेल्या अरूणाचं आगमन झालेलं असतं. हा अरुण पायाने अधू असल्यामुळे त्याला पांगुळ असं लोकभाषेत म्हटलं जातं. साहजिकच त्यावरुन एवढ्या पहाटे बाहेर पडणार्या या समाजालाही ‘पांगुळ’ म्हणजे पांगळा हे नामाभिधान चिकटलं. एकप्रकारे पांगुळ हा अरुणाचा प्रतिनिधीच मानला जातो. लीळाचरित्र आणि नामदेव-ज्ञानदेव-एकनाथ-तुकारामांच्या काव्यात याच पांगुळाचे दाखले सापडतात. 

मृत्युलोका माझारी गा एक सद्गुरू साचार,
त्याचेनी दर्शने तुटला हा संसार
पांगुळा हस्तपाद देतो कृपाळु उदार,
यालागी नाव त्याचे वेदा न कळे पार...

असं पांगुळावर रूपक ज्ञानेश्वरांनी केलं आहे. तर एकनाथांनी ‘मी माझ्या कल्पनेने जाहलोसे पांगूळ, हिंडलो दिशा दाही श्रम जाहला केवळ’ असं भारुड लिहिलं आहे. एकूण लोकपरंपरेत महत्त्वाचा मानला गेलेला लोकप्रतिनिधी पिंगळा किंवा पांगुळ याचं पहाटेपूर्वीच्या अंधःकारमय कालखंडाशी अतूट नातं आहे आणि जणूकाही नव्या दिवसाचं शुभवर्तमान सांगण्यासाठी तो गावात येतो.

. . .

अर्जुनराव, सोनबा, सर्जेराव भल्या पहाटे गावात येऊन असंच शुभवर्तमान सांगून आपल्या वस्तीवर परत गेले होते. मागे थांबून त्यांच्या परंपरेचा माग घेईपर्यंत सूर्व्यादेव उगवला होता. मग मी सूर्यकांत भिसे यांना सोबत घेऊन पुन्हा त्यांच्या वस्तीवर जायला निघालो. त्यांच्या वस्तीवर पोचलो, तोपर्यंत सार्यांना जाग आली होती, बाया-बाप्ये आपापल्या कामाला लागले होते. रात्री उशिरा त्यांच्या वस्तीवर पोचलो, तेव्हा सारं छानछान वाटत होतं. एखाद्या फार्महाऊसवर आल्यासारखंच वाटलं होतं. पण आता दिवसाउजेडी वस्ती पाहताना आमच्या परंपरेने मागत्यांच्या या समाजाला पाडलेली ठिगळं जागोजागी दिसू लागली. परंपरेने यांना कधी एका जागी स्थिर केलंच नाही. पोटा-पाण्याच्या उद्योगासाठी हा समाज महाराष्ट्रभर गाव-दरगाव भटकत राहिला. त्याच्या हक्काचा ना गावात तुकडा होता, ना रानात. नावाला कुठलं तरी एखादं मूळ गाव. पावसाचे चार महिने बुड टेकण्यासाठी. बाकीचे आठ महिने घोडा किंवा गाढवाच्या पाठीवर किडुकमिडुक संसार लादून फिरत राहायचं. गावाच्या वेशीबाहेरची उघड्यावरची पडीक जमीन, किंवा अगदी स्मशान, हीच त्यांची उतरायची हक्काची जागा. ती तरी हक्काची कुठली? अर्जुनराव आणि सूर्यकांत भिसे सांगतात-‘पोलिस पाटलाने उतरायची परवानगी दिली, तरच आजही गावाच्या बाहेर पिंगळ्यांना तळ ठोकता येतो. आपल्याजवळ असलेल्या प्रत्येक वस्तूची नोंद त्यांना आधी पोलीस पाटलाकडे करावी लागते. कारण गावात चोरी-मारी झाली, तर गाववाले सगळ्यात आधी बाहेरुन आलेल्या फिरस्तांवरच संशय घेतात.’
यामुळेच आजवर कधी या समाजाने संसारात फार काही जोडलेलं-सांभाळलेलं नाही. गावात शकुन सांगून जे कमवायचं, ते त्या गावातच खाऊन पुढे निघायचं. म्हणजे कुणाचे आरोपही नकोत आणि कुणाचे शिव्याशापही नकोत. पण त्यामुळेच आजवर हा समाज सामाजिक-शैक्षणिकदृष्टया मागासलेलाच राहिला. एका जागी स्थिर नसल्यामुळे मुलांना शिक्षण नाही आणि शिक्षण नाही म्हणून प्रगती नाही. प्राचीन काळापासून चालत आलेलं त्यांच्यामागचं हे दुष्टचक्र आता भारतीय स्वातंत्र्याला साठ वर्षं होऊन गेल्यावरही संपलेलं नाही. किंबहुना आधीची परिस्थिती बरी होती, असं सोनबा-सर्जेराव सांगतात. कारण तेव्हा देवा-धर्माच्या नावानं समाजात किमान काही मान होता. पिंगळा दारात किंवा गावात आलाय म्हटल्यावर, गावकरी आदराने स्वतःहून काही आणून झोळीत टाकत होते. पण नव्या विज्ञानयुगात, परंपरेने चालत आलेल्या समाजव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडालेला आहे. ते साईबाबा-सिद्धिविनायक अशा मंदिरातील दानपेट्यांत लाखो रुपये टाकतील. पण दारावर आलेल्या मागत्याला पाच रुपयेही देणार नाहीत. मग तो स्वतःची काही कला दाखवत असला, तरीही... 

. . .

... एव्हाना अर्जुनरावांनी चहाचा कप पुढ्यात आणून ठेवला होता. मोकळ्या माळरानावरच्या त्यांच्या खोपट्यातल्या चहाला वेगळीच चव होती. दूध दारातच बांधलेल्या म्हशीचं होतं. तर मुंबईवरून आलेला पाव्हणा म्हणून चहात सढळ हाताने साखर घातलेली होती. सकाळचं दान मागून झालेलं असल्यामुळे स्वारी मोकळी होती. दुपारच्या जेवणाला थांबणार का असं विचारुन, वर बोकड कापायचा का? असंही विचारत होती. पै-पाहुण्याच्या आणि सण-वाराच्या निमित्ताने उत्सव करायचा ही या समाजाची वृत्ती. ते साहजिकच होतं. कारण एरव्ही त्यांच्या आयुष्यात आनंदाचे-सुखाचे क्षण कमीच असतात. मग ते आनंद साजरा करण्याची संधीच शोधतात. ती संधी त्यांना कुणा पाव्हण्याचं आगमन, देवीची यात्रा-जत्रा, कुणाचा जन्म, कुणाचं लग्न अशावेळी मिळते आणि अशावेळी मटणाचं जेवण ठरलेलं.
मांसाहार या समाजाला अतिशय प्रिय. त्यामुळे मूल जन्माला आला की त्याच्या पाचवीला या समाजात बोकड कापला जातो. मात्र मुलगा झाला, तर बोकड आणि मुलगी झाली तर बकरी कापण्याची पद्धत आहे. यांच्या लग्न समारंभात भात, वांग्याची भाजी आणि गव्हल्याची लापशी ठेवावीच लागते. पण लग्नातलं एक जेवण बोकडाचं दिल्याशिवाय वधू-वरांच्या घरच्यांची सूटका नसते. या समाजात लग्नानंतर देवीचा गोंधळ किंवा खंडोबाचं जागरण करण्याची पद्धत आहे, तेव्हाही तिखटाचंच जेवण लागतं. मराठ्यांप्रमाणंच खंडोबा-जोतिबा-तुळजापूरची भवानी, ही या समाजाची कुलदैवतं. त्यांची आडनावंही तशीच जाधव, भोसले, मोरे, निकम, शिंदे, सूर्यवंशी. पण या समाजात कुलदेवतांप्रमाणेच जिथे राहतो, पाल ठोकतो, तिथल्या मरीआई-लक्ष्मीआईला मानाचं स्थान असतं. आषाढी एकादशीनंतर या समाजाची या ग्रामदेवतांची जत्रा भरते. त्या जत्रेला सगळा समाज एकवटतो. त्या जत्रेत दावणाचे म्हणजे नवसाचे बोकड कापले जातात.
या गावदेवतांच्या जत्रेला या समाजात मानाचं स्थान आहे. कारण या निमित्ताने सगळा विखुरलेला समाज एकत्र येतो आणि यात्रेच्या दुसऱ्या दिवशी त्यांची जातपंचायत भरते. समाजातले न्यायनिवाडे, भांडणतंटे या जातपंचायतीतच मिटवले जातात. लग्न ठरणं आणि मोडण्यासारखे प्रकारही या जत्रेतल्या पंचायतीत होतात. महाराष्ट्रभर विखुरलेल्या पिंगळ्यांच्या अशा भरणाऱ्या जत्रा आणि त्यातल्या जातपंचायतीतून अनेक सामाजिक-आर्थिक उलाढाली होत असतात. गेल्या काही वर्षातील एकूणच सामाजिक प्रबोधनामुळे समाजातील जातपंचायती आता पूर्वीसारख्या ताठर भूमिका घेत नाहीत. मानवतेला काळिमा फासणाऱ्या शिक्षाही आता सुनावल्या जात नाहीत. तरीही या समाजाला अद्याप जातपंचायत मात्र हवीशी वाटते. कारण समाजातले काही प्रश्न फक्त समाजाची जातपंचायतच सोडवू शकते, असं या समाजाचं म्हणणं आहे. तसंच एकाच जागी वस्ती नसल्यामुळे न्यायासाठी पोलिसांच्या पाठी कुठे धावायचं, असंही त्यांचं म्हणणं असतं. पिंगळा किंवा त्यांच्यासारख्या मागत्यांच्या या जातपंचायतींचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्या माध्यमातून चालवण्यात येणारी भिशी. जातपंचायतीच्या दिवशी फुटणाऱ्या या भिशीत अक्षरशः लाखोंचे व्यवहार होतात. ही एकप्रकारे या समाजाची पूर्वापार चालत आलेली बचतगट योजना आहे. समाजातील पाटलाच्या हाती या भिशीचे व्यवहार असतात. ज्याला गरज असते, तो उचल घेतो. त्या रकमेवर एक ते दोन टक्के व्याज आकारलं जातं. महत्त्वाचं म्हणजे वर्षानुवर्षं होणाऱ्या या भिशीच्या व्यवहारात आजवर कधीही घोटाळा झालेला नाही किंवा कधी कुणी पैसे बुडवलेले नाहीत. ज्याने उचल घेतलेली असते, तो एकवेळ जिवाचं रान करील, पण ठरल्यावेळी पैशांची परतफेड करणार म्हणजे करणारच. कारण जातपंचायतीत नावाला लागलेला बट्टा, हा या समाजात कलंक मानला जातो. आजही या समाजाला आपल्या जातपंचायतीची भीती वाटते आणि तिच्यात आपली अब्रू जाऊ नये म्हणून हा समाज स्वतःला जपत असतो. आता एकूणच सुधारणेच्या काळातील सामाजिक रेट्यामुळे फिरस्त्या समाजातील जातपंचायती बरखास्त होत आहेत. पण या समाजांचं म्हणणं आहे - ‘आम्हाला आधी एका जागी स्थिर तर करा. तुमच्या समाजव्यवस्थेत आम्हाला सामावून तरी घ्या आणि मग आम्हाला तुमचे कायदेकानून लागू करा.’    

...चहा पीत गप्पा मारता-मारता अर्जुनराव, सोनबा, सूर्यकांत भिसे सामाजिक-सांस्कृतिक माहिती पुरवत होते. या गप्पा चालू असताना मध्येच वस्तीवरचे कोण कोण अर्जुनरावांना काहीबाही विचारायला येत होते. मात्र त्यावेळी त्यांच्यात होणारी चर्चा मला बिलकूल कळत नव्हती. माझ्याशी बोलताना अर्जुनराव किंवा सोनबा नेहमीच्या, मला समजेल अशा मराठीतच बोलत होते. परंतु समाजातलं कुणी आलं की ते त्यांच्या सांकेतिक बोलीत बोलत होते. पिंगळ्यांची किंवा एकूणच भटक्या-फिरस्त्या समाजाची आपापली सांकेतिक भाषा असते. पिंगळा समाज त्यांच्या या सांकेतिक भाषेला ‘पारोशी’ भाषा म्हणतो. ती फक्त त्यांच्या समाजातल्या लोकांनाच कळते. उदाहरणार्थ माणसं आली पळा, असं म्हणायचं असतं, तेव्हा ते म्हणतात- मानवं आली खपला. किंवा वेळ आली याऐवजी ते ‘बानी आली’ असं म्हणतात. अशावेळी ते आपल्यासमोर आपलीच निंदा करत असतील, तर तेही आपल्याला कळायचं नाही. म्हणूनच तुम्ही माझ्याबद्दल तर काहीबाही बोलत नाही ना, असं विचारल्यावर अर्जुनराव खळखळून हसले आणि म्हणाले- पाव्हण्यांबद्दल आम्ही कधी वाकडा शब्द काढत नाही. समोरच्याला एकदा आपलं म्हटलं की तो आपला. 
ते खरंही होतं. आदल्या दिवशी रात्रीपासून त्यांच्या वस्तीवर ठोकलेल्या मुक्कामातल्या अनुभवातून ते सिद्धच होत होतं. खरंतर परक्या समाजातल्या, किंबहुना अनोळखी शहरी माणसाला फिरस्ते समाज कधीच आपल्या पालावर थारा देत नाहीत आणि त्यांच्याशी फार बोलतही नाहीत. कारण ही पोलिसांची माणसं तर नाहीत, अशीच त्यांना सतत धास्ती असते. आणि आजवर सुशिक्षित समाजानेही त्यांना कधी आपलं मानलं नाही. त्यांच्याकडे कायम संशयानेच पाहिलं. त्यामुळे नागर वस्तीतला कुणी त्यांच्याकडे गेला, की ते सुद्धा त्याच्याकडे संशयानेच पाहतात. पण अर्जुनरावांच्या चव्हाण वस्तीवर मला आलेला अनुभव चांगला होता. आपला माणूस मानून त्यांनी संपूर्ण वस्ती फिरवली. वस्तीतल्या माणसांची गाठभेट घालून दिली.
वेळापूरहून दोन-तीन किलोमीटरवर असलेली ही चव्हाणवस्ती, म्हणजे काही आखीवरेखीव कॉलनी किंवा गावही नाही. किंवा सगळ्यांची अगदी पक्की घरंही नाहीत. पण त्यांना बूड टेकायला हक्काची जागा मात्र आहे. सूर्यकांत भिसे यांनी आपल्या ‘भटके-विमुक्त विकासमंच’ या संस्थेच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांमुळेच गृहमंत्री असताना अकलूजच्या विजयसिंह मोहिते पाटलांनी वेळापूर गावाच्या बाहेर असलेला माळरानाचा एक तुकडा फिरस्त्या जोशी समाजाला दिला. त्यात वासुदेव, नंदीबैलवाले असे सगळेच जोशीसमाज एकत्र आहेत. या सगळ्या पन्नास-शंभर उंबर्याच्या वस्तीत पंधरा-वीस घरं पिंगळ्यांची आहेत. या पिंगळ्यांना याच अकलूज-माळशिरस परिसरातील गावं पंरपरेने मागत्यांची वतनं म्हणून मिळालेली. हक्काचं असं कुठलं गावं नव्हतंच. मग संधी मिळताच इतर जोशीसमाजांबरोबर पिंगळेही वेळापूरजवळच्या चव्हाणवस्तीत मुक्कामी आले. आता गेली पंधराएक वर्षं त्यांची मुक्काम एकाच जागी आहे. महत्त्वाचं म्हणजे सूर्यकांत भिसे आणि मोहिते-पाटलांमुळे त्यांच्या नावावर आता रेशनकार्ड आहे. त्यातल्या अनेकांची नावं मतदारयादीतही गेलीत. आजवर बूड एका जागी स्थिर नसल्यामुळे त्यांना मत नव्हतं आणि त्यामुळेच त्यांना पतही नव्हती. मात्र एकाच जागी स्थिर झाल्यावर त्यांच्याकडे मत आणि पत दोन्ही गोष्टी चालून आल्यात.
सगळ्यात दखल घेण्याजोगी बाब म्हणजे एका जागी स्थिर झाल्यामुळे सूर्यकांत भिसे यांच्या प्रयत्नांमुळेच त्यांच्या वस्तीवर शाळा सुरू झाली आणि नवी पिढी शिकू लागली. यातून चव्हाणवस्तीवरच्या पिंगळ्यांच्या कुटुंबातील अनेकजण आता वेगवेगळ्या उद्योग व्यवसायात कामाला लागले आहेत. काहीजण सैन्यातही गेलेत. तर जे वस्तीवरच राहिले, त्यांनी घोडे नाचवण्याचं कसब शिकून घेतलं आणि आता ते वरातीत-मिरवणुकीत घोडे नाचवण्याचा व्यवसाय करतात. त्यासाठी थेट मध्यप्रदेशापासून बेळगाव-बेंगळुरूपर्यंतची काही हजारांची सुपारी घेतात. सूर्यकांत भिसे सांगतात- ‘घोड्याच्या पाठीवर बिऱ्हाड टाकून हिंडत असल्यामुळे पूर्वापारपासून यांच्याकडे घोडा हाताळायची हातोटी होतीच. पण गेल्या काही वर्षांपासून अकलूजला घोड्यांची जत्रा भरायला लागल्यावर, त्यांच्या या हातोटीचा उपयोग झाला. त्यातून या जत्रेतून त्यांना उधारीवर घोडे विकत मिळू लागले. या घोड्यांना नाचायला शिकवूनच आता या समाजातील तरुण त्याचा व्यवसाय करत आहेत.’
सूर्यकांत भिसे ही माहिती सांगत असतानाच अर्जुनरावांच्या मुलाने त्यांच्या दारातला घोडा आणला आणि त्याला नाचवायला सुरुवात केली. त्या घोड्याची दुडकी चाल पाहताना खरोखर मजा वाटत होती. फक्त त्याची दुडकी चाल पाहतानाच नाही, तर वर्षानुवर्ष भटकंती करणाऱ्या समाजाने एका जागी स्थिर झाल्यावर, स्वतःचा जो उत्कर्ष साधला, तो पाहतानाही आनंद वाटत होता. मग भले त्यांची घरं अजून खूप छान नसतील, अजूनही काहीसं ठिगळं लावलेलं आयुष्यच  त्यांच्या वाट्याला आलेलं असेल, पण त्यांच्या खर्या अर्थाने जगण्याला सुरुवात तर झालेली आहे. त्याचाच आनंद वाटत होता.
अन् तरीही एकीकडे आनंद वाटत असताना, दुसरीकडे दुःखाचेही कढ येतच होते. कारण चव्हाणवस्तीवरच्या पिंगळ्यांसारखं भाग्य महाराष्ट्रातील प्रत्येक पिंगळ्यांच्या वाटेला अजून आलेलं नाही. त्यांचं पाल-दर पाल भटकणं अजून सुरूच आहे. मात्र गेल्या दहा-पंधरा वर्षात या भटक्या कलावंत समाजांच्या विकासासाठी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक संघटना उभ्या राहिल्या आहेत. पुण्यात ‘महाराष्ट्र जोशी समाज संघटना’ आहे. मराठवाड्यात लातूरला ‘भारतीय भटक्या-विमुक्त जमाती विकास संघटना’ आहे. या संघटनांचे नेते अनुक्रमे दिलीप परदेशी आणि प्रा. सुधीर अनवले भटक्या समाजांसाठी काम करत आहेत. त्यांना एकत्र आणत आहेत. सोलापूरच्या बाळासाहेब रेणके यांच्या ‘लोकधारा’ संघटनेनेही गेल्या काही वर्षांत भटक्यासांठी मोठं काम उभं केलं आहे. त्याचा परिणाम गेल्या काही वर्षांपासून दिसू लागला आहे. ‘महाराष्ट्र जोशी समाज संघटने’चे अध्यक्ष दिलीप परदेशी सांगतात- महाराष्ट्रात फिरस्त्या जोशी समाजाची लोकसंख्या ३ ते ४ कोटी असेल. त्यातून पिंगळासमाजाची लोकसंख्या ५ ते ७ लाख असेल. आजवर हा समाज कधीच एकत्र न आल्यामुळे त्याची ताकद राजकीय पक्षांना अजून कळलेली नाही. म्हणून अाम्ही आधी या समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण दर तीन दिवसांनी बदलावं लागणारं गाव, परिणामी शिक्षण नाही, शासकीय सवलती नाहीत. अशी या समाजाची कुचंबणा सुरू होती. पण माझ्या प्रयत्नांमुळे अनेकांना जातीचे दाखले मिळालेत. उर्वरित समाजालाही ते मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुख्य म्हणजे आम्ही आर्थिक विकासाबरोबरच समाजाच्या सामाजिक विकासावरही भर देतोय. कारण सामाजिक विकास झाला नाही, तर समाज इतर समाजांच्या तुलनेत मागासलेलाच राहील. म्हणूनच गेल्या काही वर्षांत समाजात शिक्षणाचा प्रसार करतानाच, समाजातील काही जुन्या चालीरिती मागे टाकण्याचाही आम्ही प्रयत्न करतोय. उदाहरणार्थ या समाजात आतापर्यंत विधवाविवाहाची किंवा परित्यक्तेला पुनर्विवाहाची परवानगी नव्हती. त्यामुळे समाजातील अनेक महिलांना जगणं म्हणजे ओझं वाटू लागलं होतं. परंतु आता अशा महिलांसाठी म्होतुर लावण्याचा, म्हणजे पुनर्विवाहाचा पर्याय संघटनेने केलेल्या प्रबोधनामुळे समाजाने स्वीकारलेला आहे.’ 
विविध संघटनांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांमुळे महाराष्ट्रभर विखुरलेला जोशी समाज आणि त्याच्या अंतर्गत पिंगळाही आता एक होऊ लागला आहे. नव्या सामाजिक-आर्थिक-राजकीय बदलाला सामोरं जाण्याची आस त्याच्यातही निर्माण झालेली आहे. त्यासाठी फक्त आपल्या पोटजातीत वस्ती करण्याऐवजी, तो संपूर्ण जोशी समाजात स्वतःला सामावून घेत आहे. अशा जोशी समाजाच्या आता वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये  मोठ्या कॉलन्याही आता उभ्या राहत आहेत. विशेषतः नगर, बीड आणि जळगाव जिल्ह्यांत तर भटक्या जोशीसमाजाच्या मोठमोठ्या कॉलनीज आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जळगावमधील जोशी कॉलनीच्या जीवावर तिथला आमदार निवडून येतो. म्हणजे या समाजाला आता आपली समाजातली पत आणि ताकद कळलेली आहे.
आजवर नसलेली ही पत-प्रतिष्ठा हा समाज एकत्र आल्यावर आणि त्याने एकाच जागी वस्तान ठोकल्यावरच त्याला प्राप्त झालेली आहे. वेळापूरजवळच्या चव्हाणवस्तीवरील अर्जुनरावांच्या घरासमोर बसल्याबसल्या महाराष्ट्रातल्या एकूणच जोशी समाजाची आणि त्यातही पिंगळा ऊर्फ कुडमुडे जोशी ऊर्फ पांगुळ समाजाची नाडीच जणू माझ्या हाती लागली होती. खरंतर एवढी वर्षं इतरांना भविष्य आणि शकुन सांगणार्या या समाजाला स्वतःचंच भविष्य उमगलं नव्हतं.
... पण आता पालापालांवर तांबडं फुटलंय. आपलं भविष्य आपल्याच हातात असल्याचं या भटक्यांनाही उमगलंय...
…..
('अनुभव' मासिकासाठी केलेल्या 'भटक्यांच्या पालावर' या पाच भागांच्या मालिकेतील पिंगळा समाजावरचा लेख)






शनिवार, २१ नोव्हेंबर, २०१५

वाडीचे कूळ नि वस्तीचे मूळ

रोहन पोरे यांनी काढलेले रेखाचित्र
 मुकुंद कुळे
 .......
अवघा सहा महिन्यांचा होतो. आई मला घेऊन मुंबईला आली. खरंतर तिला यायचंच नव्हतं. मरेस्तोवर खपून बांधलेल्या गावच्या घरात तिचा जीव अडकला होता. ती लग्न होऊन इळणे गावातल्या कुळ्यांच्या घरी आली, तेव्हा एक साधं गवतारू घर होतं. या गवतारू घरातच तिला तीन मुलं झाली. सर्व भावंडांत धाकटा आणि चौथा असलेल्या माझा जन्म मात्र नव्या पक्क्या घरात झालेला. हे घर बांधताना बाबांची कमाई ब‍ऱ्यापैकी खर्ची पडलेली आणि आईचे श्रमही. त्यामुळेच गावचं घर सोडून मुंबईला जाणं तिला मान्यच नव्हतं. पण परिस्थितीच तशी ओढवली होती. घर बांधून पूर्ण झालं आणि एकएकी तिला दमा सुरू झाला. तोही असा तसा नव्हे, दम्याची उबळ आली की जगतेय की मरतेय, असा प्रसंग ओढवायचा. गावाकडे खूप उपचार झाले पण गुण येईना. शेवटी गावाकडे काढलेल्या उण्यापु‍ऱ्या चाळिसेक वर्षांचं संचित आईने गाठोडीला बांधलं आणि मला घेऊन ती मुंबईला आली. मुंबईत गिरगावातल्या मोहन बिल्डिंगमध्ये आमची एक छोटी खोली होती, सहा बाय सहाची. जिन्यालगत असलेली. या खोलीत तिने तिचा संसार मांडला खरा... पण आपलं गाव आणि गावच्या घराचा तिला कधीच विसर पडला नाही.
... किंबहुना इथे राहतानाही मनात ती तिचं गावचंच आयुष्य जगत राहिली, जपत राहिली आणि माझ्यातही रुजवत राहिली. मी वाढत होतो मुंबईत, पण माझ्या रक्तात रुजत मात्र होतं माझं गाव. केवळ घर आणि घरातली माणसं नाहीत. नीट समजू उमजू लागण्याधीच अख्खा गावपरिसर माझ्या माहितीचा झाला होता. गावची नदी, नदीतला गि‍ऱ्ह्याचा डोह, म्हैसधाड, सतीचा वड, गांगे‍ऱ्याची गोठण... असं बरंच काही. प्रत्येक ठिकाणाची काहीतरी गूढरम्य कथा ती सांगायची. गिर्ह्याचा डोह आणि म्हैसधाडातील काळंभोर पाणी माझ्या स्वप्नातही यायचं. त्या पाण्यात खोलवर बुडत असताना, श्वास छातीत दाटून यायचा. ओरडायचं असतानाही तोंडातून किंकाळीही फुटायची नाही. जीव घाबराघुबरा होऊन जाग यायची, तेव्हा मात्र मी आईच्या कुशीत झोपलेलो असायचो. मग जीव थंड होऊन मी अधिकच तिच्या कुशीत शिरायचो. कधीकधी गांगे‍ऱ्याची गुरांची गोठणही स्वप्नात यायची. तेव्हा मात्र छान वाटायचं. एका अद्भुतरम्य दुनियेतच शिरल्यासारखं वाटायचं. ही गुरांची गोठण म्हणजे गुरांना चरण्यासाठी राखलेली खास जागा. निबीड रान असलेल्या या गोठणीवर गावातली सगळी गुरं चरायला जायची. त्या गोठणीवर एक मोठी धोंड होती. गावात लग्न असलं की या धोंडीसमोर उभं राहून मागणं मागायचं की जेवणासाठी लागणारी तपेली-पातेली अशी सगळी भांडी त्या धोंडीवर हजर व्हायची. अख्ख्या गावाचं जेवण या तपेल्या-पातेल्यांत व्हायचं. काम झालं की भांडी पुन्हा त्या धोंडीवर नेऊन ठेवायची. असं कित्येक वर्षं सुरू होतं. एक दिवस मात्र एकाने नेलेली भांडी परत दिलीच नाहीत. मग ती नेलेली भांडीही गायब झाली आणि धोंडीचा चमत्कारही. स्वप्नात मी कितीदा तरी गोठणीवरच्या धोंडीकडे भांडी मागायचो आणि ती द्यायची पण! मात्र जेव्हा मी त्या भांड्यांना हात लावायला जायचो, तेव्हा नेमकी जाग यायची.
गावरहाटीतल्या अशा किती गोष्टी-गाणी तिने मला लहानपणी सांगितली असतील, याला गणती नाही. मला कळो न कळो, ती बोलत राहायची. त्यातलं सगळंच तेव्हा मला कळत नसे. पण तिची सांगण्याची हातोटी विलक्षण होती. एखादं गुपित सांगितल्यासारखी सगळं एवढ्या विश्वासाने सांगायची की ऐकता ऐकता मी हुंकार कधी भरायला लागायचो, तेच कळायचं नाही. त्या सगळ्या सांगण्याला एक सुरेख लय असायची-
उंदुर्ल्याची उंदुर्ली, ती पडली खिरीत
वड-पान झडो, तळापाणी आटो
गायचं शिंग मोडो, कु‍ऱ्हाडीचा दांडा
नि गावचा पाटील भुंडा...
गोष्ट किंवा गाणं कुठलंही असलं, तरी त्यातले संदर्भ गावाकडचेच असायचे. तिने सांगितलेलं हे सारं मी  नकळत्या अजाण वयात ऐकलं. समजण्याचं ते वयच नव्हतं. पण तिने तेव्हा सांगितलेलं मी काहीच विसरलो नाही. आता वाटतं तिचं रक्त तर माझ्यात होतंच, पण तिने त्या रक्तातून ग्रामसंस्कृतीच्या वेदना-संवेदनाही माझ्यात संक्रमित केल्या होत्या की काय....!
अन्यथा गावाला फार न राहताही माझं गावचं घर, त्यातली माणसं आणि गावपरिसर माझ्यात कसा रुजला असता? उन्हाळी सुट्टीतलं फक्त महिनाभराचं वास्तव्य, तेही सातवीपर्यंतच...त्यानंतर कधीही गावाकडे फार काळ वास्तव्य केलेलं नाही. तरीही गावचं घर, गावची माती अजून कशी भुरळ घालत आलीय? गावच्या घरातली, पुढील दारच्या अंगणातली आणि मंगीलदारच्या आवाडातली लहानपणी अनुभवलेली प्रत्येक गोष्ट अजून कशी स्मरणात आहे? लहानपणी अनुभवलेलं सगळं अजूनही लख्ख आठवतं... कालपरवा घडल्यासारखं. चित्रांची पानं उलटावीत तसं...
पहिलं स्मृतिचित्र अर्थातच घराचं आणि भोवतीच्या आवाराचं. हे घर बाबांनी बांधलेलं असलं, तरी ते फक्त आमचं नव्हतं. वडील धरुन चार भाऊ. त्यामुळे चार जणांसाठी चार खण, असं ते घर होतं. एकाच छताखाली चार चुली पेटायच्या. पण प्रत्येक घर आतून एकमेकांना दरवाजांनी जोडलेलं होतं. त्यामुळे कुणालाही कुठूनही इकडेतिकडे जाता यायचं. सर्वत्र संचार करता यायचा. पण सगळ्यात महत्त्वाचा होता, तो या घराभोवतीचा आवार. पुढच्या बाजूने अंगण-पडवी-ओटी होतीच. पण घराच्या मागच्या बाजूला मोठं अंगण आणि आवाड (आवार) होतं.
मंगीलदारच्या या आवाडात जणू काही माझं विश्व सामावलेलं होतं आणि आहे. गावाला गेलो की माझी पहिली धाव घरामागच्या आवाडात असायची. तेव्हा आमचं हे आवाड म्हणजे देवराईच होती. आंबा, रामफळ, पेरू, शेकट, रिंगी अशा झाडांची एवढी दाटी असायची होती की, उन्हं जमिनीवर उतरायचीच नाहीत. दिवसभर या आवाडात थंड आणि गूढ वातावरण असायचं. तिथे एकटाच खेळणं ही माझ्या आनंदाची परिसीमा असायची. आल्याआल्या प्रत्येक झाडाभोवती मी फेर धरायचो आणि कानात सांगितल्यासारखं सांगायचो- मी आलोय. आता महिनाभर दे धम्माल करायची. केळीपासून आंब्यापर्यंत सगळ्या झाडांचे मुके घेत सुटायचो. वारंच भरायचं जणू माझ्या अंगात! हे वारं बहुधा आईनेच माझ्यात भरलेलं होतं.
एरवीही आमच्या गावचाच नाही, घराचा परिसर म्हणजेही दंतकथांचं आगरच होतं. त्या गोष्टींचा खरेखोटेपणा माहीत नाही. पण आईच्या सांगण्यात मात्र प्रचंड आश्वासकता असायची. गावी गेलो की या कथांची पुनःपुन्हा पारायणं व्हायची. मग सुट्टीतल्या गावच्या मुक्कामात त्या कथांतच जणू दिवस सरायचे. आईने सांगितलेल्या कथा खऱ्या मानून मी घर अन् परिसर पिंजून काढायचो. त्यातलं एक हमखास पात्र म्हणजे घराच्या मंगीलदारी आवाडात असलेलं पपनसाचं झाड. त्या झाडाभोवती बांधलेल्या पारात एक गोलाकार दगड होता. तो दगड म्हणजे म्हणे एका अद्भुत शक्तीचा रहिवास होता. आई लग्न होऊन या घरी आली असताना एकदा तिला एक बाई पुढच्या दारुनशिरुन मागच्या दारुन बाहेर पडताना दिसली. आई तिच्या मागावर गेली, तर ती पपनसाच्या झाडाजवळ अंतर्धान पावली. सकाळी उठून बघितलं, तर पपनसाच्या पायथ्याशी दगड होता. गवतारू घर जाऊन नंतर त्याच्या जागी पक्क कौलारु घर बांधलं गेलं. परंतु, पपनस आणि तो दगड कायम राहिला. कारण अद्भुत शक्तीचा अधिवास. आज मात्र ते पपनसाचं झाड नाही, परंतु त्याच्या पायथ्याशी असलेल्या दगडाला अद्याप कुणीही हात लावलेला नाही.
आमचं जुनं गवतारू असताना, आजोबांनी त्यांच्यासाठी एक छोटी खोपटी मागच्याच आवाडात बांधलेली म्हणे. एकदा कुठल्याशा मुद्द्यावरुन गाव आणि त्यांच्यात तंटा निर्माण झाला. एके दिवशी सगळा गाव त्यांच्यावर चाल करुन आला. आजोबा एकटेच खोपटीत बसलेले. गावातली दहा-पंधरा भरभक्कम माणसं काठ्या घेऊन आजोबांना मारायला आत शिरणार, तर अचानक त्यांच्याभोवती भुंग्यांची भुणभुण सुरू झाली. असंख्य भुग्यांनी त्या खोपटीला वेढा घातला. भुंग्यांचा हा फेरा एवढा तीव्र होता की, एकालाही खोपटीत पाऊ टाकता येईना. आल्या पावली सगळे माघारी फिरले. हा पपनसाजवळच्या त्या दैवी शक्तीचाच चमत्कार होता, असं आई सांगायची.
आजोबांशी आणि घराशी संबंधित आणखी एक गोष्ट आई कायम सांगायची. एकदा आजोबांना स्वप्न पडलं होतं म्हणे! स्वप्नात त्यांना कुणीतरी म्हणालं- ‘म्हादेवा (आजोबांचं नाव) उद्या तू आगरात जाणार आहेस, तिथून येताना काही लाकूडफाटा घरी घेऊन आलास, तर त्यातून जे काही निघेल, ते टोपलीखाली झाकून ठेव. तुला तेवढंच सोनं मिळेल.’ आजोबा ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पहाटे झाडांना पाणी लावायला आगरात गेले. तिथून दुपारी परत येताना त्यांनी काही सुकलेली फाटी खांद्यावरुन आणली. त्यात एक मोठासा लाकडी ओंडकाही होता. आजोबा आले आणि त्यांनी नेहमीप्रमाणे सगळी फाटी अंगणात टाकली. ते निवांत मागे वळणार इतक्यात त्या सुक्या ओंडक्यातून चक्क नाग बाहेर पडला. नाग बघून तिथेच असलेली आजी किंचाळायला लागली. त्यासरशी आजोबा पुन्हा फाट्यांकडे वळले. तिथे त्यांना नाग दिसला आणि हातातल्या काठीच्या एका दणक्याने त्यांनी नागाला भुईसपाट केलं. त्याक्षणी जिवाच्या भीतीने त्यांनी नागाला मारलं. पण नंतर जिवाचा थरकाप कमी झाल्यावर, त्यांना रात्रीचं स्वप्न आठवलं. आता हळहळण्यात काही अर्थ नव्हता. पण नंतरही त्यांना कधी या गोष्टीचं वाट वाटलं नाही म्हणे!
आजोबांची ही गोष्ट ऐकल्यावर माझ्या मात्र मनात अनेकदा यायचं, की जर आजोबांनी नागाला झाकून ठेवलं असतं, तर खरंच सोनं मिळालं असतं का?
जशी ही आजोबांची गोष्ट. तशीच आईच्या खानदानातलीही एक गोष्ट होती. तिच्या घराण्यात म्हणे कुणाला तरी एकदा जमिन नांगरताना सोन्याच्या दागिन्यांनी भरलेला हंडा सापडला होता. पण ते दागिने स्वतःकडे न ठेवता, त्यांनी सगळ्यांना वाटून टाकले होते. त्याच दागिन्यांतला एक ताविजासारखा दागिना माझ्या आईच्या गळ्यात मंगळसूत्राच्या बाजूला ओवलेला होता. आईच्या गळ्यातील तो तावीज मी कधीच विसरू शकणार नाही. कारण आधीच माझ्या जन्माच्या आधी आईची एक बोरमाळ गणपतीत नाचायला गेलेली असताना कुठेतरी हरवली होती. त्यात परंपरेने आलेला तावीजही एकदा गेला.
एरवी मी तिच्याकडून गोष्टी ऐकायचो. एकेक गोष्टी अफाट आणि अचाट. त्याच्या खरेपणावर मोठेपणी मी कायमच संशयाची मुद्रा उमटवलेली. पण ताविजाची गोष्ट माझ्यासमोरच घडलेली. मीबारा-तेरा वर्षांचा होतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत नेहमीप्रमाणे गावी गेलो होतो. एके संध्याकाळी आई नदीवर पाणी भरायला निघाली. तिच्या मागे लागून मीही तिच्याबरोबर गेलो. तिने हंडा-कळशी घेतली होती आणि गंमत म्हणून माझ्याकडे तिला लग्नात आंदण मिळालेला छोटा तांब्या दिला होता. आम्ही दोघंही गप्पा मारत नदीवर पोचलो. ती नेहमीप्रमाणे नदीच्या आसपासचं काही सांगत होती. कुठे कुणाचं स्थान आहे, कुठे कुणाचा निवास आहे, असंच काही तरी. आम्ही नदीवर पोचलो तेव्हा सूर्य मावळतीकडे झुकला होता. सगळीकडे छान संधिप्रकाश पसरलेला होता. आईने हंडा-कळशी घासून वाहत्या पाण्यात धुतली. नंतर पाण्यात थोडं पुढे जाऊन तिने नितळ पाण्यात हंडा बुडवलाआणि त्याच क्षणी तंगुसात ओवळेला तिचा मंगळसुत्राचा सर तुटला. सगले काळे मणी टपटपत पाण्यात पडले. त्याचबरोबर मंगळसुत्राची वाटी आणि तिच्या जोडीला असलेला तावीजही पाण्यात पडला. आईने मंगळसुत्राची वाटी पकडली. पण तावीज हातातून घरंगळला आणि पाण्यात पडतोय न पडतोय, तोच सळसळत आलेल्या एका माशाने तो गिळलादेखील! आमच्या दोघांच्या देखत तो मासा तिथून सळसळत गेला. आम्ही काहीही करू शखलो नाही. दोघेही अवाक् झाल्यासारखं ते पाहत राहिलो. पण त्यातही सर्वप्रथम मी भानावर आलो आणि भांबावलेल्या आलेला पाहून मला शकुंतलेची आठवण झाली. नुकतीच मी दुष्यंत-शकुंतलेची गोष्ट वाचली होती. त्यात दुष्यंताने दिलेली मुद्रिका शकुंतलेच्या बोटातून निखळून पडते आणि एक मासा ती गिळतो, असा उल्लेख होता. आता माझ्यासमोर घडलेलं ते दृश्य त्यापेक्षा वेगळं नव्हतं. क्षणभर मनात आलं- कुणाला सापडेल हा मासा आणि गवसेल तो तावीज. तो सापडल्यावर कुणालाही कशाचं स्मरण होईल का? एरव्ही आईने सांगितलेल्या गोष्टींनी मी स्तिमित होऊन जात असे. मात्र त्यावेळी मीच एक अद्भुत घटनेचा साक्षीदार झालो होतो. आईने सांगितलेल्या गोष्टींच्या खजिन्यात भर टाकणारी अशीच ही गोष्ट होती.
सुट्टीत गावाला गेल्यावर तिच्याबरोबर चालायला लागलं की, वळणाळणारच्या दगडधोड्यांच्या, भुताखेतांच्या गोष्टी सांगत राह्यची. तिची कल्पनाशक्ती जबरदस्त होती. तिने सांगितलेल्या काही गोष्टी या लोकपरंपरेने चालत आलेल्या होत्या. तर काही गोष्टींना तिच्या अनुभवांचा पातळसा का होईना, पण एक नाजुक स्तर होता. त्या पूर्ण खोट्या नव्हत्या. त्यात श्रद्धेचा भाग थोडा अधिक होता, एवढंच! त्या तिने अनुभवलेल्या गावच्या वाडी-वस्तीच्या आणि त्या वस्तीवरच्या माणसांच्या होत्या. एकदा मला सोबत घेऊन ती माहेरी निघाली होती. तिच्या माहेरच्या वाटेवर एक विहीर लागली. मी तिचा हात सोडून लगेच नेहमीप्रमाणे कुतूहलाने त्या विहिरीत डोकावायला गेलो. त्याबरोबर तिने मल पटकन मागे ओढलं. म्हणाली, ‘त्या विहिरीत पाहू नकोस. त्या विहिरीत एक मासा आहे. त्या माशाच्या नाकात मोती आहे. तो मोतीवाला मासा कुणाला दिसला की, त्याला विहिरीची ओढ लागते. आजवर अनेकांनी उड्या घेतल्यात त्या विहिरीत.’ ही गोष्ट ऐकून मी अवाकच झालो आणि तिच्या हाताला धरूनच हळू विहिरीत डोकावून पाहिलं. दुपारची वेळ असल्यामुळे उन्हात विहिरीतले सगळेच मासे चमचमत होते. मी तिला म्हटलं अगं सगळ्यांच्याच नाकात मोती दिसतायत. तशी ती खेकसली आणि मला ओढत दूर घेऊन गेली.
अशा कितीतरी गोष्टी आणि किती गाणी. कधीकधी तर प्रश्न पडायचा की एवढ्या कशा गोष्टी-गाणी हिला ठाऊक? पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे, यातल्या कुठल्याच गोष्टी तिने कधीच माझ्या इतर भावंडांना सांगितलेल्या नाहीत. मी या गोष्टींविषयी सांगायला लागलो की, ते सारे अवाक् होऊन पाहत राहतात. म्हणतात हे तुला तिने कधी आणि केव्हा सांगितलं? आणि तुलाच का सांगितलं?
या प्रश्नाचं मग माझ्याकडे उत्तर नसतं. कदाचित इतर भावंडं जन्माला आली, तेव्हा आई गावालाच होती. गावात साज‍‍ऱ्या होणाऱ्या सगळ्या सणा-उत्सवांत ती नाचायला, गाणी म्हणायला आघाडीवर असायची. ग्रामीण संस्कृतीवर पोसलेल्या तिच्या भावनांनाऊर्जेला या नाचगाण्यातून मोकळीक मिळायची. त्यांचा निचरा व्हायचा. पण दम्यापायी मला घेऊन मुंबईला आली आणि तिचं नाच-गाणं थांबलं ते कायमचंच. पण बहुधा ती आतल्या आत घुमत असावी. नाच-गात असावी. मला ती जे सगळं सांगायची, तो एकप्रकारे तिच्या मोकळं होण्याचाच भाग असावा. मला गाणी सांगताना ती मनातल्या मनात नाचत असणार. घरादाराच्या, रानशिवाराच्या गोष्टी सांगताना ती पुन्हा एकदा मनातल्या मनात गावाकडे फिरून येत असणार. आपलं गाव सुटलंय, हे तिच्या खोल जिव्हारी लागलं होतं बहुधा. म्हणूनच मला गाणी-गोष्टी सांगण्याच्या निमित्ताने ती पुन्हा सगळं कल्पनेने जगून घ्यायची.
आपल्या भावनांच्या निचऱ्यासाठी तिने माझा आसरा शोधला. मात्र तिने माझ्यात शोधलेला हा आसरा, मला संपन्न करून गेला. लोकवाङ्मयाच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेली गाणी आणि गोष्टीही मला तिच्याकडेच मिळाल्या. महत्त्वाचं म्हणजे गावाला फार न राहताही, एक संपन्न ग्रामसंस्कृती माझ्यात रुजली. ही ग्रामसंस्कृती कदाचित भाबडी असेल. पण जीवनाकडे सकारात्मक पद्धतीने बघायला शिकवणारी होती. त्यामुळेच समजायला लागल्यावर जेव्हा जेव्हा गावी गेलो, किंवा अजूनही जातो, तेव्हा आईने सांगितलेली ग्रामसंस्कृतीच गावात, गावच्या घरात शोधतो. म्हणूनच मला तेव्हाही आवाडातली झाडं कधी निर्जीव वाटली नव्हती. तिने मला निसर्गाशीच बोलायला शिकवलं होतं. त्यामुळे मी घरी गेल्यावर आधी सगळ्यांशी संवाद साधायचोच. पण गावाकडून निघतानाही घराचा, झाडाझुडपांचा, अगदी गायीगुरांचाही निरोप घ्यायचो. त्यांना सांगायचो- ‘आता मी निघालो. आता वर्षभर आपली भेट नाही. छान राहा हं सांभाळून.’ हे सगळं तिनेच मला आपसूक शिकवलं होतं. त्यामुळे मी तिच्यासारखाच गावच्या घरात, वातावरणात, तिथल्या मातीत आणि माणसांतही मी मिसळून गेलो. गावाकडे फार न जाताही त्याच्याशी जोडलेला राहिलो.
आईचा जीव तर शेवटपर्यंत गावच्या घरात गुंतलेला होता. मुंबईला आवडत नाही, म्हणून शेवटची दोनेक वर्षं ती गावाकडेच, पण माझ्या बहिणीच्या गावी होती. परंतु तिच्याकडे असतानाही तिला ओढ आपल्याच गावाची आणि घराची लागली होती. तिचा सारखा हेका सुरू असायचा-माझ्या गावी न्या म्हणून. पण तिथे तिला पाहणारं कुणीच नव्हतं. शेवटी नुकतीच तीन वर्षांपूर्वी वयाच्या ८१व्या वर्षी ती गेली, तेव्हा तिला आमच्या गावी, तिच्या घरी नेण्यात आलं. पण तोपर्यंततिने डोळे मिटले होते. मला कळल्यावर मुंबईवरून निघून मी गावी पोचलो तेव्हा, ती आपल्या घरात शांतपणे झोपली होती. रात्र झालेली होती. मग लहानपणी तिच्या कुशीत झोपायचो, तसा मी तिच्याजवळच झोपलो. तिच्या अंगावर हात टाकून. सकाळी उठलो तेव्हा आधी, तिचं पोट खालीवर होतंय का ते पाहिलं. लहानपणी ती आपल्यापासून दूर जाईल या भीतीने, कधीही उठलो तरी आधी मी श्वासाबरोबर खाली-वर होणारं तिचं पोट पाहायचो. त्यादिवशीही मी सरावाने तिच्या पोटाकडे पाहिलं. मात्र ते हलत नव्हतं. शांत झालं होतं.
मनात आलं, शेवटचे काही दिवस या तिच्या हक्काच्या घरात तिला आणायला हवं होतं. हे घर बांधून झाल्यावर या घरात ती कधीच हक्काने राहिली नव्हती. सण-उत्सवांत खेळली-मिरवली नव्हती. उगाचंच उदास वाटायला लागलं. ती गेल्यावर, तर त्या गावाबद्दलची, घराबद्दलची माझी ओढ कमी झाली. कधीच जाऊ नये तिकडे असंही वाटायला लागलं
पण तिनेच माझ्यात रुजवलेली ग्रामसंस्कृती एवढी तकलादू नव्हती, कदाचित! काही दिवसांनी मला त्या गावाच्या-घराच्या हाका ऐकू येऊ लागल्या. त्यात आईचीही हाक होती मिसळलेली. जणू ती सांगत होती – ‘मी आहे, या घरात, गावात, आणि आजूबाजूच्या परिसरात. एवढंच नाही, तर तुला सांगितलेल्या गाण्यांत आणि गोष्टींतही. जोपर्यंत तुला ते सारं आठवतंय. तोपर्यंत तुला या वाडीवस्तीत यावंच लागेल. मला भेटायला, आपल्या घराला भेटायला.’
आणि खरोखरच मी पुन्हा निमित्तानिमित्ताने का होईना गावाकडे जायला लागलो. पुन्हा एकदा घरामागच्या आवाडात फिरायला लागलो. झाडाझुडपांशी बोलायलो लागलो. एवढंच कशाला आता आई नसली, तरी गावच्या वाटेवरून चालताना मला ऐकू येतात, तिने सांगितलेल्या दगडधोंड्यांच्या आणि भुताखेतांच्या गोष्टी        

(पूर्वप्रकाशित)

सोमवार, १६ नोव्हेंबर, २०१५

त्या दोघींचा आत्मसन्मानाचा लढा!


 
मुकुंद कुळे
मुद्दुपलनी आणि नागरत्नम्मा. दोघींच्यात जवळजवळ शंभर दीडशे वर्षांचं अंतर होतं. पण दोघीही आपल्या आत्मसन्मानासाठी लढल्या. देवदासी असलेल्या मुद्दुने अठराव्या शतकात 'राधिकासांत्वनमु' हे तेलुगु शृंगारकाव्य लिहिलं. पण स्त्रीने सांगितलेला शृंगार म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. मात्र मुद्दुनंतर शंभर वर्षांनी जन्माला आलेल्या नागरत्नम्माने मुद्दुपलनी आणि तिच्या काव्याला न्याय मिळवून देण्यासाठी झगडा केला...त्याची कथा


........
जेव्हा तुझा नवरा तुला धरेल
तेव्हा तुझ्या छातीने त्याला हलकेच ढकल
जर त्याने  तुझ्या गालाचा मुका घेण्याचा प्रयत्न केला,
तर त्याच्या ओठांवर हळुवारपणे तुझे ओठ टेकव
जेव्हा तो तुझ्यावर स्वार होईल, तेव्हा तू खालून त्याला हलकेच साथ दे
प्रणय करताना जर तो थकला, तर प्रणयाची सूत्र तू हाती घे.
लगेच तू त्याच्यावर स्वार हो...                                                               
तो एक चांगला रसिक आणि  समर्पित होणारा प्रेमी आहे...
त्याच्याशी कुशलतेने प्रणय कर आणि त्यालाही करायला दे
असं म्हणत राधेने ईलाला कृष्णाकडे ढकललं. नंतर कृष्णाजवळ जाऊन ती मंदस्वरात त्याला म्हणाली -
तिची छाती अगदीच कोवळी आहे, माझ्यासारखी भरलेली नाही
तेव्हा जोराने दाबू नकोस
तिचे ओठ एखाद्या मृदू पर्णासारखे आहेत, माझ्यासारखे कडक नाहीत
तेव्हा त्यांचा जोराने चावा घेऊ नकोस
माझ्या मांड्या तुझ्याशी कुस्ती खेळायला आता सरावल्यात
पण तिच्या मांड्या अजून केळीसारख्या कोवळ्या गाभ्यासारख्या आहेत.
ती माझ्यासारखी घट्टमुट्ट नाही, तिचं शरीर अगदी नाजूक आहे
ती तुझ्या बरोबरीची नाही, प्रणयक्रीडेत अजून नवीन आहे.
तिच्याशी कसं वागायचं, हे मी तुला सांगायला हवं का?
मला माहीत आहे, प्रत्येक स्त्रीसाठी तू नेहमीच चांगला प्रियकर राहिला आहेस
तेव्हा तिच्या ओठांवर तुझ्या जिभेचं टोक फिरव, ते पिळू नकोस.
तिच्या गालांचा हलकेच मुका घे, ते ओरबाडू नकोस
तिच्या स्तनाग्रांवर हळूवार बोट फिरव, ती चुरडू नकोस.
अगदी हळुवारपणे प्रणय कर, धसमुसळेपणाने नको...

... कुठल्याही शृंगारकाव्यात खपून जातील अशाच या काव्यपंक्ती आहेत. प्रणयक्रीडेतील भावना जरा अधिकच मोकळेपणी मांडल्यात. पण कुणाही स्त्री-पुरुषांच्या त्या सवयीच्या आहेत. फक्त खाजगी शृंगारिक भाव थोडा थेट, आक्रमकपणे आणि उघडपणे मांडलाय एवढंच! परंतु भारतीय महाकाव्यांमध्ये अशा वर्णनांची कमतरता नाही. किंबहुना अभिजात वाङ्मयात शृंगाररसाला कायमच वरचं स्थान मिळालेलं आहे. शेवटी शृंगार ही सर्वाधिक महत्त्वाची नैसर्गिक भावना आहे. तसंच काव्यनिर्मिती करण्यात पुरुषवर्गच आघाडीवर असल्यामुळे त्यानं हातचं न राखता स्त्री-पुरुष संबंधांचं रसभरीत वर्णन आपल्या काव्यातून केलं आहे. त्यातही स्त्रीच्या अंगप्रत्यंगाचं. ओठांपासून मांड्यांपर्यंत आणि स्तनांपासून नितंबांपर्यंत. मग तो कालिदास असो किंवा भर्तृहरी किंवा मोरोपंत-रघुनाथपंडित... अर्थात वाचकांनीही ती काव्यं मग्न होऊन वाचलेली आहेत. वाचकही अर्थात पुरुषच... पूर्वीच्या काळी! तेव्हा वरील शृंगारिक काव्यपंक्तीही त्यांनी चवीनेच वाचल्या असतील, यात शंका नाही. चवीचवीनेच ते वर्णन वाचलं असेल आणि वाचताना कृष्णाच्या, राधा व ईलाबरोबरच्या कामलीलाही नजरेसमोर आणल्या असतील...!
... अन् तरीही वरील काव्य वाचल्यावर १८व्या शतकात तत्कालीन समाजातील संस्कृतीरक्षकांनी हैराण होऊन अब्राह्मण्यम्...शांतंपापंअशी बोंब ठोकलीच! हे काय लिहून ठेवलंय, अशी एकच हाकाटी मारली... कारण राधिका सांत्वनमुनावाचं हे शृंगारकाव्य कुणा पुरुषाने लिहिलेलं नव्हतं. ते लिहिलं होतं, एका स्त्रीने- मुद्दुपलनीने. तंजावरचे इतिहासप्रसिद्ध कलारसिक राजे प्रतापसिंह (राज्यकाळ १७३०-१७६३) यांच्या दरबारातील देवदासी आणि त्यांची भोगदासीही असलेली- मुद्दुपलनी!
मुद्दुपलनी (१७३९ १७९०) बोलूनचालून एक स्त्री. एका स्त्रीने शृंगारकाव्य लिहावं, त्यातही ते थेट उघडवाघडं लिहावं, आणि एवढंच नाही, तर तिने स्त्रीने  कामक्रीडेत कसा पुढाकार घ्यावा, हे सांगावं  हा त्यांच्या मते घोर अपराधच! कारण स्त्री कशी शालिन हवी. पडदानशिन हवी. कितीही उत्तेजित झाली, तरी तिने आपल्या कामभावना दडपूनच टाकल्या पाहिजेत. त्यांत पुरुषाला वरचढ तर तिने ठरताच कामा नये...
पण मुद्दुपलनीने पुरुषसत्ताक पद्धतीने लादलेला हा सामाजिक विधिनिषेध मुळीच मानला नाही. परंपरेने सांगितलेली राधा-कृष्णाची गोष्ट न सांगता तिने नवीच गोष्ट सांगितली रचून. राधेला कृष्णाची ज्येष्ठ पत्नी दाखवून, तिने ईला नावाचं एक नवीनच पात्र त्याच्या आयुष्यात आणलं. ही ला, राधा-कृष्णाच्या परिचयातलीच. राधा-कृष्णाचा कामलीलांनी युक्त संसार सुरू असताना, ईला लहानगी होती. तीही सतत त्यांच्या बरोबरच असायची. अंगणापासून शयनगृहापर्यंत. तिच्या वाढत्या वयातल्या भावना राधेने त्या काळात समजून घेतल्या आणि त्या भावनांना पोषक खतपाणीही घातलं. परंतु तेव्हा राधेला कुठे ठाऊक होतं, की ही ईलाच येईल आपल्या आणि कृष्णाच्या मध्ये...? पण ती आलीच त्या दोघांच्या मध्ये तेव्हा, अतिशय सुकुमार असलेल्या आणि कामलीलांपासून अनभिज्ञ असलेल्या ईलेला, त्याबाबतीत तयार करण्याची जबाबदारीही राधेवरच पडली. राधेनेही ती कौशल्याने पार पाडली.
... ही राधा म्हणजे मुद्दुच तर होती. प्रतापसिंहाकडून दुखावली गेलेली. तिचं प्रतापसिंहावर आणि प्रतापसिंहाचं तिच्यावर नितांत प्रेम होतं. तत्कालीन प्रसिद्ध देवदासी आणि वीणावादक असलेल्या तंजनायकीची नात असलेली मुद्दु वादन-नर्तन आणि लेखनातही हुशार होती. तिचं संस्कृत, तमिळ आणि तेलुगु या तीनही भाषांवर वर्चस्व होतं. एवढंच नाही, तिने जयदेवाच्या गीत गोविंदमया काव्याचा तेलुगुत अनुवाद केला होता. तसंच प्रसिद्ध तमिळ स्त्रीसंत आंदाळ यांच्या तिरुप्पवईया रचनाही तिने लोकांसमोर आणल्या. त्या आणताना तिने सप्तपदम म्हणजे सात ओळींच्या रचना केल्या, ज्या लोकप्रिय झाल्या. मुद्दुच्या या कलानिपुणतेचीच ख्याती प्रतापसिंहांच्या कानावर गेली. स्वतः प्रतापसिंह मराठी, तमिळ, तेलुगु आणि संस्कृत भाषेचे जाणकार होते. त्यांनी स्वतः कृष्णमंजिरी’, ‘उमासंहिता’, ‘पारिजातयांसारखी मराठी नाटकं लिहिली होती. खरंतर ते ज्या काळात तंजावरच्या गादीवर आले, तो काळ अतिशय धामधुमीचा होता. तंजावरात भोसल्यांची सत्ता स्थिर होऊन काळ उलटून गेला होता. तंजावरवर कब्जा मिळवण्यासाठी अर्काटच्या नवाबाबरोबरच फ्रेंच आणि इंग्रजही टपून बसले होते. या साऱ्यांशी सावधपणे सामना करत, प्रतापसिंहांनी आपलं राज्य टिकवून ठेवलं. सततची युद्ध, दंगली आणि कारस्थानांच्या मालिकांमध्येही त्यांनी कलांचे चाहतेही तंजावरच्या राजांची ख्याती टिकवून ठेवली. त्यामुळेच अंदाधुंदीच्या वातावरणातही त्यांनी विविध कलांना कायम प्रोत्साहनच दिलं. साहजिकच देवदासी असलेल्या मुदुदपलनीची लोकप्रियता कानावर पडताच, त्यांनी तिला राजदरबारात नर्तन-गायन करण्यासाठी आमंत्रित केलं...आणि पहिल्याच फटक्यात त्यांचा तिच्यावर जीव जडला. देवदासी असलेली मुद्दुपलनी लगेच प्रतापसिंहांची भोगदासी झाली.
राजाश्रय मिळाल्यावर मुद्दुपलनीला आर्थिक स्थैर्य लाभलंच. त्याशिवाय तिला आपल्या कलागुणांचाही अधिक विकास करता आला. परंतु कालांतराने प्रतापसिंहांचं मुद्दुकडे काहीसं दुर्लक्ष होऊ लागलं. राजे असल्यामुळे त्यांना स्त्रियांची तशी कमी नव्हतीच. परंतु त्या सगळ्यांपेक्षा मुद्दुपलनी वेगळी होती. ती निव्वळ देखणी किंवा कुशल नर्तिका नव्हती. ती विद्वान आणि त्याबद्दलचा सार्थ अभिमान असलेली स्त्री होती. त्यामुळेच प्रतापसिंहाने आपल्याला अव्हेरणं तिला लागलं आणि तिने आपण स्वतः, प्रतापसिंह व त्याच्या आयुष्यात आलेलं आणखी कुणी... असा कल्पनाबंध रचून, त्यावर राधिका सांत्वनमुहे ४ भागांचं आणि ५८४ पदं असलेलं प्रतीकात्मक तेलुगु शृंगारकाव्य लिहिलं. वाचणाऱ्यांना ती खरोखरच राधा, कृष्ण आणि लेची गोष्ट वाटली. पण जे मुद्दु आणि प्रतापसिंहाना ओळखत होते, त्यांना मात्र खरं काय ते ठाऊक होतं. महत्त्वाचं म्हणजे राधिका सांत्वनमुचा शेवट सुखांत होता. कृष्ण पुन्हा राधेकडे परततो आणि तिची माफी मागतो, म्हणजेच तिचं सांत्वन करतो, असं त्यात दाखवण्यात आलं आहे. मुद्दुच्या आयुष्यातील प्रत्यक्षातल्या प्रेमत्रिकोणाचा शेवट काय झाला, ते मात्र ठाऊक नाही.
मुद्दुपलनी स्वतःच्या क्षमतेचा आणि ज्ञानाचा आवाका नीट ठाऊक असलेली स्त्री होती. तसंच लैंगिक भावना फक्त पुरुषालाच असतात असं नाही, तर स्त्रीलाही असतात; फक्त त्या दाबून ठेवाव्या लागतात, हे ती चांगलंच जाणून होती. म्हणूनच तिने एकप्रकारे राधिका सांत्वनमुया काव्याच्या आधारे स्त्रीच्या लैंगिक भावनांना उघडउघड आवाज दिला. स्त्रीलाही लैंगिक भावना असतात, हे तिने दणक्यात सांगितलं. मुख्य म्हणजे हे करताना, आपण काय करतोय याचं तिला नेमकं भान होतं. आपण तंजावरच्या राजदरबारातल्या कुठल्याही विद्वानापेक्षा कमी नाही, याची तिला जाण होती. आणि ती स्वतःला त्यांच्या बरोबरीचीच मानायची. तिच्या या निर्भर आणि ठाम भूमिकेमुळे, तसंच ती राजाची भोगपत्नी असल्यामुळे तिच्या हयातीत कुणी थेट या काव्याच्या विरोधात बोललं नाही. किंबहुना वरवर कौतुकही केलं. परंतु या काव्याचा फार गाजावाजा होणार नाही, याची मात्र पक्की तजवीज करण्यात आली. इतकी की लवकरच हे काव्य काळाच्या उदरात गडप झालं. त्याचं अस्तित्वच पुसून टाकण्यात आलं. कारण ते एका स्त्रीने लिहिलं होतं. मात्र मुद्दुच्याच काळात लिहिल्या गेलेल्या रघुनाथनायकभ्युदयामु’ (रघुनाथाच्या आयुष्यातील एक दिवस) या काव्यात राजा आणि चित्रलेखा या वारांगनेचा रंगवण्यात आलेला प्रणय सहज स्वीकारला गेला. एवढंच नाहीतर त्याचं कौतुकही झालं. कारण तो शृंगार एका पुरुषाने रंगवलेला होता.
मुद्दुपलनीचं राधिका सांत्वनमुकाव्य तिच्या हयातीतच नजरअंदाज व्हायला लागलं होतं. हा पुरुषसत्ताक समाज आपलं काव्य सहजासहजी स्वीकारणार नाही, हे खरंतर मुद्दुपलनीलाही ठाऊक होतंच. म्हणून तिने आपल्या काव्यात काही गमतीजमतीही केल्या होत्या. काही ठिकाणी तिने थेट चित्रण करण्याऐवजी व्यासाचा मुलगा महर्षी शुक आणि विद्वान राजा जनक यांच्या संवादरुपात तिने काही कविता सादर केल्या. जेणे करुन कुणीही आपल्या काव्यावर अश्लीलतेचा आरोप करू नये. यावरुन मुद्दुपलनी तत्कालीन समाजाला आणि धार्मिक-सांस्कृतिक सत्ता ज्यांच्या हाती होती, त्यांना व्यवस्थित ओळखून होती, हे सिद्ध होतं. म्हणजे लेखक म्हणून असलेला आपला आत्मसन्मान जपण्याचा तिने हिरिरीने प्रयत्न केला. दुर्दैवानं तिच्या प्रयत्नांना यश आलं नाही. तिच्या हयातीतच तिचं काव्य विस्मृतीत जाऊ लागलं. तिच्या पश्चात तर, कुणी त्याची आठवण काढण्याचं काहीच कारण नव्हतं. तंजावरच्या राजदरबारात एवढं मानाचं स्थान लाभलेली विद्वान. पण तिला परंपरेनं हरवलं. सनातनी वृत्तीच्या समाजाने तिचा काव्यग्रंथ स्वीकारला नाही. जणू लेखक म्हणून तिची कर्तबगारीच मिटवण्यात आलीनाकारण्यात आली


मुद्दुपलनीच्या राधिका सांत्वनमुला न्याय देण्यासाठी
 झगडणारी नागरत्नम्मा 

पण काळ सूड उगवतो.
तब्बल शंभर-दीडशे वर्षांनी नागरत्नम्मा जन्माला (१८७८-१९५२) आली. मुद्दुपलनीचीच विद्वत्ता, रुप आणि तेज घेऊन. योगायोग म्हणजे नागरत्नम्माही देवदासीच होती. तिची आई पुटुलक्ष्मी प्रसिद्ध देवदासी-गणिका होती. नागरत्नम्माच्या जन्मानंतर लगेचच जन्मदाता आणि पालक असलेल्या वकील सुब्बाराव यांनी पुट्टुलक्ष्मीला सोडून दिलं. त्यानंतर पुट्टुलक्ष्मी म्हैसूर संस्थानच्या दरबारातील संस्कृत विद्वान असलेल्या शास्त्रींच्या आश्रयाला गेली. त्यांनी काही वर्षं पुट्टुलक्ष्मी आणि छोट्या नागरत्नम्माला आश्रय दिला. या काळात त्यांनी नागरत्नम्माला संस्कृत आणि संगीताचे धडे दिले. परंतु नागरत्नम्मा पाच-सात वर्षांची असतानाच त्यांनी नागरत्नम्माला देवदासी म्हणून सोडलं आणि तिच्या आईलादेखील. पुट्टुलक्ष्मी यामुळे प्रचंड संतापली. आपल्याला सन्मान मिळाल्याशिवाय पुन्हा म्हैसुरात पाय ठेवायचा नाही, असा निश्चय करुन ती नागरत्नम्माला घेऊन बेंगळुरुचे एक परिचित वेकंटस्वामी अप्पा यांच्याकडे गेली. वेंकटस्वामी विद्वान आणि व्हायोलिनवादक होते. त्यांच्या आश्रयाखाली नागरत्नम्माने इंग्रजी, कन्नड आणि तेलुगु भाषांचे धडे गिरवलेच. सोबत व्हायोलिनवादन आणि नृत्यही शिकून घेतलं. या साऱ्यांत ती एवढी पारंगत झाली की अवघ्या १५ वर्षी तिने जाणकारांसमोर गायन-नर्तन करुन त्यांना चकीत केलं.
नागरत्नम्माच्या पहिल्याच सादरीकरणाचं खूप कौतुक झालं. ते ऐकून तिला थेट म्हैसूर संस्थानचे अधिपती सर चामराजेंद्र ओडियार यांनी आमंत्रण दिलं. म्हैसूरमधील त्यांच्या प्रसिद्ध जगनमोहन पॅलेसमध्ये नागरत्नम्माच्या कलेचं सादरीकरण झाल्यावर, मग आजूबाजूच्या त्रावणकौर, बोब्बली अशा विविध संस्थानांतून नागरत्नम्माला कलेच्या सादरीकरणासाठी आमंत्रणं येऊ लागली. परिणामी नागरत्नम्माची विद्वत्ता, सौंदर्य आणि कलानिपुणतेची सर्वत्र चर्चा होऊ लागली. ती चर्चा ऐकून उच्च न्यायालयातील न्यायाधीश नरहरी राव यांचं तिच्याकडे लक्ष गेलं आणि त्यांनी तिला सन्मानाने बोलावलं. त्यांच्या आश्रयाला जाताच नागरत्नम्माला सामाजिक मान-प्रतिष्ठा सारं काही मिळालं. तत्कालीन घरंदाज लोकांमध्ये तिचं नाव घेतलं जाऊ लागलं. एवढंच नाही, तर मैफलीतली कलाकार म्हणूनही नागरत्नम्मा ओळखली जाऊ लागली. त्यानंतर संपूर्ण दक्षिण भारतात तिला एवढा मानमरातब आणि पैसा मिळाला की आयकर भरणारी पहिली महिला म्हणून नागरत्नम्मा ओळखली जाते. आपल्या या कलेबरोबरच नागरत्नम्मा, कर्नाटक संगीताला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या संगीतकार त्यागराज यांच्याप्रती असलेल्या समर्पणासाठीही ओळखली जाते. या दरम्यान कला सादर करतानाच तिने स्वतःची प्रकाशनसंस्था सुरू केली आणि संस्कृत, कन्नड, तेलुगु अशा विविध भाषांत ती भाषण देत फिरू लागली. या भ्रमंतीदरम्यानच तंजावरमध्ये गेलेली असताना नागरत्नम्माला मराठा राजांवरील लेखात पहिल्यांदा मुद्दुपलनी व तिच्या राधिका सांत्वनमुया काव्याचा उल्लेख आढळला.
आणि नागरत्नम्माचं आयुष्यच बदलून गेलं. तिने मुद्दुपलनी आणि तिच्या राधिका सांत्वनमु ग्रंथाचा शोध सुरू केला. शंभरेक वर्षांपूर्वी एका स्त्रीने शृंगारिक काव्य लिहावं, याचंच तिला कौतुक वाटलं होतं. खूप शोधाशोध केल्यावर तिला या काव्याची एक प्रत सापडली. परंतु त्यातून अनेक गोष्टी गाळलेल्या असल्याचं तिच्या लक्षात आलं. पहिला तेलुगु-इंग्रजी शब्दकोश तयार करणाऱ्या तेलुगुपंडित चार्ल्स फिलिप ब्राऊन याने १८५५ मध्ये इंग्लंडला परत जाताना आपल्याकडील पुस्तकांचा खजिना मद्रासच्या ओरिएन्टल ग्रंथालयाला दिला होता. त्या खजिन्यात मुद्दुपलनीच्या राधिका सांत्वनमुचं हस्तलिखित होतं. या हस्तलिखितावरुन पैदिपती व्यंकटनरसू यांनी आधी १८८७ आणि नंतर १९०७ मध्ये राधिका सांत्वनमुप्रकाशित केलं. मात्र ज्या कारणाने शंभर वर्षांपूर्वी या काव्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं, त्याच कारणासाठी पैदिपती व्यंकटनरसू यांनीही या पुस्तकातील काही भाग गाळून टाकला. एक स्त्री आपल्या लैंगिकतेविषयी एवढं उघड उघड कसं काय लिहू शकते, असाच त्यांचाही सवाल होता. परिणामी पैदिपती यांनी राधिका सांत्वनमुमधील बराचसा शृंगारिक भाग गाळून टाकला. तसंच मुद्दुमपलनीने आपल्या काव्यात स्वतःची, विद्वान देवदासींची जी उज्ज्वल परंपरा सांगितली होती, तो भागही गाळून टाकला. नागरत्नम्माच्या हाती लागलेली प्रत हीच पैदिपती व्यंकटनरसू यांनी संपादित केलेली होती.
नागरत्नम्माला हे संपादित पुस्तक मुळीच आवडलं नाही. यातला आत्माच पैदिपती व्यंकटनरसू यांनी काढून घेतलाय, असं तिला वाटलं. कारण तिला मुद्दुपलनीच्या काव्यातली गेयता आणि तिचा थेटपणा आवडला होता. त्यामुळे मुद्दुचं काव्य स्वतःच पुन्हा नव्याने छापण्याचा तिने निर्धार केला. त्यासाठी तिने मूळ हस्तलिखित पोथीही मिळवली आणि राधिका सांत्वनमुनव्याने छापलं. नागरत्नम्माने संपादित केलेली राधिका सांत्वनमुची ही आवृत्ती प्रसिद्ध तेलुगुपंडित आणि सरस्वती मुद्रालयाचे मालक वाविल्ला रामास्वामी शास्त्रुलु यांनी १९०९मध्ये छापली होती. या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत नागरत्नम्माने लिहिलं होतं – ‘मुद्दुपलनीचं हे काव्य वाचण्याचा मला वारंवार मोह होतो. यात विविध रसांच जे वर्णन करण्यात आलं आहे, ते फक्त मुद्दुपलनीच करू शकते, कारण ती देवदासी परंपरेतली होती. केवळ समृद्ध अनुभवामुळेच असं लेखन करता येऊ शकतं.
अर्थात काळ बदलला, तरी सनातनी वृत्ती तशीच होती. त्यामुळेच १८व्या शतकातील काव्य विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात छापलं गेलं, तेव्हाही त्याला नैतिकतेच्या तथाकथित ठेकेदारांच्या टीकेला सामोरं जावं लागलंच. या काव्यावर आणि नागरत्नम्मावर टीका करताना ससिलेखानावाच्या अनियतकालिकात लिहिण्यात आलं होतं – ‘एका वेश्येने लिहिलेलं असं पुस्तक, दुसरी वेश्याच प्रकाशित करू शकते.त्यानंतर काही संस्कृतीरक्षकांनी तक्रार केल्यामुळे प्रकाशकाच्या कार्यालयावर छापा टाकून राधिका सांत्वनमुच्या प्रती तत्कालीन ब्रिटिश सरकारने जप्त केल्या. परिणामी १९११मध्ये कनिंगहॅमचे पोलिस आयुक्त व मुख्य न्यायाधीशांनी नागरत्नम्मा आणि तिच्या प्रकाशकांवर अश्लील साहित्य प्रकाशित केल्याचा ठपका ठेवला आणि या पुस्तकावर बंदी आणली. एवढंच नाही, तर पुस्तकाच्या प्रती मिळवून त्या नष्ट करण्यात आल्या.
एका स्त्रीने शृंगारिक काव्य लिहिलं, म्हणून पुन्हा एकदा मुद्दुपलनी आणि तिच्या काव्याला काळकोठडीत ढकलण्यात आलं.  
या प्रकाराने नागरत्नम्मा व्यथित झाली. पण तिने हार कधीच मानली नाही. ज्यांनी ज्यांनी राधिका सांत्वनमुवर अश्लीलतेचा आरोप केला त्या सगळ्यांना तिने त्या-त्या वेळी ठामपणे उत्तर दिलं. तत्कालीन मद्रास राज्यातील महिलांच्या मोहिमेत कायम आघाडीवर असणारे कंडुकरी वीरसालिंगम यांनी आक्षेप घेतला होता – ‘पुस्तकातील काही उल्लेख लज्जास्पद आणि स्त्रियांनी ऐकू नयेत, असे आहेत. केवळ वेश्यांनीच त्याचा उच्चार करावा.यावर नागरत्त्नम्माने लगेच प्रत्युत्तर दिलं होतं- शिष्टाचार आणि अपमान या गोष्टी केवळ महिलांनाच लागू होतात का? लैंगिक सुखाविषयी बारीकसारीक उल्लेख करणे आणि कुठल्याही आडपडद्याशिवाय लिहिणे, हे ती केवळ वारांगना आहे, म्हणून मान्य आहे, असं वीरसालिंगम यांना सुचवायचं आहे का? राधिका सांत्वनमुमधील अश्लीलता तुम्ही स्वतः समीक्षा केलेल्या व प्रसिद्धी दिलेल्या वैजंयतिविलासममधील अश्लीलतेपेक्षा वेगळी आहे का?’
जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा नागरत्नम्माने आक्षेपकर्त्यांना सणसणीत चपराक लगावलेली आहे. परंतु अठराव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध हा काळच असा होता की, ब्रिटिश अमलाखाली व्हिक्टोरियन मोरॅलिटीची मुळं नवशिक्षित भारतीय समाजात रुजत होती. परिणामी आधी अठराव्या शतकातील सनातन्यांनी राधिका सांत्वनमु नाकारलं आणि विसाव्या शतकात इंग्रजी शिकून नवशिक्षित झालेल्या समूहाने ते नाकारलं. इंग्रजी शिक्षणाने शहाणे झालेल्या तत्कालीन दक्षिणेतील ब्राह्मण समाजाने ब्रिटिश व्हिक्टोरिया राणीवरील प्रेमामुळे मुद्दुपलनीचं लेखन कामुक असल्याचा अपप्रचार केला. तसंच देवदासी आणि त्यांच्या कला समाजव्यवस्था भ्रष्ट करत असल्याचाही आरोप केला. मुख्यतः नवशिक्षित समाजाच्या या भूमिकेमुळेच, तत्कालीन दंड संहितेच्या २९२ कलमांतर्गत दुसऱ्यांदा राधिका सांत्वनमुवर बंदी आली.
राधिका सांत्वनमुवरची ही बंदी भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत कायम होती. स्वातंत्र्यानंतर एक-दोन वर्षांनी मद्रासचे तत्कालीन मु्ख्यमंत्री व आंध्रकेसरी म्हणून प्रख्यात असलेले तंगुतरी प्रकासन यांनी ही बंदी उठवली. ही बंदी उठवताना ते म्हणाले – ‘तेलुगु साहित्याच्या संपन्न मालेतील काही मोती या निमित्ताने मी पुन्हा स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे.
उमेद असेपर्यंत नागरत्नम्माने राधिका सांत्वनमुचा मुद्दा लावून धरला. मात्र त्या पुस्तकावरची बंदी उठली, तेव्हा नागरत्नम्मा थकलेली होती. योगायोग म्हणजे १९ मे १९५२ मध्ये नागरत्नम्माचं निधन झालं. त्याच वर्षी वाविल्ला रामास्वामी शास्त्रुलु यांनीच राधिका सांत्वनमुच्या नागरत्नम्मा संपादित दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन केलं. कारण मुद्दुपलनीची कला-साहित्य टिकवून ठेवण्यासाठी नागरत्नम्माने दिलेला लढा, किंवा उपसलेले कष्ट म्हणजे, एक मोठ धाडसंच होतं, हे त्यांना ठाऊक होतं.
मुद्दुपलनीने १८ व्या शतकात स्त्रीलाही आपल्या लैंगिक भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे, हे आपल्या कलाकृतीतून सांगितलं आणि आपल्या आत्मसन्मानासाठी सनातन्यांशी शेवटपर्यंत लढत राहिली. हाच आत्मसन्माचा लढा नागरत्नम्माने २० व्या शतकाच्या पूर्वार्धात नवशिक्षित समाजाविरुद्ध दिला.
शेवटी मुद्दुपलनी काय किंवा नागरत्नम्मा काय, देवदासी असल्या तरी, त्यांना जो आत्मसन्मानाचा झळझळता मार्ग दिसला, तो आमच्या सनातन्यांना, संस्कृतीच्या तथाकथित ठेकेदारांना कधीतरी दिसेल काय?